मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ७:ओढ
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ७:ओढ
ओढ
-रश्मी घटवाई
"काय सुरेख पुरणपोळी आहे!नुसती तोंडात विरघळतीये!"विहिणींच्या पंक्तीत वरमायेनं नं रहावून म्हटलं,तेव्हा पंक्तीत पुरणपोळीचा आग्रह करणा ऱ्या वधुमायेला समाधान लाभलं. दादरमधला लग्नाचा तो हॉल, तो केटरर आणि त्यांच्याकडची पुरणपोळी स्पेशालिस्ट यांची सेवा मिळवण्यासाठी वधुपक्षानं मेहनत घेतली होती,त्यांना आपल्या सगळ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं!"पैसे कुठेही मोजावेच लागले असते;पण कदाचित एवढे चविष्ट जेवण अन्य केटररनं दिलेच असते,असे नाही!त्यातही अशी मऊसूत पुरणपोळी,की मुलाकडच्या सगळ्या मानकरणी खूष झाल्यात!"वधुमाय समाधानानं कुणाला सांगू लागली,तेव्हा त्यांच्या बरोबर पुरणपोळीवर तुपाची धार धरणाऱ्या मीनावहिनींच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं.पेशवाई थाटातली विहिणींची पंगत, त्याबरहुकूम सगळा सरंजाम ही सगळी त्यांची संकल्पना होती. मुलांच्या केटरिंगच्या व्यवसायाला कौतुकाची पावती म्हणून पुरणपोळ्या त्या स्वत:च करत आणि पेशवाई थाटातली विहिणींची पंगत असेल,तर नऊवारी पैठणी आणि पाणीदार मोत्यांची नथ या साजात स्वत: पुरणपोळी आणि तूप वाढायला लागत!त्या निमित्तानं लोक आपल्या मुलाच्या कामाचं मूल्यमापन कसे करतात,हेपण त्यांना समजून येई. सगळेच त्यांच्या हातच्या पुरणपोळीचं कौतुक करायचे.
"इतक्या मऊसूत रेशमी पुरणपोळ्या कराव्यात तर मीनावहिनींनीच !" घास घेताच न रहावून त्यांच्या दिरानं पहिल्यांदा म्हटलं होतं. "ग गिरगावाचा"असा श्रीगणेशा गिरवत त्या गिरगावात जन्मल्या,लहानाच्या मोठया झाल्या,लवकरच लग्न होऊन मागच्या आळीतल्या जोश्यांच्या घरून पुढच्या आळीतल्या जोश्यांच्या घरी नांदायला लागल्या.गोत्रं वेगळी;एवढाच काय तो बदल.बाकी दोन्ही घरी दीडखणी खोलीत माणसांचा राबता.माहेरी आईवडील बहीण भाऊ; सासरी सासू-सासरे,दीर,नणंदा यांच्या जोडीला पै-पाहुणे,सणावारी येणारे सख्खे-चुलत नातेवाईक.परिस्थिती जेमतेम!त्या तेवढ्या जागेत आधीच्या पिढया गुण्यागोविंदानं नांदल्या,त्यांचीही नांदणार होतीच!गिरगावाबाहेर जग असतं,हेच मुळी कुणाला ठाऊक नव्हतं.किंबहुना गिरगावाशी सगळ्यांची नाळ घट्ट बांधली होती,इतकी;की त्यांच्यालेखी मुंबईची हद्दच मुळी गिरगाव चौपाटीपर्यंत होती;गिरगाव चौपाटीच्या पल्याड दिसणारे नरिमन पॉईन्ट आणि मलबार हिल हे जणु कुठल्या परक्या देशाचे भाग होते!गणेशोत्सवाच्या वेळी,गणेशमूर्तीच्या विसर्जनाच् या वेळी तिथे मुंगीला शिरायला वाव नसायचा आणि त्या तिथल्या सणाच्या वातावरणात तिथे राहणारे लोक श्वास तरी कसे घेत असतील याचं इतर लोकांना कोडं पडायचं .प्रत्यक्षात ते वातावरण तिथे राहणाऱ्यांना प्राणवायू पुरवायचं आणि जगण्यासाठी ऊर्जा!तीच ऊर्जा घेऊन इतर गिरगावकरांसारख्या त्याही त्या दीड खणी खोलीत राहत होत्या !
"मी काय म्हणते;आपण पुरणपोळ्या करून वेगवेगळ्या दुकानांमध्ये विकायला ठेवल्या तर?हल्ली बायका नोकरी करतात त्यामुळे त्यांना वेळ नसतो निगुतीनं हे सगळं करायला.तेवढाच संसाराला हातभार!"त्यांच्या लग्नासाठी आलेले पाहुणे पांगल्यानंतर भीतभीत त्यांनी सासुबाईंना विचारलं,त्यांचा होकार मिळवून पदर खोचून कामाला लागल्या,देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून झाल्यावर धाकट्या दिराला त्यांनी वाढलं.त्याच्या तोंडून प्रशंसेचे उद्गार ऐकून सासूबाईपण तोंडाला पदर लावून हसू लागल्या."तो वाखणतोय म्हणजे नक्कीच चांगल्या झाल्या असतील!एरवी प्रत्येक गोष्टीला त्यानं नावं ठेवलीच म्हणून समजा!"त्या म्हणाल्या होत्या.दिरानं पुढाकार घेऊन गिरगावातल्या दुकानांत त्यांनी केलेल्या पुरणपोळ्या पोहोचवल्या आणि त्यांच्या आयुष्यात त्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.त्यांच्या धडपडीचं कौतुक करत सासूबाईंनी त्यांना, त्यांना त्यांच्या सासूबाईंनी घातलेली पाणीदार मोत्यांची नथ स्वहस्ते घातली होती. परिस्थितीपायी दोघींच्याही गळ्यात मंगळसूत्राचा मणी तेवढा होता;पण ती नथ पिढीजात ठेवा म्हणून प्राणपणानं सांभाळली जाणार होती..
त्या दीड खणी घरात पुढची पिढी दुडूदुडू धावू लागली,लहानाची मोठी झाली.मीनावहिनींच्या मुलांनी शिक्षणाबरोबर व्यवसाय सुरू केला.बघताबघता त्यांनी केटरिंगच्या व्यवसायात शिरकाव केला,धडाडीनं त्यात स्थैर्य मिळवलं आणि लवकरच मोठं नाव कमावून आपल्या व्यवसायाचा विस्तार आरंभला . दादर मध्ये लग्नसमारंभासाठी मोठा प्रशस्त हॉल आणि जोडीला विवाहसमारंभाचं केटरिंग!शिवाय बाजूलाच एक प्रशस्त तीन बेडरूमचा फ्लॅट! मीनावहिनींच्या मुलांनी त्यांच्या कष्टांचं चीज केलं !वास्तुशांत करून त्यांच्या मुलांनी मोठ्या सन्मानानं आपल्या आईवडिलांना,आता उतारवयात आलेल्या आजी-आजोबांना दादरच्या प्रशस्त घरात आणलं .
त्या रात्री मीनावहिनींच्या डोळ्याला डोळा लागला नाही.मुलांच्या कर्तृत्वानं अत्यानंदाने त्यांना झोप आली नाही,मात्र त्या एवढ्या विस्तीर्ण जागेत त्यांचा जीव गुदमरू लागला.समुद्राची गाज ऐकू येत होती.पण त्यांच्यासाठी जणू दादरचा समुद्र आणि गिरगावचा समुद्र वेगवेगळे होते.आपलं जग हे नव्हे!त्या दीड खणी जागेतच आपलं विश्व आहे,हे त्यांना उमगलं!
"इतरांचे लग्नसमारंभ थाटामाटात साजरे कसे होतील; यासाठी मेहनत घेताय;जरा स्वत:च्या लग्नाचं बघा रे!तिशी उलटून गेलीये दोघांची!"त्यांनी धोशा लावला.काही दिवसांतच स्वत:च्या मालकीच्या मॅरेज हॉल मध्ये धूमधडाक्यात लग्न संपन्न होऊन श्रीमंत घरांतल्या त्यांच्या सुनांनी त्या विस्तीर्ण घरात मापं ओलांडून प्रवेश केले.
"ह्या घरात सुना रहातील,मी आणि बाबा,आजी आजोबा गिरगावातच बरे!आमची आयुष्य तिथे सरली!"सत्यनारायण होऊन पाहुण्यांची पांगापांग होताच त्यांनी मुलांना सांगितलं आणि ओढीनं पुन्हा गिरगाव गाठलं
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------
"आई ,बाजूचाच एक फ्लॅट शेजाऱ्याने विकायला काढलाय !तो आपण विकत घेतला,तर घर छान मोठ्ठ होईल," सुनांनी एके दिवशी मीनावहिनींना फोन लावला.त्यांच्या मते दादरचं ते घर मोठं असलं तरी आणखी थोडी जागा मिळाली तर हवीच होती.म्हणजे मग सगळे एकत्र राहू शकले असते. त्यासाठी कर्ज उपलब्ध होतं.केवळ ते फेडायला दुप्पट परिश्रम करावे लागणार होते!त्या महानगरानं परिश्रम करणाऱ्यांना भरभरून दिलं होतं आणि देत राहणार होतं .
"ठीक आहे ,घ्या!"मीनावहिनींनी म्हटलं."हे विश्वचि माझे घर"असं लोक म्हणत असतील!म्हणोत!हे घरचि माझे विश्व!आयुष्य इथेच चांगलंय !"
दूरवर मंद्र सप्तकातली समुद्राची गाज ऐकू येत होती. त्या दीड खणी घरात वाऱ्याच्या झुळकीनं त्यांचं मन प्रफुल्लित केलं.मीनावहिनींनी श्वासात गिरगाव खोलवर भरून घेतलं आणि त्या पुरणाची डाळ शिजवण्यासाठी उठल्या.
_________________________________________________________________
Comments
Post a Comment