मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:20:साधी माणसं

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:20:साधी माणसं
साधी माणसं  
-रश्मी घटवाई
 
"णमो अरिहंताणं,
णमो  सिद्धाणं,
णमो आयरियाणं,... 
भल्या सकाळी उठून स्नानादी कर्मे करून,पूजा-अर्चा उरकून पंच परमेष्ठि नमस्कार मंत्र म्हणून रसिकाबेन स्वयंपाकघरात गेल्या.त्यानंतरच त्या पेलाभर गरम पाणी प्यायल्या.आंघोळआणि पूजा-अर्चा  केल्याशिवाय त्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवत नसत,की पाणी पीत नसत!आजच्या युगात इतकी कडक कर्मकांडं कुणी करीत नाहीत रसिकाबेन,असं कुणी त्यांना गमतीनं जरी म्हणालं ,तरी त्या हसून म्हणत.जाऊदे,माझी श्रद्धा आहे, माझ्यानं होतं तितकं मी करते. सोसवतील तितके उपास-तापास करते.सून घरात आल्यावर मी काही तिला सक्ती करणार नाही अमूक अमूक कर्मकांडं कर म्हणून.मुलगा स्वत:च्या पायावर कधी उभा रहाणार,सून कधी येणार या गोष्टी त्यांच्यालेखी दैवाधीन होत्या.त्यांनी पतीसाठी चहाचं आधण ठेवलं.त्यात निगुतीनं आलं ,गवती चहा घालून त्यांनी चांगला दोन कप चहा किटलीत भरून ठेवला आणि पतीला उठवलं. कालची विवंचना आजही पतीच्या चेहऱ्यावर कायम होती,हे बघून त्यांचा जीव कळवळला."नका इतकी काळजी करू,ईश्वर सगळं चांगलं करेल."पतीला वाफाळत्या चहाचा कप देत त्या म्हणाल्या. मागच्या आठवड्यात व्यापारातल्या पार्टनरच्या वडिलांना देवाज्ञा झाली,म्हणून पतिराजांना तिथे जाणं आवश्यक झालं होतं ,म्हणून त्यांनी मुलाला आपलं दुकान सांभाळायची गळ घातली होती. मला व्यापारातलं काही कळत नाही,दुकान कसं चालवावं हे कळत नाही,मला दुकानदारी करण्यात रस नाही,मला कॉलेज आहे,अशा नाना सबबी सांगून मुलानं जबाबदारी झटकायचा प्रयत्न केला. खरं तर एव्हाना मुलानं वडिलांची परंपरा पुढे चालवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा होता . तिचे पती जेव्हा त्याच्या वयाचे होते;तेव्हा त्यांनी स्वतःचं शिक्षण सांभाळून वडिलांच्या व्यापारात मदत करत तो नावारूपाला आणून ठेवला होता.त्या क्षेत्रातला नामवंत व्यापारी गाठून त्याच्याशी भागीदारीतला व्यवसाय शेकडो पटींनी भरभराटीला आणला होता.दोघा नवरा-बायकोनी मूल्यं जपली होती.एवढा पैसे असूनही गर्व नं करता दोघे नवरा-बायको साधेपणानं रहात.घरात नोकरचाकरपण नव्हते.रसिकाबेन समर्थपणे घर सांभाळत होत्या आणि त्यांचे पती व्यवसाय!मुलगा मात्र आळसात लोळण्यात,नाहीतर मोबाईलवर नाहीतर बाहेर निरर्थक भटकंती करण्यात भूषण मानत होता.    
"दिलीपभाई ,केम छो ?"फोनवर कुणी गिऱ्हाईक होतं. 
"मजा मां "त्यांनी उत्तर दिलं .गिऱ्हाईकाला तातडीनं सामान हवं होतं ,म्हणून त्यांनी सांगितलं , "मला तर अर्जन्टली जावं लागणार आहे. दुकानपण आज बंद राहील. तरीपण तुमचा खोळंबा होऊ नये म्हणून माझा मुलगा जातीनं तुमची ऑर्डर पूर्ण करेल.सामानाचे पैसे आम्ही खरं तर आधी घेतो,पण वांधो नथी,त्याला अमुक एवढे पैसे सामान मिळाल्यावर लगेच द्यायचे!" दिलीपभाईंनी गिऱ्हाईकाला सांगितलं आणि मुलाला त्यासंदर्भात सूचना दिल्या. संध्याकाळी दिलीपभाईंना त्या गिऱ्हाईकाचे फोनावर फोन येऊ लागले तेव्हा त्यांना कळलं की मुलानं लक्ष नं देता, कुठल्या तरी हलक्या प्रतीचा माल त्या गिऱ्हाईकाकडे पोहोचवला होता आणि ज्या चांगल्या प्रतीचा माल त्याच्याकडे पोहोचवायचा होता त्याचे पैसे त्याच्याकडून घेतले होते.अखेरीस स्मशानातून घरी येऊन आंघोळ करून दिलीपभाईंनी त्या गिऱ्हाईकाकडे स्वतः जाऊन तो चांगल्या प्रतीचा माल पोहोचवला होता.एवढीशी चूक पण मुंबईतल्या त्यांच्या आतापर्यंतच्या कीर्तीला काळिमा फासणारी आणि व्यवसायाला मारक ठरली असती. "दिलीपभाई भला माणस छे !"त्या गिऱ्हाईकानं अनेकांना सांगितलं होतं.मात्र त्या दिवशीच्या शारीरिक श्रमांपेक्षाही दिलीपभाईंनी जी मानसिक वेदना अनुभवली;त्यानं रसिकाबेनच अधिक कळवळल्या. मुलापेक्षाही त्यांना पतीची अधिक काळजी वाटू लागली.  
"आपण दोघेही मिळून समजावून सांगू ना त्याला.लहान आहे तो,नसेल कळलं त्याला घटनेचं गांभीर्य !" रसिकाबेननी पतीला समजावणीच्या सुरात सांगितलं ."तुम्हाला कित्ती कळतं तुमच्या कामातलं.खरं तर तुमच्यापासून किती शिकण्यासारखं आहे.मीच करंटी,चुल्हा-चौकीकडे अधिक लक्ष देत बसले;त्याऐवजी तुमच्याकडून शिकून व्यवसायात तुम्हाला मदत केली असती तर बरं झालं असतं.पण आपल्या समाजात स्त्रियांनी चुल्हा-चौकीकडेच लक्ष द्यायचं,असा दंडक आहे ना!"आवाजातला कातरपणा त्यांचा त्यांनाच कळला . त्याकडे दुर्लक्ष करीत त्या स्वयंपाकाची सिद्धता करण्यासाठी उठल्या. चारीठाव जेवल्याखेरीज त्यांच्या पतीला चैन पडली नसती आणि चारीठाव स्वयंपाक केल्याशिवाय रसिकाबेनना बरं वाटलं नसतं."जेणो काम,तेणो थाय अने  बीजा करे सो गोता खाय!","ज्याचं काम त्यालाच येतं ;दुसरा करू गेला तर बुडतो बापडा!ज्याला जे जमतं तेच त्यानं करावं झालं !"रसिकाबेनच्या मनात विचार आला.आणि मुलानं आदल्या दिवशी केलेल्या फर्माइशीनुसार त्यांनी उंधियु रांधायला सुरुवात केली . 
                                      **************************************** 
"गेले काही महिने प्रतीक सुस्तावलेला आहे.फारसा कुणाशी बोलत नाही,कॉलेजला दांड्या मारतो, विचारलं तर अक्षरश: थयथयाट करतो,नाहीतर शून्यात नजर लावून आढ्याकडे बघत बसतो. सात-आठ दिवस झाले,नीट जेवत पण नाहीये.मला फार काळजी वाटते हो!"अपर्णानं नवऱ्याला हळू आवाजात फोनवर सांगितलं ,तरी कानठळ्या बसणाऱ्या आवाजात कुणी बोलल्यागत तिचेच शब्द तिला ऐकायला आले. "डिप्रेशन वगैरे काय काय ऐकतो आपण!तसलं तर काही नसेल ना हो?"नवरा एक वर्षाच्या पोस्टिंग वर परदेशात असताना आपण त्याला घरातले प्रॉब्लेम्स सांगून त्याला नवी काळजी द्यायला नको,म्हणून ती प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. प्राप्तेतु  षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् या उक्तीनुसार मुलाशी वागायचा प्रयत्न करीत होती,तो नित्यनवी काळजी तिला सतावत होती."की त्याचा प्रेमभंग वगैरे झालाय देव जाणे!हल्लीची मुलं शाळेतच प्रेमबीम जमवतात,हे खूप झालं!" अपर्णाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि तो तिच्या डोळ्यांतून तो झरझर वाहू लागला. "अगं सुतावरून स्वर्ग गाठू नकोस!आयटीत करिअर करायचं म्हणत असलेला मुलगा असा नाही वेड्यासारखा वागणार.शिमल्यात खूप बर्फवृष्टी  झाली म्हणून दिल्लीतही कडाक्याची थंडी आहे ना?प्रतीकला थंडी कुठे मानवते?जरा आळसटला असेल! तो कसाही जरी वागला तरीपण तू मात्र त्याच्याशी प्रेमानं वाग."अपर्णाचा नवरा फोनवर तिला म्हणाला. "बरं माझ्या मित्रानं कनॉट प्लेस मधल्या त्याच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये  प्रतीकला इंटर्नशिप देऊ केलीये म्हणून सांग त्याला. उद्या भेटायला जा म्हणावं परमेश्वरन् ला म्हणजे तो फॉर्मल लेटर पण देईल त्याला." नवऱ्यानं फोन ठेवला तरी अपर्णा कानाशी रिसीव्हर लावून अश्रू गाळत बसली होती. 
"प्रतीक,बाबांचा फोन होता !जरा गरम गरम जेवून घे बरं !"तिनं त्याला मायेनं आणि अतीव काळजीनं ओथंबलेल्या  स्वरात म्हटलं. त्याचा काहीच प्रतिसाद नव्हता. अखेरीस तिनं त्याला हलकेच थोपटत उठवलं. पिंजारलेले केसांनी आणि तारवटलेल्या डोळ्यांनी तो पानावर येऊन बसला,तेव्हा तिच्या पोटात तटातट तुटलं . 
"ठीकाय!जाईन मी उद्या परमेश्वरन् ना भेटायला,"जेवता-जेवता अपर्णानं बाबांच्या फोनबद्दल त्याला सांगितलं , तेव्हा त्यानं कसेबसे चार घास खाऊन चार शब्दांचा संवाद केला ,ह्यातच अपर्णानं समाधान मानलं.सगळं आवरून झाल्यावर तोवर झोपी गेलेल्या प्रतीकच्या अंगावर तिनं आणखी ऊबदार रजई पांघरली.
 
"हॅलो ,हॅलो ,हा प्रतीकच्या घरचा फोननंबर आहे का?इज प्रतीक'स् मदर देअर ?आम्हाला जरा प्रतीकच्या आईशी बोलायचंय," पलीकडून फोनवर कुणी बोललं ,तसं अपर्णाच्या हातापायातलं त्राणच गेलं ."हो मी त्याची आईच बोलतेय!व्हॉट्स द मॅटर?"तिनं उसनं अवसान आणलं . "मॅडम आय 
अ‍ॅ
​म रियली सॉरी ,पण तुमच्या मुलानं आमच्या या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये येऊन मोठाच घोळ करून ठेवलाय !मी मिस्टर 
परमेश्वरन् चा सेक्रेटरी बोलतोय .हा त्यांना भेटला आणि परत जाताना त्यानं ऑफिसमधल्या छोट्या फायर एक्स्टिंगविशरसकट अनेक वस्तू चोरून आपल्या बॅकपॅक मध्ये ठेवलेल्या आमच्या सिक्युरिटी गार्डला आढळल्या.त्यानं हटकलं आणि त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्याकडे ड्रग्ज आढळले.त्यानं आमच्या  सिक्युरिटी गार्डवर हातपण उगारला.आम्हाला नाईलाजानं पोलिसांना बोलवावं लागतंय.त्यानं आत येताना रजिस्टरमध्ये हा नंबर लिहिला होता म्हणून संपर्क साधतोय!काय करावं ,तुम्हीच सांगा!पोलीस आले सुद्धा!" 
मी पार कंटाळल्येय!हात टेकले आहेत मी!तुम्हाला जे करायचंय ते करा,पोलिसात द्या ,नाहीतर तुरुंगात डांबा!अहो तो घरातले पैसे चोरून नेतो,घरातल्या वस्तू चोरून नेऊन विकतो!मी काय करू,तुम्हीच सांगा!तुम्हाला जे करायचंय,ते करा!"अपर्णानं हताशपणे म्हटलं आणि किंकर्तव्यमूढ होऊन कानाशी रिसीव्हर पकडून ती उभी राहिली . 
                                           ******************************************
"मंगला,पाच खिरी केल्या आहेस ना उज्ज्वलाच्या डोहाळजेवणासाठी?लेकीचं खरंच कौतुक हो तुला, बागेतलं, चांदण्या रात्रीतलं,झुल्यावरचं,आणि आता हे पारंपरिक पद्धतीचं डोहाळजेवण केलंस हो!"मंगलाताईंच्या मावशींनी त्यांचं कौतुक केल्यावर त्यांच्या सासूबाईंनीपण त्यांना दुजोरा दिला.आज डोहाळजेवणाच्या निमित्तानं उज्ज्वलाच्या मैत्रिणी आणि नातेवाईक स्त्रिया मुंबईतल्या त्यांच्या घरात जमल्या होत्या.ह्या बायकी कार्यक्रमात पुरुष मंडळींचं काय काम म्हणून वसंतरावांसह सर्व पुरुष मंडळी आतमध्ये गप्पा मारत चहा पीत बसली होती. सुट्टीच्या दिवशीच्या त्याच्या शिरस्त्यानुसार नेहमीप्रमाणे राजस् बाहेरच होता.आताशी तो घरात फारच कमी वेळ असायचा.एकतर पुण्यात त्याला नोकरी मिळाली होती.तिथल्याच एका नाटकाच्या ग्रुपमध्ये नवोदित कलाकार म्हणून छोट्या भूमिकाही करायला त्याला कधीकधी बोलावलं जायचं.
नववा महिना सरत आल्यावर लेकीकडे मंगलाताईंचं बारीक लक्ष होतं.त्या तिला फुलासारखं जपत होत्या. बाळाच्या आगमनासाठी त्यांचीही जय्यत तयारी झालेली होती.
डोहाळजेवणाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला.आलेली पाहुणेमंडळी पांगली.घरात केवळ मंगलाताई , मंगलाताईंच्या सासूबाई,वसंतराव,उज्ज्वला तेवढ्या उरल्या.राजस् साठी मंगलाताईनी जेवणाचं ताट वाढून झाकून ठेवलं.सासूबाई झोपी गेल्या.मंगलाताई मागची आवरासावर करू लागल्या. त्यांना सोबत म्हणून उज्ज्वला त्यांच्याशी गप्पा मारत बसली. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली आणि कुणीतरी दारावर टकटक केलं .
"राजस् आला वाटतं !थांब मी दार उघडते!"उज्ज्वलानं दार उघडलं ,तर दाराबाहेर दोन सर्वस्वी अनोळखी,धिप्पाड रांगडी माणसं उभी होती. त्यांच्या एकूण अवतारावरून ती काही चांगल्या संस्कारांची किंवा चांगल्या घरांतली दिसत नव्हती.    
 "राजस्  मराठे हितंच राहतो काय?"त्यांतल्या एकानं रांगड्या शैलीत विचारलं.उज्ज्वलानं घाबरून आईबाबांना हाक मारली.मंगलाताई आणि वसंतराव लगबगीनं आले.त्यांनी उज्ज्वलाला आत पाठवलं . 
"कोण तुम्ही?कशाला आलात इथे?"मंगलाताईंनी त्यांना विचारलं.
"राजस्  मराठेचं घर हाये का ह्ये?"त्यानं पुन्हा रांगड्या आवाजात विचारलं . 
"हो .मुलगा आहे तो आमचा.का विचारताय तुम्ही?तुम्ही कोण?"वसंतरावांनी विचारलं.त्यांना काही अंदाज येत नव्हता.
समोरचं अत्यंत सुंदर,शालीन,सोज्ज्वळ कुटुंब बघून ती गुंड माणसं पण नरमली. 
"आम्ही पुण्यातल्या अमुकअमुक बार रेस्टोरेंट कडून आलोय. तुमच्या मुलानं आमच्याकडून दारू आणि पत्ते खेळण्यासाठी अनेकदा कर्ज घेतलंय,उधारी थकवली आहे .आत्ता दारूचा पेला हातात धरून तो शेवटच्या घटका  मोजतोय.कर्ज,व्याज आणि सगळे हिशोब मिळून तो आमचं वीस लाख रुपयांचं देणं लागतो.त्यानं तुमचं नाव आणि पत्ता दिला म्हणून आम्ही धाकदपटशाहीनं ,सक्तीनं पैसे वसुली करण्याकरता आलो होतो,पण तुम्ही इतके चांगले लोक .... "त्या अत्यंत सभ्य -सुसंस्कृत लोकांशी बोलताना गुंड त्यातल्या त्यात चांगल्या भाषेत बोलायचं प्रयत्न करू लागले आणि हळहळले सुद्धा. "आमाला काय चांगलं वाटत नाय!पन काय करनार !वीस लाख उधारी करून ठिवली वो तुमच्या प्वारानी !"
"तुम्ही त्याची काळजी करू नका. आम्ही साधी माणसं आहोत,पण तुमची पै नी पै चुकती करू ." सगळी शहानिशा करून झाल्यावर आपलंच नाणं खोटं असल्याचं सूर्यप्रकाशाएवढं स्वच्छ झाल्यावर वसंतरावांनी त्या बारचा पत्ता, फोन नंबर घेतला आणि तडक सकाळी तिथे जायचं ठरवलं."तुमच्या मालकाला म्हणावं आम्ही फेडू ते कर्ज.भेटतो मी त्यांना उद्या.तुम्हाला काही पाणी-बिणी ?"आपल्यासारख्या गुंडांना समोरचा साठीचा तेज:पुंज सुसंस्कृत गृहस्थ आणि त्याची तितकीच तेज:पुंज ,सुविद्य पत्नी इतकी चांगली वागणूक देताहेत,म्हणून तेही गहिवरले. 

"आपल्या लक्षातही येऊ नये हे सगळं ?झालं ते झालं ,आता त्यावर चर्चा नको. आपण त्याचं मागच्या जन्मीचं देणं लागतो,असं समजायचं !मी उद्या शिलकीतली रक्कम ,एफडी मोडून त्यांना कर्जातली काही रक्कम देऊन येतो. त्यालाही घेऊन येतो. "वसंतराव म्हणाले. 
"माझे दागिने,घरातली चांदीची भांडी आहेत.हे सगळं मोडून काही पैसे येतील.एकूण हे कर्ज फेडायला आपल्याला वीस वर्षं लागतील!पुढची वीस वर्षं मी साधा ब्लाऊजपीसही घेणार नाही.गरज पडल्यास एक वेळ जेवून राहू!" मंगलाताई म्हणाल्या.त्या रात्री त्यांचं घर जागं होतं आणि पुढची वीस वर्षं त्या कूस बदलत झोपायचा प्रयत्न करीत राहणार होत्या. 
                 ***************************************************************** 
महानगरांमध्ये रात्र झाली होती.साधीसुधी कष्टकरी माणसं झोपी गेली होती. त्याचवेळी महानगरांमधल्या मध्यरात्रीच्या समांतर जगात उजाडलं होतं.दारू पिणारे,ड्रग्ज घेणारे ,जुगारी , गुंड-पुंड रात्रीचा दिवस करीत काम करीत होते.जाळं फेकत होते आणि  साध्यासुध्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होते. आणि त्याला बळी  पडलेल्यांचे  कुटुंबीय रात्रीचा दिवस करून कष्ट करीत त्यांची देणी चुकती करीत होती, कूस बदलत झोपायचा विफल प्रयत्न करीत होती. 
_________________________________________________________________

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी