मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १८:परवाना
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १८:परवाना
परवाना
परवाना
-रश्मी घटवाई,
"एस्क्युज मी ,देखिये ,ये अप्लिकेशन देनी है ,"प्रेरणानं पुन्हा एकदा आरटीओमधल्या त्या खिडकीच्या पाठीमागे बसलेल्या क्लर्कचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.त्या रांगेत ती किमान तीस-पस्तीस मिनिटांपासून ताटकळत उभी होती. रांग पुढे सरकायला भरपूर वेळ लागत होता .गाडी चालवायला शिकायचीये , त्यासाठी मोटर कारचं नुसतं लर्निंग लायसन्स काढायचं होतं ,तर त्यासाठी इतकी उरस्फोड करावी लागत होती.लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर महिनाभरानं जेव्हा पर्मनंट लायसन्स काढायची वेळ येईल,तेव्हा किती वेळ मोडेल याचं त्रैराशिक ती मनातल्या मनात मांडत होती. कूर्मगतीनं जेव्हा प्रेरणाचा नंबर आला,तेव्हा तो क्लर्क उठून चहा प्यायला गेला . त्यानंतर सहकाऱ्यांशी हास्य-विनोद करण्यात आणि मोबाईलवर बोलण्यात त्यानं आणखी दहा मिनिटं घालवली.त्याच्या लेखी रांगेत उभे असलेले लोक आणि त्यांचा वेळ दोन्ही कस्पटासमान होते.केवळ तो स्वत: महत्वाचा असल्यामुळे रांगेतल्या लोकांनी त्याची ती मनमानी सहन करायलाच हवी होती. मॅड्डम,कागज पुरे नहीं हैं !"त्यानं तिची अप्लिकेशन उलटसुलट करीत सांगितलं.
सब कुछ तो सही जोडा है ,फॉर्म भी सही भरा है,आयडी प्रूफ ,ऍड्रेस प्रूफ,डेट ऑफ बर्थ का प्रमाणपत्र जोडे हैं ,फोटो लगायी है,और क्या कमी है उसमें?फीज के पैसे जमा किये हैं."तिनं किंचित चिडूनच विचारलं .त्यानं अनिच्छेनं तिचा फॉर्म घेतला."आप दो दिन बाद आईए लर्निंग लायसन्स के लिये."त्यानं कोरड्याठाक आवाजात सांगितलं .
"मॅडम ,"रांगेपासून दहा हात अंतरावर उभा असलेला एक पोरगेलासा गावठी माणूस प्रेरणाला हाक मारू लागला . "आप यहाँ कितनाभी सर पटकोगी , कुछ नहीं होगा. तुम्ही माझ्या डेस्कवर या ,मी तुमचं काम हातोहात करून देतो.तीन हजार रुपये द्या,मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता लर्निंग लायसन्स मिळवून देतो आणि बरोब्बर एक महिन्यानी सहीसाठी या,की तुम्हाला पर्मनंट लायसेन्स मिळेल ."
"म्हणजे तीन हजार रुपयात लोक पर्मनंट लायसन्स विकत घेतात म्हणायचे!"तिनं चकीत होऊन त्याला म्ह्टलं.त्या परिसरात एकेक तुटकाफुटका डेस्क आणि पुढ्यात मोडकंतोडकं बाकडं टाकून अनेक तसे "फॅसिलिटेटर्स"बसले होते . "मॅडम ,यह तो सुविधा शुल्क है . आपको हाथ के हाथ लायसेन्स मिल जाएगा !वर्ना परेशान होते रहो."त्यानं म्हटलं . तो एवढं तिच्याशी बोलेपर्यंत त्याच्या सहकाऱ्यानं तीन चार ग्राहकांना 'फुल्या केलेल्या जागी' सह्या करायला सांगितल्या, त्यांनी दिलेले प्रत्येकी तीन-तीन हजार रुपये खिशात टाकून बाजूलाच असलेल्या डेस्कवरून त्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो काढून घेतले आणि पलीकडच्या फोटोकॉपी करणाऱ्या माणसाकडून आवश्यक कागदपत्रांच्या फोटोकॉपीज काढून घेतल्या.त्यांना बसवून तो विद्युत गतीनं त्या कार्यालयात गेला आणि आला आणि विजयी मुद्रेनं त्यानं त्यांच्या हाती त्यांचं 'लर्निंग लायसेन्स' त्यांच्या हाती ठेवले. आणखी एकदोघे आले,त्यांना घेऊन तो पुन्हा विद्युत वेगानं त्या कार्यालयाच्या आत गेला आणि बाहेर आला,सुहास्य मुद्रेनं आपापलं 'पर्मनंट लायसेन्स' खिशाच्या आत टाकत ते आले तसे परत गेले.किंकर्तव्यमूढ होऊन प्रेरणा त्यांच्याकडे बघत राहिली. "क्या सोच रहे हो मॅडम ?"त्या एजंटनं विचारलं. प्रेरणानं मान हलवली आणि ती पुन्हा महानगरातल्या त्या आरटीओ ऑफिसच्या खिडकीसमोरच्या रांगेत उभी राहिली.
***************************** *****************
महानगरात 'रोड सेफ्टी वीक चे बॅनर्स जागोजागी झळकत होते,आरटीओ समोरच एक पथनाट्य सुरू होतं ,म्हणून तिथे लायसन्सच्या कामासाठी गेलेली प्रांजली कुतुहलानं ते नाटक बघू लागली. "दिन-ब-दिन सड़क दुर्घटनाएं बढ़ती ही जा रही हैं।भारत में हर साल लाखों लोग सड़क दुर्घटना का शिकार हो जाते हैं। सड़क दुर्घटना में मरनेवालोंकी संख्या एक समय चीन में सबसे अधिक हुआ करती थी,पर वर्ष 2006 से भारत अब इस मामले में पहले स्थान पर आ गया है।भारत में हर साल 1,35,000 लोग सड़क दुर्घटना में अपनी जान गँवाते हैं।" त्यातल्या एका नटानं खणखणीत आवाजात आपला संवाद म्हटला.दुसऱ्या नटानं तेवढ्याच खणखणीत आवाजात सांगितलं,"अपने देश में हर मिनट एक गंभीर सड़क दुर्घटना घटती है, और हर पाँचवे मिनट एक व्यक्ति सड़क दुर्घटना में अपनी जान गँवाता है।और तो और, सड़क दुर्घटना में जान गँवानेवालों में से 50 % लोग 15 से 45 वर्ष की आयु के युवा होते हैं।" "सड़क दुर्घटना का सबसे बड़ा कारण है तेज रफ़्तार से गाड़ी चलाना।युवा जोश यह भूल जाता है कि 'Speed Thrills ,but Speed Kills !" वाहन चालवताना हेल्मेट घालण्याबद्दल,सेफ ड्रायव्हिंग-रस्त्यांवर वाहनं काळजीपूर्वक चालवण्याबद्दलचा ते जो संदेश देत होते,तो खरंच महत्वाचा होता.त्यांच्याभोवती गर्दी वाढत होती.कार किंवा बाईक चालवत असतांना बेजबाबदारपणे मोबाईलवर बोलणं म्हणजे स्वत:बरोबर दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणं आहे,प्रचंड वेगानं वाहन चालवणं प्राणघातक ठरू शकतं,हे सगळं ते सांगत होते, त्याला लोक टाळ्या वाजवून दाद देत होते.नाटक संपल्यावर एका नटानं आपली बाईक गाठली. त्याचक्षणी त्याचा मोबाईल वाजला.नं थांबता त्यानं मान आणि खांद्याच्या बेचक्यात मोबाईल पकडला आणि मोबाईलवर बोलता बोलता बाईकला किक मारत सुसाट वेगानं तो बाईक पळवू लागला. दुसरा नट कुठली तरी विदेशी बाईक घेऊन आला होता.त्यानं त्यातल्या रियर व्ह्यू मिरर मध्ये बघून आपली पोनीटेल नीट केली आणि काही लाख रुपयांची ती बाईक बटन दाबताच सुसाट वेगानं पळू लागली.त्यांच्या आकृत्या धूसर होईतो प्रांजली त्यांच्याकडे खुळ्यागत बघत राहिली.
****************************** ****************
प्रीतीनं गाडीचं सफाईदारपणे वळण घेतलं आणि मघापासून तिच्या गाडीच्या मध्ये मध्ये येणाऱ्या बाईक वाल्यापासून सुरक्षित अंतर राखून तिनं लाल दिवा लागल्यामुळे सिग्नलला गाडी थांबवली. करकचून ब्रेक दाबत तिच्या पाठीमागे असलेल्या उंची गाडीवाल्यानंही नाईलाजानं गाडी थांबवली. त्याला बहुधा त्याच्या मूळच्या सुसाट वेगानं सिग्नल ओलांडून बेदरकारपणे पुढे निघून जायचं होतं ,पण प्रीतीनं गाडी थांबवल्यानं त्याचा तो हेतू साध्य झाला नाही.त्या अडथळ्याबद्दलचा आपला हिंसक रोष तो जोरजोरात हॉर्न वाजवून व्यक्त करू लागला आणि सरतेशेवटी तर आजूबाजूच्या वाहनांना बळजबरीनं मागेपुढे सरकायला लावून उन्मत्तपणे तो सिग्नल तोडून भरधाव वेगानं निघालासुद्धा .तेवढ्या धामधुमीतसुद्धा जातांना त्यानं प्रीतीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. महानगर असलं म्हणून काय झालं !अतिश्रीमंतांचं ते अतिलाडावलेलं शेंडेफळ होतं.वाहतुकीचे नियम त्यानं पाळले पाहिजेत,अशी त्याच्यालेखी त्याच्यासाठी काही सक्ती नव्हती.वाहनचालकाचा परवाना त्यानं मिळवला होता.बहुतांश ठिकाणी बाईकवाले मजेत सिग्नल तोडून निघत होते. कुठे कुठे ट्रक ड्रायव्हर्सची वाहतूक पोलिसांशी हस्तांदोलनं सुरु होती.ह्या पार्श्वभूमीवर त्यानं सिग्नल तोडलाच तर असा कोणता गंभीर गुन्हा केला होता?आणि तो काही अमेरिकेत थोडाच गाडी चालवत होता,की मध्यरात्री सुनसान रस्त्यावर एकटी गाडी असली तरी सिग्नल लाल असताना थांबणं सक्तीचं होतं?
प्रीतीनं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. सिग्नल हिरवा झाला,तशी प्रीतीनं गाडी सुरु केली.महानगरं आणि त्यातली लाखो वाहनं महानगराला नं पेलणाऱ्या वेगानं पळू लागली.
_______________________________________________________________
Comments
Post a Comment