मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १३:शाळा
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १३:शाळा
शाळा
-रश्मी घटवाई
"वैभव ,बेटा उठ ,अरे पहाटेचे साडेपाच वाजत आलेत!मला ठाऊक आहे तू खूप उशिरापर्यंत अभ्यास करत बसला होतास,पण आता उठलं पाहिजे ना राजा?आंघोळ करून,तयार होऊन ,नाश्ता करून शाळेची बस गाठायचीय ना?सहा वाजून दहा मिनिटांनी कॉलनीच्या गेटवर शाळेची बस येते नं बेटा आपली?मग पटकन तयार व्हायला लागेल नं ?बाबासुद्धा दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त टूरवर गेलेत,मग बस चुकवून चालणार नाही नं आपल्याला ?"वैभवच्या दाट काळ्याभोर केसांतून मायेनं हात फिरवत,तेवढ्याच मायेनं ओथंबलेल्या आवाजात हाका मारीत विभावरी आपल्या लेकाला उठवू लागली तेव्हा तिच्या मनात घालमेल चालली होती. गाढ झोपलेल्या लेकाला असं निर्दयतेनं उठवणं तिच्या जिवावर येत होतं ,पण काय करणार,आज वीकली टेस्ट होती, मागच्या आठवड्यात झालेल्या वीकली टेस्टचा पेपर मिळणार होता,तो वर्गात सोडवला जाणार होता आणि शेवट्च्या तासाला डिबेट होतं!त्यातही वैभवनं भाग घेतला होता. यातलं काहीच चुकवून चालणार नव्हतं.शिवाय आतापर्यंत शाळेला एकही दिवस दांडी मारली नसल्याचा,संपूर्ण उपस्थितीचा त्याचा रेकॉर्ड होता.वैभवनं डोळे किलकिले करीत आईकडे पाहिलं ."आई दोन मिनिटं आणखी झोपू दे ना मला !"आर्जव करीत त्यानं पांघरूण आणखी वर ओढलं. विभावरीला प्रचंड अपराधी वाटलं .
"एवढ्या कोवळ्या वयात अभ्यासाची ओझी वहातात ही मुलं!झोप सुद्धा पूर्ण होत नाही यांची. जेवणसुद्धा घाईघाईनं पोटात ढकलायचं. मैदानी खेळ खेळायला वेळ तर नाहीच नाही;पण त्यासाठी जागाही नाही आणि समवयस्क,समविचारी मित्रही नाहीत,मग खेळणार तरी कुणाशी ? अभ्यास आणि सतत अभ्यास!मुलांचं मूलपणच हिरावून घेतलंय ह्या अभ्यासाच्या ओझ्यानं आणि जीवघेण्या स्पर्धेनं.लहान वयात तर योग्य खाणं -पिणं ,पुरेशी झोप मिळायलाच हवी ,नाहीतर पुढे कसं होणार यांचं ?"घड्याळाचे काटे वैभवला अंथरुणात अधिक वेळ लोळण्याची मुभा देत नसल्यामुळे विभावरीनं नाईलाजानं त्याला अंथरुणाबाहेर ओढलं आणि बाथरूममध्ये पिटाळलं. तो बाहेर येईतोवर तिनं त्याचा भाजी-पोळीचा डबा भरून तयार ठेवला होता,छोट्या सुटीत चटकमटक खायला म्हणून दुसऱ्या छोट्या डब्यात सुकी भेळ दिली होती आणि गरमागरम वाफाळत्या उपम्याची प्लेट तयार ठेवली.
"झाले एकदाचे डेली ची तयारी करवून घ्यायचीय. नववीपासूनच त्याचा फाउंडेशन कोर्स करून घेणारेत ते क्लासवाले !बाबांसारखं त्यालाही नामांकित इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये जायचंय म्हणतो! ह्या महानगरांची एक विशेषता आहे!इथे दीवान-ए-आम मध्ये कुणालाच जायचं नसतं,प्रत्येकाला दीवान-ए -खास मध्येच जायचं असतं. मागे राहणाऱ्याला कुणी विचारत नाही इथे!जीवघेणी शर्यत आहे नुसती आणि तुमची इच्छा असो किंवा नसो,तुम्हाला पळावंच लागतं !आधी शाळेत प्रवेश घेण्यासाठी ,मग परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी,नोकरी मिळवण्यासाठी आणि पुढे नोकरीत बढत्या मिळवण्यासाठी!कधी गर्दीतून वाट काढत,कधी कुणाशी होणारी टक्कर टाळत,कधी चक्क कुणाच्या खांद्यावर पाय देऊन!"
अॅब्ल्यूशन्स !काय तुझा तो शब्द आई?हं
आन्हिकं उरकली !"वैभवनं तेवढ्यातल्या तेवढ्यात वातावरणातला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्यात शाळेच्या पहिल्या तासात होणाऱ्या आठवडी परीक्षेत आजच्या गणिताच्या पेपरमध्ये काय विचारलं जाऊ शकतं आणि त्यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे याबद्दलचे विचार घोळत होते.शाळेचा गणवेश चढवत त्यानं घाईघाईनं उपमा खाल्ला,सगळ्या सरंजामासह विभावरीनं त्याला कॉलनीच्या गेटवर उभ्या असलेल्या शाळेच्या बसमध्ये बसवलं,तेव्हा बसमधली बरीचशी मुलं अक्षरश: डुलक्या घेत होती."बिचारी ही लहान लहान मुलं !यांना तर आपल्याही आधी निघावं लागत असेल !त्यांची आणि त्यांच्या आईबाबांची किती धावपळ होत असेल,"त्यांच्याबद्दल तिच्या मनात सहानुभूती निर्माण झाली."वैभव आता आठवीत आहे.आपण केवळ ह्यावर्षी जेमतेम अभ्यास घेऊ शकू. पुढच्या वर्षी नववीचा त्याचा अभ्यास घेणं आपल्याला जमणार नाही. केवढं कठीण आहे सिलॅबस!म्हणजे वेगळी ट्युशन लावणं आलं .सकाळी सहा वाजता घर सोडून शाळेतून तो परततो तोवर चार वाजतात.त्यानंतर जेवण की पुन्हा ट्युशनसाठी पिटाळायचं. चोवीस तास अभ्यास,अभ्यास!निकोप वाढ सुद्धा होणार नाही बिचाऱ्या मुलांची. दहावी झाली की बारावी मग स्पर्धा परीक्षा !मुलांबरोबर त्यांच्या पालकांचीही पुरेपूर दमछाक होते!आपल्याच्यानं कसं झेपणार आहे कुणास ठाऊक.वैभवच्या बाबांना ऑफिसच्या कामानिमित्त खूप भटकंती करावी लागते,टूर्स वर जावं लागतं.आपल्याला साधी स्कूटीही चालवता येत नाही,मग क्लासला सोडा-आणायला वेगळी व्यवस्था करावी लागेल.तो खर्च वेगळा!"विभावरीच्या डोळ्यासमोर नवं वेळापत्रक आणि खर्चाचे नवे आकडे तरळले,तेव्हा तिचा जीव हबकला . कॉलनीच्या गेटपासून घरी जाईतो तिला चार मैत्रिणी गप्पा मारत मॉर्निंग वॉक घेतांना दिसल्या.त्यांच्याबरोबर वॉक घेण्याचा त्यांचा आग्रह मोडून ती घरात शिरली."'ह्या लोकांना बरं बाई मॉर्निंग वॉक,गप्पाटप्पा वगैरे सगळं करायला जमतं.वेळ कुठून आणतात कोण जाणे!"विभावरी मनातल्या मनात म्हणाली.घरकाम वगैरे आटपून तिला वैभवच्या परीक्षांचं वेळापत्रक बघायचं होतं,त्यानुसार त्याच्या अभ्यासाचं शेड्युल तयार करायचं होतं.तिचं त्याच्या अभ्यासाकडे काटेकोर लक्ष होतं,म्हणून तर तो अगदी पहिलीपासून आतापर्यंत प्रत्येक परीक्षेत शाळेत पहिला येत होता.दस्तुरखुद्द तिची आईही तिला गमतीनं म्हणायची, की "एवढ्या लांबच्या ,एवढ्या प्रतिष्ठित ,नावाजलेल्या शाळेत घातलंय त्याला,पण त्याच्या शिक्षकांऐवजी तूच त्याचा अभ्यास घेते आहेस,काही काम त्या शिक्षकांसाठी सुद्धा राहू दे की !किती अडकून पडशील ?स्वत:ही थोडी मोकळीक घेत जा गं !उद्या त्याच्याऐवजी तुला तो पेपर सोडवायला दिला ,तर तू सुद्धा पहिली येशील,इतका त्याच्याबरोबरीनं तू त्याचा अभ्यास करते आहेस!" विभावरी ते सगळं हसण्यावारी न्यायची."कोणे एके काळी मुंबईत लोकलच्या वेस्टर्न लाईन वर रहाणारे लोक वेस्टर्न लाईन वर रहाणारीच स्थळं शोधायचे आणि सेंट्रल लाईन वर रहाणारे लोक सेंट्रल लाईन वर राहणाऱ्यांशीच लग्न ठरवायचे!जायला यायला सोयीचं म्हणून!आम्हीही तुझ्यासाठी तेच केलं ,पण विभावरी,तू गेल्या कित्येक वर्षांत धड माहेरी म्हणून आलेली नाहीस!"आईच्या काळजीभरल्या उद्गारांवर विभावरीचं उत्तर तयार असायचं. "आई,सीबीएसईचा अभ्यासक्रम खूप असतो,वैभवच्या शाळेत खूप जास्त होमवर्क देतात ,त्याच्याकडून शाळेला खूप अपेक्षा आहेत! इंजिनीअरिंग एन्ट्रन्स एगझामिनेशन्सची तयारी करवून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसची प्रवेशपरीक्षा आत्ताच आहे,त्या
वैभव शाळेतून परत आला,तोच उड्या मारत!त्याच्या मागच्या विकली टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते,आजचा गणिताचा पेपरपण खूप छान गेला होता आणि वादविवाद स्पर्धेत शाळेतून निवड होऊन आता तो पुढच्या फेरीत पोहोचला होता.त्याच्यापुढे गरमगरम रुचकर जेवणाबरोबरच आठवडाभर कोणत्या क्रमानं कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या परीक्षा आहेत आणि त्यांचा अभ्यासक्रम काय आहे,याची पद्धतशीरपणे केलेली यादी होती.त्यानं जेवणावर आडवा हात मारला आणि पलंगावर आडवा होऊन तो बघता बघता झोपेच्या अधीन झाला.
"थोडी तूपण विश्रांती घेत जा गं दुपारची,मला ऑफिसमधून यायला उशीर होतो,तूही माझी वाट बघता-बघता दमून जातेस!मी आणि वैभव गप्पा मारतो, तेव्हा आमच्या गप्पांमध्ये सामील नसतेस तू!झोपेला आलेली असतेस!तुला पुन्हा भल्या पहाटे उठून डबे-नाश्ते वगैरे तयार करायचे असतात!केव्हाही बघा, कुठल्या ना कुठल्या कामात गढलेली असतेस.अशानं तब्येत खराब होईल हं !"वैभवचे बाबा म्हणायचे."अहो कमी का कामं असतात!वैभव आणि मी एरवी दिवसा,गप्पा मारतोच की!त्याच्याशी गप्पा मारता-मारता हसत खेळत अभ्यास घेते मी त्याचा!"ती हसून त्यांना सांगायची.
गाढ झोपलेला वैभव कमालीचा निरागस दिसत होता.त्याच्या दाट,काळ्याभोर केसांतून मायेनं हात फिरवण्याचा तिला मोह झाला ,पण त्यामुळे त्याची झोप चाळवली गेली असती.त्याला पुरेशी झोप मिळणं आवश्यक होतं.तो उठला आणि चांगलं ग्लासभर गरमगरम दूध पिऊन झालं की मग त्याची त्या इंजिनीअरिंग स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणाऱ्या कोचिंग क्लासच्या परीक्षेसाठी पूर्वतयारी करून घ्यायला सुरुवात करायची होती. कटथ्रोट कॉम्पिटिशन -गळेकापू स्पर्धा काही केवळ इंजिनीअरिंग एन्ट्रन्स एग्झामिनेशन पुरतीच नव्हती,ती तर,त्याची तयारी करवून घेणाऱ्या कोचिंग क्लास मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सुद्धा होती!महानगरांमध्ये ती तर झिरपत झिरपत अगदी बालवाड्यांत -नर्सरीमधल्या प्रवेशांपर्यंत पोहोचली होती!
वैभवनं आळस दिला आणि ताजातवाना होऊन उठला,तशी विभावरी त्याच्यासाठी दूध गरम करायला उठली.महानगरातल्या घड्याळाला तास काट्यापेक्षा मिनिट आणि सेकंड काट्याचं महत्व अधिक असतं.त्या मिनिट आणि सेकंड काट्याला धरूनविभावरीसह अवघं महानगर शर्यतीत धावण्यासाठी सज्ज झालं !
***************************** ****************************** **
"ओह माय गॉड!यू पीपल हॅव
अॅन
अॅक्सेन्ट!व्हॉट्स युअर नेम यू सेड ?"काहीशा त्रासिक आवाजात उद्धटपणे त्या शाळेच्या रिसेप्शनिस्टनं विचारलं."आय अँम शर्वरी !"मनातला राग आणिअपमान गिळून शर्वरी तिला म्हणाली.खरं म्हणजे आफ्रिकन वंशाची ती अमेरिकन तरुणी स्वत:च हेल काढून बोलत होती, पण ती शर्वरीला तिच्या उच्चारांबद्दल नावं ठेवत होती तिला शर्वरीचं नाव नीट कळलं असं वाटत नव्हतं ,ते शर्वरीला कळलं.तिनं स्पेलिंग सांगितलं."माय सन श्रेयस इज सिक.मला आत्ता त्याच्या टीचरचा फोन आला.त्याला त्याच्या वर्गमित्रानं... कुठली बरं ...हं सियाबट्टा ब्रेड खायला दिली, त्याचा त्याला त्रास झाला .. "
"यू मीन चबाsssरा !"तिला मध्येच तोडत रिसेप्शनिस्टनं त्या ब्रेडचं नाव सांगितलं .तिला शर्वरी, श्रेयस ,त्याला बरं नाहीये,ह्या गोष्टींपेक्षा त्या ब्रेडच्या नावाचं नीट उच्चारण महत्वाचं वाटत होतं .
"नो,नॉट चबाsssरा,इट इज सी आय ए बी ए टी टी ए !"पुन्हा शर्वरीनं राग गिळला.तिला श्रेयसची काळजी वाटत होती. ह्या बाईशी हुज्जत घालण्यात तिला काडीचाही रस नव्हता .
"इट्स चबाsssरा!"पुन्हा हेल काढत ती म्हणाली.त्या स्पेलिंगचा आणि तिच्या उच्चाराचा काही ताळमेळ जमत नव्हता!त्याकडे दुर्लक्ष करीत तिनं पुन्हा तिला सांगितलं ,"माय सन श्रेयस इज सिक. मला त्याला घरी घेऊन जायचंय !"
बऱ्याच सोपस्कारांनंतर अखेर शर्वरी श्रेयसला भेटू शकली.तो अगदी मलूल झालेला होता.पुन्हा काही सोपस्कार उरकल्यावर ती त्याला त्याच्या शाळेतून घरी घेऊन येऊ शकली.
"मॉम !आय डोण्ट वॉंन्ट टू गो टू स्कूल अगेन !वर्गातली मुलं मला चिडवतात!दे से दॅट आय हॅव
अॅन
अॅक्सेन्ट!मी तर इतकी चांगली इंग्लिश बोलतो!ते माझ्या डब्याला हसतात.मी पोळी खातो तर दे से दॅट आय ईट विअर्ड थिंग्ज !आय डोण्ट वॉंन्ट टू गो टू स्कूल अगेन !"श्रेयस मुसमुसत शर्वरीला म्हणाला.
शर्वरीच्या नवऱ्याला दोन वर्षांच्या पोस्टिंगवर अमेरिकेत यावं लागलं होतं आणि कदाचित गरज पडली तर आणखीही दोन वर्षं अमेरीकेत रहावं लागणार होतं ,त्यामुळे ते सगळे चार वर्षांच्या तयारीनं व्हर्जिनियात दाखल झाले होते.डिपेन्डन्ट व्हिसावर असल्यामुळे शर्वरीला तिथे काही करता येण्यासारखं नव्हतं.श्रेयसला त्यांनी जवळच् या एका चांगल्या शाळेत टाकलं ,पण रोज त्याची कुठली ना कुठली कुरबुर सुरू झाली.आणि आताच्या प्रसंगामुळे तर शर्वरीची खात्रीच पटली की अमेरिकेत,त्यातही त्या शाळेत श्रेयसचं मन काही लागत नाहीये!त्या परक्या मातीत ते इवलंसं रोप रुजत नाहीये!विशुद्ध शाकाहारी असलेल्या इवल्या श्रेयससाठी त्याच्या वर्गातल्या मांसाहारी असलेल्या अमेरिकन मुलांना डबा खाताना बघणं हीसुद्धा एक मोठी शिक्षा आहे!शेवटी शर्वरीनं मन पक्क केलं आणि नवऱ्याजवळ मन हलकं केलं!"आपण श्रेयसला त्या शाळेतून काढूया आणि होम स्कूलिंग करूया!मी घेईन त्याचा सगळा अभ्यास! लाखो अमेरिकन मुलं आणि त्यांचे पालक होम स्कूलिंगचा पर्याय स्वीकारतात!बरेच नियम आहेत त्याचे;पण ते एवढे जाचक नाहीयेत, जितका जाच ह्या बाहेरच्या जगाचा आपल्या निरागस श्रेयसला होतोय!त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मी घेईन मेहनत!नाहीतरी मला नोकरी करता येणार नाही अमेरिकेत;माझ्या चिमुरड्याकडे सर्वतोपरी लक्ष देणं हीच माझी नोकरी,हेच माझ्या आयुष्याचं ध्येय!आता उद्यापासून एका आखीव-रेखीव वेळापत्रकाप्रमाणे त्याचा सगळा अभ्यास घेत जाईन,एवढंच नव्हे, त्याच्या उठण्याची,झोपण्याची,खाण्या-पिण् याची ,खेळण्याची आणि अभ्यासाची वेळ निश्चित करून आई आणि शिक्षिका अशी दुहेरी भूमिका जबाबदारीनं पार पाडेन !"शर्वरीनं श्रेयसच्या शाळेला ईमेल लिहायला घेतली. तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं.
______________________________________________________________
Comments
Post a Comment