मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम
लंचटाईम
लंचटाईम
-रश्मी घटवाई
सकाळी दहा-साडेदहाच्या सुमाराला विजयानं आपल्या मैत्रिणीच्या घराची बेल वाजवली,ते काहीसं ओशाळं होऊनच!मुंबईसारख्या महानगरातअसं नं कळवता कुणाकडे जाणं,तेही मदत मागण्यासाठी जाणं तिला प्रशस्त वाटत नव्हतं.जाण्याआधी तिनं तिच्या मोबाईलवर सलग दोनतीनवेळा फोनपण लावला,पण तो बिझी येत होता.अखेर नाईलाजानं तिनं तिच्या घरी जाण्याचं ठरवलं होतं.एकीकडे मोबाईलवर बोलत बोलत दुसरीकडे विजयाच्या मैत्रिणीनं दार उघडलं.समोर विजयाला बघून आश्चर्यचकित होत तिनं खुणेनीच तिला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि पुन्हामोबाईलवर बोलत ती आतमध्ये अदृश्य झाली.अवघडून बसलेल्या विजयाला काही मिनिटांत पाणी आणून देत मैत्रिणीनं तिला आरामात बसायला सांगितलं.दोघीही अजीजीनं एकमेकींकडे दिलगिरी व्यक्त करू लागल्या.
"सॉरी ,मी अवचित,नं सांगता आले... जरा मदत हवी होती," विजया भीतभीत मैत्रीणीला म्हणाली. "अगं ड्रायव्हिंग लायसन्सच्या रिन्युअलसाठी मेडिकल सर्टिफिकेट हवंय,म्हटलं डॉक्टरसाहेब असतील तर त्यांच्याकडून घ्यावी सही आणि स्टॅम्प.मी त्या फॉर्म्सचं प्रिंट आउट घेण्याचा प्रयत्न केला ,पण तेही जमलं नाही!महिन्याभरानी मुदत संपणार आहे लायसन्सची ,म्हणून तर हातची कामं टाकून आलेय. सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं मला , जरा आजारी आहेत त्या,त्यामुळे लायसन्स नसून चालणार नाही ना!आताही मऊ मुगाची खिचडी, पाणी,औषधं,फळं वगै रे सगळं त्यांच्याजवळ ठेऊन आलेय, शेजारणीला किल्ली देऊन आलेय!तिला म्हटलं मधून मधून बैस त्यांच्याजवळ!शेजारणीची मुलं शाळेतून येईतो बसेल ती त्यांच्याजवळ!"
"काही हरकत नाही!काळजी करू नकोस ,मी देते तुला ते सगळे फॉर्म्स!आणि हे येतीलच एवढ्यात,सही आणि स्टॅम्प पण करून देतील!मग लगोलग क्लिनिकला जायचंय त्यांना!" मैत्रिणीनं लगोलग लॅपटॉप आणि प्रिंटर सुरु करून विजयाला हवे असलेले फॉर्म्स दिले. विजयाच्या सुदैवानं मैत्रिणीचे डॉक्टर पतीही तेव्हाच आले आणि तातडीनं हवं असलेलं मेडिकल सर्टिफिकेटही विजयाला लगेच मिळालं .कृतज्ञतेनं त्यांचा निरोप घेऊन विजया अंधेरीच्या आरटीओ मध्ये पोहोचली, तेव्हा तिथे पाय ठेवायला म्हणून जागा नव्हती.प्रत्येक खिडकीसमोर पायऱ्यांपासून खालपर्यंत चित्रविचित्र नागमोडी रांगा लावून लोक उभे होते.त्या भल्यामोठ्या रांगेच्या शेवटी उभ्या असतांना आता आपला नंबर नंबर केव्हा येणार याची वाट पहात ,आपले भरलेले फॉर्म घेऊन विजया दुपारच्या टळटळीत उन्हात उभी राहिली.काही वेळानं कोलाहल झाला. तेव्हा तिनं प्रश्नार्थक नजरेनं खिडकीजवळच्या माणसाकडे पाहिलं."लंचटाईम हो गया है उनका !इधर कोई नहीं है और उधर खिडकी बंद है!"वैताग आणि चीड व्यक्त करत रांगेतली माणसं पांगली.आता काय करावं ह्याचा विचार विजया करीत असतानाच तिचा मोबाईल वाजू लागला. "विजयाताई ,आत्ता जेवायचं नाही म्हणताहेत आजी!विजयाला येऊ देत ,मगच खाते खिचडी म्हणाल्या. आता जेवल्याच नाहीत तर औषध कसं द्यायचं त्यांना ?" तिच्या सासूबाईंजवळ बसून त्यांच्या जेवणाची काळजी करणारी तिची शेजारीण तिला फोनवर सांगू लागली.
"सासूबाईंना म्हणावं विजया पोहोचतेच आहे.तोवर तू त्यांना फळं तरी खाऊ घाल!आलेच मी!"विजया शेजारणीला म्हणाली ,ह्रदयाच्या तळातून आलेला एक अस्फुट हुंदका दाबत विजयानं गाडी काढली आणि घराच्या रोखानं वळवली.
************************
"एवढ्या घाईघाईनं मुंबईला जाते आहेस,काही विशेष?"अमेरिकेतून फोनवर बहिणीनं राणीला विचारलं.
"हसशील मला!मुंबईतल्या घराचं लीज रेन्ट भरायचंय म्हणून दोघेही जातोय!काल फाईल आवरताना लक्षात आलं की या वर्षीचं लीज रेन्ट भरलं नाहीये. दोनच महिने वर झाले आहेत,पण दंडाची रक्कम वाढेल,उगीच प्रॉब्लेम होईल म्हणून भरलेलं बरं! "फोनवर बोलता बोलता छोट्या बॅगेत घाईघाईनं कपडे आणि कागदपत्रं भरत राणी उद्गारली.
"अगं पण हल्ली लाईट ,पाणी वगैरे सगळी बिलं ऑनलाईन भरली जातात,टॅक्स ऑनलाईन भरले जातात,मग तिथे प्रत्यक्ष जाऊन घराचं लीज रेन्ट भरण्याची काय गरज आहे?"
"तीच तर गंमत आहे.इथे दिल्लीत राहून आम्ही मुंबईतल्या घराचं वीज-पाण्याचं बिल ऑनलाईन भरतो ,मुंबईतल्या घराचा प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन भरतो. पण लीज रेन्ट ऑनलाईन भरलंच जात नाही गं !मी संबंधितांना त्याबद्दल ईमेल पाठवले,पण उत्तरही नाही आणि लीज रेन्ट ऑनलाईन भरण्याची सोय झाली नाही ती नाहीच!"
"अगं मुंबईत तुमचे एवढे ओळखीचे आहेत ... कुणालातरी सांगायचं !"
"लीज रेन्ट भरण्यात पूर्ण एक दिवस खर्ची पडतो. मागे एकदा कुणालातरी पाठवलं होतं ,त्यांना तर दोनदा चकरा मारायला लावल्या. तेव्हापासून कान पकडले.लोकांचा बहुमूल्य वेळ वाया घालवायचा आपल्याला काय अधिकार?"राणी म्हणाली.
"ते आहेच गं !बरं मी तुझा वेळ घेत नाही ,लगेच फ्लाईट गाठायची आहे ना तुला?"
"हो,गं !फ्लाईट मधून उतरून सरळ बांद्रयालाच जाऊ त्या ऑफिसमध्ये!आज धुकं पण नाहीये!फ्लाईट वेळेवर पोहोचेल बहुतेक!उद्याचा एक दिवस हाताशी ठेवलाय ,दोघे उद्या रात्रीच्या फ्लाईटनी परत येऊ. अच्छा!"राणीनं पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी,कागदपत्रं बरोबर घेतल्याची खात्री करून घेतली आणि यजमानांसह दिल्लीचं विमानतळ गाठलं.
"कलानगर!"मुंबईच्या विमानतळावरून ऑटोरिक्षावाल्याला राणीनं सांगितलं .
मुंबईतल्या उत्फुल्ल गुलाबी गारव्यानंसुद्धा त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांमधली मरगळ गेलेली नव्हती.तिथे रोज येणाऱ्या असंख्य लोकांच्या पायधुळीनं आधीच्याच धुळीवर नवी पुटं चढली होती. लिफ्टमधून सवयीनं चौथ्या मजल्यावरच्या तो विभाग सांभाळणाऱ्या मॅडमकडे राणी यजमानांसह गेली. मॅडम कामात गर्क होत्या.अखेर बराच वेळ वाट पाहून राणीनं कागदपत्रं त्यांच्या पुढे धरली.
"एस्क्युज मी मॅडम,आम्हाला लीज रेन्ट भरायचं होतं ... "
"तुम्ही उद्या या!आज मला साहेबांनी खूप अर्जन्ट काम दिलंय!मला वेळ नाहीय !"मॅडम रुक्षपणे म्हणाल्या.
" मॅडम,लीज रेन्ट साठी असा कितीसा वेळ लागेल ?"राणीनं नेटानं लीज रेन्ट भरल्याची आधीची पावती त्यांना दिली.
"ते सगळं मला कॅल्क्युलेट करायला लागेल!तुम्हाला दंड पण भरावा लागेल ना!आज मला साहेबांनी खूप अर्जन्ट काम दिलंय!मला वेळ नाहीय !"
"मॅडम,आम्ही फक्त ह्या एवढ्या कामासाठी दिल्लीहून मुंबईला आलोय!"राणीनं त्यांना सांगितलं.
"तुम्ही उद्या या!"मॅडम तेवढ्याच कोरडेपणानं उद्गारल्या .
"तुमचे साहेब कुठे आहेत?मला त्यांना भेटायचंय!आम्हाला लीज रेन्ट भरायचंय! "राणीच्या यजमानांनी थोड्या चढ्या आवाजात म्हटलं !बाजूलाच साहेबांची केबिन दिसत होती आणि काही लोकांबरोबर त्यांची मीटिंग सुरु होती.दोघांनी जेव्हा आपला मुद्दा त्या साहेबांना सांगितलं,तेव्हा त्यांनी शिपायाकरवी त्या मॅडमना बोलावणं धाडलं ."यांचं लीज रेन्ट चं काम करून द्या . "
"पण साहेब,मला मोठ्या साहेबांनी खूप काम दिलंय!"
"मी सांगतो ते करा!आणि मोठ्या साहेबांनी विचारलं तर त्यांना माझं नाव सांगा!"साहेबांच्या बोलण्यावर मॅडम निरुत्तर झाल्या,जरा घुश्श्यात टेबलाशी गेल्या .
"एकदम चार वर्षाचं लीज रेन्ट भराल ?"मॅडमनी विचारलं ,तेव्हा ,निदान पुढच्या काही वर्षांची निश्चिती झाली म्हणून राणीला मनातल्या मनात हसू आलं. "एवढ्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट बनवून आणा . मग ते सगळं एन्डॉर्स करायला माझ्याकडे या ." आकडेमोड करून त्या म्हणाल्या,तेव्हा कुठे त्यामागचा गनिमी कावा राणीच्या नी तिच्या यजमानांच्या लक्षात आला.
धोरणानं बरोबर घेतलेल्या चेकबुकमुळे,तिथेच असलेल्या बँकेमुळे अवघ्या अर्ध्या तासाच्या आत डिमांड ड्राफ्ट घेऊन अर्जासह दोघे मॅडमकडे गेले. त्या जागेवर नव्हत्या .तोवर भराभर कॅंटीनची माणसं टेबलांवर जेवणाच्या थाळ्या आणून ठेवू लागली होती .लंचटाईम झालेला होता.घरीही होत नसेल एवढ्या साग्रसंगीतपणे तब्बल दीड तास सगळ्यांनी लंच केलं. विमानात केलेल्या नाश्त्याच्या भरोशावर दोघा नवराबायकोंनी तो दीड तास त्यांचा लंचटाईम संपण्याची वाट बघत काढला. अखेरीस बडीशेप चघळत,एवढ्या लवकर हे लोक आले कसे याचा अचंबा करत मॅडम पुन्हा आपल्या जागेवर गेल्या.
खूप आधीच डीडी तयार झाला होता,पण तुम्ही जागेवर नव्हता,हे शब्द गिळून राणीनं अर्जासह तो त्यांच्या पुढ्यात ठेवला.
"पहिल्या मजल्यावरच्या रूम नंबर २१९ मध्ये अर्ज आणि ड्राफ्ट जमा करा !"त्या म्हणाल्या.
रूमनंबर २१९ चं दार बंद होतं . बाहेर ज्येष्ठ नागरिकांसह अनेक लोक लीज रेन्ट भरण्यासाठी रांगेत ताटकळत होते. "आम्ही एक वाजायच्या आधी आलोत,तेव्हापासून बंद आहे ते दार.तब्बल दीड तास !लंचटाईम सुरु आहे म्हणे त्यांचा !रांगेत उभ्या राहिलेल्या राणी आणि तिच्या यजमानांना बाकीचे लोक सांगू लागले.अखेरीस त्या काउंटरवरच्या माणसाला उपरती झाली. त्यांचा लंचटाईम संपला तोवर रांगेतल्या लोकांची भूक कधीचीच क्षीण झाली होती!
****************************** ****************
कांदरपाड्याच्या आरटीओ मध्ये नेहमीप्रमाणे गर्दी ओसंडून वाहत होती.पाय ठेवायला म्हणून तिथे जागा नव्हती.प्रत्येक खिडकीसमोर लोकांच्या भल्याथोरल्या रांगा लागल्या होत्या.त्या रांगांमध्ये सुशिक्षित,सुसंस्कृत लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. बाकी असंस्कृतांचीच मांदियाळी होती. गेटच्या बाहेर तेवढेच अल्पसंस्कृत लोक बाकडी टाकून आरटीओ कन्सल्टन्ट वगैरे स्वत:ला म्हणवून घेणारे बोर्ड लावून बसले होते आणि कुठलेच बोर्ड नं लावता अल्पसंस्कृत अनेकांनी आरटी ओच्या आवारात ठिकठिकाणी उभ्या असलेल्या मोडक्यातोडक्या ऑटोरिक्षांमध्ये आपापली कार्यालयं थाटली होती. रांगेतली,किमान पाच-सात वेळा तरी खेपा मारायला लागलेली सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्चशिक्षित माणसं आपला नंबर कधी येईल,याची काकुळतीला येऊन वाट पाहत होती आणि त्या रांगांत नसलेली पण त्यांना नेहमीनेहमी दिसणाऱ्या चेहऱ्यांची अशिक्षित माणसं हातांत प्रत्येकी पन्नास-साठ अर्जांच्या कागदांचे गठ्ठे खिडकीशी देऊन, स्वत:च त्यावर संबंधित अधिकाऱ्यांचे ठप्पे मारून घेऊन, "उरलो उपकारापुरता"असलेल्या खिडकीपल्याडच्या अधिकाऱ्याच्या सह्या घेत होती,आपण त्यांचे काही देणे लागतो,ह्या उदात्त भावनेनी प्रत्येक अर्जागणिक हिरव्या नाहीतर गुलाबी नोटेचा नैवेद्य दाखवत होती.खिडकीच्या आतल्यांचे आणि खिडकीच्या बाहेरच्यांचे प्रपंच त्या नैवेद्याच्या योगे नेटके सुरु होते. बाहेरच्या जगातला नोटबंदीचा काहीएक त्रास तिथे जाणवत नव्हता.सगळेच लक्ष्मीपुत्र म्हटल्यावर अमाप संपत्ती तिथे ओसंडून वहात होती!
यजमानांची दिल्लीहून मुंबईला बदली झाल्यामुळे दिल्लीतल्या आपल्या कारची मुंबईत नोंदणी करण्यासाठी रश्मी आपल्या यजमानांसह,लेकीसह तिथे आली होती. आजची तिची ह्या आरटीओतली पाचवी खेप होती.तिच्या अर्जासह कुठल्याच रंगाचा नैवेद्य नं आल्यामुळे आतापर्यंत कूर्मगतीनं सगळं सुरु होतं.आधीच्या खेपेत जकात विभागात खिडकी क्रमांक १८ वरच्या अधिकाऱ्यानं डिमाण्ड ड्राफ्टनी जकातीची रक्कम भरायला सांगितल्यावर पंधरा मिनिटात तिनं तो सादर केल्यावर अचंबित झालेल्या त्या अधिकाऱ्यानं काम केल्याचा मेहनताना म्हणून तिच्याकडे तीनशे रुपयांची मागणी केली होती. "आमच्याकडे भ्रष्टाचाराच्या पैशाचं विष येत नाही आणि आयुष्य दिल्लीत जाऊनही मी आजवर कुणाला एक नवीन पैशाची लाच दिली नाहीये!" तिनं "मी शेंगा खाल्ल्या नाहीत ,मी टरफलं उचलणार नाही,"इतक्याच बाणेदारपणानं त्याला उत्तर दिलं होतं . आतापावेतो ह्याची सही घ्या त्याची सही घ्या अर्ध्या तासानी या,एक तासानी या म्हणत किमान दोनशे तरी खेपा त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांनी मारलेल्या होत्या. दिल्लीतल्या वेगळ्या!
"तुम्ही हे कागद जोडलेले नाहीत,ते कागद जोडलेले नाहीत ,तुम्ही अंधेरी आरटीओ तून अमुक अमुक कागद घेऊन या! अरे,सगळं कुटुंबच आलंय इथे!" वरच्या अधिकाऱ्यानं म्हटलं,तेव्हा तिच्या डोक्यात संतापाची तिडीक उमटली. कागदपत्रांच्या वर गुलाबी-हिरवे कागद नाहीत,हे पाहून, गरज नसताना निव्वळ त्रास देण्याच्या हेतूनं ह्या क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांनी चालवलेला हा छळवाद आहेव,हे स्वच्छ दिसत होतं. उच्च्शिक्षित सुशिक्षित लोकांशीही ती सगळी यंत्रणा तुसडेपणानी वागत होती.
"सॉरी टु इंटरप्ट यू ,बाहेरची जेण्ट्री कशी आहे ते बघितलंत का?बाहेर सेफ आहे का?आम्ही तिथे कशा बसणार ?"तिनं त्याला म्हटलं.
लंच टाईम झाला. सार्वजनिक ठिकाण असूनही तिथली दारं गच्चं बंद झाली ,खिडक्यांवर पडदे ओढले गेले. आणि तासाभरानं लंच टाईम संपला ."तुम्ही पुढच्या आठवड्यात या!"तिला सांगितलं गेलं.वैतागून तिनं यजमानांना फोन लावला,तेव्हा आत आणि बाहेर एकच धावपळ उडाली. कुणीतरी धावत येऊन तुम्ही फोटो घेतले का ,असं तिला विचारू लागलं ,तेव्हा हे काय गौडबंगाल आहे,हे तिला कळेना.
"कुणी मोबाईल काढला नुसता,तरी ते त्यांना दिसत,पण भ्रष्टाचारानं बरबटघलेला तो संपूर्ण परिसर ह्यांना कसा दिसत नाही ,अर्जाचे गठ्ठे घेऊन फिरणारे एजन्ट ,बेकायदेशीरपणे काम करणारे लोक,पुढ्यातले हिरवे गुलाबी नैवेद्य ह्यांच्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक का केली जाते?" आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार आपल्या देशाला सर्वाधिक भ्रष्टाचारी देशांच्या यादीत बरंच वर नेण्यात ह्याच मंडळींचा वाटा आहे! "तिच्या मनात आलं .
महानगरातल्या त्या भ्रष्ट प्रवाहाच्या विरुद्ध ती पाय रोवून उभी राहिली .उर्वरित लोंढे त्या प्रवाहाबरोबर वाहू लागले.
______________________________ ______________________________ ______________________________ ____________
(स्वानुभावर आधारित)
-रश्मी घटवाई ,नोएडा
०९८७१२४९०४७
Comments
Post a Comment