मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १७:हॅपी न्यू ईयर
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १७:हॅपी न्यू ईयर
हॅपी न्यू ईयर
-रश्मी घटवाई
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी महानगरांमधले मॉल्स अगदी सुसज्ज झाले होते. सर्वत्र रोषणाई केलेली होती. कुठले कुठले देखावे उभे केलेले होते. मॉल्समधली दुकानं नानाविध वस्तूंनी सजली होती. ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी सगळीकडे विविध प्रलोभनांची खैरात केली जात होती,अमूक इतकी खरेदी केली,की तमुक फ्री ,दोन कपडे खरेदी करा आणि त्यावर आणखी दोन कपडे मोफत मिळवा ,अशा नानाविध ऑफर्समुळे दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडालेली होती. सर्वत्र जल्लोषाचं वातावरण होतं.काहीजण तिथलं चकचकीत ,रंगीबेरंगी ,हर्षोत्फुल्ल वातावरण अनुभवण्यासाठी नुसतेच भटकंती करायला आलेले होते.अल्पनाच्या ऑफिसनं मॉलमधल्या मोठ्या हॉटेलमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जंगी पार्टी आयोजित केली होती.त्यासाठी अत्यंत नावाजलेल्या डीजेला आणि त्या गाण्यांवर थिरकण्यासाठी दोन नामवंत नर्तिकांना आमंत्रित केलं होतं.मॅनेजमेंटवाल्या अल्पनाला तिनं ते ऑफिस जॉईन केल्याकेल्याच पार्टी आयोजित करण्यासाठीच्या कोअर टीम मध्ये घेतलं गेलं होतं.ती तुलनेनं त्या हाय क्लास कॉर्पोरेट कल्चर मध्ये नवखी होती,पण सराईतपणे पार्टीचं प्लॅनिंग करीत होती. मेन्यू ठरवण्यापासून ते पार्टीला आमंत्रित करायच्या पाहुण्यांची यादी बनवण्यापर्यंत आणि इन्व्हिटेशन कार्ड्स , थॅंक्सगिव्हिंग कार्ड्स डिझाईन करण्यापासून ते कॉर्पोरेट गिफ्ट्स आणण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीचं नियोजन सहकाऱ्यांसह तिनं काटेकोरपणे केलेलं होतं. त्यासाठी त्यांच्यासह तिनं त्या मॉलमधल्या मोठ्या हॉटेलमध्ये आणि दुकानांमध्ये कित्येकदा खेपा घातल्या होत्या.सगळं पद्धतशीरपणे केलं की ही न्यू ईयर पार्टी सगळ्यांना आवडेलच ह्याची तिला खात्री होती. नववर्षाची पूर्वसंध्या उजाडली.एरवी ऑफिसमध्ये फॉर्मल,कॉर्पोरेट ड्रेस कोड होता.अंगभर कपडे घालायचे ह्या घरच्या दंडकामुळे ती ऑफिसमध्ये सलवार कमीज घालत होती. पण आज आता त्या पार्टीत घालण्यासाठी म्हणून तिनं तिथल्याच एका महागड्या दुकानातून घेतलेला ग्लॅमरस इव्हिनिंग गाउन परिधान केला होता."यू आर लुकिंग सो गॉर्जस!","यू आर लुकिंग सो स्टनिंग!"तिच्या स्त्री सहकाऱ्यांनी तिला कॉम्प्लिमेंट्स दिले होते. बऱ्यापैकी सुखावून तिनं त्यांचे आभार मानले. आमंत्रितांचं स्वागत करण्यात ती गुंतली.
निमिषभरात डीजे आणि दोघी नर्तिका तिथं अवतरल्या.दोघींनीही टॅटरड म्हणजे अक्षरश: चिंध्या असलेल्या जीन्स आणि टॉप्स परिधान केलेले होते . दोघींना त्या तसल्या वेषात पाहून अल्पनाच हबकली."नीड एनी हेल्प ?"तिनं प्रयत्नपूर्वक सौम्यपणे त्यांना विचारलं "अगं हे कपडे आहेत की चिंध्या ?" "असे फाटके ,चिंध्या झालेले कपडे कुणी भिकारी सुद्धा घालणार नाही." "अशुभ असतं गं अंगावर फाटके कपडे घालणं !" "चिंध्या घालून का कुणी नवीन वर्षाचं स्वागत करतं ?"तिच्या घरच्यांनी त्यावर भाष्य केलं असतं,ते तिला अचानक जणू ऐकायला आलं.कुठल्या तरी दुकानात तिनं ते तसले कपडे अव्वाच्या सव्वा ,नं परवडणाऱ्या किमतीला विक्रीला असलेले पाहिलेही होते. मुद्दाम फाडलेल्या जीन्स घालून फिरतांना लोकांना पाहिलं होतं .त्या फाटक्या जीन्स नेहेमीच्या,नं फाटलेल्या जीन्सहून अधिक महाग होत्या.
"नो नो ,वी आर रेडी !"त्यांनी म्हटलं.डीजेनं म्युझिक सुरु केलं आणि डिझायनर चिंध्या ल्यालेल्या त्या आधुनिक स्त्रिया त्या तालावर थिरकू लागल्या.त्या पार्टीत ड्रिंक्स पाण्यासारखे वाहू लागले. अल्पनालाही अनेकांनी आणि अनेकींनी आग्रह केला.
"आय डोण्ट ड्रिंक !वी आर अ फॅमिली ऑफ टी टोटलर्स !"तिनं निर्वाणीचं वाक्य म्हटलं .
" अगं घे गं !तुझ्या घरच्यांना कुणी सांगणार नाही. आम्हीही काही रोज घेत नाही... ऑकेजनल सोशल ड्रिंकिंग... पार्टीत तेवढे घेतो!"तिच्या पुरुष आणि स्त्री सहकाऱ्यांनी तिला पराकोटीचा आग्रह केला."हं!बट व्हॉट इफ दॅट ऑकेजन कम्स एव्हरी नाऊ अॅण्ड देन?"तिनं हसत हसत रेशमी चिमटा घेतला . "प्लीज कॅरी ऑन .चालू द्या तुमचं.मी घेतेय ना निंबूपानी !हॅपी न्यू ईयर !"अल्पना म्हणाली. अल्पनाएवढा निग्रह नसलेल्या तिच्या ऑफिसच्या एकदोघींनी इतरांच्या आग्रहाखातर आयुष्यात प्रथमच एकच प्याला तोंडाला लावला. डीजेच्या रिमिक्सच्या तालावर आणि नर्तिकांच्या नृत्यावर पार्टी रंगू लागली.आणि हॅपी न्यू ईयर म्हणत अवघे जण नववर्षाचं स्वागत करण्यात बुडून गेले .
***************************** *******
"मम्मी ,माझे दोन तीन फ्रेण्ड्स माझ्या मागे लागलेत,की आपण न्यू ईयर सेलिब्रेशन करायला कुठेतरी बाहेर जाऊ म्हणून!मी त्यांना एक ट्रीट देणं लागतो!मी त्यांना उद्या पार्टी द्यावी म्हणून सोशल मीडियावरपण लिहू लागले आहेत!पप्पा मला द्या ना थोडासा जास्तीचा पॉकेटमनी!मला नाही तुम्हाला त्रास द्यावासा वाटत;पण मी एकदोन वर्षांनी जॉब करायला लागेन,तेव्हा नाही तुम्हाला त्रास देणार!मग नाही मी तुम्हाला पैसे मागणार."ओंकाराचा जप करीत बसल्या असताना नातवाचं बोलणं प्रमिलाताईंच्या कानावर प डलं.त्यांची एकाग्रता भंगली.आतल्या खोलीत नातू त्याच्या आईवडिलांपाशी आर्जवं करत होता;पण त्यांच्याकडून त्याला काहीच उत्तर मिळत नव्हतं.एक विचित्र शांतता त्यांना जाणवली. आज घरातल्या वातावरणातच त्यांना एक अदृश्य ताण जाणवू लागला.नेहमीसारखी मायलेकामध्ये पॉकेटमनीवरून वादावादी झाली नाही किंवा बापलेकांनी कुरबुर केली नाही तेव्हा नक्कीच काहीतरी गडबडलंय हे त्यांच्या ध्यानी आलं. त्यांचं लक्ष काही केल्या जपात लागेना!देवाला नमस्कार करून त्या उठल्या.
"काय रे अथर्व,काय चाललंय?"त्यांनी नातवाला हाक मारली.एवढा फर्स्ट ईयर बीएस्सीला असलेला मुलगा;पण केवढा आज्ञाधारक आहे पहा!गुणी एवढा, की बारावीच्या परीक्षेनंतर गणिताच्या ट्युशन्स घेऊन त्यानं पैसेही मिळवून दाखवले आणि त्यातून नंतर गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकं घेऊन दिली. त्याच्या वयाची मुलं वाईट मार्गाला लागतात;पण अथर्व बिचारा सरळमार्गी आहे! प्रमिलाताईंच्या मनात आलं."अर्चना,अरे अनिरुद्ध,तब्येती बऱ्या आहेत ना दोघांच्या?"त्यांनी आपल्या मुलाला,सुनेला,काळजीनं विचारलं.काहीच उत्तर आलं नाही,तेव्हा त्या त्यांच्या खोलीच्या दाराशी जाऊन उभ्या राहिल्या. शून्यात नजर लावून मुलगा विमनस्कपणे बसला होता .सून गुडघ्यात मान घालून हुंदके देत होती."काय झालं गं ?"आईच्या ममतेनं सुनेच्या पाठीवरून हात फिरवत प्रमिलाताईंनी विचारलं."यांची कंपनी बंद पडलीये!तिथे काम करणाऱ्या सगळ्यांची,अर्थात यांची पण नोकरी गेलीये!मागचे दोन महिने सुद्धा पगार नव्हता मिळाला. कसंबसं भागवलं इतके दिवस !"सुनेनं सांगितलं.क्षणभर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे भयाण शांतता पसरली. मुंबईसारख्या शहरात आपलं कसं व्हायचं,कितीही काटकसरीनं राहिलं तरी घरखर्चासाठी पैसे कुठून मिळवायचे,या काळजीनं त्या सगळ्यांनाच घोर लागला. "उठा,असं निराश होऊन कसं बरं चालेल?
आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ: लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||
असं संस्कृत सुभाषित आहे.धनानं उन्मत्त होऊन निर्धनांकडे तुच्छतेनं बघून हसायचं नाही.लक्ष्मी एका जागी स्थिर राहत नाही. पाण्यानं भरलेलं रहाटगाडगं रिकामं होतं ,पुन्हा भरतं आणि पुन्हा रिकामं होतं .तसंच हे. परिस्थिती उत्तम आहे;म्हणून हुरळून जायचं नाही,आणि परिस्थिती वाईट आहे म्हणून कष्टी व्हायचं नाही!उठा बघू! देव नक्की काहीतरी मार्ग दाखवेल!"प्रमिलाताई उद्गारल्या. त्यांच्या अंगात एकाएकी बळ संचारलं!"आणि असं निराश होऊन थोडीच नवीन वर्षाचं स्वागत करायचं !आपल्या भारतीयांना रोज उत्फुल्लपणे जगायला सणवार आहेतच;त्यात ह्या न्यू ईयरची भर!अथर्व,तुझ्या त्या फ्रेंड्सना म्हणावं माझी आजीच पार्टी देणार आहे घरी.देशी जेवण ही थीम आहे पार्टीची!थंडीतला खासा बेत आहे म्हणावं !बोलाव त्यांना उद्या संध्याकाळी !"
दुसऱ्या दिवशी कडाक्याच्या थंडीत अथर्वच्या मित्रांना आजीनं ऊन ऊन खिचडी ,वांग्याचं भरीत, मेथीची भाजी,त्यावर लसणाची फोडणी,मिरचीचा ठेचा आणि लोण्याचा गोळा गरमगरम भाकरीवर वाढला;तेव्हा त्यांच्यासाठी ते पूर्णब्रम्ह 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड "ठरलं .आपण किती जेवलो,पोट भरलं,पण मन काही भरलं नाही,शेवटी शेकोटीभोवती बसून गरमगरम दूध प्यायल्यावर तर अशी न्यू ईयर पार्टी यापूर्वी झाली नाही,नंतरही कधी होणार नाही,"हॅपी न्यू ईयर "म्हणत अथर्वला वाखाणत त्याची मित्रमंडळी पांगली."आमच्या बाबांच्या कंपनी मधला मॅनेजर नोकरी सोडून गेलाय,कुणी खात्रीचा,विश्वासू, जबाबदार माणूस असेल ओळखीचा ,तर नक्की सांग!" त्यातला एक अथर्वला पुन्हापुन्हा सांगून गेला.
महानगरामध्ये सर्वत्र जल्लोषाचं वातावरण होतं "हॅपी न्यू ईयर "म्हणत सर्वत्र नववर्षाचं स्वागत केलं जात होतं.प्रमिलाताईंनी मनापासून देवाचे आभार मानले आणि मुलाला-सुनेला हाक मारली. "हॅपी न्यू ईयर "त्यांनी दोघांना म्हटलं आणि आरामखुर्चीत टेकून समाधानानं डोळे मिटून घेतले.
_________________________________________________________________
Comments
Post a Comment