मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १६:प्रवास

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १६:प्रवास 
प्रवास 
-रश्मी घटवाई 
दिल्लीहून आलेली राजधानी एक्स्प्रेस बोरिवलीच्या प्लॅटफॉर्मवर थांबली.तिथे ट्रेन केवळ दोन मिनिट थांबणार असल्यामुळे उतरणाऱ्या प्रवाशांची एकच धांदल उडाली.सुलक्षणा आपल्या वयस्करआईसह सांभाळून खाली उतरली.तिच्याजवळ सामान फार नव्हतं.दोघींच्या दोन ट्रॉली सुटकेसेस.त्या जवळजवळ जबरदस्तीनं घेऊन निघालेल्या हमालाला निग्रहानं नकार देऊन सुलक्षणा त्या स्वतःच ढकलत आईला सांभाळून,तिच्या चालीनं चालत स्टेशनबाहेर पडली.   
 "घाई होतेय का फार ?सावकाश चाल!ह्या 
मोबाईल 
अ‍ॅपनी कॅब बुक झालीच आहे!एवढे बाहेर पडलो आपण की मग काही त्रास होणार नाही.     
मधूनमधून पाहिजे तर थांबत जाऊया."सुलक्षणा आईला म्हणाली.खरं तर ती आईला विमानानंच दिल्लीहून मुंबईला आणणार होती;पण सिनियर सिटिझन म्हणून रेल्वेमध्ये टिकिटात पन्नास टक्के सवलत मिळत असताना ती नाकारून विमानानं खूप महागडा प्रवास करण्यात काही हशील नाही असा आईचा अट्टाहास असल्यामुळे सुलक्षणा आईला राजधानी एक्स्प्रेसनं मुंबईला घेऊन आली.दिल्लीला थंडी पडली की आईनं सुप्रियाच्या -धाकट्या मुलीच्या घरी मुंबईला राहायचं आणि पावसाळ्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडायला लागला की आईनं दिल्लीला मोठ्या मुलीच्या -सुलक्षणाच्या घरी राहायचं,म्हणजे आईला ह्या दोन्ही ऋतूंचा विशेष त्रास होणार नाही,असं बाबा गेल्यावर दोघी बहिणींनी आईशी बोलून समंजसपणे ठरवलं होतं.दोघींच्या कुटुंबीयांनी पण त्यांच्या निर्णयाचं सहर्ष स्वागत केलं होतं.आईची प्रवासाची आवड पण अशा रीतीनं पुरी होणार होती.कुणा एकीवरच आईला सांभाळायचा ताण पण पडणार नव्हता.    
"मुलांना ख्रिसमसच्या सुट्या लागणार आहेत ना ?तुम्ही नका एवढ्या लांब स्टेशनवर घ्यायला येऊ.आम्ही पोहोचतो ना टॅक्सीनं !मोबाईल अ‍ॅप जिंदाबाद!"सुलक्षणानं सुप्रियाच्या नवऱ्याला सांगितलं होतं.
दोघी जणी बोरिवली स्टेशनच्या बाहेर आल्या.अनेक टॅक्सीवाले कुठे जाणार म्हणून त्यांना विचारू लागले. "मीटरनं नाय जाणार !हजार रुपये भाडं होईल!सामानाचे वेगळे चार्जेस लागतील!"शेजारी उभ्या असलेल्या ,खूप सामानासह आलेल्या एकीनं विचारल्यावर दोन-तीन टॅक्सीवाल्यांनी सांगितलं,नाईलाजानं ती त्या टॅक्सीत बसली ,हे बघून सुलक्षणालाच कसंसं झालं ."एवढ्या कमी अंतरासाठी पहा केवढे पैसे आकारताहेत!"दोघी मायलेकींनी तीव्र नाराजी दर्शवली.      
सुलक्षणानं मोबाईल अ‍ॅपनं बुक केलेली टॅक्सी पुढ्यात येऊन थांबली तशी सुलक्षणानं पुन्हा एकदा टॅक्सीचा नंबर पाहून खात्री करून घेतली .तिनं टॅक्सीचं मागचं दार उघडून आईला आत बसायला सांगितलं आणि पुढच्या सीटवर ती आपल्या दोन्ही सुटकेसेस ठेवायला लागली, तेवढ्यात काळ्या-पिवळ्या टॅक्सींचे चारपाच चालक आणि ऑटोरिक्षांचे चारपाच चालक एकदम त्यांच्या रोखानं धावत आले."ए ए ,तुम यहा नही रुक सकते !"ते त्यांच्या टॅक्सी चालकाच्या अंगावर खेकसले.जवळजवळ सुलक्षणाच्या हातातून सुटकेस ओढून काढत एकानं धाडकन दरवाजा आपटला आणि दुसऱ्यानं सुलक्षणाच्या आईला आत बसण्यापासून रोखलं."तिसऱ्यानं त्यांच्या टॅक्सी चालकाला तिथून जवळजवळ हाकललंच. "हा काय वेडेपणा आहे?तुम्ही कोण आम्हाला आम्ही ठरवलेल्या टॅक्सीत बसायला परवानगी नं देणारे?" संतापानं सुलक्षणानं त्यांना विचारलं.त्या सगळ्या गोंधळात सुलक्षणाच्या आईच्या दंडाला खरचटलं होतं आणि सुलक्षणाच्या पायाला सुटकेसचं चाक जोरात लागलं  होतं."थांबा,तुमची तक्रार केलीच पाहिजे !" संतापून ती म्हणाली. तिनं त्या दोन-तीन लोकांचे आणि टॅक्सी नंबर्सचे फोटो घेतले. "करा करा ,तुम्ही आमचं काही नाही बिघडवू शकत!"ते उद्गारले. त्या टॅक्सीवाल्यांच्या माजोरडेपणाची,बेमुर्वतखोर वर्तनाची दोघींना प्रचंड चीड आली होती.आजूबाजूला पोलीस नव्हते,कुठलीच व्यवस्था नव्हती. कुठलीच यंत्रणा त्यांच्या मदतीला नव्हती. सुलक्षणानं 
मोबाईल 
अ‍ॅपनी बुक केलेल्या कॅब ड्रायव्हरला फोन लावला ."मॅडम ,मी थोडासा समोर येऊन थांबलोय!तुम्ही हळूहळू चालत थोडेसे पुढे या ना!अहो हे काली-पीली टॅक्सीवाले असेच करतात,बाहेरच्यांना त्रास देतात!आमच्या गाड्यांची तर काचपण फोडतात किंवा नुकसान करतात त्यांच्याशी आम्ही वाद घातला तर!"तो म्हणाला. नाइलाजानं दोघी मायलेकी सामान घेऊन हळूहळू पुढे चालत त्यांच्या कॅबपाशी पोहोचल्या .कॅब ड्रायव्हरनं स्वतः त्यांचं सामान गाडीत ठेवलं.दोघींना खरचटलेल्या जागेवर लावायला प्रथमोपचाराच्या पेटीतून डेटॉल काढून दिलं.पाणी प्यायला ब्रॅण्डेड मिनरल वॉटरच्या बाटल्या दिल्या आणि मोठ्या अदबीनं त्यानं त्यांच्या परवानगीनं गाडी सुरु केली .सुप्रियाच्या घरी पोहोचल्या,तेव्हा त्यांचं बिल त्या कॅब कंपनीच्या त्या दिवशीच्या ऑफरमुळे अवघं पन्नास रुपये आलं ,तेव्हा सुलक्षणाच्या आणि तिच्या आईच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. त्या दोन वेगवेगळ्या अनुभवांनी त्यांना बुचकळ्यात पाडलं होतं . 
                                  ******************************************
नागपूरहून आलेल्या दुरांतोमधून सुरेखानं आपल्या आजीला आणि आत्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस वर उतरवून घेतलं आणि त्यांना खारघरला घेऊन जाण्यासाठी तिनं सीएसटीहून पनवेलला जाणारी लोकल ट्रेन पकडली.त्यांना लग्नासाठी म्हणून नातेवाईकांकडे खारघरला पोहोचवायचं होतं.ती एकटीच नोकरीनिमित्त मुंबईला वर्षभरापासून पेईंग गेस्ट म्हणून स्थिरावली होती,म्हणून मुंबईची माहिती असल्यामुळे वडिलांनी तिच्यावर ही मोठीच जबाबदारी सोपवली होती.शिवाय खारघर स्टेशनवर घरापर्यंत न्यायला कुणीतरी येणारच होतं."सांभाळून हं आजी !" तिनं हात देऊन आजीला आणि आत्याला नीट खारघरला उतरवलं .सामान आणि दोघींना घेऊन ती स्टेशनबाहेर पडली."बाहेर चुलतभाऊ स्कूटर घेऊन त्यांची वाट बघत होता. तिनंच रिक्षा ठरवली .
"मीटरनं नाय जात!दीडशे रुपये लागतील!"रिक्षेवाल्यानं रुक्षपणे सांगितलं. तिनंच घासाघीस करून एकशेचाळीस रुपयांमध्ये रिक्षा ठरवली. ह्यांच्या स्कूटरच्या मागे जाऊ द्या रिक्षा ." तिनं सांगितलं.  रस्ता फारसा चांगला नव्हता. अनेक खड्डे ,रस्त्याचं सुरु असलेलं काम ह्या दिव्यातून स्कूटर आणि त्यापाठोपाठ त्यांची ऑटोरिक्षा चालली होती. "लय लांबून नेतोय तो!शॉर्ट कट घ्यायचा ना हायवेवरून!"रिक्षेवाल्यानं कटकट करायला सुरुवात केली. "नाय परवडत एवढ्या कमी पैशात!कुठून बाहेरगावाहून आलात काय?"त्यानं बायकांनी स्वेटर घातलेले पाहून विचारलं मुंबईत ऐन डिसेंबरमध्ये प्रचंड उकाडा होता.पंखे आणि एअर कंडिशनर सुद्धा सुरु होते .    
"हो!"
"कुठून ?" 
"नागपूरवरून!" 
"तरीच!" त्यानं तुच्छपणे म्हटलं.तो बहुधा स्वतःला अमेरिकेत असल्यागत समजत असावा.रिक्षा चालवत होता ,पण तोरा मात्र मर्सिडीझ चालवत असल्याचा होता.
"ए,शॉर्ट कट घ्यायचा ना हायवेवरून"त्यानं तिच्या चुलतभावाच्या अंगावर वसकन ओरडत कट मारला . तिला प्रचंड चीड आली. 
"ओ ,जरा नीट बोला .मघापासून कटकट करताय.मीटरनं येत नाही,एकशेचाळीस रुपये काय कमी आहेत काय?त्याला बोलायची काही गरज आहे का?" तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला.एकशेचाळीस रुपये तिनं त्याच्या पुढ्यात टाकले ,तरी त्यानं त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही .सामानासह आजी आणि आत्याला उतरवून तिनं चिडून त्याच्या ऑटोरिक्षाचा आणि नंबर प्लेटचा फोटो घेतला. "तक्रार केली पाहिजे तुमची. "ती म्हणाली."तुम्ही माझं काही बिघडवू शकत नाही!"त्यानी मोठ्या टेचात म्हटलं आणि मग्रुरीनं रिक्षाचा गियर टाकून तो धुरळा उडवत निघाला. 
                         ******************************************************************  
 लोकल ट्रेननं घाटकोपर स्टेशनवर उतरून स्मिता रिक्षासाठीच्या भल्याथोरल्या रांगेत उभी राहिली. बाजूला बससाठीची रांग होती आणि केवळ सराईत व्यक्तीलाच ती कोणती रांग कशासाठीची आहे,कुठून सुरु होतेय आणि कुठे संपतेय हे कळलं असतं.बाजूच्या टपरीवर मोठ्यमोठ्यानं गाणी वाजत होती . "वाट माझी बघतोय रिक्षावाला ,वाट माझी बघतोय रिक्षावाला... ". इथे मात्र रिक्षेवाले कुणी थांबायला तयार नव्हते . थांबलेच तर त्यांना भरपूर भाडं मिळेल, एवढं लांबचं गिऱ्हाईक पाहिजे असायचे.जवळच्या ठिकाणी राहणाऱ्यांना तर रिक्षेवाले ऐकून नं ऐकल्यासारखं करीत होते .वाट बघणारा रिक्षावाला केवळ गाण्यातच होता.प्रत्यक्षातला रिक्षावाला सपशेल नकार देणाराच होता.अखेर तासभर रिक्षासाठी खोळंबल्यावर स्मिता दोन-अडीच किलोमीटर अंतरावरच्या घरी पायीच निघाली.निदान इथे पोहोचण्याची शाश्वती तरी होती!
                           *********************************************************** 
"ममा ,"स्वप्नानं आईला फोन करून सांगितलं ."मी तरी ठरवलंय की लोकल ट्रेन,मेट्रो ट्रेन आणि बेस्ट बस ह्यांचे पास बनवून घ्यायचे आणि त्यांनीच प्रवास करायचा.आणि पर्याय नसेल तर शॉर्ट डिस्टन्स साठी पायीच प्रवास करायचा.आय हॅव बॉयकॉटेड रिक्शाज फॉर नाऊ .लोकल ट्रेननं जाताना खूप पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागतात ,म्हणजे यंगस्टर्स साठी सोपंय त्यानं ट्रॅव्हल करणं . ममा आय हॅव लॉस्ट वेट !जिममध्ये जायचीच गरज नाहीये. "मोठ्या उत्साहानं स्वप्ना आईला सांगत होती. मुंबई आणि तिथली वाहतूक आपल्या गतीनं सुरु होती. प्रवासी आपापल्या वाटेनं,ठरलेल्या साधनांनी  प्रवास करत होते.कधीच नं थांबणारं ते महानगर अखंड प्रवास करत अव्याहतपणे धावत होतं !
________________________________________________________________

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी