मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२८):पळसाची पानं

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२८:पळसाची पानं 
पळसाची पानं 
-रश्मी घटवाई 
'आगं ये बारके ,कुटं हायीस ?"अंथरुण धरलेल्या बायजेनं कण्हत कण्हत नातीला हाक मारली."बारकी न्हाय हितं.चाला,म्याच येतो तुमच्या संगट."नातीऐवजी बायजेच्या सुनेनंच उत्तर दिलं."दोन दिसापासून म्हातारीनं हांथरुन धरल्यालं.काय बी खाईना.लई तरास देतीया समद्यास्नी !"बायजेच्या सुनेनं अर्धं स्वगतपर आणि अर्धं शेजारणीला म्हटलेलं अनेकींनी ऐकलं.महानगरातल्या त्या झोपडपट्टीच्या मधल्या भागांतल्या झोपड्यांमध्ये थोड्याच वेळात बायजेला बरं नसल्याची बातमी पसरली आणि बायजेच्या ओळखीच्या दोघी-तिघी वयस्कर शेजारणी लगोलग उठून  तिच्या तब्येतीची विचारपूस करायला तिच्यापाशी गेल्या."ये बायजे काय होतंया ?"त्यांनी आत्मीयतेनं तिला विचारलं.  "काय बी खाईनात दोन दिसाधरनं.लई तरास होतुया त्यास्नी.रगत न्हायी त्येंच्या आंगात,"बायजेच्या सुनेनं परस्पर उत्तर दिलं."उलुसक पानी पीत ऱ्हायलं तर आराम पडंल जिवाला."तिनं बायजेला आधार देत भिंतीला टेकून बसवलं.पाण्याचा पेला सासूच्या हाती दिला.आलेल्या शेजारणी बायजेशी थोड्या वेळ बोलून बायजेची सून लई गुनाची ,सासूचं समदं करते म्हणत आपापल्या घरी परतल्या.बायजेची सून आपल्या शेजारणीशी गप्पा मारण्यात रमली . 
"काय वं बायजे,तू काय बी खात न्हाईस म्हूनशानी आइकलं.माह्या नरड्याखाली घास कसा उतरन ?" खणखणीत आवाजात पुकारा करत बायजेची आणखी एक शेजारीण थोड्याच वेळात तिच्या जवळ येऊन थडकली.तिनं पिशवीतून डब्बा काढला.बळेबळे बायजेला उठवून बसवत तिनं डबीतून आणलेलं आलं-लिंबूमिठाचं चाटण तिला चाटवलं."लई आशक्तपना आलाय.दोन घास ऊन ऊन खिचडीचे बी ढकल प्वाटात!"
"आगं आंबे ,किती करशील माझ्यासाठी?"क्षीण आवाजात बायजेनं तिला म्हटलं .
"आत्ता !माहेरवाशिणी ना आपण दोघी एका गावच्या ?शेतात राबायचो आपण,ते जोडीनं.लगीन झालं ते बी जोडीनं आनं नशिबाचा फेरा बी जोडीनंच पडला!"अंबा म्हणाली. 
दोघीजणी एका खेडेगावात बरोबरीनं वाढल्या होत्या,शेतात बरोबरीनं राबल्या होत्या .लग्न होऊन गेल्यावर दोघींची परिस्थिती बदलली नव्हती.शेतीत फारसं हाती लागत नव्हतं म्हणून बायजेच्या नवऱ्यानं अखेर मोलमजुरी करून गुजराण करण्यासाठी मुंबई गाठली होती. हाल-अपेष्टांमध्ये दिवस काढून पडेल ती कामं करत एक दिवस त्या झोपडपट्टीत झोपडी घेऊन बायजेला आणि मुलाला आणलं होतं.एक दिवस बायजेच्या कानी वाईट बातमी आली. 
"शेतीत दोन वर्षांधरनं काहीच पिकलं नाही म्हूनशान आंबेच्या नवऱ्यानं ईख खाल्लं!शेतकऱ्याची आत्महत्या म्हनत पेपर वाल्यांनी आनी लोकांनी आंबेचं जीनं हराम करून टाकलया जनु!"बायजेच्या नवऱ्यानं बायजेला सविस्तर माहिती दिली.लगोलग दोघे गावी पोहोचले. 
"बायजे ,पुरुषमाणूस असूनही हार मानली त्यांनी परिस्थितीपुढे! एरवी बाई पुरुषापेक्षा शरीरानं कमकुवत असेल,पण मनानं खंबीर असते त्याच्यापेक्षा.शेतकऱ्याच्या घरातलं बाईमाणूस नाही आत्महत्या करत...कच्ची-बच्ची असतात तिच्या डोळ्यांपुढे!परिस्थितीची झुंजायची शक्ती देवानी दिली असते तिला ."बायजेच्या गळ्यात पडून तिनं शेवटचे अश्रू गाळले आणि परिस्थितीशी दोन हात करत पोटच्या तीन पोरींना वाढवण्यासाठी तिनं कंबर कसली. गावात पैसे मिळणं अशक्य म्हणून बायजेनं आणि तिच्या नवऱ्यानं तिला मुंबईला काम करण्याचा सल्ला दिला आणि जमेल तितकी मदत केली. तिलाही हाताला काम आणि आपल्या झोपडीजवळच राहायला झोपडी मिळवून दिली.बायजेच्या नवऱ्यानं या जगाचा निरोप घेतल्यावर अंबाच खंबीरपणे बायजेच्या पाठीशी उभी राहिली. समाजातल्या वाईटापासून वाचवत, आपल्या मुलींना शिकवून तिनं त्यांना आपापल्या पायावर उभं केलं आणि चांगल्या ठिकाणी त्यांची लग्नं करून दिली. 
 
झोपडपट्टीच्या बाहेर उभ्या असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांत कसंबसं खुरडत जाऊ शकणाऱ्या बायजाला नंतर-नंतर तेही शक्य होईना ."त्येंचं समदं हांथरुनातलं आपल्याइलेच निस्तरा लागनार !म्हातारी ही झोपडी आपल्या नावावर करणार पण आहे की नाही,कुणास ठाऊक!"बायजेच्या सुनेनं एक दिवस नवऱ्याच्या कानात कुजबुज केली,"न्हाईतर येक दिस त्या आंबाबाई हितं दिसतील आनी लेक-सून रस्त्यावर !तुमी वेळ-वखुत बगुन सांगून टाका येकडाव त्यास्नी!"
"बायजे,येवडी लापशी खाऊन घेजो!"कामावर जाण्याआधी अंबा नित्याप्रमाणे बायजेसाठी खाणं घेऊन आली.तिनं खाणं आणलं नसतं तर बायजेच्या पोटात अन्नाचा कण गेला नसता,तिनं आग्रह केला नसता तर बायजेनं खाल्लं सुद्धा नसतं ."आगं आंबे ,किती करशील माझ्यासाठी?"क्षीण आवाजात बायजेनं तिला म्हटलं,तशी अंबा हसली."बायजे,आगं आपन येका गावच्या माहेरवाशिनी !तुहा जीव माह्यात आन माहा तुह्यात!
कसंनुसं हसत,धडपडत उठून बसत बायजेनं थरथरत्या हातांनी बोटातली चेपलेली सोन्याची अंगठी काढली.अंबेच्या हाती ठेवली."न्हाई म्हनू नगं!माही वेळ-वखुत सांगून येनार न्हाई!झोपडीचा कागुद न्हाई माह्यापाशी!पोरासाठी तं काई ठेवा लागंन !न्हाई तर म्हातारा-म्हातारीनं काई ठिवलं नाई म्हून खपल्यानंतरबी कोसत बसतीन !"बोलता-बोलता बायजेला धाप लागली.अंबानं पाण्याचा पेला तिच्या ओठाशी लावला.दोन घोट पाणी पिऊन बायजा आडवी झाली."शांतपणे जा बाई !"अंबानं ममतेनं तिला थोपटलं.बायजेनं डोळे मिटले,ते कायमचे.अंबेच्याही तोंडून तिच्याही  नकळत हुंदका फुटला . 
"खपली का काय म्हातारी!"सुनेनं शेजारणीला म्हटलं आणि गळा काढला ."आगागा ,द्येवा आसं का क्येलंस ,लई चांगली व्हती माही सासू ... " तिच्या रडण्यानं आजूबाजूचे लोक लगेच गोळा झाले .त्या कोलाहलात अंबाचं मूक रुदन कुठल्या कुठे विरून गेलं . 
                                      ******************************************
"एक कप चाय बना दे बहू !"सीता काकींनी पुन्हा एकदा सुनेला आठवण करून दिली. हल्ली त्यांना वयोमानानुसार रात्रीची झोप कमीच लागायची.भल्या पहाटे त्यांना जाग यायची,पण अंथरुणावर पडून देवाची स्तोत्रं म्हणण्याखेरीज त्यांना दुसरा पर्याय नव्हता.त्यांचा मुलगा आणि सून  दमून भागून रात्री उशिरा ऑफिसमधून घरी परतायचे .मग मुलं आणि दोघे नवरा-बायको आपापल्या खोलीत टीव्ही बघत बसायचे .मुलगा सून सकाळी अंमळ उशिराच उठायचे.
"अम्माजी,चाय आप खुद ही बना लिया कीजे ना!"सुनेनं एकदा त्यांना म्हटलं होतं ."तुम्ही सकाळी खूप लवकर उठता.मग आमची झोपमोड होते. "
"अगं तू ते नवीन पद्धतीचं स्वयंपाकघर बनवून घेतलं आहेस ना,मला खरंच त्यातलं काही कळत नाही. त्या नवीन पद्धतीच्या कपाटाची दारं मला काही उघडता येत नाहीत,नवीन पद्धतीची गॅसची शेगडी पेटवता येत नाही ,गोंधळायला होतं.चहा करायला गेले,तर काही भलतंच व्हायचं,"सीता काकींनी ओशाळून सुनेला म्हटलं होतं. "काही हरकत नाही,तू उठलीस की चहा करून देत जा!"
रात्रीचं जेवण बहुतांश वेळा हॉटेलमधून मागवलं जायचं ,किंवा मग पास्ता-पिझ्झा खाऊन भागवलं जायचं.
"तुला जमलं तर सकाळीच माझ्यासाठी दोन जास्तीच्या पोळ्या करून ठेवत जाशील का?"त्यांनी मोठ्या संकोचानं सुनेला म्हटलं होतं," हॉटेलचं तेलकट मसालेदार जेवण नाही गं मला सोसवत . पिझ्झा- पास्ता खायची आमच्या पिढीला सवय नाही ना!त्यांनी पोटपण भरत नाही .खरं म्हणजे वाढत्या वयाच्या मुलांच्या पोटात सकस अन्न जायला हवं."सीता काकींनी ओठांवरचे बरेचसे शब्द पाण्याच्या घोटाबरोबर गिळले होते. 
"अम्माजी आज गॅस का सिलिंडर आनेवाला है.आप घर में ही रहना,बाहर चली जाएंगी,तो मुश्किल हो जाएगी."सीताकाकींच्या सुनेनं चहाचा कप त्यांच्या हातात देत म्हटलं, "हे पैसे ठेवतेय ."
"अगं मला काही ह्या दाराचं  कुलूप बाहेरून उघडायला जमत नाही ,मी कशाला बाहेर जातेय?तू निश्चिन्त रहा .मी बरी आणि ही बाल्कनी बरी .ह्या बाल्कनीतून दिसणारी रहदारी,जरा लांब असलेली एक झोपडपट्टी न्याहाळत दिवस सरतो."त्यांनी चहाचा घोट घेत सुनेला सांगितलं .सुनेनं कुतूहलानं बाल्कनीतून डोकावून पाहिलं.झोपड्पट्टीपासून दूर एक पळसाचं झाड उभं होतं.
घरातले सगळे आपापल्या कामावर गेल्यावर सीता काकी बाल्कनीत बसून गॅस सिलिंडर आणणाऱ्या माणसाची वाट पाहू लागल्या .मुंबईतल्या त्या अजस्त्र पसाऱ्यात उत्तरप्रदेशातल्या एका लहानशा गावातून त्या तीन वर्षांपूर्वी आल्या होत्या.मुलगा आणि सून नोकरीच्या निमित्तानं अनेक वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि इथलेच होऊन गेले. मुलींची लग्नं होऊन त्या आपापल्या संसारात रमल्या होत्या . मुलीच्या सासरी मुलीच्या आईवडिलांनी पाणीही प्यायचं नसतं ,ह्या पूर्वापारच्या रिवाजानुसार मुलींना सीताकाकींनी भेटायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीं वडील गेल्यावर गावी तुला कोण बघणार म्हणत सीता काकींच्या मुलानं आपल्या आईला आपल्या घरी मुंबईत आणलं.त्या जुन्या इमारतीचं रीडेव्हलपमेन्ट होऊन,प्रत्येकाला चकचकीत,आधुनिक सरंजाम असलेला फ्लॅट मिळाला." मुलानं नशीब काढलं,"सीता काकींच्या मनात आलं. 
"अम्मा,ह्या मुख्य दाराला अंगचंच कुलूप आहे.लॅच म्हणतात त्याला.हवेनं दार बंद झालं ,तर उघडायला नेहमी त्याची ही किल्ली जवळ बाळगायची. तू एकटीच घरी असतेस .एखादवेळी पंचाईत व्हायची." सीता काकींच्या मुलानं आपल्या आईला समजावून सांगितलं,तश्या त्या चकचकाटानं आधीच बावरून गेलेल्या सीता काकी आणखीनच घाबरल्या .एकतर त्या टोलेजंग इमारतीत कोणी कोणाला ओळखत नव्हतं.गावासारखा तिथे शेजार नव्हता की आजूबाजूला कोणी मदत करणारं  नव्हतं. धास्तावून,मुख्य दाराची किल्ली त्या जवळ बाळगू लागल्या खऱ्या,पण ती कुलुपांची क्लिष्ट यंत्रणा नं समजल्यामुळे आपल्याला दार उघडता येईलच,याची त्यांना खात्री नव्हती.
इतक्या वेळ वाट बघितल्यावर अखेरीस दारावरची बेल वाजली. गॅस कंपनीचा माणूस गॅस सिलिंडर घेऊन आला होता. 
"अम्मा,छुट्टा पैसा दिया करो. दो हजार का नोट दिया है ,मैं किधर से छुट्टा करके लाएगा ?"त्यानं कुरकुर केली.खिशातले पैसे काढून उरलेली रक्कम त्यांच्या हाती दिली आणि रिकामं गॅस सिलिंडर घेऊन तो परत गेला. बावरलेल्या सीता काकींनी पैसे मोजले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं,की त्यानं चुकून पाचशे  रुपये त्यांना कमी दिले आहेत."भैया,सुनो,"घाई गडबडीत  घराच्या बाहेर जाऊन त्यांनी त्याला हाका मारल्या,पण तोवर तो दृष्टीआड झाला होता आणि त्या गडबडीत घराचं दार बंद होऊन गेलं होतं . 
"हरे राम!घराची किल्ली तर आतच राहिली.आपण कोणाला ओळखत नाही .लिफ्टनी काही आपल्याला जाता येणार नाही. कोण आपल्याला मदत करणार ?पैसे नीट परत घेतले नाहीत, घराची किल्ली बरोबर ठेवली नाही,म्हणून आपल्या वेंधळेपणाबद्दल मुलगा -सून आपल्याला दोष देतील ,तो वेगळा !"प्रचंड घाबरून त्या जिन्याच्या पायरीवर बसल्या राहिल्या. त्या टोलेजंग इमारतीत जिन्यानं कोणी येण्या-जाण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे सीता काकी कोणाला दिसायची शक्यताही  नव्हती. 
"अरे अम्माजी,आप यहाँ क्या कर रहीं हैं ?आप भी नं ,कमाल करती हो!"दाराला किल्ली लावता-लावता सुनेचं लक्ष अचानक तिथे डोळे मिटून बसलेल्या सीता-काकींकडे गेलं .पाठोपाठ त्यांचा मुलगाही आला.
"अरे अम्मा ,यहाँ क्यों बैठी हो? "त्यांनंही त्यांना म्हटलं.सीता काकींनी काहीच उत्तर दिलं नाही,तेव्हा दोघेही त्यांच्याजवळ आले.सीता काकींनी काहीच हालचाल केली नाही. 
"अम्मा "मुलानं टाहो फोडला,"आम्हाला पोरकं करून अशी कशी निघून गेलीस?"कोलाहल ऐकून इमारतीतले लोक त्यांच्या मजल्यावर गोळा झाले. इमारतीत राहणारे डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी तपासून नकारार्थी मान हलवली. सीताकाकीचं पार्थिव शरीर आत नेलं गेलं . कोणी तरी बाल्कनीचं दार उघडलं . तिथून दूरवरचं दृश्य दिसत होतं . तिथे उभ्या असलेल्या पळसाच्या झाडाची पानं हवेनं सळसळत होती.  
________________________________________________________________
-रश्मी घटवाई ,मुंबई 
९८७१२४९०४७ 

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी