मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ४:अतिथी देवो भव
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ४:अतिथी देवो भव
अतिथी देवो भव
-रश्मी घटवाई
"कबूल आहे मला की 'अतिथी देवो भव'असं भारतीय संस्कृती मानते.अतिथी म्हणजे पाहुणा,हा देवासमान मानून त्याचे आगतस्वागत करण्याची आपली परंपरा आहे.पण हे तुझे नातेवाईक इतके अवचित येताहेत की सुटीसाठी विचारसुद्धा करता येणार नाही मला.ऑफिसमध्ये महत्वाच्या मीटिंग्ज आहेत, एकदोन प्रेझेन्टेशन्स तयार करायची आहेत!लोकही असे प्लॅनिंग नं करता कसे काय कोणाकडे जायचा विचार करू शकतात?तेही मुंबई सारख्या शहरात ?लहान गावात एक वेळ असं चालून जाऊ शकतं,पण महानगरात शक्यच नाही गं !त्यांना कळव,माझ्या नवऱ्याला काही जमणार नाही सुटी घेणं!"मोबाईल वर मेसेजेस बघता बघता नाश्ता करताना संजयनं साधनाला सांगितलं .
"अरे पण जयाताई आणि तिचा मुलगा तेवढंच महत्वाचं काम आहे म्हणून येताहेत!जयाताईच्या मुलाला एमएस करण्यासाठी अमेरिकेत जायचंय म्हणून व्हिसासाठी येताहेत!काम आटपून दोन तीन दिवसांनी परतणारही आहेत.फक्त उद्याचा एक दिवस त्यांना तुझी मदत हवीय!लांबचे असले तरी नातेवाईक आहेत; मग केली मदत तर बिघडतं कुठे?"साधनानं त्याच्या प्लेटमध्ये आणखी एक गरम गरम वाफाळती इडली वाढली,पण त्याचं सगळं लक्ष व्हॉट्सअँप वरचे मेसेज वाचण्यात होतं."लहान गावातून मुंबईत पहिल्यांदाच येताहेत दोघे!त्यांना कौन्सुलेट मध्ये एकट्यानं जाण्याची,वेळेवर पोहोचू की नाही याची भीती वाटतेय.तू उद्या त्यांना तिथे घेऊन जाऊ शकलास,तर आयुष्यभर दोघे तुझे उपकार स्मरतील !"साधनानं अजीजीनं म्हटलं .
"एकीकडे तो अमेरिकेत जायला निघालाय म्हणतेस आणि दुसरीकडे त्याला साधं बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स मध्ये जायची भीती वाटते म्हणून सांगतेस!अगदीच विचित्र!तू असं कर,तूच उद्या सीएल घे,नाहीतरी तुम्हां बँकेत काम करणाऱ्यांना हल्ली कुठे पूर्वीसारखं काम असतं !टॅक्सीनं भल्या सकाळी त्यांना आणायला जा,दोघांचं निगुतीनं आदरातिथ्य कर आणि नंतर टॅक्सीनं त्यांना कौन्सुलेट मध्ये घेऊन जा आणि टॅक्सीनं परत घेऊन ये!दोन तीन दिवसांनंतर त्यांना स्टेशनवर सोडायला पण जा !मला काही उद्या सुटी घेता येणार नाही!"नाश्ता संपवून संजयनं निर्वाणीचं सांगितलं आणि ऑफिसला निघायची तयारी केली,तेव्हा उद्या आपली केवढी धांदल उडणार आहे,या कल्पनेनं साधना त्या क्षणी भांबावल,."आपण दोन तीन दिवस आणखी दोघांचा स्वयंपाक करावा लागणार म्हणून घाबरतो आहोत की काय! "
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट!पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्याचे औचित्य साधून बँकेनी आपल्या सामाजिक जबाबदारीतून केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या एका लहान गावात पर्यावरणावर प्रबोधनपर कार्यक्रम करायला म्हणून साधना बँकेतल्या स्नेह्यांबरोबर गेली होती,तेव्हा गावातल्या एका माऊलीनं,त्यांच्या शेतातली वांगी तोडून छान चुलीवरची गरमगरम भाजी-भाकरी खाऊ घातली होती.बरेच लोक होते,तरीही काही शेजारणींच्या मदतीनं त्या माऊलीनं सहज इतक्या जणांचा स्वयंपाक केला होता.
"उं sss त्यात काय विशेष!लहान गावांत पाहुणचार करणं काही अवघड नाही!"तिनं मोठ्या उत्साहानं सांगितल्यावर तिच्या नवऱ्यानं प्रतिक्रिया दिली होती, "हे प्रकार महानगरांत चालू शकत नाहीत.महानगरं घड्याळाच्या काट्यांवर धावतांत,भावनांवर नाही! मुंबईत काही वर्षांपूर्वी लग्नाच्या रिसेप्शनला केवळ आईस्क्रीम असायचं!आठव!"
गृहकर्जाचे हफ्ते आणि फ्रिज-टीव्ही-
वॉशिंग मशीन यांचे इएमआय यांतून साधनाला टॅक्सीची चैन परवडणार नव्हती ,त्यामुळे लोकल,बस,ऑटोरिक्षा यांचा आधार घेत तिनं पाहुण्यांना घरी आणलं ,ते तयार होईस्तोवर घाई घाईनं भाजी पोळी करून सगळ्यांचे खाणे उरकून त्यांना घेऊन ती कौन्सुलेट मध्ये गेली.अखेरीस काम झालं,तेव्हा सगळे प्रचंड दमले होते,सगळ्यांना भूक लागली होती,म्हणून ती जवळच्याच 'फूड जॉईन्ट 'मध्ये त्यांना घेऊन गेली. तिथे पाय ठेवायला जागा नव्हती.तिनं नाईलाजानं महागड्या रेस्तरॉंकडे मोर्चा वळवला.मुंबईत बहुतेक कधीच घरी जेवत नसावेत लोक,सगळीकडे गर्दीच दिसतेय,असं पाहुण्यांप्रमाणे तिलाही वाटू लागलं!तिथलं मेन्यूकार्ड वाचताना पाहुण्यांना जाणवू न देता स्वत:च्याही नकळत साधनानं पर्समधल्या नोटा एकदा नीट मोजून घेतल्या .
------------------------------ ------------------------------ ----
त्या रेस्तरॉंमधली किट्टी पार्टी रंगात आली होती,तंबोला सुरू होता.जवळजवळ शंभरेक श्रीमंत स्त्रिया नटून-थटून त्यात सामील झालेल्या होत्या.अद्ययावत फॅशनचे कपडे,मेकअप,महागड्या मोबाईल्सवरनं त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या श्रीमंतीचा कुणालाही अंदाज बांधता आला असता.तिथे शीतपेय,स्नॅक्स यांची रेलचेल होती,खाणं-पिणं आणि गप्पा यांना ऊत आला होता.मागवलेले खाद्यपदार्थपुढ् यात येईपर्यंत साधना किट्टी पार्टीवाल्या स्त्रियांना न्याहाळत होती!
"एक हफ्तेसे तो मैं तींनो समय बाहर हॉटलमें ही खाना खा रही हूँ !यू नो ,कुकिंग इज सो बोअरिंग !"साधनाच्या कानावर शब्द आले,तेव्हा तिला प्रचंड ठसका लागला.आपण चुकीच्या ठिकाणी पाहुण्यांना घेऊन आलो,या भावनेनं तिला अधिक ओशाळवाणं वाटू लागलं. खाणे संपवून साधना पाहुण्यांसह रेस्तरॉंबाहेर आली. "या मुंबापुरीत अतिश्रीमंत,श्रीमंत,उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, गरीब असे वेगवेगळे झोन आहेत,एका कम्युनिटीच्या हद्दीत दुसऱ्याने प्रवेशच करायला नको,आपापल्या सीमारेषा ओलांडायला नको!"ती विचार करू लागली .
------------------------------ ------------------------------ ------------
रेस्तरॉबाहेर भिकाऱ्यांची रांग होती.किट्टीपार्टीत त्या ललनांनी वाया घालवलेलं अन्न रेस्तरॉचा स्टाफ त्यांच्या पुढ्यात ठेवत होता,त्यावर त्या भुकेकंगाल गरीब स्त्रिया आपल्या मुलांसह तुटून पडत होत्या.किट्टी पार्टीतल्या स्त्रिया पार्टी संपवून आपापल्या महागड्या गाड्यांच्या दिशेनं जाऊ लागल्या."आता रात्रीच्या जेवणात कुठली भाजी करायची बरं !" विचार करीत साधनानं ऑटोरिक्षाला हात दाखवला. महानगरात निमिषार्धासाठी श्रीमंत,मध् यमवर्गीय आणि गरीबीच्या सीमारेषा आमोरासमोर आल्या आणि आपापल्या वाटेनं पुन्हा समांतर चालू लागल्या !
_________________________________________________________________
-रश्मी घटवाई
Comments
Post a Comment