मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट
चौथी सीट
रश्मी घटवाई
दिल्लीहून निघालेली राजधानी एक्स्प्रेस धडधडत मुंबई सेन्ट्रलला येऊन थांबली तेव्हा प्रज्ञानं अनेकदा पाहिलेली सूचनांची यादी शेवटची एकदा म्हणत पुन्हा नव्यानं पाहून घेतली.गाडी कोणत्या फ्लॅटफॉर्मला लागणार,मग तिनं उतरून कोणत्या दिशेनं चालत जाऊन टॅक्सी घ्यायची ,घाटकोपरला मिळवलेल्या शेअरिंग फ्लॅटमध्ये कसं पोहोचायचं आणि नंतर तयार होऊन लोकल ट्रेनच्या दुसऱ्या वर्गाच्या लेडीज डब्यातून प्रवास करून सीएसटीला पोहोचून मग फोर्टमधल्या आपल्या ऑफिसमध्ये कसं पोहोचायचं याची तपशीलवार माहिती तिला प्रणितानं तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून दिली होती ."ही उगीच नाही दिल्ली आयआयटीत गेली!शी इज अ जिनियस!" प्रज्ञाच्या मनात आपल्या धाकट्या बहिणीबद्दल त्या क्षणी अपार कौतुक दाटून आलं,"धाकटी असली तरी आईच्या मायेनं आणि वडिलांच्या शिस्तीत ती आपली काळजी घेतेय त्या दोघांच्या पश्चात!"क्षणभर तिचं मन हळवं झालं.आपलं सामान उचलून ती गाडीतून खाली उतरली ."आपलं सामान सुद्धा तिनंच भरलं सुटकेसमध्ये.इंटरनेटवरून शोध घेऊन शेअरिंग रेंटेड अकोमोडेशन मिळवून दिलं .फार कशाला,आपल्या सिनियर्सच्या मदतीनं मुंबईत ही नोकरीसुद्धा तिनंच मिळवून दिली आपल्याला.अन्यथा आईबाबा असे तडकाफडकी आपल्या दोघींना अनाथ करून गेले, याच दु:खात बुडले होतो आपण!मॉर्निंग वॉक घ्यायला गेलेल्या आईबाबांना भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं उडवलं हे कळताच प्रणिताच पेटून उठली, नातेवाईकांच्या मदतीनं पोलिसांकडेही तिनंच एफआयआर नोंदवला ... आपण केवळ तिच्यासह मम म्हणायला!आणि नंतर वडिलांच्या पश्चात मिळालेल्या आयुर्विम्याच्या पैशाच्या लोभाने आलेल्या नातेवाईकांनाही निग्रहानं दूर सारलं ,ते तिनंच!प्रणिता तुस्सी ग्रेट हो !"टॅक्सीत बसतांना तिनं मनातल्या मनात प्रणिताची पाठ थोपटली."बी ब्रेव्ह!बी ब्रेव्ह!"नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आपल्याला निरोप देताना प्रणिता म्हणाली होती .त्यामुळे आता आपल्याला गळपटून चालणार नाही."तिनं पुन्हा एकदा स्वत:ला बजावलं.
"ए,दिखता नहीं?अंधी है क्या?"लोकलमध्ये शिरताना कुणीतरी कुणाच्या तरी पायावर पाय दिला,तेव्हा त्या लेडीज डब्यात अक्षरश: वाकयुध्द पेटलं . 'मैने किधर पैर रखा! मैने कुच नहीं किया फिर मेरेको कायको बोल रही है ?"हिंदीवर अक्षरश:अत्याचार करत अट्टाहासानं हिंदीत बोलत दोघीचौघीजणी भांडू लागल्या,तशी प्रज्ञा शहारली.आपल्या मातृभाषेचे कुणी असे तीनतेरा वाजवावे ,हे तिला रुचलं नाही .सुशिक्षित भासणाऱ्या नोकरीपेशावाल्या बायका सार्वजनिक ठिकाणी अशा भांडकुदळपणा करीत असतील,हे तिला एरवी स्वप्नातही खरं वाटलं नसतं .नं जाणो आपला कुणाला धक्का लागायचा आणि कुणी आपल्याशी भांडण उकरून काढायचं म्हणून चौथ्या सीटवर बसलेल्या प्रज्ञानं आपलं आंग आणखी आक्रसून घेतलं. दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांच्या प्रोफाईलमधला प्रचंड मोठा वेगळेपणा तिला त्या क्षणी त्या डब्यात जाणवू लागला.डब्यातल्या बहुतेक सगळ्या जणी इयरफोन्स अडकवून मोबाईल मधल्या आपापल्या विश्वात गुंग झालेल्या होत्या ."ह्या महानगरात नवोदितांचं स्वागत नक्कीच होत नसावं . कुणी वाट पुसली,तर सांगायलाही कुणाला सवड नसणार इथे!बरं झालं प्रणितानं ऍप डाऊनलोड करून माझी सगळी सोय करून दिली आहे!धक्काबुक्की करण्यात आणि त्यावरून एकमेकांशी भांडण्यात ह्या लोकांचा बराच वेळ वाया जात असणार !कुणाला कुणाशी देणं घेणं नाही,कुणी कुणाला इथे मदतही करत नसावेत !"प्रज्ञानं विचार केला .
गर्दीतून वाट काढत वयाची साधारण ऐंशी पार केलेल्या पण ताठ कण्याच्या तेज:पुंज आजी प्रज्ञाच्या चौथ्या सीट जवळ येऊन ओठंगून उभ्या राहिल्या . प्रज्ञाची त्यांच्याशी नजरानजर होताच ती आपसूक उठून उभी राहिली आणि अतीव आदरानं तिनं त्यांना आपली सीट देऊ केली. त्यांनीही कौतुकानं तिच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि तिनं देऊ केलेल्या चौथ्या सीटवर बसत त्या म्हणाल्या ,मला दादरला उतरायचंय. प्रज्ञालाच काळजी वाटू लागली एवढ्या गर्दीत त्या एकट्या कशा उतरणार?
आपल्या मोबाईल वरच्या ऍप वर बघत दादर स्टेशन येण्याच्या आधी तिनं त्या आजींचा हात धरून त्यांना उतरणाऱ्यांच्या गर्दीत सुरक्षित उभं केलं . 'चला आजी,या माझ्याबरोबर!' हरहर महादेव गर्जत शिवबांचे मावळे ज्या अभिनिवेशानं गडावर चढाई करीत असतील,त्याच अविर्भावात लोकल ट्रेनच्या डब्यांत चढणाऱ्या प्रवाशांपासून त्या आजींना कुठला त्रास होऊ नये याची पराकाष्ठा करीत प्रज्ञानं त्यांना स्टेशनबाहेर पोहोचवून नीट टॅक्सीत बसवून दिलं ,तेव्हा तिच्या जिवात जीव आला .पुढच्या लोकल ट्रेनमध्ये लोकलच्या लेडीज डब्यात चढून पुन्हा एकदा ती सीएसटीच्या दिशेनं निघाली;ती चौथ्या सीट वर बसून!बसायला जागा मिळाल्याचं सुख पण पुरेशी जागा नाही;जेमतेम टेकायला याचं दु:ख असा आंबटगोड अनुभव तिला खूप वेगळा वाटला .ती त्या चौथ्या सीटच्या जणू प्रेमातच पडली!
****************************** *******
"''कट!कट !"डायरेक्टर ओरडली!सेटवर स्मशानशांतता पसरली!"सीनमध्ये प्रेमा मॅडमना यत्किंचितही चूक चालणार नाही,तिचा दराराच मोठा आहे!डायरेक्टर प्रेमाच्या नावावर अनेक गाजलेले सिनेमे आहेत!शिवाय त्यांचा एक पाय बॉलिवूड मध्ये तर दुसरा पाय हॉलिवूड मध्ये आहे!"स्पॉटबॉय पासून ते नायिकेपर्यंत प्रत्येकाच्या मनात विचार आला. "आपण सर्वसाधारण घरातली नायिका दाखवतोय,तिची सुख-दु:ख सर्वसामान्यांची असणार आहेत!आणि ह्या सीनमध्ये तर ती लोकल ट्रेनमध्ये लेडीज डब्यात प्रचंड गर्दीत चौथ्या सीट वर बसून चाललीये असं दाखवतोय!मग त्या नायिकेच्या चेहऱ्यावर कसे भाव असायला हवेत?"प्रेमा मॅडमनं काहीसं करड्या आवाजात नायिकेला सुनावलं !चवथी सीट!अप्रत्यक्षपणे खूप महत्वाची भूमिका आहे ह्या चौथ्या सीटची ह्या सीनमध्ये!राईट?"प्रेमा मॅडम गरजल्या. आयुष्यभर मर्सिडीझ मध्ये प्रवास केलेल्या नायिकेनं चौथ्या सीटवर प्रवास करणाऱ्या व्यक्तिरेखेच्या मनातले,चेहऱ्यावरचे भाव दाखवायचा प्रयत्न केला.पॅक अप! डायरेक्टर नं आदेश दिला!
एव्हाना परतीच्या प्रवासात प्रज्ञा सीएसटीहून घाटकोपरला जाण्यासाठी सराईतपणे लोकल ट्रेन मध्ये चढली आणि चौथ्या सीटवर जाऊन बसली!प्रणिताला अपेक्षित असलेला ब्रेव्हनेस -आत्मविश्वास आता तिच्यात ठासून भरला होता आणि गाडीच्या वेगाबरोबर तिनं प्रसन्न ठेका
धरला होता.
_________________________________________________________________
-रश्मी घटवाई
Comments
Post a Comment