मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १५:सोनं
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १५:सोनं
सोनं
सोनं
-रश्मी घटवाई
हैद्राबादच्या चकाचक राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर कविता उतर ली,तेव्हा तिला क्षणभर अमेरिकेत असल्याचा भास झाला,इतकं ते इंटरनॅशनल दिसत होतं आणि वातावरण पण जवळजवळ तसंच होतं.तिथेही कानावर इंग्रजी आणि तेलुगू कानावर पडत होती आणि अमेरिकेतपण !अमेरिकेत साड्या नेसलेल्या स्त्रिया कधीकधी दिसायच्या ,इथे जीन्स घातलेल्या बायकांच्या जोडीला लांबसडक वेणीत गजरे माळलेल्या,भरजरी साड्या नेसलेल्या,दागिने वगैरे घातलेल्या बायकाही होत्या.अनेकजणी सर्रास अंगभर सोन्याचे दागिने घालून सहज वावरत होत्या,याचंच कविताला आश्चर्य वाटलं. "हल्लीचे दिवस हे असे,इतकं असुरक्षित वातावरण असतांना कशा काय या बायका सोन्याचे दागिने घालू शकतात ?यांना जीवाची भीती नाही का?"तिच्या मनात विचार आला. भारतातल्या बातम्यांमध्ये चेन स्नॅचिंग,मंगळसूत्र खेचल्याच्या बातम्या असायच्या,त्याची कवितानं अमेरिकेत धास्ती घेतली होती.चुलत भावाच्या लग्नाला म्हणून ती थेट हैद्राबादला गेली होती.लग्नात घालायला म्हणून एअरपोर्टवरच तिनं स्वत:साठी छानपैकी मोत्यांचे आधुनिक दागिने खरेदी केले. एअरपोर्टवरून पुष्पक बस घेऊन कविता गाचीबोवली पर्यंत आली.तिथे तिचे नातेवाईक तिला उतरवून घ्यायला आलेलेच होते.हैद्राबादच्या 'आयटी हब'ला लागून असलेल्या त्याच भागात चुलत भाऊ राहत होता,तसंच त्याची होणारी तेलुगूभाषिक वधुपण!ह्या पिढीतल्यांपैकीचं हे शेवटचं लग्न म्हणून बाकीचे सगळे नातेवाईक भारताच्या विविध भागांतून आणि भारताबाहेरून आवर्जून आले होते!लग्न ज्युबिली हिल्स मध्ये होतं .साहजिकच त्या महागडया ,पॉश वस्तीत असलेला मॅरेज हॉल आणि व्यवस्थाही त्याच तोलामोलाची होती.
"तू का गं अशी लंकेची पार्वती बनून बसली आहेस?लग्नाला आली आहेस ना तू?मग दागिने-बिगिने नको घालायला?"ज्येष्ठ मंडळींपैकी कुणीतरी कविताला टोकलं."नाही हो काकू,मी काही सोनं वगैरे अमेरिकेत नेलं नाहीये,दागिने लॉकरमध्येच ठेवलेत पुण्यात !कशाला जोखीम बाळगा?"तिनं कसं -बसं उत्तर दिलं."किती बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष असतं यांचं !"तिच्या मनात आलं.काहीतरी निमित्त काढून ती तिथून उठून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन बसली.त्या सगळ्यांचं लग्नाच्यावेळी कोण काय घालणार,यावर चर्चासत्र सुरु होतं."मी आणल्यात एकदोन साडया माझ्या लग्नातल्याच.पाच वर्षांत एकदाही नेसले नाही!ब्लाऊज तरी होईल की नाही,म्हणून एअरपोर्टवरुन घेतलेत दोन डिझायनर ब्लाऊजेस !"लोक सुख-दु:खांपेक्षा,एकमेकांची ख्याली-खुशाली विचारण्यापेक्षा ह्या बाह्य गोष्टींवर बोलण्यातच वेळ खर्ची घालतात,याचं तिला वाईट वाटलं.सगळ्यांशी थोडंफार बोलून ती लवंडली.लग्नाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी पहाटेचाच असल्यामुळे लवकर उठून तयार व्हावं लागणार होतं .
बहुतेकींनी अंगभर सोन्याचे ठसठशीत दागिने घातले होते. वधूच्या अंगावर तर जवळजवळ तिच्या वजनाएवढंच सोनं होतं. "अगं इथे हैद्राबादमध्ये बायका रोज व्यवस्थित दागदागिने घालून बाहेर जातात ,इथे नाहीये कसली भीती!"कुणीतरी तिच्या ज्ञानात भर घातली. "तुला काय सोन्याची
अॅ
लर्जी वगैरे आहे का?"कुणीतरी आगाऊपणे तिला विचारलं."किती हा सोन्याचा हव्यास !सोनं विकत घेऊन चोरांची सोय का म्हणून करायची आपण?सोनं विकत घेऊन घालू तर शकत नाही आपण,नुसतं लॉकरमध्येच ठेवायचं असेल,तर कशाला घ्यायचे दागिने?शिवाय सोन्यावर काही रिटर्न्स मिळत नाहीत ,बँकेत पैसे ठेवले तर व्याज तरी मिळेल!"तिचा युक्तीवाद असायचा,त्याची पर्वा नं करता तिच्या आईनं तिच्या लग्नात चार ठसठशीत दागिने करून घातलेच होते तिच्या अंगावर.आता ती नाही. हुज्जत घालायलापण कुणी नाही!"जुनं ते सोनं ,ओल्ड इज गोल्ड ,चकाकतं ते सारं सोनं नव्हे,सोने पे सुहागा,सोन्याहून पिवळं ... आपल्या भाषेतल्या म्हणीही अशा सोन्यानं मढलेल्या!"आईचं प्रत्युत्तर असायचं .
थाटामाटात लग्न पार पडलं.मुलीकडच्यांनी वरपक्षाच्या लोकांना मानपानादाखल घसघशीत आहेर केला.वराची चुलतबहीण म्हणून
मानपानात
कविताला साडीबरोबरच सोन्याची साखळी आणि लॉकेट मिळालं.कविता खुळ्यागत
त्याकडे बघू लागली .
****************************** ******
शाळेचं गॅदरिंग होतं,म्हणून आपटे बाई दुपारच्या जरा लवकरच तयार होऊन बसस्टॉप वर जाऊन उभ्या राहिल्या होत्या.भरजरी साडीवर खऱ्या सोन्याचे भासतील अशा खोट्या दागिन्यांनी त्या नटल्या होत्या.मनोमन त्यांनी ते खोटे दागिने घडवणाऱ्या कारागिराला दंडवत घातला.आजूबाजूला अजिबात रहदारी नव्हती.मुंबईत
रस्ते
असे निर्मनुष्य क्वचितच दिसायचे!
मुलुंडची बस अजून आली नव्हती.कुणीतरी लांबून आपल्याकडे बघतंय की काय,असं त्यांना वाटून गेलं.आजूबाजूला कुणी नव्हतं.तिकिटासाठी सुटे पैसे वर काढून ठेवावेत म्हणून त्या पर्स काढणार,तोच कुणीतरी मागून येऊन त्यांच्या गळ्यातला नेकलेस,मंगळसूत्र,कानातले झुमके आणि हातातले तोडे ओरबाडून,हिसकून काढले आणि त्यांना काही कळायच्या आत चोर पळूनही गेला. काही नं सुचून त्या बसस्टॉपच्या बेंचवर मटकन बसल्या.त्यांचे पाय लटपटत होते,घसा कोरडा पडला होता.पर्समधून पाण्याची बाटली काढून त्या आधी घटाघटा पाणी प्यायल्या.त्या भानावर आल्या,तेव्हा समोर मुलुंडची बस थांबली होती.यंत्रवत त्या बसमध्ये चढल्या. "खोटेच दागिने तर होते,काय करायचं तक्रार करून?झाल्या प्रसंगाची वाच्यताच नं केलेली बरी!"मनातल्या मनात त्यांनी विचार केला,"खरे दागिने असते तर ?"भीतीची लहर त्यांच्या शरीरभर पसरली.शाळेच्या गॅदरिंगमध्ये त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली गेली होती,त्यामुळे मनातले सगळे विचार शर्थीनं थांबवून त्यांनी आपल्या कामाकडे चित्त एकवटलं.
शाळेनं दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना सुटी दिली असली तरी शिक्षकांसाठी सुटी नव्हती,त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपटे बाई शाळेत जायला तयार होऊन बस स्टॉपवर बसची वाट बघू लागल्या.आजही विशेष रहदारी नव्हती.तेवढ्यात संपूर्ण चेहरा पंचाने झाकलेला एक इसम अवचित त्यांच्या पुढ्यात आला आणि काही कळायच्या आत त्यांच्या अंगावर त्यांचे ओरबाडून नेलेले खोटे दागिने जोरात फेकून शिव्याशाप देत पळूनही गेला."खरे दागिने परवडत नाही,तर खोटे तरी कशाला घालता एवढे!"
आपटे बाई भानावर आल्या तेव्हा समोर बस थांबलेली होती. "एक मुलुंड!"यंत्रवत त्यांनी कंडक्टरला सांगितलं. सीटवर धपकन बसत त्यांनी स्वत:ला सावरलं .पर्समधून पाण्याची बाटली काढून त्यांनी तोंडाला लावली,तेव्हा पर्समधून त्यांचे खोटे दागिने घरंगळून खाली पडले.निर्विकारपणे त्यांनी ते उचलून पर्समध्ये टाकले आणि आपला स्टॉप येईतो डोळे मिटून घेतले.
***************************** ***********
दिल्लीतल्या महाराष्ट्र मंडळात प्रौढ वयाच्या स्त्रियांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इतिहासातली एखादी व्यक्तिरेखा साकारावी असं जयश्रीताईंच्या मनात आलं आणि त्यानुसार त्या सारी जमवाजमव करायला लागल्या.आपण आनंदीबाई साकारुया!'ध' चा 'मा' करणारी आनंदीबाई!खलनायिका!त्यां नी पुण्यावरून खास नऊवारी पैठणी,नथ मागवली आणि स्पर्धेच्या दिवशी लॉकरमधून सोन्याचे सगळे दागिने काढून आणून आणि घालून त्या पतिराजांसह स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्या .
"तुला मी गल्लीच्या टोकाशी सोडतो,गाडी काही गल्लीच्या आत जाउ शकणार नाही.तू पुढे हो,मी आलोच गाडी पार्क करून !" जयश्रीताईंना त्यांचे पतीराज म्हणाले.अवघी वीस पंचवीस पावलं तर अंतर होतं.दागिने आणि नऊवारी पैठणी या सरंजामासह तिथवर पायी जाणं काही कठीण नव्हतं .
"नमस्ते आंटी... आप अच्छे घर की लग रहीं हैं !तुम्हाला आम्ही सावधगिरीचा इशारा द्यायला म्हणून सांगायला आलोय. आताच इथे काही चोरांनी एक-दोन बायकांचे दागिने चोरून नेलेत.मोठाच बखेडा झाला होता इथे काही मिनिटांपूर्वी.तुम्ही असं करा,हा रुमाल घ्या,यात तुमचे सगळे दागिने बांधून आपल्या पर्स मध्ये ठेवून द्या,मग आत जाऊन घाला !"गल्लीच्या टोकाशीच दोन तरुण अतीव शालीनतेनं जयश्रीताईंजवळ आले आणि अदबीनं त्यांना म्हणाले.जयश्रीताईंनी त्यांच्याकडे नजर उचलून बघितलं आणि यंत्रवत सगळे दागिने त्यांनी पुढे केलेल्या पांढऱ्या स्वच्छ रुमालात गुंडाळले,आपल्या पर्समध्ये टाकले!"थँक यू आधीच सावध केल्याबद्दल,"जयश्रीताई त्यांना म्हणाल्या .
"काय गं काय झालं ,अशी का उभी आहेस?आणि तुझे दागिने कुठे आहेत?"पार्किंग मध्ये गाडी ठेवून आलेल्या पतिराजांनी गोंधळून जयश्रीताईंना विचारलं .तो प्रश्न सुद्धा जयश्रीताईंना बऱ्याच वेळानं कळला.त्यांनी पर्समध्ये बघितलं .त्या पांढऱ्या स्वच्छ रुमालात काहीच नव्हतं,केवळ मंद सुगंध तेवढा येत होता, गोंधळून त्यांनी इकडे तिकडे पाहिलं . तिथे ना ते तरुण होते,ना त्यांचे सोन्याचे दागिने!
***************************** *********
"सोन्याचे भाव गगनाला भिडणार!सोनं महागणार!"वर्तमानपत्रात बातमी आली,तशी महानगरात सोन्याच्या दुकानांत खरेदीदारांची एकच झुंबड उडाली. मागणी आणि पुरवठा याचं चक्र बदललं आणि सोन्याचे भाव गगनाला जाऊन भिडले.त्यामुळे ,नं जाणो,उद्या सोनं मिळणार नाही तर?म्हणत आणखी काही जण रांगेत उभे राहिले. सोनं आणखीनच चकाकू लागलं !
Comments
Post a Comment