मेट्रोतल्या बायका :लेख ३१:विरंगुळा


मेट्रोतल्या बायका :लेख ३१:विरंगुळा

विरंगुळा
​​-रश्मी घटवाई 

कितीतरी वेळ बसची वाट पाहिल्यावर एकदाची बस आली,तसं निर्मलाताईंना हायसं वाटलं.तसा मुंबईतला हा बस स्टॉप जवळजवळ अठ्ठावीस वर्षांपासून त्यांच्या चांगलाच परिचयाचा होता.लग्न होऊन नागपूर जवळच्या गावातून त्या आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईला आल्या,तेव्हा प्रचंड बुजल्या होत्या.इतक्या उंच , अजस्त्र  इमारती,वाहनं,लोकांची ही गर्दी,पण बोलायला कुणी नाही-म्हणजे शेजार होता,पण जो तो आपापल्या कामात,मुळात आपापल्या खोलीचं दार लावून बसलेल्यांच्या त्या शहरात आल्याआल्या त्यांचा जीव घुसमटायला लागला होता.तिथे त्यांच्या गावात तर जीवाला जीव देणारे शेजारी होते. एखाद्याच्या घरात कार्य निघालं की ते जणू सगळ्या गावाचंच कार्य असायचं; तसंच कुणाच्या घरी दु:खाचा प्रसंग आला,की संबंध गावावरच शोककळा पसरायची.संकटाच्या वेळी सगळे मदतीला धावून जायचे.तसं तर त्यांचे पतीही त्याच गावातले होते;पण नशीब काढण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली होती, त्याचंही संबंध गावाला अप्रूप होतं.किंबहुना गावातल्या होतकरू मेहनती लोकांना त्यांनी एक प्रकारे वाट दाखवली होती.त्यामुळे त्या बैठ्या चाळीतलं त्यांचं दीड खोलीचं घर आणि दोघे नवराबायको म्हणजे गावकऱ्यांना मोठाच आधार वाटत होता.
"कष्टकरी माणसाच्या हाताला मुंबईत काम मिळतंच निर्मला.मुलं थोडी मोठी झाली आहेत. शेजारच्यांनी पाळणाघर सुरु केलेलंच आहे,तर अनायासे एका चांगल्या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची गरज असल्याचं मला माझ्या सहकाऱ्यानं सांगितलंय,करशील का तू ती नोकरी?" अठ्ठावीस वर्षांपूर्वी निर्मलाताईंना त्यांच्या पतीनं विचारलं होतं.
"अहो मला कसं जमेल ?इतक्या शहरी वातावरणात,एवढ्या पुढारलेल्या लोकांमध्ये माझा कसा निभाव लागेल ?"निर्मलाताई त्या विचारानंच घाबऱ्याघुबऱ्या झाल्या.
"गावातून मुंबईत आलीस,तेव्हाही अशीच घाबरली होतीस.पण झालीस ना ह्या पाच वर्षांत एकदम तयार?बाजारहाटच काय,एकूण एक गोष्ट करण्यात तरबेज झाली आहेस."नवऱ्यानं कौतुकाची पावती दिली होती. "तुझ्या पगारावर डोळा नाही रहाणार माझा;पण आज ह्या भाड्याच्या घरात राहतोय;ते उद्या आपल्याला हक्काची जागा घेता येईल दोघांच्या पगारातून.तुझाच आत्मविश्वास वाढेल,बघ,विचार कर!" अखेर पती आपल्या भल्याचंच सांगणार,हा विचार करून त्यांनी त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला आणि त्या कंपनीत नोकरीवर रुजू झाल्या.लवकरच जवळच्या रिडेव्हलपमेंटच्या जागेत त्यांनी दोघांनी वन बीएचके फ्लॅट घेतला,त्यात सोयी करून घेतल्या. सुदैवानं घराजवळच्या बस स्टॉप वरून कामावर जायला आणि तिथून घरी परतायला थेट बस होती.बघता बघता वर्षं कशी सरत गेली,तेसुद्धा कळलं नाही.त्या कंपनीतले वरिष्ठ अधिकारी निर्मलाताईंच्या कामावर खूष होते.त्यामुळे साध्या कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या निर्मलाताई पगारवाढ आणि पदोन्नती होत होत विभागप्रमुख झाल्या होत्या.त्यांची मुलं शिकून नोकरीला लागली होती,त्यांची लग्नं पण वेळेवर झाली होती.त्यांचं घर एकदमच गजबजलं,नांदतं झालं होतं.एवढ्यातच त्यांचे पतीही सेवानिवृत्त झाले होते. 
"निर्मला,बघता बघता अठ्ठावीस वर्षं झालीत तुझ्या नोकरीला.वर्षं कशी झरझर सरली," त्यांनी पत्नीला म्हटलं होतं ,"आता कंटाळली असशील,तर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय आहेच तुझ्यापुढे .मला एकट्याला करमत नाही घरात. मुलं -सुना आपापल्या कामावर गेले की थोडावेळ वर्तमानपत्र वाचल्यावर मी करू तरी काय?मला काही टीव्हीवरच्या त्या कंटाळवाण्या मालिका बघायला आवडणार नाही."
"अहो तुमच्याच आग्रहाखातर मी ही नोकरी धरली,इतकी वर्षं इमाने-इतबारे नोकरी केल्याचं आणि संसाराला हातभार लावल्याचं समाधान आहे मला.तुम्ही म्हणाल्याप्रमाणे खरंच आत्मविश्वास आला माझ्यात.कंपनी आपला विस्तार करणार आहे आणखी वेगवेगळ्या क्षेत्रांत.अशावेळी नोकरी सोडणं म्हणजे त्यांना दगा देण्यासारखंच होईल ना?शिवाय मलाही आणखी पगारवाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे नव्या सेटअप मध्ये. पाहू पुढेमागे !"त्यांनी व्दिधा मनस्थितीत विषय तिथेच थांबवला होता.पण नव्या सेटअप मध्ये तरुण रक्ताला वाव देण्याचं कंपनीनं ठरवलं. निर्मलाताईंच्या बरोबरच्या अनेकांनी लांबचं पोस्टिंग टाळण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली.कंपनीनीही आडून-आडून निर्मलाताईंना तेच सुचवलं आणि शेवटी दुसऱ्या लांबच्या ठिकाणचं पोस्टिंग दिल्यावर अखेर नाइलाजानं निर्मलाताईंनी राजीनामा दिला . 
"नवी विटी,नवं राज्य !आपली ती इनिंग संपली असं समजायचं.आता करण्यासारखं खूप आहे.फिरायला जाऊया, नाटकं पाहूया ,गाण्याचे कार्यक्रम ऐकूया," निर्मलाताईंच्या पतीनी त्यांची समजूत घातली होती. 
पण तशी वेळच आली नाही.क्षुल्लक निमित्त होऊन निर्मलाताईंच्या पतीनी या जगाचा निरोप घेतला आणि आपण एकदमच निराधार झाल्याचं त्यांना वाटलं.इतकी वर्षं नोकरी केल्यावर घरात त्यांना वेळ खायला धावू लागला."घरात रहावं,तर सुनांचा ओढा माहेरच्यांकडे आहे,त्यांचं म्हणावं तसं घरात लक्ष नाही.सुना वाटेल तेव्हा उठतील,मनात येईल,तेव्हा हॉटेलमध्ये खाऊन येतील, आपल्या घरात कधी अंडं सुद्धा आलं नाही,सुना मात्र सणवार नं बघता सामिष आहारसुद्धा घेतील!दोन्ही मुलं आपापल्या बायकोच्या आहारी गेलीयेत.आपलं म्हणावं असं काही उरलंच नाहीये.आपली गरजही कुणाला नाहीये.मी करू तरी काय?वेळ कसा घालवू? पतीची तक्रार रास्त होती!"त्यांच्या मनात आलं.एकदोनदा सुनांशी त्यांचं वाजलंही.घरात राहिल्यावर वाईटपणाच त्यांच्या पदरी येऊ लागला.एकटेपण त्यांना नकोसं वाटू लागलं.
"निर्मलाताईंचाच नंबर आहे ना हा?मी मनीषा बोलतेय. माझी मावशी तुमची जुनी सहकारी होती."एक दिवस अचानक त्यांना फोन आला."तुमच्या घराजवळच्या बस स्टॉप जवळच रहाते मी. माझ्या मिस्टरांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्याच प्रोत्साहनानं नुकताच मी आपला व्यवसाय सुरु केलाय आणि मला कुणीतरी अनुभवी मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ सहकारी हव्या आहेत,ज्या माझं काम नीट सांभाळू शकतील. मी मावशीला म्हटल्यावर तिनं तुमचं नाव सुचवलं.तिनंच मला तुमचा हा नंबर दिला.तुम्हाला वेळ असेल तर भेटायला येऊ का मी आत्ता ?"मनीषानं अधीरपणे विचारलं आणि निर्मलाताईंची अनुमती गृहीत धरून दहा मिनिटांत ती घरी आलीसुध्दा.
"त्या कंपनीत तुम्ही इतकी वर्षं जो विभाग सांभाळला,तेच प्रॉडक्ट आहे हे.इतकी वर्षं त्यांची मोनोपली होती,एकाधिकार होता.पण केवढं महाग प्रॉडक्ट आहे ते!त्याच तोडीचं,त्याच गुणवत्तेचं पण सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीचं तेच प्रॉडक्ट दुसऱ्या एका कंपनीनं बाजारात आणलंय,त्याला मागणीपण आहे.मी धाडस करून त्याची एजन्सी घेतलीये,पण त्यासाठी मला तुमची मदत,आशीर्वाद आणि सल्ला सगळं हवंय.प्लीज मला नाही म्हणू नका,"मनीषानं म्हटलं,तसं मंद स्मित करत निर्मलाताईंनी थंडगार पन्हं तिच्या पुढयात ठेवलं."अगं,तुझ्या मावशीनं मोठ्या विश्वासानं माझं नाव सुचवलं म्हटल्यावर मी नाही कशी म्हणीन?माझ्या जुन्या सहकारी मैत्रिणीची भाची,म्हणजे माझीपण भाचीच झालीस ना?सांग,केव्हापासून सुरुवात करायची ते!"निर्मलाताईंनी मनीषाला आश्वस्त केलं . 
महानगरात ऊन चांगलंच रणरणत होतं.मात्र महानगरातल्या त्या दोघींसाठी त्याची तलखी कमी झाली होती.
                  ********************************************************
"सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !तेच ते!!"टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात कुणीतरी सांगत होतं.चॅनेल बदलता बदलता अंजली थबकली."काही तरी नवीन वाटतंय!"तिच्या मनात आलं,"सहसा इतका सलग वेळ आपण एक चॅनल पाहू शकत नाही,ती कविता किती चांगलीये."तिनं लगोलग आईला फोन लावला. "अगं ती विंदा करंदीकर या प्रख्यात कवींची प्रख्यात कविता आहे,त्याचा उल्लेख करून ते आयुष्य कसं एकसुरी झालंय,त्यावर चर्चा करताहेत,"नलिनीताईनी लगोलग लेकीला सांगितलं.अंजलीचे  वडील मराठीचे प्राध्यापक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते.अंजलीच्या आईलाही मराठी साहित्यात रस होता.आईनं दिलेल्या मौलिक माहितीमुळे कुतूहल म्हणून अंजलीनं इंटरनेटवर मराठीतले प्रख्यात कवी आणि त्यांच्या कविता शोधल्या आणि सवयीप्रमाणे पाच मिनिटात त्यात रस वाटेनासा झाल्यावर पुन्हा टीव्हीवरचं दुसरं चॅनल लावलं.समीर अजून ऑफिसमधून आला नव्हता.त्याचा फोनही आला नव्हता. अंजली जेमतेम ऑफिसमधून  घरी येऊन सोफ्यावर बसली होती आणि आता सवयीनं तिनं पंखा, एसी आणि टीव्ही सगळं एकदम सुरु केलं होतं.सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून दोघंही सोमवार ते शुक्रवार माना मोडून काम करीत असल्यामुळे अर्थातच कम्प्युटर आणि माहितीचं आंतरजाल हेच त्यांचं विश्व होतं.अंजलीचे आईवडील तिच्या घरापासून जवळच रहात होते,तिच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलं लहान असल्यापासूनच त्यांनी घेतली असल्यामुळे त्या बाबतीत तरी अंजली समीरला  काळजी नव्हती.कितीदा तर संध्याकाळी मुलांना परत आणतांना संध्याकाळचं जेवणही अंजलीचे आईवडील सोबत पॅक करून द्यायचे."दमता दोघेही.अंजलीला कुठून जमणार आहे एवढं दमून आल्यावर स्वयंपाक करायला?ह्या पिढीला सपोर्ट सिस्टीम हवीच हो!आम्ही हातीपायी धड आहोत,आमच्याच्यानं होतंय , तोवर आम्ही मदत करणारच.पुढचं पुढे!"अंजलीच्या आईनं जावयाला सुरुवातीलाच सांगितलं होतं . "नातवंडांचा आम्हालाही लळा आहेच. माझी पहिली इनिंग कॉलेजमध्ये शिकवण्यात पूर्ण झाली, आता ही दुसरी इनिंग नातवंडांना सांभाळण्यात पूर्ण करायला मला आवडेल,"अंजलीच्या  वडिलांनी लेकीला आणि जावयाला सांगितलं होतं . 
"मुंबईत रहात असल्यामुळे आपण आपल्या मुलांना हवा तसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे शनिवार रविवारचा संपूर्ण वेळ  मुलांबरोबर घालवायचा. म्हणजे आईबाबांना पण थोडी मोकळीक मिळेल,"अंजलीनं समीरला म्हटलं होतं. "आठवड्यातले पाच दिवस घाणीला जुंपलेल्या बैलासारखं काम करून झाल्यावर शनिवारी-रविवारी उशिरापर्यंत झोपण्याची मुभा सगळ्यांना असली पाहिजे."समीरनं तिला म्हटलं होतं. त्यानुसार वीकएण्डला दोन्ही दिवस सकाळी दहा वाजेपर्यंत झोपायचं,त्यानंतर उठून आंघोळी करून मॉल मध्ये जायचं,नाश्ता,दुपारचं जेवण,रात्रीचं जेवण मॉलमधल्या विविध रेस्टॉरेन्टस् मध्ये करून,एखादा सिनेमा पाहून आणि आठवडाभराची खरेदी करून मग घरी परतायचं ,हाच कार्यक्रम असायचा. 
"अंजली,हे वीकएण्डचं रुटीन काही चांगलं नाही गं ,मुलांबरोबर घरी राहूनही छान वेळ घालवता येईल, तुम्हालाही घरी राहून आराम करता येईल," नलिनीताईंनी आपल्या परीनं लेकीला सांगायचा प्रयत्न केला होता. 
"आई ,आठवड्याचे पाच दिवस आम्ही खुर्चीत खिळून आणि कम्प्युटर स्क्रीन वर डोळे खिळवून बसलेलो असतो,मग बाहेर बरं वाटतं.मुलंही घरीच असतात,त्यांनाही जरा चेन्ज होतो.मला स्वयंपाक करायला वेळ नाही,आवड त्याहून नाही. स्वयंपाक करणाऱ्या बाईंच्या हातचं त्याच चवीचं जेवण पाच दिवस खाल्ल्यावर मग दोन दिवस चेन्ज बरा वाटतो आई.मॉल हाच आमच्या पिढीचा विरंगुळा आहे. आमच्या पिढीचं हेच रुटीन झालंय !घर आणि ऑफिस अशी दोन्ही फ्रन्टस् आमच्या पिढीला अशाच पद्धतीनं सांभाळता येतील,असं दिसतंय," अंजलीनं कष्टी स्वरात आईला सांगितलं होतं .
"म्हणजे आमच्या पिढीला रिटायरमेंट नंतर पुन्हा रोजगार मिळण्याची चांगली संधी आहे तर!म्हणजे ज्यांना घरची हक्काची सपोर्ट सिस्टीम नसेल,अशा कुटुंबांसाठी जेवणाचे डबे तयार करणं आणि मुलांना सांभाळणं हा चांगला पर्याय आणि विरंगुळा आहे आमच्या पिढीसाठी, रिटायरमेंट नंतर वेळ कसा घालवावा याची काळजी करण्याचं कारण नाही!"अंजलीच्या वडिलांनी डोळे मिचकवत अंजली आणि समीरला म्हटलं होतं . 
"मॉल मध्ये खरेदी आम्हाला तरी काही जमली नाही बुवा,आपले इतक्या वर्षांचे लागलेले दुकानदार बरे आणि आम्ही बरे!"नलिनीताईंनी म्हटलं होतं.लेक जावयाबरोबर एकदोनदा त्या मॉल मध्ये, सगळं काही एका ठिकाणी मिळण्याची सोय असलेल्या मोठाल्या डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये गेल्या होत्या,रविवारी संध्याकाळी तिथे मुंगी शिरायला वाव नव्हता,इतकी गर्दी ओसंडून वहात होती.
"कसलं साच्यातलं जगणं जगतोय गं आपण,"ऑफिसमधून घरी परततांना वाटेत अंजलीच्या आईवडीलांच्या घरून मुलांना घेऊन येऊन गाडी पार्किंग मध्ये लावतांना अंजलीच्या फोनला उत्तर देत समीर उद्वेगानं म्हणाला.आठवड्यातले पाच दिवस एका साच्यातनं काढलेले आणि वीकएण्ड चे दोन दिवस दुसऱ्या साच्यातून काढलेले!"
"थांब,अत्यंत समर्पक शब्दांत हेच एका प्रख्यात कवीनं सांगितलंय!सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !तेच ते!!"अंजलीनं दार उघडत म्हटलं ,तसा समीर अविश्वासानं अंजलीकडे बघू लागला." उद्या जरा आपण हटके काही करूया,म्हणजे चांगल्या मराठी कविता नेटवरनं शोधून काढून बाबांकडून समजावून घेऊयात. आणि खिचडी तर खिचडी,मी घरीच करीन ती!"
महानगर आपल्या गतीनं धावत होतं.त्या गतीशी जुळवून घेत आपापल्या साच्यात जिवाच्या करारानं महानगरांतली लोकं धावत होती.गती,नं पेलवणारी  गती हाच त्या महानगराचा विरंगुळा होत चालला होता.
__________________________________________________________________
-रश्मी घटवाई ,मुंबई 
९८७१२४९०४७ 

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी