मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख २:सण
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख २:सण
-रश्मी घटवाई
"सणावाराचं महत्व या पिढीला केव्हा कळणार कोण जाणे!"काळजीच्या सुरात स्वत:शी पुटपुटत देवबाईंनी रांगोळीचे ठिपके काढायला सुरुवात केली.ही कासवाच्या पाठीची नऊ ते एक ठिपक्यांची रांगोळी त्यांची अगदी आवडती होती.त्यातला थ्री-डी इफेक्ट त्यांच्यातल्या रसिक कलाकाराला प्रत्येक वेळी खिळवून ठेवत असे.मुळात दिल्लीसारख्या महानगरात रांगोळी हा प्रकारच लोकांना नवीन होता.दिल्लीत रांगोळी सुद्धा मिळत नसे.त्या महाराष्ट्रात गेल्या की स्वत:साठी आवर्जून रांगोळी विकत घेऊन येत.एक काळ असा होता;की दिल्लीत ओला नारळ मिळत नसे!दिल्लीकर मराठी लोकांना पूजेसाठी म्हणून आठवणीनं महाराष्ट्रातून नारळ विकत घेऊन ठेवावे लागायचे!
त्या विज्ञानाच्या शिक्षिका होत्या.कालच त्यांच्या शाळेत "इम्पाँर्टन्स आँफ फेस्टिवल्स इन इंडिया", "भारत में त्यौहारों का महत्व" या विषयावर नववी -दहावीच्या विद्या्र्थ्यांसाठी वक्त्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या,त्या स्पर्धेच्या परीक्षिका होत्या.बहुतेक विद्या्र्थ्यांनी आंतरजालावरून माहिती घेऊन घोकंपट्टी करून जशीच्या तशी सादर केलेली जाणवत होती.काहींनी विषयाचा विपर्यास करून "इम्पाँर्टन्ट फेस्टिवल्स आँफ इंडिया" अशी भारतात साजरया् होणारया् प्रमुख सणांची जंत्रीच प्रस्तुत केली होती. सणाच्या मूळ संकल्पनेऐवजी तो सण साजरा करण्याच्या पद्धतीला,बाह्यरूपालाच ही पिढी सण मानते आहे,हे क्षणोक्षणी जाणवत होतं॰ह्या पिढीला सण कसे साजरे केले जातात, हे सांगण्याची आणि सोदाहरण दाखवून देण्याची जबाबदारी सर्वस्वी मुलांच्या आईवड़िलांची,घरातल्या वडीलधारयांची आहे;पण कुठेतरी ते कमी पडताहेत,हे त्यांना स्वच्छ दिसत होतं॰दिवाळी म्हणजे केवळ फटाके,नवे कपडे,मिठाया,महागड्या गिफ्ट्स यांची खरेदी असा त्या सगळ्या मुलांचा समज झालेला दिसत होता.दिल्लीसारख्या महानगरातला एकूणच वैचारिक उथळपणा जाणवून त्यांचा जीव कासावीस होऊ लागला होता॰
महाराष्ट्रातल्या एका लहान शहरातून त्या अजस्त्र महानगरात देवबाई पंचवीस वर्षांपूर्वी लग्न होऊन आल्या होत्या॰या महानगराच्या चालीरीती वेगळयाच होत्या॰तिथे मूठभर मराठी भाषिक होते;पण तेही विखुरलेले!देवबाईंनीच पुढाकार घेऊन चार-दोन मराठी कुटुंबांना एकत्र आणून गणेशोत्सव साजरा करायला,स्वत:च्या मुलांसकट त्या मराठी कुटुंबांतल्या लहान मुलांनासुद्धा किमान गणपतीची आरती आणि रामरक्षा यावी म्हणून संस्कारवर्ग चालवायला सुरुवात केली होती॰मात्र पंचाईत अशी होती,की या हिंदीभाषिक महानगरात कुठल्याच मराठी सणाच्या वेळी;फार काय,गणेशचतुर्थीचीही कुणालाच सुट्टी नसायची!इतकंच काय,ऐन गणेशोत्सवात इथे मुलांच्या परीक्षा सुरू असल्यानं मुलं नी त्यांचे पालक कालांतरानं येईनासे झाले होते आणि मग गणेशोत्सवाची जबाबदारी जणू काही त्यांची एकटीची होऊन बसली होती॰तरीही नं कुरकुरता नेटानं त्या इतकी वर्षं आपली आणि मुलांची शाळा,नवरयाचं ऑफिस असं सर्व सांभाळून ती जबाबदारी पार पाडत होत्या॰मुलं आता मोठी झाली होती॰मोठा मुलगा इंजीनियर होऊन दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला नोकरीसाठी गेला होता॰ धाकटी मुलगीही पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन नुकतीच नोकरीला लागलेली होती॰
”आता पुढच्या वर्षी दोघांचीही लग्न उरकून,शाळेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन या व्यापांत मन अधिक गुंतवू,“देवबाईंनी विचार केला॰रांगोळी काढ़ता काढ़ता त्यांनी लेकीला हाक मारली॰अनायसे रविवारची सुट्टी होती,तेव्हा लेकीला हाताशी घेऊन,कुळाचार नसला तरी घरातल्या घरात पूजा करू, नैवेद्यासाठी पदार्थ करायला शिकवू,असा त्यांनी विचार केला होता॰इतकी वर्ष घरात नुसतं अभ्यासाचं वातावरण होतं,हे सर्व शिकवू म्हटलं, तरी लेकीला शिकायला वेळच नव्हता॰मुलगी उद्या सासरी गेली की लोक म्हणतील;आईनं काहीच शिकवलं नाही,अशी देवबाईंना काळजी वाटू लागली.दोष त्यांचा नव्हता,आणि लेकीचाही नव्हता!"ह्या महानगरात गळेकापू स्पर्धा आहे!अभ्यासाच्या स्पर्धेत मुलांचं बालपण सरतं.नोकरीच्या स्पर्धेत धावायला त्यांना सक्षम करायच्या नादात त्यांच्यावर धड संस्कारही होत नाहीत!वर्तमान पिढ़ीकडून भूत आणि भविष्य अशा दोन्हींची अपेक्षा केली जाते,त्यामुळे संभ्रमात पडलेली पिढी आणखी वेगळं काय करणार!"त्यांच्या मनात विचार आला.
“आई ,झोपू दे नं गं थोडावेळ!काल किती दमून आले होते मी,झोपायला उशीर नव्हता झाला का मला?”झोपेतच राधा,त्यांची लेक कुरकुरली आणि तोंडावर पांघरूण ओढून,कूस बदलून पुन्हा झोपी गेली॰काळजी,नाराजी,सात्विक संताप सगळ मनातल्या मनात ठेवीत रांगोळी संपवून देवबाई दुसरया कामाला लागल्या...खरं म्हणजे कुणी त्यांच्यावर सक्ती केली नव्हती,की सगळे सणवार साग्रसंगीत साजरे व्हायलाच हवेत,म्हणून!पण सणावाराचे लहानपणातले संस्कार त्यांच्यात रुजलेले होते,ते काही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हते.आपल्या परंपरा टिकवून ठेवण्यासाठी ऊर फुटेस्तोवर त्या धावणार होत्या॰..
राधा घाईघाईनं ऑफिससाठी तयार झाली.आज ऑफिसमध्ये लंचनंतर दांडिया साजरा होणार होता.खरं म्हणजे दिल्लीसारख्या ठिकाणी नवरात्र धूमधडाक्यात साजरं केलं जातं,पण त्यात ग्लॅमर नसतं,म्हणून मग ऑफिसमधल्या सगळ्या तरुणाईनं दांडिया साजरा करायचा ठरवलं,त्यानुसार रंगीबेरंगी,भरजरी, पारंपारिक वेश भूषा करून सगळ्या जणी आल्या होत्या!सिनेमातल्या गाण्यांच्या ठेक्यावर मनसोक्त नाचून झालं!ऑफिसची वेळ संपल्यावर दमलेल्या तरुणाईनं मग श्रमपरिहारार्थ फेसाळलेल्या ग्लासेसचा आधार घेतला.धुरांची वलयं उमटू लागली. नाईलाजानं राधाही त्यात सामील झाली.ह्या उच्चभ्रू समाजात त्या हाय सोसायटीतले तरुणाईच्या विश्वातले सणाचे सेलिब्रेशन सुरु असतांना तिला मागे राहून चालणार नव्हतं!अन्यथा तिच्या वैचारिक मागासलेपणाची चर्चा ऑफिसमध्ये आठवडाभर चालली असती आणि कदाचित तिला महत्वाचं कामसुद्धा मिळालं नसतं!
“ही अँजेलिना!तू तिला अंजली किंवा लीना म्हणू शकतेस!अमेरिकेहून आलीय! ऑफिसमधल्या माझ्या मैत्रिणीच्या भावाची ती मैत्रीण आहे!तिला कसलंसं कल्चरल रिसर्च करायचंय म्हणून ती इथे आलीय बघ तर खरं !"राधा ऐन दिवाळीच्या दिवसांत एका अमेरिकन तरुणीला घरी घेऊन आली. ”नमस्ते!” अमेरिकन उच्चारात अँजेलिनानं त्यांना हात जोडून नमस्कार केला,तेव्हा देवबाई भानावर आल्या॰” छान रंगोली!” अमेरिकन उच्चारात अँजेलिना म्हणाली,“मला पण शिकवाल का?मला भारतीय सण खूप आवडतात,तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे॰’भारत में त्यौहारों का महत्व’ यह मेरे रिसर्च का विषय है।”ती अस्खलित हिंदीत म्हणाली॰तिला भारतीय सण पारंपरिक रीतीनं कसे साजरे केले जातात,हे दाखवायला राधाच्या मैत्रिणीनं अख्खी दिल्ली पालथी घातली होती,तरी अँजेलिनाच्या संकल्पनेतल्याप्रमाणे तो सण साजरा होताना दिसत नव्हता.अखेर राधानंच आपल्या आईची भेट घेण्याचं तिला सुचवलं आणि तिला जणु भांडार गवसलं ...
रांगोळीचे रंग आता अधिक सुंदर दिसत होते आणि घरादारावर सणाच्या मंगल वातावरणाचा प्रसन्न शिडकावा झाला होता॰
________________________________________________________________
Comments
Post a Comment