मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:25:उतारा
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२५:उतारा
उतारा
उतारा
-रश्मी घटवाई
"एक समोसा और एक चाय !"अक्षतानं समोरच्या मोबाईलवरची नजर नं काढता वेटरला ऑर्डर दिली .
"एक समोसा और एक चाय !"दिव्यानं मोबाईलवर सराईतपणे अंगठे चालवता चालवता वेटरला ऑर्डर दिली .
"मुझे भी एक समोसा और एक चाय !"निहारनं जेमतेम एक कटाक्ष वेटरकडे टाकला आणि पुन्हा आपल्या मित्राचा व्हाट्सऍप मेसेज वाचण्यात तो गढून गेला
"और मुझे भी एक समोसा और एक चाय !"मल्हारनं त्याचाच कित्ता गिरवला.
वेटर बुचकळ्यात पडला ."आप चारों साथ में हैं या ऑर्डर अलग-अलग है ?" नं राहवून वेटरनं विचारलं . अधिक चौकश्या केल्या तर चिडून ह्या लोकांनी मॅनेजरकडे तक्रार केली,तर त्याची नोकरी जाण्याची त्याला भीती वाटत होती. पण तेवढी शुद्ध त्या चौघांनाही नव्हती. आपापल्या सेल्फी घेऊन त्याच क्षणी सोशल नेटवर्किंग साईटवर टाकण्यात ते चौघेही गर्क होते .
"नाही आम्ही चौघेही बरोबर आहोत. "ते चौघेही अंगठेबहाद्दर एकाच वेळी उद्गारले. कोणे एके काळी अशिक्षित लोक अंगठा वापरायचे. ही नवी अती शिक्षित पिढी मोबाईलवरच्या माध्यमातूनआपापल्या मित्रमंडळींशी संवाद साधण्यासाठी सपासप वेगानं दोन्ही हातांचे अंगठे चालवत होती .चौघेही एका टेबलावर बसलेले असले तरी 'अंगूठाछाप' नावानं त्यांनी बनवलेल्या आपल्या सोशल नेटवर्किंग ग्रूप मधल्या इतर अंगूठाछाप मित्रांशी त्यांचा संवाद सुरु होता.
वेटरनं चहा-समोसा प्रत्येकाच्या पुढ्यात आणून ठेवला.ही ऑर्डर त्वरेनं पूर्ण करावी की सावकाश ,हेच त्याला कळत नव्हतं. दोन्हीकडून पंचाईत होती.चौघांनीही चहासमोश्याची दखल पहिले सेल्फीतून आणि नंतर प्रत्यक्ष घेतली.
"यार सुन,एक प्रॉब्लेम है !"चौघेही मुंबईत राहणारे आणि मराठीभाषिक असले तरीही आपसांत मराठीत बोलणं त्यांना कमीपणाचं वाटत होतं."मुझे नं बहोत अकेलापन लग रहा है.डिप्रेशन; यू नो!"अक्षतानं सांगितलं. तिघांनीही मान वर करून तिच्याकडे पाहिलं.
"अगं मग तू आपल्या आईबाबांना सांग ना !"दिव्या तिला म्हणाली.
"आईबाबांशी बोलायला त्यांना आणि मला कुठे वेळ असतो?दोघेही सकाळी आठ वाजता ऑफिससाठी घरातून निघतात ,रात्री आठ वाजता घरी परततात.मीसुद्धा सकाळीच कॉलेजसाठी निघते!"
"सेम हिअर !माझेपण आईबाबा कामासाठी सकाळी घराबाहेर पडतात आणि रात्री घरी पोहोचतात." दिव्या म्हणाली.
"सेम हिअर !मैं तो खाली सण्डे को मेरे मम्मी -पप्पा से मिलता हूँ.ते कामासाठी सकाळी घराबाहेर पडतात,तेव्हा मी झोपलेला असतो आणि मी कॉलेज आणि जिम वगैरे उरकून घरी पोहोचतो,तेव्हा ते दमूनभागून झोपलेले असतात ,"निहारनं सांगितलं.बोलतांना त्याच्या दंडांनीसुद्धा तो जिममध्ये नित्यनेमानं जातो,मन लावून तिथे व्यायाम करतो,याची साक्ष दिली.जिममधल्या वर्कआऊट मधून कमावलेल्या त्याच्या शरीरयष्टीवर कॉलेजमधल्या सगळ्या मुली फिदा होत्या आणि मुलांना त्याच्यासारखी शरीरयष्टी करायची होती.इतर काहींना असूया वाटत होती .
"तुम लकी हो यार !तुझे आईबाबा तुला निदान सण्डेला तरी भेटतात !माझे आईबाबा आठवड्यातले सहा दिवस ऑफिसमध्ये असतात आणि सण्डेला कॉर्पोरेट पार्ट्या ऑफिसचेच कलिग्ज वगैरेंमध्ये बिझी असतात.घरी माझी आजी एकटी असते.शी इज लाईक अ फ्रेण्ड.प्रत्येकाशी तिची मस्त फ्रेण्डशिप जमते. तिच्याशीच मस्त वेव्हलेंग्थ जमते माझी.पण तिच्याशी बोलून बोलून किती बोलणार!पण ती एकदम मस्त बिझी ठेवते स्वतःला.बुकस् ,न्यूजपेपर्स वाचते,न्यूजपेपर्स मध्ये आलेल्या आर्टिकल्सवर पत्र पाठवून आपलं मत कळवते.न्यूजपेपर्समध्ये कितीदा तिची पत्रं पब्लिश होतात,मग तिला आमच्या रिलेटिव्ह्जचे,ओळखीच्यांचे फोन येतात.मी शाळेत असतांना तर कितीतरी टीचर्स मला म्हणायच्या की तुझ्या आजीला सांग,आम्ही वाचतो शुभांगी आगाशे नावानी छापून आलेली तुमची पत्रं,म्हणून!" मल्हार म्हणाला,तसे बाकी तिघे त्याच्याकडे कौतुकाने बघू लागले.
"वॉव मल्हार!मस्तंय रे!प्लीज भेटव ना एकदा आम्हाला तुझ्या आजीशी !"दिव्या म्हणाली, बाकीच्यांनी पण त्याला गळ घातली. "अगदी नक्की !"त्यानं मान डोलावली .
"ओह,शुभांगी आगाशे का?मीपण ऐकलंय माझ्या मम्मी-पप्पांच्या तोंडून एकदा ते नाव !काहीतरी खूप छान लिहिलं होतं त्यांनी ."अक्षताला एकदम आठवलं.
"वॉव मल्हार,यू आर रिअली लकी !"बाकीचे तिघे चहा समोसे संपवत पुन्हा एकदा म्हणाले. इतक्यावेळ पहिल्यांदाच मोबाईलकडे ढुंकून नं बघता चौघेही चक्क एकमेकांशी थेट बोलत होते. तेवढ्यात मल्हारचा मोबाईल वाजला.आजीचा मेसेज होता,आज केव्हाही घेऊन ये आपल्या मित्र-मैत्रिणींना म्हणून. नाहीतरी लेक्चर्स संपलेलीच होती .चौघांनीही आपापली स्वयंचलित दुचाकी वाहनं काढली आणि मल्हारच्या मागोमाग तिघे त्याच्या घरी जाऊ लागले.
"मी काही ह्या विषयातली तज्ञ वगैरे नाहीये ,पण मला सांगा ,तुम्हीच जर आपापल्या खोलीची दारं बंद करून मोबाईलवर नाहीतर लॅपटॉपवर आपापल्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारत बसलात,तर तुमचे आईबाबा तुमच्याशी बोलणार कसे आणि कधी?त्यांचा पण विचार करा,तेसुद्धा कामावरून दमून-भागून येतात की नाही?मोबाईलवरच्या संवादापेक्षा थेट भेट आणि थेट संवाद अधिक जोडतो हं माणसांना! " मल्हारच्याआजीनं बोलता-बोलता खमंग थालीपीठ,लोण्याचा गोळा आणि लोणचं वाढलेली प्लेट प्रत्येकाच्या हातात ठेवली,तेव्हा चौघेही त्यावर तुटून पडले.
"आज्जी ,आम्हाला शिकवाल थालीपीठ कसं करायचं ते?"अक्षता आणि दिव्या एकदमच म्हणाल्या, तशी आजींनी त्यांच्याचकडून पुढची दोन्ही थालिपीठं करवून घेतलीत. निहार आणि मल्हारसुद्धा स्वयंपाकघरात येऊन सगळं निरखत होते.अंमळ वेडीवाकडी झालेली ती थालिपीठंसुद्धा चौघांनी चाटून -पुसून खाल्ली,तेव्हा तृप्तीनं त्यांचे चेहरे झळाळले होते.कसं मोकळं मोकळं वाटत होतं.अक्षता आणि दिव्यानं आजींना ओटा आवरायला मदत केली,चौघांच्या प्लेट्स घासून ठेवल्या.आजींना वाकून नमस्कार करून तिघे भारावून आपापल्या घरी निघाले ,तेव्हा आजींच्या निळ्या डोळ्यांत समाधानाचं हसू होतं आणि मल्हारच्या डोळ्यांत आजीबद्दलचा अभिमान!
***************************** ******
श्री राममूर्ती आणि लता राममूर्ती दोघेही वरदच्या शाळेत त्याच्या मुख्याध्यापिकेच्या कक्षात सचिंत होऊन बसले होते.आपल्याला कशाला इतक्या तातडीनं त्यांनी बोलावून घेतलंय हे त्यांना कळलं नव्हतं. ऑफिसच्या आपापल्या मीटिंग्ज रद्द करून दोघेही तिथे आले होते,त्यामुळे त्यांचं अर्ध लक्ष ऑफिसमध्ये होतं .
"आय
अॅम रियली कन्सर्न्ड मिस्टर
अॅण्ड मिसेस राममूर्ती "सुरुवातीचे औपचारिक बोलणे झाल्यावर शब्दांची जुळवाजुळव करीत वरदच्या मुख्याध्यापिका वरदच्या आईवडिलांना म्हणाल्या,"गेल्या एक महिन्यापासून वरद शाळेत आलेला नाहीये. त्यानं चार आठवडी परीक्षासुद्धा दिलेल्या नाहीयेत!"
"असं कसं होईल?मी स्वतः त्याला शाळेच्या बसमध्ये चढवते!"लता राममूर्तीना जबरदस्त धक्का बसला होता.मुख्याध्यापिका मॅडमनं वरदच्या बसची व्यवस्था पाहणाऱ्या,मुलांवर देखरेख करणाऱ्याला बोलावलं.त्याच्यामते वरद बसमधून सकाळी आठ वाजता शाळेच्या गेटवर उतरायचा मात्र दोन वाजता शाळा सुटली की परतताना बसमध्ये नसायचा.शाळेच्या वॉचमनच्यामते तर तो बसमधून शाळेच्या गेटवर भले उतरत असेल,पण गेटमधून आत काही प्रवेश करीत नव्हता.अखेर निष्कर्ष हाती लागला,तो म्हणजे वरद रोज बसमधून शाळेच्या गेटवर उतरायचा आणि पाऊण तास बसच्याच मार्गानं पायी घरी परत जायचा.तोवर त्याचे आईवडील ऑफिससाठी निघून गेलेले असायचे.कॉलनीतल्या त्याच्या सातमजली इमारतीच्या गच्चीच्या दरवाजाच्या कुलुपाची एक चावी त्यानं गुपचूप स्वतः जवळ ठेवून घेतली होती,तो दरवाजा उघडून तो गच्चीत पाण्याच्या टाकीखाली टाकीच्या सावलीत बसला असायचा. शाळेतून घरी परतायच्या वेळी घरी दार उघडून यायचा. त्याच्यासाठी एका महागड्या हॉटेलमधून घरपोच जेवण पोहोचवण्याची व्यवस्था त्याच्या आईवडिलांनी केली होती,ते जेवण जेवून तो टीव्ही बघत बसायचा. नं कुणाशी बोलायचं,नं कुणात मिसळायचा. अधिक तपासाअंती आढळलं की वर्गातल्या एका मुलानं त्याच्यावर त्याचा महागडा मोबाईल चोरल्याचा आळ आणून त्याला खूप मारलं होतं. दिल्लीतल्या त्यांच्या त्या नामवंत शाळेत अर्थातच विद्यार्थ्यांना मोबाईल आणण्याची परवानगी नव्हती,तरीही मुलं चोरून शाळेत मोबाईल आणत होती.वरदच्या हादरलेल्या आईवडिलांनी मुख्याध्यापिकेकडे पाणी मागितलं आणि आधारासाठी मदत,तेव्हाच घाईघाईनं आणखी एका विद्यार्थ्यांचे आईवडील नववीतला आपला मुलगा घरातून पळून गेला म्हणून चौकशीसाठी म्हणून शाळेत येऊन थडकले होते.त्या मुलाला स्पोर्ट्स मध्ये काही करायचं होतं ,तर अष्टौप्रहर ईशभक्तीत रमलेल्या त्याच्या त्या पालकांना त्यानं अभ्यासात लक्ष असं वाटत होतं. त्या दोघाही विद्यार्थ्यांच्या पालकांचं आपापल्या पाल्याकडे लक्ष नव्हतं,फरक एवढाच की एकाचे पालक करीअर आणि ऑफिस यात गुंतून पडले होते आणि दुसऱ्याचे अष्टौप्रहर जपमाळा घेऊन बसले होते.
"डोण्ट वरी,मी आणि शाळा आहोत तुमची मदत करायला.आपण या समस्येवर नक्कीच तोडगा काढू !" मुख्याध्यापिका मॅडम त्या चौघांनाही म्हणाल्या,तेव्हा चौघांच्याही डोळ्यांतून घळाघळा आसवं ओघळत होती आणि ही नवी जबाबदारी पेलायला मुख्याध्यापिका मॅडम आणखी सज्ज झाल्या होत्या .
***************************** **************
"आय डोण्ट लाईक माय पेरेन्ट्स,आय वॉण्ट टु डाय !"पायलनं सेजलला, त्या स्टॅण्ड अप कॉमेडियनला चवथ्यांदा फोन करून सांगितलं.हादरलेल्या सेजलनं पाहिलेपासून पायलशी जरा मृदुपणे बोलायचं ठरवलं होतं.मुंबईत राहणाऱ्या पायलच्या शाळेत कार्यक्रम सादर केल्यावर स्वतःच कॉलेज मध्ये शिकत असलेल्या त्या स्टॅण्ड-अप कॉमेडियनचा नंबर पायलनं मागून घेतला होता आणि आता हॉस्पिटलच्या बेडवरुन ती तिला सारखी फोन करीत होती.पहिल्यावेळी पायलनं फोन केला तेव्हा आणखी कुठेतरी तिचा कार्यक्रम सुरु असल्यामुळे तीनेक तास तिचा फोन बंद होता,नंतर ती विमानात बसली , म्हणून स्विच्ड ऑफ होता.अखेरीस घुसमट होऊन,आईवडिलांवर चिडून पायलनं घरातलं कुठलं तरी घातक विषारी रसायन पिऊन टाकलं होतं.पायलच्या प्रचंड घाबरलेल्या आईवडिलांनी तिला इस्पितळात दाखल केलं आणि तिची तब्येत थोडी सुधरल्यावर झाल्या घटनेची वाच्यता कुठेही नं करण्याबद्दल बजावलं होतं. प्रत्यक्षात जरी उलट वस्तुस्थिती असली,तरी आपल्या आईबाबांचं एकमेकांशी छान पटतं,ते एकमेकांशी मुळीच भांडत नाहीत,हे त्यांनी तिच्याकडून दहादा वदवून घेतलं होतं.
"यू आर सच अ गुड गर्ल ,तू असं काहीच करणार नाहीस बेबी !"सेजलनं वडिलधाऱ्याची भूमिका बजावत तिला हळुवारपणे समजावून सांगितलं. "आता ना पायल,आत्ता थोड्यावेळानं माझा एक कार्यक्रम आहे. पुढच्या दहा दिवसांतपण माझे कार्यक्रम आहेत, तेव्हा मला फोन बंद ठेवावा लागेल,तेव्हा प्रक्षुब्ध व्हायचं नाही हं !नंतर पंधरा दिवस माझी परीक्षा असणार आहे!तुझी पण परीक्षा जवळ आलीये ना,तू तर खूप हुशार मुलगी आहेस!"कितीतरी वेळ ती लहान मुलाला थोपटावं तसं मृदु शब्दांनी तिला थोपटत राहिली .
"थँक यू सेजल दीदी !"पायलनं तिला म्हटलं."मी आता शहाण्यासारखी वागेन!पुन्हा असा वेडेपणा करणार नाही !तुझ्या छान बोलण्यामुळे माझ्या मनाला खूपच उभारी आलीये.तू माझी सगळ्यात लाडकी दीदी आहेस!"तिनं स्टॅण्डअप कॉमेडीयनला म्हटलं.मोबाईलमधूनसुद्धापार्श् वसंगीतासारखा, मागून पायलच्या आईवडिलांचा भांडण्याचा आवाज सेजलच्या कानावर आला.आपण अचानक खूपच वडीलधारे झाल्यासारखं सेजलला वाटू लागलं. कार्यक्रम सुरु होण्याची घोषणा झाली,तशी स्टेजला नमस्कार करण्याआधी तिनं आपला मोबाईल बंद करून ठेवला .
***************************** *********
"आपली कुटुंबसंस्था हा आपला अत्यंत मौलिक ठेवा आहे.परदेशातल्या अनेक लोकांना आपल्या भारतीय कुटुंबसंस्थेचा,कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास करावासा वाटतो,ते उगीच नाही. आपल्या भारतीय मूल्यांना-फॅमिली व्हॅल्यूज ना आपणच जपायला हवं की नाही?महानगरांत खरंच खूप वेगवेगळ्या समस्या आपल्याला भेडसावताहेत.पण बघा,ह्या समस्याही आपणच निर्माण केलेल्या आहेत!त्यामुळे त्यावरचे उपायही आपल्यालाच शोधायचे आहेत!कामं आहेतच हो;ती कधीच संपणार नाहीत,पण आपल्या कुटुंबियांना वेळ द्या,मोबाईलवर नव्हे,कुटुंबियांशी आणि मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्ष संवाद साधा! मुलांना नावं ठेवू नका,त्यांच्यात खूप क्षमता आहे!त्यांना आपण घडवू तशीच ती घडतील की नाही?" शुभांगी आगाशेंनी स्वतःचं छोटंसं मनोगत मल्हारच्या मित्रपरिवारानं आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मांडलं ,तेव्हा त्यावर भराभर खूप सकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या.मुंबई,दिल्लीतून अनेक लोक त्या वेबिनारचं प्रक्षेपण बघताबघता स्वतः पण त्यात सहभागी होत होते.
'पेरेंटिंग इज नॉट ईझी,हे मी आता शिकतेय!"लता राममूर्तींनी लिहिलं.
"मला आता एकटेपण छळत नाही,डिप्रेशन जाणवत नाही !"
"आय लाईक माय पेरेन्टस,त्याहून पण अधिक,मला सेजलदीदी खूप आवडते!" पायलनं लिहिलं .
महानगरं आपल्या गतीनं धावत होती.महानगरांतल्या काही लोकांनी नं पेलवणाऱ्या त्या गतीतूनही आपल्याला भेडसावणाऱ्या काही समस्या आणि त्या समस्यांवरचे आपापल्यापुरते उतारे शोधले होते.
______________________________ ______________________________ ___
-रश्मी घटवाई
मुंबई
मोबाईल नं :९८७१२४९०४७
Comments
Post a Comment