मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १२:क्षितिजापल्याडचं आभाळ

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १२:क्षितिजापल्याडचं आभाळ 
क्षितिजापल्याडचं आभाळ 
-रश्मी घटवाई 

अरुंधतीनं पुन्हा एकदा आपल्या लेकीशी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आत्तापर्यंत पाचसात वेळी ऐकायला मिळाला होता तोच -मोबाईल स्विच्ड ऑफ असल्याचा  रेकॉर्डेड मेसेज तिच्या कानावर पडला."स्नेहाला रोज दोनतीनदा फोन करायला सांगूनही ती पहा कशी बेजबाबदारपणे वागतेय!संबंध दिवसभरात एकदाही आपल्याशी बोलायला तिला सवड मिळू नये?हट्टानं एव्हढ्या लांब नोकरीसाठी गेलीये.गुडगावसारखं अनोळखी शहर, कुणीही ओळखीचं नाही!त्यात तरुण मुलींवरच्या अत्याचारांच्या दिल्ली -गुडगांव-नोएडातल्या रोजच्या कानावर पडणाऱ्या ,पेपरमध्ये येत असलेल्या बातम्या!जिवाला नुसता घोर लागलाय !" कल्पनेनंसुद्धा अरुंधतीच्या अंगावर शहारा आला."छे !संध्याकाळच्या वेळी असलं भलतं सलतं आपल्या मनात येता कामा नये !" तिनं आपल्या मनाला दटावलं.मन चिंती ,ते वैरीही नं चिंती ,ह्या म्हणीचा प्रत्यय तिला गेला आठवडाभर येत होता.आजवर भिलईच्या बाहेर पाऊल नं ठेवलेल्या स्नेहानं एकदम गुडगावमध्ये नोकरी मिळवली,तेव्हा अरुंधतीची पहिली प्रतिक्रिया नापसंतीचीच होती!"कशाला गं एव्हढ्या लांब जायचं ?भिलईत तुला नोकरी मिळणार नाही असं थोडीच आहे!जास्तीत जास्त रायपुरला जावं!"अरुंधतीमधली आई बोलली.
"बघा हो बाबा!आईचा नेहेमीच प्रत्येक गोष्टीला विरोध असतो!तुम्हीच म्हणता ना,जरा आपलं क्षितिज विस्तारलं पाहिजे म्हणून,आभाळात उंच भरारी घेतली पाहिजे म्हणून!केवळ जॉब घरापासून लांब-गुडगांवमध्ये आहे;म्हणून ह्या दिग्गज ग्लोबल आयटी कंपनीतली इतकी चांगली जॉब ऑफर सोडून द्यायची का?समजा ह्याच कारणानी हा जॉब करायचा नाही म्हटलं असतं तर तुम्ही दोघे तिकडूनही बोलले असता की सेनेमधले जवान बघा आपलं घरदार सोडून जिवावर उदार होऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जातात;मग गुडगांव कोणचं लांब आहे!"स्नेहा धुसफुसत म्हणाली.आईबाबा आपली नको इतकी काळजी करतात आणि म्हणून खूप बंधनं आपल्यावर लादतात,सं तिला वाटत राहिलं.अखेर खूप वादावादीनंतर ती त्यांचं मन वळवण्यात यशस्वी झाली.आपण रोज तीनदा तरी फोन करून आपली ख्याली-खुशाली कळवत जाऊ,कंपनीच्या शेअरिंग अकोमोडेशनमध्ये स्वत:चा स्वयंपाक करून जेवत जाऊ आणि जरा ह्या जॉब मध्ये स्थिरावल्यावर आईबाबांना पण पंधरा दिवसांसाठी बोलावून घेऊ अशा मौखिक वाटाघाटींनंतर स्नेहा आयुष्यात पहिल्यांदा भिलईची सुरक्षित सीमारेखा ओलांडून अनोळखी गुडगांव मध्ये येऊन दाखल झाली होती. आठवडाभर व्यवस्थित तीनचार वेळा आईबाबांना  फोन करून आपली ख्याली-खुशाली कळवत होती.त्यामुळे संबंध दिवसभरात स्नेहाचा फोन नं आल्यामुळे अरुंधती बेचैन होती.स्नेहाचे बाबा स्टील प्लान्टमधून कामावरून घरी परत आले.तेव्हा मात्र अरुंधतीचा संयम संपला,त्याची जागा उद्वेगाने आणि नंतर काळजीनं घेतली. 
"तुम्ही फार शेफारून ठेवलंय पोरीला!"ती उद्वेगानं म्हणाली.तोच तिचा मोबाईल फोन वाजला.स्नेहाचा फोन होता."काय गं ?आत्ता वेळ मिळाला होय तुला फोन करायला ?"अरुंधती जवळजवळ कडाडलीच! 
"अगं आई ,जरा शांत हो बघू!आज आमच्या टीमला एक मोठठं काम देण्यात आलंय.म्हणून तर सगळ्यांना आपापले मोबाईल फोन सगळा वेळ बंद ठेवावे लागले आणि त्या कामात झोकून द्यावं लागलं.त्यात मी फ्रेशर असले तरी माझ्यावर जबाबदारी सोपवली गेलीये!गुडगांव मध्ये राहायचं म्हणजे स्मार्ट फोन घेणं आलं .त्यासाठी थोडे जास्त पैसे पण मोजावे लागणारेत आई,"उत्साहात स्नेहा आईला सांगू लागली,"इथे भाज्या किराणा सगळं भिलईपेक्षा खूप महाग आहे!बाबांना म्हणावं माझ्या बँकेच्या खात्यात प्लिज थोडेसे पैसे टाकून द्या ना!माझा पहिला पगार झाला की  मग नाही मी तुम्हाला पैसे मागणार!"
"अगं आई,ह्या गुडगांवची पण गम्मतच आहे!ह्या पॉश भागात आयटी कंपन्या, राहण्यासाठी  चकाचक फ्लॅट्स आहेत,त्यामुळे कोपऱ्यावर भाजीवाला किंवा दुकान-बिकान काही नाही!भिलईत दारावर येणारा तुझा ठरलेला भाजीवाला मिरच्या-कोथिंबीर फुकटच द्यायचा ना ,इथे त्यासाठी पैसे मोजावे तर लागतातच,पण साधी कोथिंबीर घ्यायची तरी किंवा मीठ संपलं असेल तर ऑटोरिक्षा करून मोठ्या मॉल मध्ये जावं लागतं आम्हाला !"
"ह्या शहराचं काही खरं नाही!ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करून घरी परतल्यावर नाही गं स्वयंपाक करण्याचा उत्साह रहात,म्हणून बाहेर खावं लागतं!जाण्यायेण्याचा,बाहेर खाण्यापिण्याचा,राहण्याचा खर्च इथे खूप आहे आणि पन्नास हजार रुपये पगार असला ना,तर तोसुद्धा पुरणार नाही कुणाला!"पहिल्या पगारानंतरच्या वेळी स्नेहानं फोनवर सांगितलं आणि गरज भासल्यास बाबांना पैसे पाठवावे लागतील असं सूतोवाच पण केलं तेव्हा अरुंधती गोंधळली. आजवर स्नेहाच्या बाबांच्या एकट्याच्या मर्यादित पगारातपण त्यांचा संसार उत्तम सुरु होता. मुलीचं उच्चशिक्षणसुद्धा साध्य झालं होतं आणि लेकीला भरपूर पैसे मिळूनही ते कमी पडत असल्यामुळे आपल्या बचतीतून तिलाही गरजेनुसार ते पैसे पाठवत होते.अरुंधतीनं क्षितिजाकडे पाहिलं. ते तिच्या नजरेच्या कवेत आलं.क्षितिजापल्याड विस्तीर्ण आभाळ होतं,पण तिथवर अरुंधतीची नजर पोहोचत नव्हती!तिच्या डोक्यावरच्या आभाळाच्या तुकड्यानं तिच्यावर सुरक्षित छत्रछाया धरली होती!
                                   ************************************** 
विख्यात गायिका मालिनी बॅनर्जींच्या कार्यक्रमाला सुहासिनीनं लेकीसह आवर्जून हजेरी लावली होती.इंदूरात त्यांचा कार्यक्रम जाहीर होताच तिनं कार्यक्रमाची सर्वात महाग तिकिटं काढून ठेवली होती.कार्यक्रमाच्या आयोजकांकडे ओळख काढून कार्यक्रमानंतर त्यांच्या भेटीची पण व्यवस्था करून ठेवली होती.आपली नऊ वर्षाची लेक नेत्रा अतिशय सुरेख गाते,तेव्हा तिला टीव्हीवर होणाऱ्या लहान मुलांच्या गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला लावण्याचं,गाण्याच्या स्पर्धेत उतरवण्याचं स्वप्न सुहासिनी पाहू लागली होती.तिला अन्य काही सुचेनासं झालं होतं.त्यामुळे आता नेत्राला उत्तम उत्तम गायिकेकडे गाणं शिकायला पाठवायचं हाच ध्यास सुहासिनीनं घेतला होता.         

"खरं सांगू का ,संगीत म्हणजे महासागर आहे. मीच अजून शिकतेय गाणं !पण तुमच्या आग्रहाखातर मी तुमच्या लेकीची गाण्याची तयारी करून घेईन,पण मी आता परवापासून महिनाभर कोलकात्यात माझ्या घरी मुक्कामाला असणार आहे.त्यामुळे तुम्हाला इंदुरातून लेकीला घेऊन कोलकात्याला दोन -तीन दिवस येऊन रहावं लागेल.बघा,सांगा काय ते!"मालिनी बॅनर्जींनी तानपुऱ्याला नमस्कार करून त्याला गवसणी चढवत बाजूला ठेवला."मुलगी टॅलेन्टेड आहे तुमची.नैसर्गिक गोड गळा लाभलाय तिला.पण तरीही मला वाटतं की तुम्ही टीव्हीवरच्या रि
अ‍ॅलिटी शोजच्या फंदात नं पडता तिचं गाणं कसं फुलत राहील, ती मन लावून गाणं शिकत राहील,याकडे अधिक लक्ष द्यावं .शाळेचा अभ्यास आणि गाणं दोन्हीत भरपूर मेहनत करावी लागते मुलांना त्यामुळे त्यांच्यावर आत्तापासून परफॉर्म करण्याची,स्पर्धेची सक्ती करू नये पालकांनी असं मला मनापासून वाटतं.हा माझा नंबर.कळवा मला कधी येणार ते!" विनम्रपणे मालिनी बॅनर्जींनी म्हटलं.त्यांना नमस्कार करून सुहासिनी नेत्रासह घरी परतली,ते कल्पनांचा वारू चौखूर उधळवत!मालिनी बॅनर्जींनी तिला  गाणं शिकवणं म्हणजे तिच्यालेखी नेत्रासाठी टीव्हीवरच्या रि
अ‍ॅलिटी शोमध्ये जिंकण्याची हमी,आधीची पायरी होती.

अनेक सायास करून सुहासिनी नेत्रा आणि नेत्राच्या बाबांसह कोलकात्याला पोहोचली. बसमधून ,मेट्रोमधून प्रवास करताना क्षणोक्षणी त्या शहराचा भांडखोर चेहरा तिला दिसू लागला.बसमधून उतरताना प्रवाशांची "चोलबे ना "ह्या पवित्र्यासह किरकोळ कारणावरून कंडक्टरशी भांडणं होत होती.एरवी इतके मधुर गाणारे,गोड गळा लाभलेले बंगाली लोक कर्कश्श आवाजात भांडतात कसे,याचं तिला नवल वाटू लागलं."अहो,पूर्वी पंचवीस पैसे,पाच पैसे चलनात होते,त्या काळात पाच पैसे दिले नाहीत म्हणून लोक भांडायचे!"खळखळून हसत मालिनी बॅनर्जींनी तिला सांगितलं .नेत्राच्या आईबाबांचं यथायोग्य आदरातिथ्य करून त्यांनी नेत्राला गाणं शिकवायला सुरुवात केली,तेव्हा सुहासिनीला स्वर्ग दोन बोटं  उरला.

टीव्हीवरच्या रि
अ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या पाच स्पर्धकांमध्ये नेत्रा होती.समोरच्या दुसऱ्या ओळीत प्रेक्षकांमध्ये बसलेली सुहासिनी आपली लेक जिंकावी यासाठी डोळे मिटून देवाचा धावा करत होती.निकाल घोषित होण्यासाठी अवघा काही मिनिटांचा अवधी होता. विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव होणार होता,त्या बालगायकाला किंवा बालगायिकेला चित्रपटात गाण्याची  संधी मिळणार होती. किंबहुना इंदुरसारख्या ठिकाणी राहून लेकीचं गाणं लोकांसमोर येणार नाही,तेव्हा मुंबईमध्येच आपण कायमचं स्थायिक होऊया म्हणून सुहासिनी नेत्राच्या बाबांच्यामागे मुंबईला बदली करवून घेण्यासाठी लागली होती.

निकाल घोषित झाला,तेव्हा नेत्रा पाचव्या स्थानावर आली होती. नेत्रापेक्षा सुहासिनीच अधिक दु:खी झाली होती. आपण हरलो ,म्हणून तिला स्वत:चा अपमान झाल्यासारखा वाटत होता ."नेत्राला गोड गळ्याची दैवी देणगी लाभली आहे. सुदैवानं इंदुरसारख्या संगीताच्या साधनेसाठी पोषक वातावरण असलेल्या शहरात ती रहातेय,तेव्हा तिनं तिथे राहून संगीताचं सखोल ज्ञान मिळवावं .तिच्यासमोर दृष्टी पोहोचणार नाही इतकं संगीताचं विशाल क्षितिज आहे.त्या क्षितिजापल्याडचं आभाळ तिची वाट पाहत राहील.त्या क्षितिजापल्याडच्या आभाळात नेत्राला उंच भरारी घेऊन स्वच्छंद विहरायचं आहे. त्यासाठी तिला आमच्या भरभरून शुभेच्छा." स्पर्धेचे परीक्षक म्हणाले,तेव्हा टाळ्यांचा एकच गजर झाला.आभाळाच्या एका तुकड्यानं तिथे छत्रछाया धरली आणि क्षितिजापल्याडच्या आभाळाला उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्यांचे वेध लागले .
_________________________________________________________________

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी