मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24)माणुसकी
माणुसकी
-रश्मी घटवाई 
"सराय काले खान बस अड्डा उतरने वाले लोग आगे चलो,बस यहीं रुकेगी !"कंडक्टरनं घोषणा केली,तशी भागवती हातातली पिशवी आणि डोक्यावरचा घुंघट सावरत दोघा लहानग्यांचा हात घट्ट धरून दिल्लीतल्या त्या बस स्टेशनवर उतरली.आग्र्याजवळच्या एका अत्यंत लहानशा खेडेगावातून ती अशिक्षित स्त्री आपल्या दोघा कच्च्याबच्च्यांना घेऊन चांगला साडेचार-पाच तासांचा प्रवास करून धडपडत नवऱ्याचा शोध घेण्यासाठी इथवर आली होती. कुठे जायचं कसं जायचं ते ईश्वराधीन होतं.सकाळी सहा वाजता तिनं एटा सोडलं,तेव्हा तिची लहानगी समजूतदार मुलं पेंगुळली असली तरी नं कुरकुरता आईबरोबर मुकाट्यानं प्रवास करीत होती.प्रवासात तिनं फडक्यात बांधून घेतलेल्या कालच्या पोळ्या लोणच्याशी खाऊन आणि पाणी पिऊन आयुष्यातला इतका लांबचा पहिलावहिला बसप्रवास अनुभवतांना हरखून गेली होती.आपल्या आईच्या मनाची घालमेल समजण्याचं त्यांचं वय नव्हतं.
उन्हं चढायला सुरुवात झाली होती.आजूबाजूला अनेक स्त्रीपुरुष प्रवासी हातातलं सामान सावरत आपापल्या बससाठी वाट पाहत उभे होते भागवतीनं धीर एकवटून हातातला चुरगळलेला पत्त्याचा कागद एकीसमोर धरला. "जे कहाँ पडेगा?"तिनं विचारलं. तीही भागवतीसारखीच अशिक्षित निघाली.अखेरीस चारपाच लोकांना विचारल्यावर एकानं तिला मदत केली. 
"नोएडा स्टेडियम का पता लिखा है इसमें ."
"न्योएडाही जाना है .कैसे जाएंगे ?"अनोळखी परपुरुषांशी बोलायचा प्रसंग आल्यामुळे तिनं पुन्हा धीर एकवटला .
"नोएडामें कहाँ जाना है ?"
"इसी पतेपर!"तिनं सांगितलं . 
"इस बस में बैठकर चली जाओ. ये नोएडा जाएगी.नोएडा स्टेडियम उतर जाना.दस रुपये बस का किराया लगेगा  !"त्या माणसानं तिला समजावून सांगितलं आणि समोरच्या एका बसकडे अंगुलीनिर्देश केला.त्या खटारा बसचा कंडक्टर नोएडा नोएडा पुकारा करत प्रवासी गोळा करत होता.भागवती मुलांना घेऊन बसमध्ये चढली.पिशवीतून चुरगळलेली दहा रुपयांची काढून देऊन तिनं नोएडा स्टेडियमचं तिकीट घेतलं.अखेरीस सवाऱ्या मिळाल्यानंतर पंधरा मिनिटांनी बस तिथून निघाली आणि तासाभरानी नोएडा स्टेडियमला पोहोचली. समोर अर्ध बांधकाम झालेलं नोएडा स्टेडियम उभं होतं. तिचा नवरा किशन तिथे बांधकामासाठी मजूर म्हणून दीडदोन वर्षांपूर्वी आलेला होता.एटातल्या त्याच्या लांबच्या नात्यातल्या एकानं ते काम करणाऱ्या मुकादमाकडे त्याची शिफारस करून त्याला तिथे कामावर चिकटवून घेतलं होतं.आपला खर्च भागवून किशन गावी राहणाऱ्या बायको पोरांना आणि वृद्ध आईला उदरनिर्वाहासाठी म्हणून आताआतापर्यंत एक ठराविक रक्कम पाठवत होता.मात्र दोन महिन्यांपासून त्याच्याकडून पैसे आले नव्हते,त्याची ख्यालीखुशाली कळली नव्हती.भागवतीच्या जिवात जीव नव्हता आणि दोन महिन्यापासून तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता की तिला अन्नपाणी गोड लागत नव्हतं.नवरा सुखरूप असू  दे म्हणत तिनं देवाला साकडं घातलं होतं ,कैक नवस बोलले होते .
"नमस्ते बाबूजी ,यहाँ एटा गांव से आये कोई मजदूर काम करते हैं क्या ?"तिनं पुन्हा धीर एकवटला.पतीची ख्यालीखुशाली जाणून घेण्याची सगळी आशा तिच्या डोळ्यांत एकवटली होती. 
"देखता हूं,"त्या भल्या माणसानं मोबाईलवर कुणाशी तरी संपर्क साधला.काही वेळानं दोन  मजूर आणि त्यांच्या  कामावर देखरेख करणारा सुपरवायझर त्याच्याजवळ येऊन पोहोचले. "अरे कोई एटा के मजदूर काम करते हैं क्या साईटपर?जरा इनसे बात कर लो." त्यानं भागवतीला सांगितलं आणि तो तिथून निघाला . 
एटा के दो मजदूर पहले यहाँ काम करते थे ,लेकिन दो महिनेसे मुकादम ने उन्हें कहीं और भेजा है. " त्या मजुरांनी तिला सांगितलं ,
"किशन नाम है उनका !"आयुष्यात पहिल्यांदा तिनं जाहीररीत्या पतीचं नाव तेही सर्वस्वी अनोळखी लोकांसमोर घेतलं ,तेव्हा धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं,असं तिला वाटू लागलं.डोक्यावरचा घुंघट तिनं आणखी ओढून घेतला. 
"कुणाला तरी विचारून सांगतो.तोवर मुलांना घेऊन सावलीत बसा जरा !"त्या मजुरांनी तिला म्हटलं .पाण्यानी भरलेली बाटली तिला देऊ केली. निराशेनं झाकोळलेल्या तिच्या मनाला किंचितशी उभारी आली. 
थोड्या वेळानं एक वयस्कर मजूर तिच्या रोखानं आला."कौनो चिंता की बात नाही !मुकादमने  तुम्हारे पति को और उसके गांववालेको दुबई भेजा है कामपर!त्यानं घाईघाईनं त्यांचे पासपोर्ट तयार करून घेतलेत आणि त्यांना तिथल्या कामावर पाठवलंय ,पण दोघांचेही पासपोर्ट त्यानं स्वतः जवळ ठेवून घेतले असतील!किशन तुम्हां लोकांशी संपर्क साधणार तरी कधी आणि कसा?मागे माझ्याही बाबतीत अगदी असंच घडलं होतं.मेरे भी घरवाले ऐसेही परेशान हुए थे!"त्यानं तिला दबक्या आवाजात सांगितलं ."तुम्हारे पति कुछ रुपये मेरे पास छोड गये हैं तुमको देने  के लिये .किशनला जेव्हा कळलं की त्याला दुबईला त्या संध्याकाळी जायचंय ,तेव्हाच त्यानं तुला देण्यासाठी माझ्याजवळ हे तीन हजार रुपये देऊन ठेवलेत.त्यानं मला गावाचा ठावठिकाणा पण सांगितला होता,पण आम्हाला बाहेरच्या जगाशी इथून मुळीच संपर्क साधता येत नाही,यात काय ते सगळं आलं.वर्षा-दोन वर्षांनी येईल तुझा नवरा परत,तोवर धीर धर !"त्यानं मोठया आत्मीयतेनं तिला सांगितलं,तिच्या हाती किशननं दिलेले पैसे आणि मुलांच्या हातात बिस्किटांचा पुडा ठेवला,तेव्हा तिला प्रचंड गहिवरून आलं.मोठ्या कृतज्ञतेनं ती त्याच्या पाया पडली,तेव्हा त्याच्या डोळ्यांतून आसवं ओघळली .    
"आता इथून बाहेर पडलं की दोघे नवरा बायको दालरोटीचा ठेला चालवतात,तिथे जाऊन जेवून घ्या आणि वेळेवर गावी पोहोच कशी!" त्यानं पित्याच्या मायेनं तिला म्हटलं  आणि परतीची बस कुठून,कशी घ्यायची,ते समजावून सांगितलं."आणि हो,हे जेवण माझ्याकडून बरं !"त्यानं तिच्या हाती पन्नास रुपयांची नोट ठेवली.तिनं मुलांनाही त्याच्या पाया पडायला लावलं.त्याचा निरोप घेऊन मुलांना घेऊन ती निघाली,तेव्हा तिच्या मनावरचं मणामणाचं ओझं हलकं झालं  होतं आणि डोळ्यांतून आसवं झरझर वाहू लागली होती
                                                                 ***************************************** 
रामप्यारीच्या आसवांना खळ नव्ह्ती.पंधरा दिवसांपूर्वी नोएडातल्या एका बांधकामाच्या साईटवर काम करताना चक्कर येऊन उंचीवरून पडून तिचा नवरा  जखमी झाला होता.ते प्रोजेक्ट छोटेखानी होतं,सात मजल्यांच्या जेमतेम दोन इमारती तिथे उभ्या राहणार होत्या . बिल्डरही काही नामवंत नव्हता. कामावर सुरक्षिततेच्या दृष्टीनं यथा-तथाच काळजी घेतली जात होती.सेफ्टीकडे एकुणातच दुर्लक्ष होत होतं आणि त्याची जबर किंमत रामप्यारीच्या नवऱ्याला आणि ओघानंच रामप्यारीलापण चुकवावी लागली होती. बिल्डरनं त्याला नजीकच्या इस्पितळात आणि नंतर सरकारी इस्पितळात  दाखल केलं होतं.बिल्डरचा एक माणूस रोज इस्पितळात येऊन त्याला बघून जात होता . ही बिल्डरची मेहेरबानी नसून उद्या त्याचं काही बरं -वाईट झालं तर आपल्यावर शेकेल म्हणून तो बित्तंबातमी मिळवण्यासाठी रोज रुग्ण बघून जात होता ,हे कळण्याइतकी रामप्यारी शिक्षित नव्हती. 
नवऱ्याची शुश्रुषा  करण्यासाठी तिनं पंधरा दिवस आपली  धुणीभांडी करण्याची  कामं थांबवली होती.काही घरांतल्या मालकिणी समजूतदार होत्या,त्यांनी उदारपणे तिला पूर्ण महिन्याचा पगार दिला होता,दुसरी मोलकरीण नं ठेवता तिची वाट पाहण्याची तयारी दर्शवली होती. काही अतिहिशेबी मालकिणींनी तिला पंधराच दिवसांचा पगार दिला होता.तिच्याजागी दुसरी मोलकरीण लावून घेतली होती. अखेरीस इस्पितळातून त्याला सुटी मिळाली तरी त्याला  आणखी दोनेक महिने तरी काम करता येणार नव्हतं . त्यामुळे बिल्डरनं त्याला दहा हजार रुपये देऊन त्याच्याजागी दुसरा मजूर लावला होता. 
"यो दस हजार रुपया तो इलाज में खर्च हो जावेगा .पुढे खाणार काय?"खाटेवर पडून कण्हत कण्हत रामप्यारीच्या नवऱ्यानं तिला विचारलं .
"तुम चिंता मत करो,भगवान श्रीराम सगळं नीट करेल. घ्या चहा घ्या.मी आज माझ्या कामांच्या घरी जाऊन हात जोडून मालकिणींना विनंती करीन,पाहिजे तर आणखी नवी कामं शोधीन. कामाला थोडीच घाबरतेय मी." तिनं त्याला धीर दिला. तिचं सगळं जग त्याच्यातच सामावलं होतं . 
"नाहीतर आपण गावी चालले जाऊ !इथे कोण पुसणार आपल्याला ?गाम में रुखी सुखी खा लेवेंगे!"त्यानं म्हटलं . 
"गावी सदोदित दुष्काळ असतो,म्हणून तर गाव सोडून आलो होतो ना आपण!इथे निदान हातांना काम मिळतंय !गावी जाऊन करणार तरी काय?"अर्थशास्त्राचं शिक्षण नं घेताही तिनं गाडग्या-मडक्यातून कुठे कुठे साठवलेल्या दहा-पाच रुपयांच्या नाण्यांची रास त्याच्यासमोर ठेवली. तीच चारशे रुपये भरली. 
"यो तो मेरी एक दिन की देहाडी होवे है .तू  तो बड़ी सयानी निकली."त्याच्या तोंडून पहिल्यांदाच तिच्यासाठी कौतुकाचे शब्द निघाले. 
"हो,पण देहाडीतले किती पैसे तर तुम्ही बाहेर उधळत होते !आता ते सगळे शौकपाणी बंद!"तिनं सौम्य शब्दांत त्याला निर्वाणीचा इशारा दिला.   
"पडून पडून कंटाळा आलाय.काहीतरी हलकं फुलकं काम शोधावं लागेल . "
"आधी बरे व्हा नीट.लेबर चौक थोडाच पळून चाललाय!"पुन्हा त्याला समजावत तिनं बाहेर जाण्याची तयारी केली .
रामप्यारी भांडी घासण्याची,झाडू-पोछे करण्याची कामं मिळवण्यासाठी पुन्हा नव्या जोमानं जुन्या ठिकाणी गेली. काही मालकिणींनी तिला चहा देऊन आस्थेनं विचारपूस केली,काहींनी दुसरी मोलकरीण लावलीये ,नंतर गरज पडली तर पाहू,म्हणत दारं बंद करून घेतली. 
"रामप्यारी,ओ रामप्यारी,"आवाजाच्या दिशेनं तिनं मागे वळून पाहिलं.खूप पूर्वी ती त्यांच्याकडे धुणीभांडी करीत होती. "काम करशील का?दिवसभराचंच काम आहे समज!धुणीभांडी,झाडूपोछाचं तर काम आहेच ,त्याचे दोन हजार रुपये देईन मी,पण मी एक नवं काम सुरु करतेय,लोकांना घरपोच चिरलेल्या,निवडलेल्या भाज्या देण्याचं ,त्याच्यासाठी मला कुणी मदतनीस पाहिजेय.दिवसभराचं हलकं-फुलकं काम आहे,पण त्याचेही देईन प्रत्येकी दोन हजार रुपये.व्यवसाय वाढल्यावर पैसेही वाढवीन ! आणखी कुणी असेल तर बघ ,यासाठी मला दोन लोकांची तरी गरज आहे!मंडईतून भाज्या घेऊन येण्यासाठी,ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी वेगळा ड्रायव्हर ठेवलाय!नाही म्हणू नकोस,ये उद्यापासून !" जुन्या मालकिणीनं म्हटलं."आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन,तसं रामप्यारीला वाटलं.मनोमन तिनं तिच्या दैवताला श्रीरामाला हात जोडले .
"लो,तुम्हारे लिये काम ढूंढा है !"खाटेवर पडल्या-पडल्या तिची वाट बघणाऱ्या नवऱ्याला तिनं सांगितलं .श्रीरामाच्या तसबिरीसमोर अतीव श्रद्धेनं तिनं डोकं टेकलं.उपाशी दिवस कंठायची जिथे वेळ आली होती,तिथे देवाच्या कृपेनं सहा हजारांची सोय झाली होती.
रामप्यारीनं त्याला सगळा वृत्तांत सांगितलं,तसा तिच्या नवऱ्यात उत्साह संचारला.दोघांच्या मनावरची मरगळ झटकली गेली.
"यो तो भगवान की किरपा होवे है!"त्यानं म्हटलं.इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच तो कुणाच्या आधाराविना खाटेवरून उठला आणि त्यानं त्याच्या झोपडीतल्या श्रीरामाच्या तसबिरीसमोर लोटांगण घातलं .रामप्यारीच्या डोळ्यांतून आसवांची झड लागली.आनंदाश्रूंच्या वर्षावात तिची झोपडी न्हाऊन निघाली. 
                                    **************************************************************  
लीलावतीनं शुचिर्भूत होऊन देवाची पूजा करून स्वयंपाकाची प्राथमिक सिध्दता केली. हल्ली थंडी ओसरायला लागली होती.ऊन वाढायला सुरुवात झाली होती.थंडीचा फायदा एक होता,तो म्हणजे सकाळी एकदम मोठ्या कुकरमध्ये डाळ शिजवून ठेवली,बटाटे उकडून ठेवले की नंतर फारशी घाईगडबड होत नव्हती."तिवारी भोजनालय-आलू की रस्सेदार सब्जी ,दाल तड़का ,दो रोटी,स्वादिष्ट भोजन मात्र पच्चीस रुपयों में.स्वादिष्ट दाल-दो रोटी बीस रुपयों में. "चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या लीलावतीनं आपल्या सुवाच्च्य अक्षरांत खर्ड्यावर लिहून तो बोर्ड आपल्या ठेल्यावर लावला होता.ती आणि तिचा नवरा दोघे अनेक वर्षांपासून नोएडात रस्त्यावर ठेल्यावर खाद्यान्नाची विक्री करीत होते.अगदी स्वच्छ ठेवलेल्या हातगाडीवर, कमालीची स्वच्छता पाळून शिजवलेलं अन्न तिनं लख्ख घासलेल्या स्टीलच्या पातेल्यांत ठेवलं. नोएडात खूप बांधकामाचा व्याप वाढल्यामुळे अनेक कष्टकरी लोक दुपारी क्षुधाशांतीसाठी दोघा नवराबायकोंनी चालवलेल्या त्या स्टॉलवर येऊ लागले होते.हळूहळू त्यांच्या रुचकर  भोजनाची आणि स्वच्छतेची कीर्ती नोएडाभर पसरली होती. नोएडात येणारे विद्यार्थी,आयटीच्या क्षेत्रातले नोकरी करणारे युवक युवती यांची गर्दी त्यांच्या तिवारी भोजनालयात होऊ लागली होती. नित्याप्रमाणे दोनेक वाजेपर्यंत तिनं शिजवलेले खाद्यपदार्थ संपत आले होते.नंतर  कुणी ना कुणी एखाद-दुसरा येऊन जेवून गेल्यावर दोघे नवराबायको जेवून घ्यायचे. मग रात्रीच्या भोजनविक्रीची व्यवस्था करायला लागायचे.
"दाल रोटी मिलेगी?" घाबऱ्याघुबऱ्या आवाजात स्टॉलच्या समोर उभं राहून कोण क्षुधाशांतीसाठी पृच्छा करतंय ते लीलावतीनं ओणवून पाहिलं.समोर डोक्यावर घुंघट घेतलेली एक तरुण स्त्री आपल्या दोन लहान मुलांसह उभी होती. तिच्या देहबोलीतून तिच्या मनाची अवस्था स्पष्ट झळकत होती. 
"बिलकुल मिलेगी!"लीलावतीनं तिला आश्वस्त केलं,"घबडाओ मत,यहाँ आरामसे बैठकर खाना खाओ!"तिनं तिला बसायला प्लॅस्टिकची खुर्ची दिली.तिच्या मुलांना बसायला प्लॅस्टिकचे स्टूल दिले. तिघांनाही व्यवस्थित वाढून तिनं स्टीलच्या थाळ्या त्यांच्या हातात ठेवल्या. त्यांना किती कडकडून भूक लागलीये,ते लीलावतीला स्वच्छ जाणवलं .स्टीलच्या पेल्यांत पाणी भरून तिनं त्यांच्यासमोर धरल्यावर तिघांनीही घटाघट पाणी प्यायलं ,तेव्हालीलावतीला रहावलं नाही. 
"क्या नाम है तुम्हारा?कहाँ से आयी हो ?यहाँ कोई रहता है क्या तुम्हारा?"
"मेरा नाम भागवती है .एटा से आयी थी पति से मिलने . किशन नाम है उनका,"तिनं लीलावतीला सांगितलं. आता तिचा संकोच दूर झाला होता.
"अरे,किशन तर इथेच काम करीत होता ना?आमच्याचकडे तो आणखी एका वयस्कर काकांबरोबर रोज जेवायला यायचा. काका येतात, तो मात्र एवढ्यात आला नाही खरा!मीही फारशी चौकशी केली नाही!"लीलावती म्हणाली.भागवतीनं पन्नास रुपयांची नोट तिला दिली. 
" इसका कोई पैसा नहीं हुआ.किशन आमचा नेहमीचा ग्राहक होता.तुम्ही आज आमचे पाहुणे आहात.पाहुण्यांकडून आम्ही कसे पैसे घेणार?"प्रसन्न हसत लीलावती तिला म्हणाली.प्रवासात बरोबर पाणी असावं म्हणून तिनं तिला पाण्याची बाटली भरून दिली.
महानगरात ऊन रणरणत होतं, मात्र भागवतीला आता त्याची धग जाणवत नव्हती. समोरच सराय काले खानला जाण्यासाठी उभ्या असलेल्या बसमध्ये मुलांना घेऊन ती चढली. तिला आता नवखेपणा जाणवत नव्हता. बस सुरु झाली,तशी तिनं लीलावतीला हात दाखवला. नजरेच्या टप्प्यातून दूर सरेपर्यंत दोघी एकमेकींकडे बघत राहिल्या.
महानगर आपल्या गतीनं धावत होतं.कुठेतरी मात्र अजूनही माणसांत माणुसकी टिकून होती. 
__________________________________________________________________________________________ -रश्मी घटवाई ,मुंबई 

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम