मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:१९:दृष्टीकोन
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:१९:दृष्टीकोन
दृष्टीकोन
-रश्मी घटवाई
अखिल भारतीय स्तरावर महाप्रचंड काम करणाऱ्या त्या महाबलाढ्य कॉर्पोरेट ऑफिसच्या शिरस्त्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या बढती आणि बदलीची दर वर्षी सगळ्यांनाच उत्सुकता असायची.कोण कुठे जाणार,कुणाला कुठला पदभार मिळणार,कुणाची कार्यपद्धती कशी,कोण खरोखरी कामं करणारा ,कोण नुसत्या पाट्या टाकणारा यावरच्या खमंग चर्चेला ऑफिसमध्ये ऊत आलेला असायचा.उच्चपदस्थानं आपलं मूळ राज्य सोडून अन्य राज्यात आपल्या कामाची चुणूक दाखवावी,हा त्या कॉर्पोरेटचा नियम असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आणि कॉर्पोरेटच्या हाऊसिंग कॉलनीत विविध भाषिक संस्कृती नांदत होती. त्यानिमित्तानं साजऱ्या होणाऱ्या विविध प्रांतीय सणांमुळे आणि कार्यक्रमांमुळे साहजिकच सर्व संस्कृतींचा मिलाफ तिथे घडत होता.यावर्षीची यादी काही क्षणांतच कॉर्पोरेटच्या वेबसाईटवर झळकली आणि पुन्हा लोकांचे मोबाईल वाजू लागले, "मिस्टर रामेश्वरम् फ्रॉम चेन्नई , मिस्टर मुखर्जी फ्रॉम कोलकाता
अॅ
ण्ड मिस्टर पांडे फ्रॉम मुंबई आर गोइंग टू दिल्ली ऑन द मोस्ट कोविटेड पोस्ट्स्. " दिल्लीतल्या प्रतिष्ठित उच्चपदांवर बढती मिळाल्याबद्दल सहकाऱ्यांचे त्या अधिकाऱ्यांना अभिनंदनपर फोन येऊ लागले.त्या त्या शहरातल्या हाऊसिंग कॉलनीत राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांवर मित्रपरिवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.ठरलेल्या नियमानुसार विवक्षित कालावधीत ते उच्चंपदस्थ अधिकारी दिल्लीतल्या त्यांच्या हाऊसिंग कॉलनीतल्या अजस्त्र बंगल्यांमध्ये कुटुंबियांसह आणि सामानासह स्थिरावले.
****************************** ******
"आय डोण्ट नो व्हाट आय्याम गोइंग टू डू हिअर !मला काही उत्तर भारत आवडला नाही. "जानकी रामेश्वरम् स्वत:शीच पुटपुटल्या.त्यांचं अवघं आयुष्य चेन्नईत गेलं होतं.सगळे नातेवाईक त्याच शहरात असल्यामुळे चेन्नईच्या परिघातच त्या आतापावेतो वावरल्या होत्या. त्यांच्या नजरेला भरजरी कांजीवरम साडया नेसलेल्या,तेल लावलेल्या लांब केसांमध्ये गजरे माळलेल्या स्त्रिया ,पांढरा शर्ट आणि वेष्टी म्हणजे लुंगीसारखे घातलेले धोतर घातलेले पुरुष आणि सुसंस्कृत घरांतल्या पावाडाई-सट्टई म्हणजे परकर-पोलके घातलेल्या लहान मुली आणि दावनी म्हणजे हाफ साडी घातलेल्या त्यापेक्षा मोठ्या मुली बघायची सवय असल्यानं त्यांना दिल्लीतल्या सर्व वयोगटातल्या सलवार कुर्ता किंवा जीन्स -टीशर्ट घातलेल्या स्त्रिया आणि मुली दिसू लागल्या,तेव्हा त्या अंमळ कंटाळल्याच!कॉलनीच्या बाहेर फेरफटका मारायला जरी बाहेर पडलं ,तरी पंजाबी खाद्यसंस्कृती त्यांच्या अंगावर चालून येऊ लागली. सामिष पदार्थांच्या वासानं तर त्यांना श्वास घेणं कठीण होऊ लागलं.कानावर शब्द पडायचे,तेही हिंदी!अगदीच परके!आपण डोळे असून दृष्टीहीन,कान असून श्रवणहीन आणि तोंड असून वाचाविहीन आहोत ,असं त्यांना वाटू लागलं .
"आता तीन वर्षं इथे काढायची आहेत ,तीन वर्षांनी मी सेवानिवृत्त होईन,तेव्हा कुठे चेन्नईला परत जाऊ !"श्रीयुत रामेश्वरम् पत्नीला म्हणाले.
"तोवर मी काय करू इथे?मुलंही भारताबाहेर,त्यांच्याशी आठवड्यातून एक-दोनदा,त्यांच्या सोयीनं फोनवर बोलणं होतं .नातेवाईकांशी तरी किती गप्पा मारणार रोज?"
"काहीतरी विरंगुळा शोध.मी रोज उशिरापर्यंत ऑफिसच्या कामात बिझी असतो,आम्हाला रविवारी,सुट्टीच्या दिवशीही सुट्टी नसतेच;ऑफिसचं काम असेल, त्यामुळे तुला मी कितपत वेळ देऊ शकीन,मला माहीत नाही.बरं बाहेर फिरायला गेलो,तरी तुला इथलं वातावरण अजिबात आवडत नाही म्हणतेस!" मोबाईलवर ऑफिसची मेल वाचतावाचता ,नजर सुद्धा नं उचलता श्रीयुत रामेश्वरम् पत्नी ला म्हणाले,तशा जानकी रामेश्वरम् कष्टी झाल्या.
"सगळ्या तामिळनाडूभर आता पोंगलची धामधूम सुरु असेल.आज भोगी.उद्या पोंगल!आणि इथे आपणच दोघे कसा काय साजरा करणार सण ?" आणखी कष्टी होऊन त्यांनी विचारलं.
"अगं इथे काही आम्हाला पोंगलची सुटी नाहीये. उलट मला आज आणि उद्या सकाळी खूप महत्वाच्या मीटिंग्ज आहेत आणि दोन्ही दिवशी बाहेरच्या ऑफिशियलस् बरोबर डिनर पार्टीजना जायचंय.तीच मेल वाचतोय मी ! तू एकटी कर ना जे करून खायचंय ते!निघालं पाहिजे मला!"श्रीयुत रामेश्वरम् पत्नीला म्हणाले , तेव्हा ठेवणीतून काढलेली रेशमी वेष्टी त्यांनी पुन्हा आत ठेवून दिली आणि वार्डरोबमधून हँगरवरून सूट काढून पतीच्या हाती दिला .
"ठीक आहे. मी पण तयार होते. तुमचा ड्रायव्हर तुम्हाला रोज ऑफिसमध्ये सोडेल ,तेव्हा रोज जवळच्या एखाद्या मंदिरात मलापण सोडायची व्यवस्था करून द्या. जमलं तर माझी परत यायची पण व्यवस्था करून द्या,म्हणजे मला भाषेचा प्रश्न येणार नाही. मी हिंदी बोलायला जाईन आणि काही भलतंच बोलले तर माझी फजिती होईल .दिल्लीत रामकृष्णपुरम् मध्ये खास दाक्षिणात्य लोकांसाठीचं मलाय मंदिर खूप प्रसिद्ध आहे,असं माझी वहिनी सांगत होती. तिथेच मी रोज जात जाईन.आता तर पोंगलच्या निमित्तानं तिथे पुष्कळ तामिळभाषिक लोकही भेटतील!"जानकी रामेश्वरम् नवऱ्याला म्हणाल्या. त्यांनी एक भरजरी कांजीवरम साडी कपाटातून काढली आणि आरशात बघत त्यांनी आपल्या प्रतिबिंबाला म्हटलं,"हॅपी पोंगल टू यू ,जानकी रामेश्वरम् !"
****************************** **
"ओ माँ !भयंकर ठंडा !"जानेवारीच्या थंडीत कुडकुडत दुर्गा मुखर्जी हीटरच्या पुढयात बसल्या,तरी त्यांची हुडहुडी काही कमी होईना. कोलकात्याहून इथे दिल्लीत बढती आणि बदली होऊन मिस्टर मुखर्जी भले आले होते,तरी त्याचा आनंद त्यांच्या पत्नीलाच अधिक झाला होता. दुर्गा मुखर्जीच्या आयुष्यातला हा पहिलाच कडक हिवाळा होता."कोलकात्यात कुठली आलीये थंडी?यंदा आता दिल्लीतला हिवाळा अनुभवायला या!"त्यांनी आपल्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं होतं.आयुष्यात प्रथमच दिल्लीत त्यांना राहायला मिळालं होतं,त्यामुळे आजूबाजूचा उत्तर भारत किती बघू आणि किती नको,असं त्यांना झालं होतं.
"बहिणीची मुलं सहकुटुंब यायचं ठरवताहेत इथे.शनिवारी-रविवारी आग्रा-मथुरा -वृंदावन बघायला जाऊया म्हणत होती.आज रात्री कॉलनीत लोहडी साजरी होणारे ,म्हणजे बोनफायर हो!ह्या पंजाबी सणाचं केवढं महत्व आहे इथे.म्हणून मी त्यांना म्हटलं आजच या,तर संध्याकाळच्या फ्लाईटनं ते सगळे येणारेत.तुम्ही याल नं आमच्याबरोबर ताजमहाल पाहायला?"मोबाइलवरचा मेसेज वाचत दुर्गा मुखर्जींनी नवऱ्याला विचारलं.बाजूच्या गल्लीत काही लहान मुलं लोहडीचं लोकगीत गात होती.
"सुंदर मुंदरीये हो,
तेरा कौन विचारा हो
दुल्ला भट्टीवाला हो...,"
"उद्या?आज आणि उद्या तर आमची ऑफिसची अत्यंत महत्वाची मीटिंग आहे.हा बघ मेसेज.तूच त्यांना घेऊन जा."चहाचा दुसरा कप तोंडाला लावत मिस्टर मुखर्जी बायकोला म्हणाले,"आणि हो,दोन्ही दिवस बाहेरच्या ऑफिशियलस् बरोबर डिनर पार्टी आहे,त्यामुळे पाहुण्यांबरोबर डिनरला मी नसेन."
"ठीक आहे. त्यांच्याचबरोबर मी पण दिल्ली पुन्हा एकदा बघून घेईन.तुम्हाला कुठे आहे आवड आणि सवड कुतुब मिनार किंवा लालकिल्ला बघायची?दोन वर्षांनी रिटायर व्हाल तुम्ही,आपण परत आपल्या कोलकात्यात जाऊ;तरी तुम्ही हे सगळं बघितलेलं नसेल !"फणकाऱ्यानं त्या नवऱ्याला म्हणाल्या .
"कॉलेज मध्ये असतांना बघितलं होतं ते सगळं.पुन्हा-पुन्हा बघण्यासारखं त्यात आहेच काय?बरं ,नाश्त्यात काय करणार आहेस?थंडीत भूक लागते खूप !"
"राधाबल्लभी !हा दुसरा चहा करतानाच मैदा भिजवून ठेवला नी चणा डाळ गरम पाण्यात भिजत घातली. म्हणून तर हुडहुडी भरलीये मला!आणि हो , पाहुण्यांना दिल्ली हाट दाखवायला घेऊन जाईन ,तेव्हा मला पण भरपूर खरेदी करायचीये.तुम्हाला ना ,कसला उत्साहच नाही. मला द्या आता जरा सढळ हस्ते पैसे ! तिथे खूप छान-छान वस्तू मिळतात असं ऐकलंय नुसतं ."दुर्गा मुखर्जींनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली.
"तुला ना,चटक लागलीये नातेवाईकांना दिल्लीदर्शनासाठी बोलावण्याची,त्यांच्यासह भटकंतीची आणि खरेदीची!"नवऱ्यानं केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी नाईलाजानं हीटर बंद केला आणि त्या दाल पुरी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात वळल्या.
***************************** **
"यंदाची संक्रांत दिल्लीत साजरी होईल,असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ,पण प्रत्यक्षात उतरलंय,"रंजना पांडे फोनवर बहिणीला सांगू लागल्या ."पंचाईत अशी,की हळदीकुंकू करावं ,तर आजूबाजूला कुणी मराठी नाहीत ,एकदोघी मराठी बायकांशी झालीये ओळख ,पण त्या लांब राहतात. म्हणून शेजारच्याच चार-पाच अमराठी बायकांना बोलावून घेईन म्हणते हळदीकुंकवाला.त्यानिमित्त ओळख तरी होईल .माझाही वेळ मजेत जाईल. नाहीतरी दिल्लीत पोस्टिंग झाल्यापासून तुझे जीजाजी खूपच व्यस्त झालेत. सुट्टी वगैरे कागदोपत्री असते केवळ."त्या सांगू लागल्या .नवऱ्याच्या ऑफिसच्या आताच्या कामाचं स्वरूप अधिक जबाबदारीचं आहे,त्यानं त्याकडे लक्ष द्यावं,म्हणून त्यांनी घरच्या,बाजारहाटाच्या,वस्तू खरे दीच्या जबाबदारीतून पूर्ण मुक्त केलं होतं.आलागेला , पै-पाहुणा यांची जबाबदारी त्यांनीच स्वतःकडे घेतली होती.त्याहीपेक्षा कुठल्या तरी सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी धडपड आरंभली होती. जवळच्याच एका गरीब वस्तीतल्या शाळेत पूर्णवेळ शिकवण्यासाठी स्वतःच त्यांच्याशी संपर्क साधला होता.त्या कामात त्यांना लोकाश्रय हवा होता. "रंजना ,तुझं खरं म्हणजे कौतुक करायला हवं..मूलबाळ नाही,म्हणून रडत नं बसता ,नवरा ऑफिसच्या कामात,म्हणून वेळ खायला धावतो वगैरे कुरकुर नं करता,काहीतरी सकारात्मक करायचा प्रयत्न करते आहेस!त्या शहराचा चेहरामोहरा वेगळा,ह्या शहराचा वेगळा,संस्कृती वेगळी,तरीही तिथे सामावून जाण्याचा मार्ग शोधते आहेस,"बहिणीनं फोनवरच त्यांना शाबासकी दिली,"तुझ्या संक्रांतीच्या सेलिब्रेशन मध्ये त्या गरीब मुलांनाही समाविष्ट कर. "
"तेच ठरवलंय ,तिळगुळाच्या वड्या आत्ताच केल्यात त्यासाठी.यांची ऑफिसची मीटिंग आहे आज आणि उद्या आणि दोन्ही दिवस डिनरला नाहीयेत ते , म्हणून तर त्या वेळेचा सदुपयोग करायचं ठरवलंय.आज शाळेत शेकोटी पेटवणार आणि लोहडी साजरी करणार आणि उद्या संक्रांतीचा सण साजरा करणार." त्यांच्या आवाजात उत्साह संचारला."पेला अर्धा रिता नसतोच गं कधी,अर्धा भरलेलाच असतो,आपण तो पूर्ण भरावा म्हणून धडपड करायची!आपला दृष्टिकोन बदलला की अर्धा रिता पेला अर्धा भरलेला दिसू लागतो."त्या म्हणाल्या .
**********************
रात्र झाल्यावर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आणि लोहडी साजरी होऊ लागली.शेकोटीच्या साक्षीनं नवविवाहितांचा गिद्धा आणि भांगडा रंगू लागला, कुठे नवजात शिशुच्या नावानं पॉपकॉर्न,मूंगफल्ली आणि मिठाई वाटली जाऊ लागली. महानगरानं थंडीची पांघरलेली झूल उतरवली आणि शेकोटीच्या उबेत खणखणीत हाळी दिली-सुंदर मुंदरीये हो...!
Comments
Post a Comment