मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२१:आधार
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२१:आधार
आधार
आधार
-रश्मी घटवाई
"जय जय रघुवीर समर्थ"कीर्तनकारांनी कीर्तन संपवलं.राममंदिरात आरतीची लगबग सुरु झाली.चंद्रप्रभाताई आरतीसाठी थांबल्या.रात्री साडेसात वाजता आरती सुरु झाली की निघायला साडेआठ तरी होणार.बाजूच्या चार इमारती सोडल्या की पलीकडच्या पाचव्या बिल्डिंगमध्ये त्यांचं घर होतं.घरी जाऊन तरी काय करायचं होतं?मुलीला कामावरून घरी पोहोचायला चांगलाच उशीर व्हायचा.रोज चेंबूरहून बोरिवलीला जायचं आणि परत यायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती.तिनं वेगवेगळे प्रयोग करून पहिले आणि सरतेशेवटी घरून बसस्टॉपपर्यंत एक किलोमीटर पायी जायचं मग बसनं घाटकोपरच्या मेट्रोस्टेशनपर्यंत जायचं,मग मेट्रोट्रेननं अंधेरीला जायचं आणि मग अंधेरीहून लोकलट्रेन पकडून बोरिवलीला उतरायचं,तिथून बस घ्यायची आणि बसस्टॉपपासून पुढे कामाच्या ठिकाणापर्यंत पायी जायचं असा दोन-अडीच तास जाताना आणि उलट क्रमानं दोन-अडीच तास येताना प्रवास करायचा या कोष्टकात स्वतःला बसवलं ."मुंबईत कुठल्याही वेळी गेलं तरी गर्दी असतेच गं आई !आणि प्रवासात बसायला सीट मिळतेच,असंही नसतं.घरी यायला उशीर होतोच. याहीपेक्षा उशीर झाला तरी काळजी नको करत जाऊ!" पहिल्या दिवशी रात्रीचे नऊ वाजले तरी मुलगी परतली नव्हती,म्हणून काळजीनं त्यांचा जीव गोळा झाला होता.लेक सुखरूप परत येईतो त्या देव पाण्यात घालून बसल्या होत्या.चेंबूरमधल्या चांगल्या सोसायटीतला वन बीएचके फ्लॅट आणि तुटपुंजी पेन्शन एवढ्या आधारावर त्यांनी नवऱ्याच्या पश्चात मुलीला वाढवलं होतं.मुलीनंही जबाबदारीची जाणीव ठेऊन वडिलांच्या पश्चात स्वबळावर शिक्षण केलं होतं आणि आता स्वबळावर नोकरीही मिळवली होती.मुलीबद्दल कौतुक आणि काळजीची संमिश्र भावना सदोदित त्यांच्या मनात कॅलिडोस्कोपसारख्या वेगवेगळ्या चित्राकृती निर्माण करीत होती.लेकीला पहाताच त्यांचा बांध कोसळला.त्या हमसाहमशी रडू लागल्या.पतिनिधनानंतर इतके वर्षांनी पहिल्यांदाच त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती.इतकी वर्षं त्यांनी सगळी सुखदु:खं पापण्यांआड दडवून ठेवली होती आणि आता किंचितसं निमित्त होऊन जरासा धक्का लागताच काठोकाठ भरलेल्या सुखाश्रु आणि दु:खाश्रुंच्या गंगाजमुना त्यांच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होत्या.लेकीनं त्यांना मुक्तपणे रडू दिलं.आईला आपल्या आधाराची किती गरज आहे हे निव्वळ स्पर्शातून तिला कळलं,तेव्हा तिला आतून प्रचंड गलबलून आलं. आईची आई होऊन अतीव मायेनं आईला थोपटत तिनं मुंबईतल्या जाण्यायेण्याच्या प्रवासाची कल्पना दिली.
"नाही गं तुला एवढा त्रास झालेला बघवत. आताआतापर्यंत शाळा-कॉलेजमध्ये होतीस. आता एकदम नोकरी मिळवून कामावर गेलीस तर वाटलं,अरे, आपली छकुली एकदम मोठी झाली. जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत्येय.किती समजूतदार आहे!चल हातपाय धू आणि गरमागरम जेवायला बैस बघू!" चंद्रप्रभाताई पुन्हा आईच्या भूमिकेत शिरल्या आणि लेक लेकीच्या!
"आता लग्नाचं पण मनावर घे! हवं तर एखाद्या वधुवरसूचक मंडळात नाव नोंदव !"नोकरीत लेक रुळल्यावर त्यांनी तिला म्हटलं होतं. "मी तुला सोडून कुठे जाणार नाही आई!"लेकीनं उत्तर दिलं.
"असं म्हणून कसं चालेल ?सासरी तर जावंच लागेल ना आज ना उद्या ! " त्यांनी म्हटलं.
"की घरजावईच शोधायचा?"लेकीनं फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. मायलेकी हसू लागल्या.
राममंदिरातल्या रामानं चंद्रप्रभाताईंच्या मनातले विचार जाणले असावेत.तिथे नेहमी येणाऱ्या आणि इतक्यातच त्यांच्याशी ओळख झालेल्या देशपांडेबाईंनी बँकेतल्या आपल्या मुलासाठी चांगलं स्थळ सुचवा,असं त्यांना म्हटल्यावर तर त्यांना हर्षवायूच झाला .
"देशपांडेबाई आणि मुलगा असे दोघेच आहेत त्या घरात.स्थळ तर चांगलं वाटतंय ."चंद्रप्रभाताईंनी लेकीला सांगितलं .
"एका अटीवर लग्नासाठी तयार होईन मी.मी रोज त्या घरातल्यांची का ळजी घेणं त्यांना अभिप्रेत असेल तर मी इथे येऊन रोज माझ्या आईची पण काळजी घेईन,हे जर त्यांना मंजूर असेल,तरच पुढे बोल त्यांच्याशी!तू इथे एकटीच रहाशील ,तुला सगळं सामान आणून देणं वगैरे कामं मी आता करते आहे ,तसंच पुढेही करीन,हे त्यांना चालणार असेल,तरंच पुढे जायचं हं आई!"लेकीनं पुन्हा-पुन्हा बजावलं. इतक्या स्वच्छ शब्दांत आपली मतं मानणारी मुलगी आहे तरी कोण हे बघायला देशपांडेबाई आणि त्यांचा मुलगा असे दोघे जेवणं उरकून कॉफी प्यायला म्हणून मायलेकींची अनौपचारिक भेट घ्यायला आले.
"कुणाला दुखवायचा हेतू नाहीये माझा.पण इतकी वर्षं आईनी माझ्यासाठी खस्ता खाल्ल्यावर या टप्प्यावर तिला एकटं टाकून जाणं प्रशस्त वाटणार नाही मला.मुलाची आपल्या आईशी जशी कमिटमेन्ट असते;तशीच मुलीलाही आपल्या आईशी कमिटमेन्ट असणार , तिचीही काही जबाबदारी असणार,हे ध्यानात घेऊन मोकळीक देणारा नवरा मला हवा आहे!म्हणजे आई ह्याच घरात राहील,पण मी इथे ऑफिसमधून रोज अर्ध्या तासासाठी तरी येईन,तिला काय हवं -नको,ह्याची व्यवस्था बघीन आणि मग आपल्या घराला पूर्ण वेळ देईन."
कॉफीचे कप ट्रेमध्ये ठेवून लेकीनं त्यांच्यासमोर धरले,तेव्हा देशपांडेबाई आणि त्यांचा मुलगा तिच्या सौम्य शब्दांत पण ठामपणे मांडलेल्या मतांनी प्रभावित झाले.
"इथून नाहीतरी जवळच आहे आमचं घर.तुला दोन्ही घरी समान वेळ देता येईल एवढा मोकळेपणा आमच्याकडे निश्चितच मिळेल." देशपांडेबाई म्हणाल्या,"आतापर्यंत माझं मत होतं की लग्न झाल्यावर मुलीनं माहेर विसरून सासरच्या घराशी एकरूप व्हायला हवं ; पण आवश्यक असल्यावर मुलीनं माहेरची जबाबदारीही पेलायला हवी ,हे मला आत्ता कळलं.आमच्या पिढीनं बदलायला हवं,नव्या विचारांचं स्वागत करायला हवं आणि सुनेला पुरेशी मोकळीक द्यावी,हे मला पटलं .'अस्सं माहेर सुरेख बाई खेळायला सापडतं,अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं,'असं भुलाबाईच्या गाण्यांमध्ये आम्ही म्हणत असू, ते सासरचं वर्णन असू नये,हे आम्ही बघू. "
"काकू ,महानगरांच्या स्वतःच्या वेगळ्या समस्या आहेत आणि प्रत्येक पिढीच्या वेगळ्या. प्रत्येक सुनेनं घरं दुभंगवण्यासाठी द्विभाजक नाही,तर दोन्ही घरांना जोडण्यासाठी सेतू उभारायचं काम केलं पाहिजे एवढं केवळ माझ्या अल्पबुद्धीला वाटतं;अधिक काय बोलू?" लेकीनं देशपांडेबाईंना म्हटलं,तेव्हा चंद्रप्रभाताईंचे डोळे पाणावले.एवढीशी ही मुलगी;विचारांची एवढी परिपक्वता हिच्यात कधी,कुठून आणि कशी आली,याचा अचंबा त्या मनातल्या मनात करू लागल्या.देशपांडेबाईंचा मुलगा तिच्या चटपटीतपणावर आधीच भाळला होता;तिच्या शब्दांनी त्याच्यावर गारुडच केलं.
वातावरणात हवाहवासा सुखद गारवा होता."आणखी एकेक कप कॉफी चालायला हरकत नसावी!या,आपण दोघीजणी स्वयंपाकघरात बोलूया,ह्या दोघांना बोलू देत मोकळेपणानं !" चंद्रप्रभाताई देशपांडेबाईंना म्हणाल्या.दोघीजणी स्वयंपाकघरात गेल्या,तेव्हा चंद्रप्रकाशाचा एक चुकार कवडसा खिडकीतून त्यांच्या दिवाणखान्यात शिरला आणि त्या धवल प्रकाशात दिवाणखान्यातला कोपरा उजळून निघाला.
****************************** *****************
"एक अमर महल!"घाटकोपर पूर्व बाजूला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या तीनशे एक्याऐंशी बसच्या रांगेतून बसमध्ये प्रवेश करत मुक्तानं कंडक्टरला दहा रुपयांची नोट दिली. आत्ता रात्रीचे साडेनऊ वाजले होते,पण सकाळचे साडेनऊ वाजले असावेत,एवढी गर्दी रस्त्यांवर होती.बसमध्ये पण भरपूर गर्दी होती.स्त्रियांसाठीची राखीव आसनं रिकामी नव्हती आणि तिच्यासह अनेक स्त्रियापण उभ्यानं प्रवास करीत होत्या.आता बसस्टॉप वरून उतरून चांगलं पाऊणेक किलोमीटर चालत आपल्या छेडानगरच्या फ्लॅटवर जायला लागेल,नाहीतरी आपली रूममेट नाहीये इथे;तेव्हा आज खिचडी खाऊ आणि उद्या डब्यासाठी जाता-जाता भाजी घेऊ,"मुक्तानं मनातल्या मनात गणित मांडलं.नोकरीनिमित्त ती आणि तिच्या ओळखीची आणखी एक मुलगी भाड्यानं टू बीएचके फ्लॅट घेऊन रहात होत्या.पायानं थोडी अधु असलेली ती मैत्रीण घरून कॉम्प्युटरवर काम करीत होती आणि घरच्यांना नियमितपणे पैसे पाठवत होती,वेगळं राहून स्वतःला सिद्ध करीत होती, याचं मुक्ताला विलक्षण अप्रूप होतं.मुक्तानं बाहेरची कामं सांभाळायची आणि त्या मैत्रिणीनं घरातली, अशी त्यांनी आपणहून कामाची वाटणी करून घेतली होती."हेच तर सहजीवन ,सिम्बायोसिस म्हणतात त्याला,एकाच्या असण्याचा आधार दुसऱ्याला असतो!"त्या मैत्रिणीनं मुक्ताला सांगितलं होतं,"आपल्याकडे मसाल्यामध्ये दगडफूल वापरलं जातं ,त्यात अल्गी आणि फंगाय ह्यांचं असंच सहजीवन असतं!"त्या मैत्रिणीचं आता लग्न होऊ घातलं होतं आणि तिनंही स्वतःसारखाच मुलगा स्वतःसाठी शोधला होता. त्या ग्राउंड फ्लोअरवरच्या त्यांच्या फ्लॅटमध्ये व्हीलचेअरवरून बाहेरून येणं आणि वावरणं सोपं होईल,अशा सोयीही करून घेतलेल्या होत्या. साहजिकच लग्नानंतर तो मुलगा ह्या घरात येणार होता आणि दोघं समजूतदारपणे स्वबळावर संसार थाटणार होते."तू नाही हलणार हं ह्या घरातून कुठे. कुटुंबीय आहोत आपण ;उद्या तुझं लग्न झालं तर तुझे यजमानपण इथेच राहू शकतात,तुम्हीही इथे संसार करू शकता.पूर्वी एकत्रित कुटुंबपद्धती होतीच ना?"त्या मैत्रिणीनं तिला प्रेमळ दम दिला, "माझा स्वार्थ नाहीय गं काही ह्यात ,"तिनं खुलासापण करून टाकला होता.मुक्ताला हसू आलं.ह्या वीकेण्डला घर स्वच्छ करून सजवून नवविवाहित जोडप्याचं स्वागत करण्याचं तिनं ठरवलं आणिबसस्टॉपवर उतरल्यावर तिची पावलं झपझप छेडानगरच्या दिशेनं पडू लागली.
****************************** ******************
घाटकोपर मेट्रो स्टेशनवरून अंधेरीला जाणारी मेट्रो ट्रेन निघाली,तेव्हा घाईघाईनं आत शिरलेल्या अमोलनं फोन लावला. "दीदी ,मैं ही बोल रहा हूं ,सहजीवन सोसायटी में रहता हूं ना,कल शायद आपने झाडू नहीं लगायी थी ,धूल -मिट्टी दरवाजे के पीछे वैसी ही थी, कचरा भी डस्टबिनमें वैसेही था ... "अमोल तक्रारीच्या सुरात म्हणाला,तेव्हा डब्यात त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दोघी मुली आपसूकच त्याचं संभाषण ऐकू लागल्या. तो त्याच्या घरी काम करणाऱ्या कामवाल्या बाईंशी बोलतोय हे त्यांनी ताडलं . "कल मैं नहीं गयी ,आज आनी उद्यापन नाही कामावर जानार ,पटत नसेल तर दुसरी कामवाली बगा ..."तिचा संवाद त्यालाच काय;पण शेजारी उभ्या असलेल्या दोघींना पण स्वच्छ ऐकू आला . त्यानं हताशपणे दुसरा नंबर लावला . "मगनभाई ,आज देर से घर पहुँचूंगा ,गाय के दूध के दो आधे आधे लिटर के पॅकेट हमारे सहजीवन सोसायटीके गेट पर दे देना रात को दुकान बंद करने से पहले..."त्यानं सांगितलं. "वांधा नहीं ,पाच रुपये दूध पोहोचवायचे अधिक लागतील ..."दुकानदार म्हणाला. अमोलनं आजूबाजूला पाहिलं ,लयीत जाणाऱ्या मेट्रो ट्रेनमधल्या त्या दोघी समजूतदारपणे एकमेकींकडे बघून स्मित करीत होत्या. मेट्रोट्रेनच्या खांबाचा आधार घेऊन तो उभा राहिला.बाकीची मुंबई, परस्वाधीन आहोत,असं म्हणण्याऐवजी एकमेकांचा आधार असं मानून घेऊन एकमेकांच्या आधारानं धावू लागली.
________________________________________________________________
Comments
Post a Comment