मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख १: आला पाऊस...
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख १: आला पाऊस...
आला पाऊस...
-रश्मी घटवाई
पावसाची पहिली रिमझिम सुरू झाली तेव्हा महानगरामधली मध्यमवर्गीय सीमा सुखावली.रोज भल्या पहाटे उठून,आंघोळ,देवपूजा उरकून स्वयंपाक करून नवऱ्याचा,मुलांचा, असे सगळ्यांचे डबे भरायचे,सगळ्यांना उठवून,त्यांचं चहापाणी,नाश्ते उरकून,नवऱ्याला त्याच्या कार्यालयासाठी आणि मुलांना त्यांच्या शाळेत रवाना करून झालं,की स्वत: छान टापटीप तयार होऊन आपल्या दुचाकीवरून स्टेशनपर्यंत आणि मग लोकलनं,पुढे बसनं,कार्यालयात जाणाऱ्या,परत त्याच क्रमानं आपल्या घरी परतायचं,वाटेत भाजी,फळं घ्यायची ,मग घरी आल्यावर नव्या जोमानं रात्रीचा स्वयंपाक करायचा,मुलांचे अभ्यास घ्यायचे,दुसऱ्या दिवशीची तयारी करायची,सणवार,पाहुणे-राव्हणे, आला-गेला यांचं सगळं व्यवस्थित करायचं आसा आखीव रेखीव शिस्तबद्ध दिनक्रम असणाऱ्या नोकरी करणाऱ्या आणि तरीही वेळात वेळ काढून आपले छंद जोपासणाऱ्या सगळ्या मध् यमवर्गीय स्त्रियांचं ती जणू प्रतिनिधित्व करीत होती.पावसानं आलापी सुरु करताच तिच्या मनात पावसाची गाणी रुंजी घालू लागली."आला पाऊस मातीच्या वासातगं..."तिच्या मनात पाऊस बरसू लागला तशी तिच्या गळ्यातून पावसाच्या गाण्याच्या लकेरी उमटू लागल्या.भले महानगरातल्या टोलेजंग इमारतीतल्या सातव्या मजल्यावर पहिल्या पावसानंतर मृदगंध जाणवणं दुरापास्त असलं तरी तिच्या स्मृतीतला तो मृदगंध तिच्याभो वती दरवळू लागला.आज चक्क दांडी मारावी ऑफिसला आणि मस्त कॉफी पीत ,गाणी ऐकत खिडकीतून पावसाचं नृत्य बघावं असा वेडा विचार मनातून निग्रहपूर्वक बाजूला सारून तिनं एकीकडे भाजी फोडणीला टाकली,दुसरीकडे पोह्यांवर पाण्याचा हबका मारला आणि तिसरीकडे कणिक मळायला घेतली.आज न जाऊन चालणार नव्हतं.आज ऑफिसमध्ये अत्यंत महत्वाची मीटिंग होती आणि तिलाच तिच्या बॉसच्या प्रेझेंटेशनवर अखेरची नजर फिरवायची होती.बॉस इंटरनॅशनल कॉन्फरन्सवरून सरळ ऑफिसमध्ये पोहोचून ते प्रेझेंटेशन देणार असल्यानं सीमानं वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचणं नितांत गरजेचं होतं.त्यामुळे घड्याळाच्या काट्याबरोबर सीमाचे हात सराईतपणे चालत होते.सगळं आवरून ती तयार झाली झाली तरी कामवाली दयावती तोवर आली नव्हती!तोही विचार काढून टाकून तिनं रेनकोट चढवला.तिच्या कपूर साहेबांना जराही चूक झालेली खपली नसती.
सीमा स्टेशनपर्यंत पोहोचली तेव्हा पावसानं आपला पवित्रा बदलून त्या महानगराला वेठीला धरलं होतं.'रिमझिम झरती श्रावणधारा' संपून 'घन घन माला नभी दाटल्या,कोसळती धारा'सुरू झाल्या होत्या.लोकलच्या डब्ब्यांत मुंगीलाही शिरायला वाव नव्हता,तरी सवयीनं आणि चपळाईनं सीमानं लोकल गाठलीच.अखेर दोन तास उशिरा अपराधी चेहऱ्यानं ती ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिच्यासह जेमतेम साताठ लोक ऑफिस मध्ये पोहोचू शकले होते. त्या अवाढव्य महानगराला पावसानं झोडल्याचे, महापुरानं वेढल्याचे फोटो आणि पोस्ट व्हॉट्स अप वर क्षणोक्षणी येत होत्या आणि त्यातलीच एक होती, की विमानतळाच्या धावपट्ट्या पाण्याखाली बुडल्यामुळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही विमानतळ परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवण्यात आलेले होते.म्हणजे बॉसची फ्लाईट काही वेळेवर येणार नव्हती आणि बॉस प्रेझेंटेशन देईल ही शक्यताही नव्हतीच!तरीही सीमानं प्रेझेंटेशनवर शेवटची नजर फिरवली.नं जाणो वीज गेली तर असावं म्हणून फायनल प्रेझेन्टेशनचं प्रिंटआऊट पण घेऊन ठेवलं,तर तेवढ्यात घरून फोन आल्याचा रिंगटोन तिच्या मोबाईलवर आल्यावर ती धास्तावलीच!धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे शाळेच्या व्यवस्थापनानं शाळेला मध्येच सुट्टी देऊन टाकल्यानं भर पावसात तिची मुलं चिंब भिजून घरी परतली होती.तिच्या काळजाचा ठोका चुकला आणि मन आक्रन्दू लागलं !चिमणी होऊन इथून भुर्र्कन उडावं आणि आपल्या सुरक्षित घरट्यात परतून भिजलेल्या आपल्या चिमण्या पाखरांना पंखाखाली घ्यावं अशी अनिवार उर्मी तिच्या मनात दाटून आली.अतीव काळजीनं तिनं नवऱ्याला फोन लावला,तेव्हा तो आणि त्याच्या कार्यालयातले कर्मचारी सावधगिरीचा भाग म्हणून कार्यालयातून लंचनंतर घरी परत जाण्यासाठी निघणार होते.एव्हाना लोकल बंद झालेल्या होत्या.रस्त्यात वाहनं बंद पडली होती,त्यामुळे दुसऱ्या कुठल्या वाहनानं जाणं अशक्य होतं .त्या तसल्या धो धो कोसळणाऱ्या पावसात पायीच जावं लागणार होतं. त्यानं तिलाही लवकरच कार्यालयातून निघण्याचा सल्ला दिला,तेव्हा तिचं मन नववधुगत नवऱ्याकडे ओढ घेऊ लागलं!तो बघायला आला होता तेव्हा तिनं पावसाचं गाणं गायलं होतं आणि ते सुरेल गाणं ऐकून त्यानं ती पसंत असल्याचं तिथल्या तिथे सर्वांना सांगितलं होतं.त्या आठवणीनं ती बारा-तेरा वर्षांनंतरही त्या क्षणी मोहरली...
दयावती नेहमीप्रमाणे उठली.उत्तर प्रदेशातून या महानगरात येऊन तिला चार वर्षं झाली होती.एका साहेबांची गाडी चालवणाऱ्या,ड्रायव्हर असलेल्या रामनारायण बरोबर लग्न होऊन त्या लहानशा कच्चे बांधकाम असलेल्या खोलीत टुकीनं संसार करताना तिच्या संसारवेलीवर तीन गोजिरवाणी फुलं फुलली होती.संसाराला मदत म्हणून चार घरची भांडी-धुणी ती करीत होती.तिनं नेहमीप्रमाणे लगबगीनं त्याला चाय-रोटी दिली.रामनारायण खुशीत होता. आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनत्याच्या कपूर साहेबांना आणायला त्याला जायचं होतं. त्यांच्या पत्नीलाही त्यांच्या स्वागताला विमानतळावर घेऊन जायचं होतं.सब्जी रोटी दुपारसाठी बांधून देऊन दयावतीनं रामनारायणला रवाना केलं.पावसाचा जोर चांगलाच वाढला होता.मुलं अद्याप झोपलीच होती. तिलाही कामावर जायची घाई होती.मुलांना झोपू देऊ.,शेजारच्या काकींना सांगून जाऊ आणि पटकन कामं उरकून परत येऊ असा विचार करून ती चपला अडकवणार,तोच पावसाच्या निर्दय माऱ्यानं ती कच्ची भिंत कोसळली,त्या तीन निष्पाप जिवांची निष्प्राण कलेवरं आणि दयावतीची आर्त किंकाळी याच्याशी त्या पावसाला काहीच देणंघेणं नव्हतं !
मिसेस कपूर खूप खुशीत नटून थटून गाडीत बसल्या होत्या.मिस्टर कपूर एक खूप मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स गाजवून परत येत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी तर त्या जात होत्याच;पण त्याप्रित्यर्थ त्यांच्या किट्टीपार्टी ग्रूपनं त्यांना महागड्या हॉटेलात पार्टी मागितली होती,त्यामुळे साहेबांना त्यांच्या कार्यालयात सोडून ड्रायव्हर त्यांना पुढे घेऊन जाणार होता.सेल्फीज काढता काढता कोसळत्या पावसातून इंच इंच मार्ग आक्रमत जाणाऱ्या ड्रायव्हरवर मिसेस कपूर खेकसल्या... 'रामनारायण, जल्दी चलो,हमें देर हो रही है!'
पाऊस कोसळतच होता.त्या महानगरात लाखो लोक होते! त्या तीन स्त्रियांच्या सुखदु:खाशी पावसाला काहीही देणघेणं नव्हतं !तो अलिप्तपणे कोसळतच होता!
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------
Comments
Post a Comment