मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:30:देवाघरची फुले

 मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख ३०:देवाघरची फुले 
देवाघरची फुले 

-रश्मी घटवाई  
ईशानं आपल्या ब्युटी पार्लरचं दार उघडलं आणि चपला काढून तिनं देव्हाऱ्यातल्या देवासमोरचं निरांजन लावलं,मनोभावे देवाला नमस्कार केला.मुंबईतल्या,लोकांचा खूप राबता असलेल्या एका चांगल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये तिनं वर्षभरापूर्वी आपलं ब्युटी पार्लर थाटलं होतं.आजुबाजूला चांगल्या हाऊसिंग सोसायट्या असल्यानं बघता-बघता तिचा जम बसला होता.तिथल्या उच्च मध्यमवर्गीय स्त्रिया आणि सोबत केस कापून घ्यायला आलेल्या त्यांच्या लहान मुली हा तिचा ग्राहकवर्ग होता.ईशा मन लावून काम करीत असल्यामुळे साहजिकच ती अल्पावधीत लोकप्रिय झाली होती,नावारूपाला आली होती.तिची पूजा संपत आली तेवढ्यात दोन-तीन लहान मुली पार्लरचं दार उघडून आत शिरल्या. 
"गुड मॉर्निंग ईशा दीदी !"त्यांनी म्हटल्यावर ईशानं हसून त्यांना प्रत्युत्तर दिलं".ह्या मुली कोण बरं ?पहिल्यांदाच आल्यात की आपापल्या मम्मीबरोबर आल्या होत्या पूर्वी?"तिनं बुद्धीला ताण दिला.
"दीदी,हमें मेकअप कराना है." तिघींनी एका आवाजात सांगितलं,तशी ईशा चपापली."आज काय तुमच्या शाळेत तुमचा काही नाचा-बिचाचा कार्यक्रम आहे का?" त्याची शक्यता तशी कमीच होती. सगळीकडे सध्या परीक्षेचं वातावरण होतं."ह्या मुली जेमतेम आठ नऊ वर्षाच्या,तिसरी चौथीत शिकणाऱ्या असाव्यात."ईशानं अदमास बांधला.
"नहीं दीदी ,आमच्या मैत्रिणीची आज ग्रँड बर्थडे पार्टी आहे.एका मोठ्या हॉटेलमध्ये तिनं तिच्या बर्थडे साठी बोलावलंय.इतने लोग आएंगे तो हमें अच्छा भी तो दिखना पडेगा !"त्यांनी म्हटलं .
 "अरे पण तुम्ही अशाच इतक्या गोड आहात ,इतक्या छान दिसताय,छानसे कपडे घातले की पार्टीसाठी तय्यार!"ईशानं त्यांना समजावलं . 
"पार्टी के लिये कपडे भी हम साथ में ले आए हैं."त्यांनी बरोबरच्या बॅगेतून चमचमणारे ,पार्टीत घालायचे कपडे काढून दाखवले .ईशाला कळेचना काय बोलावं ते !
"मेकअप वगैरे करायचं तुमचं वय नाहीये गं इटुकल्यांनो!त्यानी तुमची त्वचा खराब होईल. नाच वगैरे असला तर गोष्ट वेगळी!पण पार्टीसाठी जायला लहान मुलांनी थोडीच मोठ्यांसारखं तयार होऊन जायचं असतं ?"
"आप को पता नहीं है दीदी .सगळ्याजणी छान मोठ्यांसारखा मेकअप करून येतात .मागे आम्ही अशाच गेलो होतो,तर सगळ्या हसल्या आम्हाला. इतक्या बावळट दिसत होतो आम्ही त्या सगळ्यांसमोर.शेवटी नुसती गिफ्ट देऊन,रिटर्न गिफ्ट पण नं घेता परत आलो होतो.शाळेतपण त्या आम्हाला टोमणे मारत होत्या किती दिवस!"त्या कोवळ्या मनांवर अपमानाचे ओरखडे उमटलेले ईशाला स्वच्छ दिसले. 
"पण मेकअप करायला बरेच पैसे लागतात हं,आणि तुमच्याबरोबर तुमची आई वगैरेपण नाही आलेली, मी कसं काय काम करू तुम्हीच सांगा ,उद्या तुमची आई मलाच रागवेल!".ईशानं बचावाचा पवित्रा घेतला,तशी लगोलग एकीनं आपल्या आईला मोबाईलवर फोन लावला ,दुसरीनं पर्समधून पैसे काढून दाखवले. ईशाला काही सुचेचना.  
"अरे मुली हटून बसल्या आहेत,होऊन जाऊ द्या त्यांच्या मनासारखं !जमाना बदल रहा है!"शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये शॉपिंग करत असलेल्या त्या चिमुरडीच्या आईनं फोनवर सांगितलं,तेव्हा नाईलाज होऊन ईशानं त्या चिमुरड्यांच्या मनासारखा मेकअप करून दिला.पार्टीसाठी आणलेले कपडे परिधान करून आणि सेल्फी घेऊन त्या चिमुरड्या आल्या तशा परत गेल्या,तरीही ईशा त्याच विषयावर विचार करीत राहिली.
"एस्क्युज मी,माझ्या मुलीला चॉकोलेट फेशियल करून हवंय !"पार्लरचं दार उघडून एक आधुनिक, अल्पवस्त्रांकिता फॅशनेबल बाई आत शिरली,तेव्हा ईशानं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं . तिच्याबरोबर साताठ वर्षांची मुलगी होती,तिनंही तिच्या आईच्याच कपड्यांच्या फॅशनचं अनुकरण केलेलं  होतं."अरे आज चाललंय काय?सकाळी उठून आपण कुणाचं तोंड पाहिलं बुवा?"ईशाच्या मनात विचार आला."काही नाही,आजच्या ह्या पेपरनी टॉप स्टोरी केलीये की लहान मुलीही आता ब्युटी पार्लरमध्ये जाऊन चॉकोलेट फेशियल,नखं रंगवणं -नेल आर्ट -करवून घेतात म्हणून!तो लेख मी लिलीला वाचून दाखवला,तर तीही हट्ट करू लागली.आजच तिची परीक्षा संपलीय. छान गेलेत पेपर, म्हणून  तिला रिवॉर्ड!"लिलीची आई ईशाला म्हणाली,तशी कुतुहलानं ईशानं तिच्या हातातून पेपर घेऊन तो लेख चाळला.मुंबईचं प्रतिबिंब त्या दर्पणात दिसत होतं आणि मुंबईच्या बदललेल्या रूपाचं प्रतिबिंब लिलीच्या आईत उमटलं होतं."अच्छा ,म्हणजे लहान मुलांनी हे सगळे प्रकार करू नयेत, लहानांनी लहानांसारखं रहावं ,वागावं म्हणून लहानग्यांना समजावून सांगण्याऐवजी त्यांच्या आयांनीच जर खतपाणी  घातलं,तर आज आपल्या पार्लरमध्ये लहान मुलींची रीघ लागतेय,यात नवल काहीच नाही.त्या लेखापासून प्रेरणा घेऊन,त्यानं उद्युक्त होऊन उद्या आणखी काही लहान मुलं -मुली आल्या,तर आश्चर्य वाटायला नको!नाहीतरी पाश्चात्य देशांत कुत्र्या-मांजरांना पण नटवतात,आधुनिक फॅशनचे कपडे, गॉगल ,कायकाय त्यांना घालतात,त्यांच्यासाठी ब्युटी पार्लर्स आहेत परदेशांत!आपल्याकडेही हे लोण आलंच आहे म्हणा!लहान मुलांच्या रिऍलिटी शो मध्ये मोठ्यांच्या नाचाचं अनुकरण करतांना लहानग्यांचे उत्तान हावभाव आणि कपडे बघवत नाहीत अगदी!"ईशाच्या मनात विचार आला,"आपण तर तिशीही नाही गाठली वयाची,पण आपले विचार आजीच्या पिढीचे किंवा मागासलेलेच वाटतील या अत्याधुनिक म्हणवणाऱ्या मंडळींना!"त्या वर्तमानपत्राला लेखावर खरमरीत प्रतिक्रिया पाठवायचं तिनं ठरवलं. 
"चॉकोलेट फेशियलचे दोन हजार रुपये लागतील!" ईशानं लिलीच्या आईला सांगितलं .लिलीच्या त्या निरागस चेहऱ्यावर चॉकोलेटचा लेप चढवताना,प्रतिक्रियेचा मसुदा तिच्या मनात उमटू लागला,"लहान मुलांना मुलांसारखंच राहू द्या,मोठ्यांनी त्यांच्यावर अकाली लादलेलं हे प्रौढत्व अनाठायी आहे!"
"मॅडम,आज केवळ स्पेशल केस म्हणून मी करतेय,उद्यापासून लहान मुलांना नाही मी हे असलं काही करून देणार,"तिनं ठामपणे लिलीच्या आईला सांगितलं . 
महानगरात लहानग्यांसाठीच्या बाजारपेठेची एक नवीच गंगा अवतरली होती आणि अनेक जण  त्या वाहत्या गंगेत हात धुवून घेत होते. ईशा मात्र तिच्यापुरती त्या विरोधात उभी ठाकली होती. 
                           **************************************** 
शाळेची घंटी वाजली,तशी मुंबईतल्या त्या शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात विद्यार्थी -विद्यार्थिनी शिस्तीत उभे राहून शाळेची प्रार्थना म्हणू लागले.राष्ट्रगीत झाल्यावर वर्तमानपत्रांतल्या प्रमुख बातम्यांचं वाचन,सुविचार वाचन सुरु झालं,तशी मागच्या रांगेत उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीकडे मुख्याध्यापिका मॅडमचं लक्ष गेलं.त्या विद्यार्थिनीचा चेहरा फिकुटला होता.पुढच्याच क्षणी ती चक्कर येऊन खाली कोसळली. विद्यार्थ्यांमध्ये एकच कोलाहल झाला.मुख्याध्यापिका मॅडम त्वरेनं तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला आधार दिला.शाळेतल्या मदतनीस मावशींनी उचलून तिला मेडिकल रूम मध्ये नेऊन झोपवलं,तेव्हा कुठे विद्यार्थी-विद्यार्थिनी आपापल्या वर्गांत पांगले.
"काही नाही,पोटात अन्नाचा कण नाहीये तिच्या.अशक्तपणामुळे चक्कर आली असेल तिला. डॉक्टरांनी तपासलंय तिला.काळजीचं तसं कारण नाहीये,पण तिला घरी जाऊ देणं योग्य !"तिच्या वर्गशिक्षिका घाईघाईनं मुख्याध्यापिका मॅडमना सांगू लागल्या,"ही मुलं काही नं खाता-पिता घाईघाईनं तशीच उठून शाळेत येतात. मग शाळेत त्यांना त्रास झाला की त्यांचं आणि इतर सर्वांचं गणित बिघडतं .बाकीचे विद्यार्थी आता शिकायचं सोडून ह्याच विषयावर बोलत बसलेत!" त्यांनी तिच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं.
"अहो आमची मुलगी आत्ता सहावीत आहे ,मिस इंडिया स्पर्धेत चमकायचं आहे तिला,म्हणून डाएटिंग करून आतापासूनच फिगर चांगली करते आहे. इंटरनेटवर वाचून केवळ फळं खातेय.... झाला असेल थोडासा त्रास..." विद्यार्थिनीच्या आईनं मोठ्या कौतुकानं तिच्या वर्गशिक्षिकेला आणि मुख्याध्यापिका मॅडमना सांगितलं,तेव्हा दोघी हतबुद्ध होऊन तिच्याकडे बघू लागल्या. "बहुधा आपल्या आईची अपुरी राहिलेली इच्छा ती विद्यार्थिनी पुरी करीत असावी!त्या दोघींच्या मनात आलं . "नाही,पण हे योग्य नाही हं ,तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जा तिला... अशानं तुमच्याच मुलीचं नुकसान होईल. "शिक्षिकांनी कळकळीनं सांगितलं ,तोवर चवथीच्या वर्गशिक्षिका आपल्या वर्गातल्या एका विद्यार्थिनीला घेऊन त्यांच्याजवळ आल्या होत्या. 
"मॅडम,मुलींचं वयात येण्याचं वय खूप कमी होत चाललंय,खूप लहान वयात मुली वयात येताहेत,असं आपण ऐकतो वाचतो,आपल्याकडची ही दुसरी घटना.. आपण चोख व्यवस्था ठेवलीय,पण ही खरंच गंभीर  गोष्ट आहे!आपल्याला तिच्या पालकांना बोलावून घ्यावं लागणार बरं का,त्यांना घेऊन जाऊ दे तिला घरी !"चवथीच्या वर्गशिक्षिका हलक्या आवाजात कुजबुजत मुख्याध्यापिका मॅडमना सांगू लागल्या, "नको इतक्या प्रमाणात टीव्ही,चित्रपट बघतात आजकालची ही मुलं ... "
"अहो कोणे एके काळी चित्रपटाचा नायक बऱ्यापैकी प्रौढ वयात नायिकेवर प्रेम करायचा,मग हळूहळू नायक कॉलेजकुमार होऊन प्रेम करू लागला आणि आताचे चित्रपट तर शाळेत असतानाच प्रेम करायचे धडे देताहेत,म्हटल्यावर आणखी काय होणार!" मुख्याध्यापिका मॅडम काहीसं गंभीरपणे आणि काहीसं हलक्याफुलक्या नर्म विनोदी शैलीत म्हणाल्या.
"पुढच्या आठवड्यात आपल्याला शिक्षकांच्या एका परिषदेत जे मुद्दे मांडायचेत,त्यात हे दोन अनुभव पण सांगूयात... महानगरातल्या शिक्षकांना किती वेगवेगळ्या समस्या हाताळाव्या लागतात,पहा!" मुख्याध्यापिका मॅडम दोन्ही वर्गशिक्षिकांना म्हणाल्या. 
"मुले ही देवाघरची फुले,"शाळेतल्या फळ्यावर सुभाषित लिहिलेलं होतं . 
महानगर आपल्या गतीनं जात होतं.त्या महानगरातली देवाघरची फुलं अकाली फुलू पाहत होती...  अकाली कोमेजत होती. 
_________________________________________________________________
-रश्मी घटवाई ,मुंबई 
९८७१२४९०४७ 

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी