मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ८:हॅपी दिवाली

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ८:हॅपी दिवाली
हॅपी दिवाली 
-
​रश्मी घटवाई ​
"ओ वाव !हाऊ 
​ब्युटीफुल 
अ‍ॅ
ण्ड
 ​
वायब्रण्ट!
यू पीपल आर ऑलवेज ड्रेसड् अप इन फ़ेस्टीव्ह क्लोदस्"  मेधा आणि पद्मजा घाईघाईनं सात बेचाळीसच्या बोरिवली -चर्चगेट लेडीज स्पेशल स्लो लोकल ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये शिरल्या,तेव्हा नं रहावून आत बसलेल्या दोघी विदेशी तरुणी उद्गारल्या. गेला महिनाभर नियमितपणे त्या चौघी त्या डब्यात असायच्या,
​​
त्यामुळे चेहरे परिचयाचे झाले होते.क्वचित स्मितहास्याची देवाण-घेवाणही व्हायची;पण कुणाशी संवाद घडला नव्हता.किंबहुना मोकळेपणी कुणी कुणाशी बोलतंय असं मुंबईसारख्या महानगरांमध्ये अभावानंच घडत होतं .
दोघींनी त्यांच्या कॉम्प्लिमेंट्सना प्रत्युत्तर म्हणून स्मितहास्य केलं."एनिथिंग स्पेशल?"त्यांनी विचारलं .आचारविचारांच्या कप्प्याकप्प्यांमध्ये बंदिस्त असलेल्या मुंबापुरीत एरवी हा आगाऊपणा मानला गेला असता."त्याचं काय आहे,वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आमच्या देशात कुठला तरी सण, कुठला तरी उत्सव असतोच .आम्ही भारतीय तसे उत्सवप्रियच आहोत!सणवार असला की रंगीबेरंगी,पारंपरिक भरजरी कपडे,आभूषणं वगैरे परिधान करायला आम्हाला आवडतं." मेधा आणि पद्मजानं जरा मोकळीक घेत संवाद वाढवला." तरीच!आत्ता काही दिवसांपूर्वी ह्या ट्रेनमधल्या सगळ्या स्त्रिया प्रत्येक दिवशी एका ठराविक रंगाचे कपडे परिधान करून यायच्या,ते आम्हाला खूप आवडलं."त्या विदेशी तरुणी म्हणाल्या."ओह!तुम्ही नवरात्राबद्दल बोलताय!नवरात्राचे नऊ दिवस संबंध देशात खूप उत्सवाचं वातावरण असतं आमच्याकडे!देवीची पूजा होते,तशीच दांडियाच्या ठेक्यावर अवघी मुंबई थिरकते.ही ट्रेन म्हणजे आमचं सेकंड होमच आहे, त्यामुळे आम्ही सगळे सण उत्सव इथे या ट्रेनमध्ये  साजरे करतो."मेधा आणि पद्मजा त्यांना म्हणाल्या . 
"मग आता काय आहे?आम्हाला खूप उत्सुकता आहे हे सगळं जाणून घेण्याची!"त्या विदेशी तरुणी म्हणाल्या.  
"आता दिवाळी आहे!आम्ही हा सण पाच दिवस साजरा करतो!आज धनतेरस !आज आम्ही धनाची पूजा करतो."
​ ​
मेधा आणि पद्मजा विस्तृतपणे त्यांना माहिती देऊ लागल्या."नाहीतरी आता थोड्यावेळाने टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीवर दोघींनाही विशेष कार्यक्रम प्रस्तुत करायचा होता,त्यात दिवाळीचं धार्मिक,सामाजिक महत्व वगैरेंबद्दल खूप विशेष माहिती द्यायची होती पण त्यासाठी तयारी करायला मागच्यावर्षीप्रमाणे यंदाही दोघींना हवा तसा वेळ मिळाला नव्हता.या विदेशी तरुणींना माहिती देण्याच्या ओघात अनायासे त्या कार्यक्रमात काय सांगायचं याची उजळणी होणार असेल,नवीन काही सुचणार असेल तर चांगलंच होतं !शिवाय तो कार्यक्रम दिवाळीत पाचही दिवस करायचा होता.चॅनेलला ह्या कार्यक्रमाला सर्वाधिक टीआरपी मिळायला हवा होता,त्यामुळे दोघींवर प्रचंड दडपण होतं !गेले आठ दहा दिवस, तो कार्यक्रम अधिकाधिक वैभवसंपन्न  आणि डोळे दिपवून टाकणारा कसा होईल हा एकच विषय चॅनेलमधल्या प्रत्येकाच्या डोक्यात घोळत असल्यामुळे सर्वात कहर म्हणजे,दिवाळी सुरू झाली असली तरी दोघींनाही दिवाळीची तयारी करायला अथवा साधे फराळाचे जिन्नस विकत घ्यायलाही वेळ मिळाला नव्हता.

तोवर
​ 
ट्रेन ​सुरू झाली.काही क्षणात वातावरण चैतन्यमय झालं.
​"
​​
हॅपी दिवाली
" म्हणत
 खमंग चकल्या-चिवड्याची,​
 
मिठायांची, शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू झाली आणि संबंध लेडीज स्पेशल लोकल ट्रेनमध्ये जणू दिवाळी अवतरली .


"आमच्या लहानपणी आईची किती लगबग असायची!दिवाळीपूर्वीची स्वच्छता,मग फराळासाठीची पूर्वतयारी,रांगोळ्यांची खरेदी!"मेधा भूतकाळात शिरली.  "घरोघरी चकल्यांची भाजणी भाजल्याचा, लाडवांसाठी रवा-बेसन भाजल्याचा  खमंग दरवळ असायचा!गेले ते दिन गेले!"पद्मजा हळहळली. 
"चालायचंच!कालाय तस्मै नमः !आता ह्या महानगरांमध्ये इतक्या धावपळीच्या आयुष्यात हे सगळं करायला, इच्छा असली तरी आपल्या पिढीला वेळ मिळणार तरी कसा!
"ती उटणी,ऊनऊन पाण्यानं केलेलं अभ्यंगस्नान ,हौसेनी शिवलेली जरीकाठाची परकर-पोलकी... माझ्या लहानपणीची दिवाळी मला आठवते!"
"आता सगळं काही आयतं आणा आणि सण साजरा केल्याचं कृत्रिम समाधान करून घ्या!महानगरांमध्ये तरी सगळं कसं वरवरचं,सुपरफिशियल होत चाललंय,कशालाच डेप्थ नाहीये असं वाटू लागलंय मला !"
"देशाच्या विविध भागातल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या आणि  नसलेल्या घरांत बायका दिवाळी कशी साजरी करतात हेपण दाखवूया आपण दिवाळी विशेष कार्यक्रमात!"मेधा आणि पद्मजाच्या संवादाचा ओघ अभावितपणे पुन्हा त्याच विषयाकडे वळला . 

"मॅडम,दिवाळीसाठी आकर्षक पणत्या घ्या,रंगीबेरंगी रांगोळ्या घ्या,सुवासिक आयुर्वेदिक उटणे घ्या!आपला देशी माल आहे,चायनीज नाही!घ्या ना ताई!" लोकलच्या डब्यात,हातात खोक्यांची उतरंड घेऊन आर्जवानं विनवणाऱ्या विक्रेती महिलेच्या हाळीनं त्या दोघींच्या संवादात खंड पडला.रंगीबेरंगी बिंदया, क्लिपा -पिना यांच्या जोडीला दिवाळीच्या सामानाची विक्री ती करीत होती.बघता बघता तिच्याजवळचं सामान विकलं गेलं .मुंबापुरीतल्या वेळ नसलेल्या बायकांना बसल्या जागी त्या सगळ्या वस्तू मिळाल्या आणि तिला रोजगार!त्या दिवाळीत तिच्यामुळे अनेकींकडे पणत्या उजळणार होत्या आणि त्या अनेकींनी तिच्याकडून खरेदी केल्यामुळे तिच्याही घरी इवली का होईना पणती मिणमिणणार होती. एवढंच नव्हे,तर तिचं विक्रीकौशल्य आणि तिच्याकडच्या पणत्या ,रांगोळी आणि उटणे मेधा आणि पद्मजाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात समाविष्ट होणार होतं .                     

चर्चगेट आलं ,तोवर संबंध लेडीज स्पेशल लोकल ट्रेनमध्ये दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी झाली होती.  
​"
हॅपी दिवाली
"अशा शुभेच्छा देत 
त्या विदेशी तरुणी पण त्या आनंदात सहभागी झालेल्या होत्या.  ​
                                        ************************************************   
  
​" 
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
 " 
पौलोमी आणि ​पुरबीनं अतीव श्रद्धेनं  देवीचं भजन संपवलं.काली मातेच्या मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला.दोघींच्या भजनसंध्येनं कोलकात्यातल्या त्या छोटयाशा मंडपात भक्तिमय वातावरण निर्माण केलं होतं.त्या शांत सुरांनी कित्येक लोकांना तिथे येऊन,शांतचित्त होऊन भजन ऐकायला प्रवृत्त केलं होतं.
​"
बंगालमध्ये
 
दिवाळीपेक्षाही 
​​
दुर्गापूजेला अधिक महत्व 
​!
  नरकचतुर्दशीला
​​
 बंगालमध्ये कालीपूजा होते. दिवाळीपेक्षाही अधिक महत्व ह्या कालीपूजेला असतं.
ती शक्तिरूपिणी दुर्गेचंच दुष्टांचा संहार करणारं रूप.त्या कालीमातेला नमन करीत पौलोमी आणि ​पुरबीसह अवघ्या कोलकात्यानं कालीमातेसाठी दीप प्रज्वलित केले आहेत."मेधा आणि पद्मजानं आपल्या कार्यक्रमात माहिती देत त्या भजनसंध्येचं क्लिपिंग दाखवलं. 
चेन्नई मधल्या आपल्या जुन्या लहानशा घराबाहेरच्या छोटयाश्या अंगणात पार्वतीअम्मानं लगबगीनं सडा घातला,तिच्या लेकींनी- चंद्राक्का आणि लक्ष्मीनी पारंपरिक कोलम- रांगोळी काढली आणि सगळ्यांना तिळाचं तेल आणि उटण्यानं अभ्यंगस्नान घालण्यासाठी मागच्या अंगणातल्या सणसणत्या चुलाण्यावर तिनं  पाणी तापायला ठेवलं.आदल्याच दिवशी तिनं त्याला छान सारवून कुंकवाचे पाच ठिपके काढून दिवाळीसाठी सज्ज केलं  होतं.घरातल्या सगळ्यांच्या आंघोळी उरकल्यावर पार्वतीअम्मानं देवाची पूजा केली,सगळ्यांना चंदन लावून विड्याचं पान ,सुपारी ,केळं वगैरे दिलं.सगळ्यांना गुळाच्या  पाकात  सुंठ,मिरे,जिरे,धने इत्यादी जिन्नसांची पूड  घालून शिजवलेलं दिवाळीचं औषधी चाटण दिलं आणि नंतरच फटाके उडवण्याची परवानगी. वर्षातून एकदाच नवे कपडे मिळण्याची चैन परवडणाऱ्या त्या घरातल्या सगळ्यांनी  दिवाळीच्या दिवशी छान नवे कपडे परिधान केले.त्या स्निग्ध,मंगल,पवित्र वातावरणात पार्वतीअम्मानं तयार केलेले नेहेमीचे इडली आणि पणियर
म् सारखे पदार्थसुद्धा अमृततुल्य चवीचे भासू लागले. चेन्नई मध्ये मर्यादित संसाधनातपण पारंपरिक पद्धतीने 
पार्वतीअम्माकडे कशी छान दिवाळी साजरी होते,हे दिवाळी विशेष कार्यक्रमात दाखवलं गेलं .       
                                  
खूप आधीपासूनच दिल्लीला दिवाळीचे वेध लागलेले होते. मॉल्स वस्त्र-प्रावरणांनी,विविध वस्तूंनी सजले होते.मिठायांची दुकानं आकर्षक मिठायांनी सजली होती.वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया विकत आणण्यात अवघी दिल्ली गुंतून गेलेली होती.दिल्लीतली दिवाळी म्हणजे आदल्या दिवशी छोटी दिवाळी आणि दिवाळी म्हणजे बड़ी दिवाली!पाडव्याच्या दिवशीची गोवर्धन पूजा,भाऊबीज यांना आगळं महत्व होतं.दिल्लीतल्या  उच्चभ्रू  समाजातल्या किरण आणि प्रतिभा छोटी दिवाली आणि बड़ी दिवाली साजरी करण्यासाठी कितीतरी आधीपासून तयारी करण्यात गुंतल्या होत्या. वर्कफोर्सकडून-मजूर लावून त्यांना त्यांच्या अजस्त्र बंगल्यांची सफाई करवून घ्यायची होती,नव्या वस्तू,कपडे आणि दागिने यांची खरेदी करायची होती. नवऱ्याच्या कंपनीलाच काँट्रॅक्ट मिळावा म्हणून संबंधितांना देण्याच्या मिठाया आणि महागड्या भेटवस्तूंची खरेदी करायची होती. झालंच तर महागातल्या महाग  ब्यूटी पार्लर्स मध्ये अपॉईंटमेंट घेऊन ठेवायची होती. दिवाळीनिमित्त  पार्ट्या आयोजित करायच्या होत्या तसंच इतरांनी आयोजित केलेल्या  पार्ट्यांमध्ये हजेरी लावण्यासाठी वेगवेगळी वस्त्र प्रावरणे ,आभूषणे यांची खरेदी करायची होती. गेल्यावर्षी एका पार्टीत  किरणनं घातलेली वीसहजारांची साडी प्रतिभाच्या तीसहजारांच्या  डिझायनर साडीपेक्षा अधिक चांगली छाप पडून गेल्यामुळे  यंदा काहीही झालं तरी प्रतिभाला तिच्यापेक्षा वन-अप  तयार व्हायचं  होतं . दिल्लीतल्या हाय सोसायटीतली बायकांची दिवाळी साहजिकच सामान्यजनांच्या दिवाळीपेक्षा वेगळी असणार होती.  
                                         **************************************
सर्वत्र सणाचं ,उत्सवाचं ,आनंदाचं वातावरण होतं. "हॅपी दिवाली"  म्हणत लोक शुभेच्छांचा वर्षाव करीत होते. देशातली खेडेगावं ,शहरं आणि महानगरं दिव्यांनी उजळलेली होती आणि उजळलेली राहणार होती!अनेक संकटं ,विवंचना,काळज्या,आर्थिक अडचणी असल्या तरी त्या नजरेआड करून  वेगवेगळ्या आर्थिक गटातल्या स्त्रिया आपापल्या परीनं उत्तम उत्तम दिवाळी साजरी करीत होत्या! 
_________________________________________________________________

​​-रश्मी घटवाई 

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी