मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ११:उत्तर

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ११:उत्तर
उत्तर 
-रश्मी घटवाई 




पहाट झाली तशी मुंबईतल्या गणेश नगरातल्या दुसऱ्या गल्लीच्या टोकाशी असलेल्या सार्वजनिक नळावर बायकांची एकच झुंबड उडाली. हंडे,कळश्या,तपेल्या आणि मिळेल ते भांडे घेऊन त्या झोपडपट्टीतल्या आयाबाया पाणी भरायला म्हणून त्या सार्वजनिक नळावर गोळा झाल्या.दोन दिवस महानगराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे रस्ते संपूर्ण जलमय झाले होते आणि नळाला पाणी आलं नव्हतं.मात्र आज पहाटेपासून पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची घोषणा झालेली होती.सुशीलानं हातातली बादली,डोक्यावर ठेवलेला हंडा आणि काखेतली कळशी रांगेत लावली आणि हळूच अवतीभोवती नजर वळवली.पाणी भरण्याचं काम स्त्रियांचं असा अलिखित नियम असल्यामुळे तिथे स्त्रियांचं साम्राज्य होतं.झोपड्पट्टीतली  पुरुष मंडळी,घरातल्या स्त्रिया पाणी भरून झाल्यावर चहा करतील या आशेवर नुसतीच टवाळक्या करीत बसली होती.या अशा वातावरणात चवथ्या गल्लीतला सुभाष त्या सार्वजनिक नळावर आला,तेव्हाअनेक भुवया उंचावल्या."ह्याचा काही खरा नाही." "हा काही आपल्या घरच्यांना पाणी भरण्यास मदत करण्यासाठी आलेला नाही ."ह्यावर दोन्ही गल्य्यांमध्ये वास्तव्य असलेल्या बायकांचं एकमत झालं.त्यांची घारीची नजर सुभाषच्या नजरेचा वेध  घेऊ लागली . संशयाची सुई घुमून शेवटी सुशीलावर येऊन स्थिरावली.सुभाष एवढ्या दुरून तिच्याचकडे बघत होता आणि सुशीलानं तीन -चारदा त्याच्याकडे चोरटे कटाक्ष टाकले होते,हे त्यांच्या चाणाक्ष नजरांनी हेरलं होतं.पाणी भरतांना गणेश नगर झोपडपट्टीतल्या समस्त स्त्रीवर्गाला बोलायला एक जबरदस्त विषय मिळाला आणि झोपडपट्टीत थोड्याच वेळात बातमी पसरली की "सुशीला आनि सुभाषचा काहीतरी लफडा हाय!"
"सुशीला की अम्मा ,तुम्हारी लड़की का लच्छन ठीक नहीं है ,मैं पहलेच तुमको बता रही हा !जैसेच मैंने सुना ,तुमको बताया "शेजारणीनं सुशीलाच्या आईच्या कानात सांगितलं तेव्हा तिला जणू कानात तापलेलं तेल ओतल्यासारखं झालं .शेजारीण जाताच तिनं कोपऱ्यातल्या तुटक्या केरसुणीनं सुशीलाला बडवायला सुरुवात केली ."आमचं आयुक्ष  ह्या झोपडपट्टीत गेलं . हितंच जल्मलो ,हितंच मरनार ,पन आमच्याकडे कधी कोनी बोट दाखविलं नाही की ही  बाई वाईट चालीची हाये म्हनून ,अन तुझ्याबद्दल मी काय ऐकून राह्यले गं पोरी!बाईच्या जातीला आपली आब्रु सांभाळून राहायला हवी! "तिनं सुशीलाचं बाहेर पडणं बंद करून टाकलं आणि रोज पाणी भरायलापण स्वतःच जायचा निर्णय घेऊन टाकला .तिच्यापरीनं एक सुरक्षित कुंपण तिनं पोरीभोवती उभारलं आणि ती अशिक्षित स्त्री डोळ्यांत तेल घालून पोरीवर पहारा करू लागली!

                                                      ********************************************************  
पत्रकारितेच्या क्षेत्रात काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवायच्या इराद्यानं विनयानं मुंबईतल्या त्या नामांकित वृत्तपत्राच्या वृत्त संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली,तेव्हा आता आपला दिवस इतरांच्या आधी उजाडणार आणि इतरांच्या नंतर मावळणार यांची तिनं मनाशी पक्की खूणगाठ बांधली होती.नागपुरात आधीच्या वृत्तपत्रात काम करताना वार्ताहर म्हणून आणि नंतर प्रमुख वार्ताहर म्हणून तिनं आपला ठसा उमटवला होता. तिनं दिलेल्या बातम्या खऱ्या असणार,तिनं केलेला बातमीचं विश्लेषण किती अचूक असतं,विशेषतः राजकारणात काय शिजतंय याचा गंध सर्वात पहिले तिच्या नाकाला जाणवतो,असं गमतीनं म्हटलं जायला लागलं आणि पाठोपाठ तिला आणि तिच्या बातमीला सर्वच क्षेत्रात गंभीरपणे घेतलं जाऊ लागलं.दृश्य माध्यमांत ,टीव्हीवर जाण्यासाठी सर्वत्र चढाओढ असताना तिनं मात्र जाणीवपूर्वक प्रिंट मीडियममध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. "ह्या दोन शहरांत मुळात इतका फरक आहे;वार्तांकनातही तो जाणवतो,मग कार्यपद्धतीत तो जाणवतोय;यात नवल नाही!' विनयानं विचार केला ."किती मोकळेपणा आहे इथे!पुरुष सहकाऱ्यांशीही इतक्या मोकळेपणानं बोलतात आणि मुख्य म्हणजे बोलू शकतात स्त्रिया!आपलंच उदाहरण घ्या ना!इथल्याइतकं मोकळेपण नव्हतं आधीच्या ठिकाणी ! प्रमुख वार्ताहर म्हणून नाव होतं आपलं पण इतक्या मोकळेपणी आपण ना आपल्या वृत्त संपादक साहेबांशी चर्चा करू शकलो, मग थेट संपादकांशी चर्चा तर अशक्यप्रायच !इथे मात्र आपण केव्हाही थेट संपादकांशी चर्चा करू शकतो.आणि कार्यशैली सुद्धा संपूर्ण व्यावसायिक!यालाच म्हणतात प्रोफेशनॅलिझम!"तेवढ्यात दोन स्वतंत्र बीट कव्हर करणारे पत्रकार तिच्या केबिनमध्ये येऊन मनमोकळी चर्चा करायला लागले.नर्मविनोद झडले.एवढंच काय;त्यातल्या एकानं तर बोलण्याच्या ओघात त्याच्या गर्लफ्रेंडबद्दलपण विनयाला सांगून टाकलं ."आपल्याला बुवा नसतं जमलं आधीच्या ठिकाणी असं प्रांजळपणे आपल्या वरिष्ठांशी बोलायला,वैयक्तिक गोष्टी सांगायला!त्याचा बभ्राच अधिक झाला असता;मोठ्या शहरांत ,महानगरांत कोण कशाला दुसऱ्यांच्या गोष्टींत नाक खुपसणार ?"विनयानं विचार केला आणि ती तिच्याकडेआलेली बातमी बारकाईनं वाचू लागली .एका प्रथितयश बँकेच्या अधिकाऱ्यानं कुणा बाईच्या नादी लागून आणि तिला वर मोठं कर्ज देऊन मोठाच घोळ करून ठेवला होता त्यासंबंधीची ती बातमी होती... 

                                           ********************************************************
मुंबईतल्या त्या आलिशान रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपली डान्स अकॅडमी असावी ,असा विचार मनात येताच नैनानं हबी डियरला फोन लावला.तिला स्वत:ला उपजतच नृत्याचं अंग होतं आणि त्याहीपेक्षा आपण डान्स अकॅडमी काढून खोऱ्यानं पैसे कमवू शकतो,असा आत्मविश्वास होता. मात्र त्यासाठी कमर्शियल स्पेस  घ्यावी लागणार होती,ज्यासाठी दहाएक करोड रुपये खर्च आला असता.अर्थात तिच्या अरबोपती नवऱ्याच्या लेखी दहाएक करोड ही अगदीच नगण्य रक्कम होती आणि घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ती तिला सापडली असती. "नो नैना !नो डान्स स्कूल.मैं अभी बिझी हूँ .डोण्ट डिस्टर्ब् मी!"त्यानं घाईघाईनं फोन बंद केला.दुबईत पार्टनरशिपमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल उभं करण्यासाठी त्याची महत्वाची मीटिंग सुरु होती. नैनाला रडू कोसळलं."त्याला आपली कसलीच पर्वा नाहीये!ही डझन्ट केअर अबाउट मी!"तिनं आलिशान बेडवर धाडकन अंग टाकलं आणि आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली ."ठीक आहे मी बँकेतून कर्ज काढून त्याला नं सांगता डान्स अकॅडमी काढते आणि स्वत:च्या हिमतीवर चालवून दाखवते!"cनं विचार केला,मेकअप ठीकठाक करून तिनं ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली.दहा मिनिटात ती त्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या प्रथितयश बँकेच्या ब्रान्च मॅनेजरच्या प्रशस्त केबिनमध्ये बसून त्याला आपल्या डान्स अकॅडमीबद्दल भरभरून सांगत होती,त्यासाठी कर्जासाठी विचारणा करीत होती.तो एकाग्र चित्तानं तिचं बोलणं ऐकून घेत होता.तिच्या हबी डियरनं त्याच्या शतांशानं पण कधी तिचं बोलणं इतकं लक्षपूर्वक ऐकलं नव्हतं.तिला कल्पना येणार नाही एवढी वरचेवर डान्स अकॅडमीच्या संदर्भात ती त्याला भेटत होती. तिच्याही नकळत तिचं मन त्याच्यात गुंतत गेलं, आणि त्याचं तिच्यात! तिच्या डान्स अकॅडमीसाठी तिच्या आणि काही अस्तित्वात नसलेल्यापण लोकांच्या नावानं मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर झालं,त्या दिवशी तिनं सरळ आपल्या हबी डियरला सोडचिट्ठी दिली आणि ब्रान्च मॅनेजरनं आपल्या कुटुंबाला!तिच्या डान्स अकॅडमी बरोबरच तिचं नवं लिव्ह इन सुरु झालं!कुठेतरी कुणाला शंका आली आणि त्या कर्जाबद्दल ब्रान्च मॅनेजरच्यामागे चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलं आणि वृत्तपत्रांना सुगावा लागताच तेही हात धुवून त्याच्या मागे लागले.टीव्ही चॅनलवाल्यांना चघळायला आणखी एक विषय मिळाला. 
                                       *************************************** 
शाळा-कॉलेजसारख्या ठिकाणी मुलामुलींमध्ये,कामाच्या ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष यांच्यात वागण्याबोलण्यात मोकळीक असावी का,यावर टीव्हीवर पोटतिडकीनं चर्चा झडू लागली. मुंबईत तीन वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरांवर वावरणाऱ्या त्या तिघींनाही हाच प्रश्न  पडला होता,त्या तिघी आपापल्या परिघात आपापल्या पद्धतीनं जगताना आपापलं उत्तर शोधत होत्या. 

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी