मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:23: टाऊनशिप
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख: 23: टाऊनशिप
टाऊनशिप
टाऊनशिप
-रश्मी घटवाई
दिल्लीतल्या प्रमुख इंग्रजी दैनिकांमध्ये सेन्टर स्प्रेड -मधल्या दोन पानांवरची नोएडातल्या भव्य टाऊनशिपची अतिभव्य जाहिरात त्यादिवशी प्रकाशित झाली,तेव्हा घरखरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना कधी एकदा नोएडातल्या त्या टाऊनशिपमध्ये पैसे भरून फ्लॅट बुक करतो आणि तिथे रहायला जातो,असं वाटू लागलं.आपण आत्ता वेळेवर पोहोचलो नाही,तर आपल्याआधी कुणी दुसरा पैसे भरेल आणि आपल्या हातून संधी कायमची जाईल अशी पक्की धारणा लोकांच्या मनात तयार झाल्यामुळे काही वेळातच त्या टाऊनशिपच्या साईटवरच्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये सकाळपासूनच रांगा लागल्या .एकच कोलाहल सुरु झाला आणि काहीवेळानं तर धक्काबुक्की पण सुरु झाली. त्याचं कारणही तसंच होतं. नोएडा हे जरी राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेशात असलं,तरी लौकिकार्थानं ते दिल्लीचं उपनगर आहे.
नोएडाच्या जलदगतीनं विकास होण्यामागचं कारण ते N C R -राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात येतं आणि चांगल्या शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा असल्यामुळे आधीच स्वस्ताई असलेल्या दिल्लीपेक्षाही कमी किमतीत खूप चांगल्या दर्जाचं राहणीमान असल्यामुळे एकुणात सर्व सुखसोयीनीं युक्त परिपूर्ण जीवन तिथे जगता येतं ,हे ठाऊक असलेल्यांनी तर नातेवाईकांना पण बोलावून घेतलं होतं.घरटी किमान दोघांच्या नावे दोन फ्लॅट बुक करण्याच्या इराद्यानं लोक तिथे पोहोचले होते!पहिले येणाऱ्यास प्राधान्य,किमतीत सूट ,लकी ड्रॉ मध्ये जिंकणाऱ्यांना महागडी कार,मोटारसायकल, मॉड्युलर किचन ,टीव्ही ,फ्रिज ,वॉशिंग मशीन वगैरे गृहोपयोगी गोष्टी देण्यात येणार होत्या. शिवाय आज आणि उद्या तिथे येणाऱ्या प्रत्येकाची चहा- नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळी सोय केलेली होती. बाहेरगावाहून येणाऱ्या मंडळींसाठी आंघोळीपासून प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केलेली होती. फ्लॅट घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला आवश्यक त्या कागदपत्रांसह फ्लॅटच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम तेवढी भरायची होती. त्यासाठी गृहकर्जे देणाऱ्या बँका तसेच खाजगी संस्थाची गृहकर्जाची सोय पण उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या टाऊनशिपमध्ये तर इतक्या काही सोयी असणार होत्या की सर्वसामान्यांना आपापल्या ऑफिसव्यतिरिक्त कुठल्याच गोष्टीसाठी टाऊनशिपच्या बाहेर जाण्याची वेळ येणार नव्हती .
वर्षा आणि तिचे पती राकेशही त्या रांगेत उभे होते.तेवढ्यात तिथे उभारलेल्या भव्य स्क्रीनवर एका आलिशान महागड्या गाडीतून बिल्डर आणि त्याचे लोक उतरताना आणि छोटेखानी व्यासपीठावर विराजमान होतानाचं दृश्य दिसलं ,थाटामाटात झालेल्या भूमिपूजन सोहोळ्याचं पण प्रक्षेपण झालं.पाठोपाठ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या युवतीनं आणि युवकानं त्या टाऊनशिपबद्दलची माहिती चित्रफितींसह सांगितली,तेव्हा त्या परिसरातल्या लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
वर्षा आणि राकेशचा नंबर येईतो जवळजवळ दोनेकशे लोकांनी,कालांतरानं तिथे उभ्या राहणार असलेल्या वेगवेगळ्या इमारतींतले साडेतीनशे फ्लॅट बुक करून टाकले होते."चार बेडरूमचा हा मोठ्ठा डिझायनर फ्लॅट आज बुक केला तर दीड करोडला पडेल!आज बाहेर उपलब्ध असलेल्या दोन बेडरूमच्या साध्या फ्लॅटचीच किंमत पंचाहात्तर ते पंच्याऐंशी लाख रुपये आहे!"वर्षा आणि राकेशला उद्देशून त्यांच्या मागे उभा असलेला मनुष्य म्हणाला,"दोन वर्षांत ही टाऊनशिप उभी राहणार आहे म्हणे!तोवर त्या आपल्या फ्लॅटची किंमत दुप्पट झालेली असेल !"त्याच्या त्या वाक्यावर रांगेतल्या अनेकांचं स्वप्नरंजन सुरु झालं.एका हिंदी चित्रपटगीतातल्याप्रमाणे लोकांना त्या जागी दिवाणखाना,शयनकक्ष ,स्वयंपाकघर वगैरे सगळे कल्पनेत दिसू लागले.
" दीड करोड रुपयांचा फ्लॅट घ्यायचा की नाही ,ह्याचा निर्णय एवढ्या घाईघाईत घेणं कठीण आहे!आपण त्यावर विचार करू नीट आणि पाहिजे तर पुन्हा उद्या येऊ !" बिल्डरच्या माणसानं पुन्हा एकदा टाऊनशिपबद्दल वर्षा आणि राकेशला संक्षिप्तपणे समजावून सांगितलं, तेव्हा नवराबायको आपसांत चर्चा करू लागले. "पंधरा लाख बुकिंग अमाऊंट काही थोडीथोडकी नाहीये!आम्हाला उद्यापर्यंत थोडा वेळ द्या,मात्र तोवर हा फ्लॅट आमच्यासाठी ठेवला तर बरं होईल!"वर्षानं त्या बिल्डरच्या माणसाला म्हटलं तेव्हा रांगेत कोलाहल झाला. "अरे आम्हालाही घ्यायचाय फ्लॅट ,तुम्ही पैसे नं भरता कसा काय ब्लॉक करायला सांगता?","तुम्हाला आत्ता नको असेल तर नंतर या ,रांगेत उभे राहून आमचा वेळ मोडू नका!"एकच गदारोळ उमटला.
"ठीक आहे!आम्ही काय तो निर्णय उद्या घेतो!"वर्षा आणि राकेशनं त्यांना सांगितलं .दोघे तिथून फ्लॅट बुक नं करता बाहेर पडले. रांगेतल्या अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला,की चला आणखी एक फ्लॅट आपल्यासाठी उपलब्ध झाला !
दुसऱ्या दिवशी उशिरा रात्रीपर्यंतची वेळ होईतो, बिल्डरचे भविष्यात उभ्या राहणार असलेल्या त्या टाऊनशिपमधले नव्वद टक्के फ्लॅट चहासमोश्यांसारखे झटपट विकले गेले होते. दहा टक्के एनआरआय लोकांसाठी राखीव असलेल्या अतिभव्य फ्लॅट्सच्या बुकिंगसाठी लोकांनी प्रतीक्षायादीतपण नाव नोंदवलं होतं.
प्रोजेक्ट सुरु होऊन चार वर्षे उलटून गेली,तरी ती टाऊनशिप अद्याप उभी झालेली नव्हती,म्हणून अन्याय झाल्याबद्दल लोकांनी नोएडात मोर्चा काढला होता.बिल्डरनं आपलीच माणसं पेरून आभासी गर्दी निर्माण केली आणि आपण आत्ता फ्लॅट्स विकत घेतले नाहीत तर आपल्या हातून ही संधी कायमची जाईल,अशा पद्धतीची वातावरणनिर्मिती केली,त्यामुळे आपणही सारासार विचार नं करता भावनेच्या भरात फ्लॅट विकत घेऊन टाकले,त्यासाठी आवश्यक असलेली दहा टक्के बुकिंग अमाऊंट बिल्डरला देऊन टाकली,कागदपत्रं नं वाचता, त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी, फुल्या मारलेल्या जागी डोळे मिटून सह्या केल्या,त्या बिल्डरनं आपल्याला लाखो रुपयांना फसवलं ,नवे गृहकर्जाचे हफ्ते आणि भाड्यानं राहत असलेल्या घराचं घरभाडं अशा चक्रात भरडल्या जात असलेल्या त्या लोकांनी रास्तारोको आंदोलन केलं होतं त्यामुळे नोएडा आणि दिल्लीत वाहतुकीचा प्रचंड मोठा खोळंबा झाला होता.तासाभरापासून त्यात वर्षा आणि राकेशसुद्धा अडकले होते. त्या टाऊनशिपमध्ये फ्लॅट बुक नं करताही दोघांना त्याची अप्रत्यक्ष झळ पोहोचत होती.
****************************** ************
चारपाच हायराईझ टॉवर्स आणि चारपाच लोराईझ बिल्डिंग असलेल्या नोएडामधल्या त्या टाऊनशिपमध्ये प्रामुख्यानं परदेशस्थ भारतीय लोकांचीच आर्थिक गुंतवणूक होती.आज बिल्डरनं त्यांना घराची चावी देण्यासाठी आणि मालकाच्या नावानं फ्लॅटची रजिस्ट्री करण्यासाठी संपूर्ण सहाय्य्य देऊ करण्यासाठी एक गेट टुगेदर आयोजित केलं होतं.श्यामला आणि रमाकान्त आपल्या फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी दुबईहून आले होते.मुळात आता जवळ साठलेल्या ह्या पैशांचं काय करायचं एवढ्याच विचाराच्या बळावर, कसलीही खातरजमा नं करता ऐकीव माहितीच्या आधारावर, आपले इतर भारतीय सहकारी तिथे फ्लॅट घेताहेत म्हणून त्यांनीपण त्या टाऊनशिपमध्ये दोन बेडरूमचा फ्लॅट घेऊन टाकला होता.फ्लॅटचे पैसे तिथूनच थेट इलेक्ट्रॉनिकली बिल्डरच्या खात्यात जमा केले होते. त्या टाऊनशिपच्या जाहिरातीत प्रशस्त फ्लॅट दाखवला होता,त्याच्या जवळपास सुद्धा तो फटकत नव्हता.श्यामलाला तर आपला फ्लॅट अंमळ लहानच वाटला होता.जाहिरातीतल्या आणि त्यांच्या सॅम्पल फ्लॅटमध्ये त्या फ्लॅटच्या किमतीच्या तिप्पट किमतीचं इंटिरियर डेकोरेशन केलेलं होतं. इंटिरियर डिझायनर सुद्धा अवघ्या पंधरा दिवसांत त्यांना हवं तसं सुबक इंटिरियर डिझाईन करून देऊन त्यांचा फ्लॅट राहण्यासाठी सुसज्ज करून देणार होता,केवळ त्याची फी थोडी अधिक होती,एवढंच !दुबईत आणखी किती दिवस राहायचं आहे, कोण जाणे,अडीअडचणीला भारतात घर असलेलं बरं म्हणून इंटिरियर डिझायनर म्हणेल तेवढी रक्कम त्यांनी त्याला आगाऊ देऊन टाकली.महिनाभराची रजा साठलेली होती,ती नातेवाईक आणि घराच्या इंटिरियर मध्ये खर्ची पडणार होती.
महिनाभराअखेरीस हॉटेलातल्या राहण्याचा खर्च आणि घराच्या इंटिरियर डिझायनिंग मध्ये झालेला खर्च यांचा ताळेबंद मांडत पतीसह श्यामला दुबईला परत जाण्यासाठी विमानात बसली तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्या इंटिरियर डिझायनरनं आपल्याला जवळजवळ लुबाडलेलंच आहे!आणखी थोडे पैसे घातले असते तर त्या पैशांत आणखी एक वन बीएचके फ्लॅट आला असता.श्यामला हळहळू लागली. तोवर दुबईला जाण्यासाठी विमानानं आकाशात झेप घेतली होती
****************************** ***********
त्या टाऊनशिपमध्ये हळूहळू लोक राहायला येऊ लागले होते. नोएडातल्या विस्तीर्ण परिसरात,दिल्लीच्या अगदी जवळ वसलेल्या त्या टाऊनशिप मध्ये एकावर एक फ्री अशा पद्धतीनं वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटसची विक्री झालेली होती,एकावर एक फ्री फ्लॅट ही ऑफर त्यांनी आणली तेव्हा कुठे त्यांच्या इमारतींमधल्या बाविसाव्या मजल्यांवरच्या फ्लॅटसना गिऱ्हाइक मिळालं होतं .अडला नारायण म्हणत त्या ग्राहकांनी ती घरं खरेदी केली होती,साहजिकच बाविसाव्या मजल्यावरचे लोक इमारतींमध्ये पहिल्याप्रथम राहायला आलेले होते.बाकीच्या खालच्या मजल्यांवर तुरळक लोक आलेले होते.टाऊनशिप गावाबाहेर होती,आत असलेल्या दुकानांमध्ये सामान मिळालं तर ठीक;नाहीतर खूप लांबवरच्या बाजारात जावं लागत होतं.श्वेताच्या नवऱ्यानं आणि दिरानं संयुक्तपणे खरेदी केलेल्या,लागून लागून असलेल्या त्या स्वतंत्र फ्लॅट्स मध्ये ते दोघेही भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय राहायला आलेले होते.दोघीही जावा नोकरी करीत होत्या. श्वेताला तर आपल्या लहानग्या मुलीला पाळणाघरात सोडणे आणि तिला परत आणणे ही अधिकची कामं करावी लागत होती. नव्या घरात राहायला मिळतंय या आनंदात त्रासाची क्षिती वाटत नव्हती,हा भाग वेगळा!
"आजचा दिवस विचित्रच उगवलाय !कामं पूर्ण व्हायच्या ऐवजी वाढतच जाताहेत!"सकाळपासून कामात गुंतलेल्या श्वेताच्या मनात आलं!तिनं पतीची,स्वत:ची आणि लेकीची तयारी केली आणि घराची,गाडीची किल्ली घेऊन तिनं बाविसाव्या मजल्यावर लिफ्ट बोलावली.
"मम्मी मुझे टॉयलेट जाना है !"लिफ्ट जेमतेम एकदोन मजले खाली गेल्यावर श्वेताची चिमुरडी लेक उद्गारली,तशी घाईघाईनं लिफ्ट थांबवून श्वेता लिफ्टबाहेर पडली,जिने चढून ,कुलुपं उघडून लेकीला घेऊन घरात गेली.दारं बंद करण्याचे सगळे सोपस्कार करून पुन्हा ती बाविसाव्या मजल्यावरून अंडरग्राउंड पार्किंग मध्ये आली ,तेव्हा तिच्या लक्षात आलं ,की कारची किल्ली आपण घरी डायनिंग टेबलवर ठेवली,ती परत घ्यायलाच विसरलो!श्वेताचा त्रागा होऊ लागला.पुन्हा लेकीला घेऊन महत्प्रयासानं आलेल्या लिफ्टमधून ती बाविसाव्या मजल्यावरच्या आपल्या घरात शिरली,तेव्हा तिचं डोकं भणभणायला लागलं होतं.अशा त्राग्यानं कामावर जाण्यात अर्थ नाही,असं तिला वाटू लागलं.तिनं आपल्या कामाच्या ठिकाणी आपण आज बरं नसल्यानं येऊ शकत नाही,म्हणून कळवून टाकलं.आपण आज सुटीवर आहोत म्हणून लेक घरीच असल्याचं पाळणाघरातल्या काकींना पण सांगितलं!आता चहा घेतला की बरं वाटेल म्हणून तिनं चहाचं आधण ठेवलं ,तोच तिच्या लक्षात आलं,की दोन्ही घरांतला चहा सकाळीच संपला होता. टाऊनशिपमधल्या दुकानदाराला तिनं फोन लावला .
" चाय खतम हो गयी है मॅडम !मंगायी है ,आतेही भेज दूंगा !"दुकानदारानं सांगितलं,तसा तिनं गॅस बंद करून टाकला.
टाऊनशिपवरच्या बाविसाव्या मजल्यावरून स्वयंपाकघराच्या बंद बाल्कनीतून तिनं खाली पाहिलं .तिथून खाली वावरणारी माणसं खूप छोटी भासत होती. तिथून जवळच आणखी एका टाऊनशिपचं काम सुरु होतं ,तिथे पंचवीस मजली इमारतीचं बांधकाम सुरु होतं . तिनं पंचविसाव्या मजल्याकडे नजर वळवली आणि फिक्कट हसत स्वयंपाकघराचं दार बंद करून घेतलं !
______________________________ ______________________________ ___
-रश्मी घटवाई,नोएडा
Comments
Post a Comment