मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२९:स्पर्धा
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२९:स्पर्धा
स्पर्धा
संजय एका प्रतिथयश मल्टीनॅशनल कंपनीत दिल्लीत काम करीत होता. आठवड्यातून दोन दिवस प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन तर तीन दिवस घरून काम करायचं आणि दोन दिवस साप्ताहिक सुट्टी असं त्याच्या कामाचं स्वरूप होतं.सृष्टीही पूर्वी एका शाळेत गणिताची शिक्षिका होती पण मग दोन जुळ्या मुली झाल्यावर तिनं नोकरी सोडली होती.त्यांचा शाळाप्रवेश हा आता सध्याच्या तिच्या जीवनातला सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय होता .
स्पर्धा
-रश्मी घटवाई
"अरे साहब,जागिये!उठिये,आप की नींद की गोली लेने का समय हो गया है!"स्वतःच्या रोजच्याच विनोदावर नेहमीसारखं हसत भल्या पहाटे सृष्टीनं नवऱ्याला हाक मारली.तिला आज खूप लवकर जाग आली होती.अवघं महानगर अद्याप झोपेची चादर पांघरून होतं,पण सृष्टीला आज अजिबात अंथरुणात लोळावंसं वाटत नव्हतं.निरागसपणे झोपलेल्या आपल्या जुळ्या मुलींकडे तिनं मायेचा कटाक्ष टाकला. "संजय ,उठायचं का?आज सृजना -संजनाच्या नर्सरी
अॅ
डमिशनचा निकाल शाळांच्या वेबसाईटवर कळणार आहे."प्रतिसादाची वाट नं बघता सृष्टी
मोठ्या उत्सुकतेनं उठली.तिनं पहिल्याप्रथम इंटरनेट आणि लॅपटॉप सुरु केला आणि मग चहाचं आधण ठेवलं.
"इतक्या लवकर नाही कळणार गं रिझल्ट!नऊ वाजता अपलोड करतील.आत्ता पावणेचार वाजलेत. तूही झोप आणि आम्हालाही झोपू दे!"अर्धवट झोपेत संजयनं सृष्टीला सांगितलं,तोवर तिनं कपात चहा गाळला सुद्धा होता."उठिये ना!आज आपको कौनसा ऑफिस जाना है;आज वर्क फ्रॉम होम आहे, विसरलात?"अखेर संजयचाही नाईलाज झाला. दोघे नवराबायको भल्या पहाटे चहा घेता-घेता अर्थातच मुलींच्या शाळेच्या अॅ
डमिशनचा निकाल या विषयावर बोलू लागले.
"दिल्लीतल्या सगळ्या प्रमुख शाळांमध्ये आपण दोघींचे प्रवेश अर्ज पाठवलेत.तरी बरं,आता शाळेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचे असतात.पूर्वीसारखं असतं,तर ह्या प्रत्येक शाळेच्या प्रत्येक ब्रान्च मध्ये जाऊन रांगेत उभं राहून फॉर्म आणावे ,भरावे आणि प्रत्यक्ष जमा करावे लागले असते!"सृष्टीनं सुटकेचा नि:श्वास टाकला .
"समजा आपलं नाव दिल्लीतल्या ह्या शाळांच्या यादीत नसेल,तर आणखी एक संधी आपल्याला मिळेल,ती म्हणजे ह्या प्रख्यात शाळांनी आपली शाखा ग्रेटर नोएडा मध्ये पण उघडली आहे. तिथे प्रयत्न करूया. सुदैवानी आपण तोही पर्याय दिलाय!"संजयनं लॅपटॉपचा ताबा घेतला.
"आपण चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेतलंय ,मग आपल्या मुलींना त्याहूनही चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार आहे.दिल्ली मध्ये कसं ,शाळेत एकदा नर्सरीच्या वर्गात प्रवेश मिळाला,की बारावीपर्यंत बघायला लागत नाही. मग त्या मेडिकलला जातील,की इंजिनीअरिंगला ,पुढचं पुढे!"
"सृष्टी,एवढ्यातच पेपरला बातमी होती,साठ टक्के इंजिनीअर्स अनएम्प्लॉएबल, नोकरी करण्यायोग्य नाहीत म्हणून!"संजयनं म्हटलं .
"पण त्या भारतातल्या सगळ्यात चांगल्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये किंवा सगळ्यात चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये जातील,हे आपण बघू. पाहिजे तर त्यांना शाळेतच कोचिंग द्यायला लागू. " सृष्टीनं म्हटलं,तसा संजय हसू लागला. "अगं हीच पोस्ट कुणीतरी मला पाठवली आहे. कुणीतरी ह्या सोशल नेटवर्किंगच्या साईटवर लिहिलं की पाचवीत शिकणाऱ्या माझ्या पाल्यासाठी आयआयटी कोचिंग साठी कुठली इन्स्टिट्यूट योग्य राहील,तर त्याला एकानं उत्तर दिलं की अरेरे तुम्हाला अंमळ उशीरच झालाय त्यासाठी,तुमचा पाल्य जर का नर्सरी अथवा ज्युनियर केजी मध्ये असता,तर मी नक्कीच तुम्हाला काही इन्स्टिट्यूटस्ची नावं सुचवू शकलो असतो. आणि देवाची कृपा,तुमचा पाल्य एम्स साठी तयारी करत नाहीये. कारण एम्स मध्ये प्रवेशासाठी इच्छूक असलेल्यांनी त्यांच्या आधीच्या आयुष्यात मरण्यापूर्वी आधीच तयारी करायला सुरुवात केलीये . "
"हं ,लोकांना तिरकस बोलायला काय जातंय !ज्यांच्या मुलांचे शाळाप्रवेश होऊ घातलेत,त्यांना विचारा हे शाळा प्रवेशाचं दिव्य काय असतं ते!"सृष्टी फणकाऱ्यानं म्हणाली,"सोशल नेटवर्किंगच्या साईटपेक्षा आपले निकाल बघा आधी!"
खूप लोकांनी सगळ्या शाळांच्या वेबसाईट्स लावल्यानं त्या क्रॅश झाल्यामुळे बराच वेळ डोकेफोड केल्यानंतरही,मुलींच्या प्रवेशाचे निकाल सृष्टी आणि संजयला कळले नाहीत. अखेरीस मुलींना घेऊन दोघे गाडीने प्रत्येक शाळेत गेले. तिथे बोर्डवर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी होती,पण तिथे सुशिक्षित पालकांची इतकी गडबड आणि झुंबड होती,की त्यापेक्षा अशिक्षित परवडले!संध्याकाळी उशिरा चौघे घरी परतले,तेव्हा मुलींना दिल्लीतल्या एकाही नामवंत शाळेत प्रवेश मिळाला नाही आणि आता ग्रेटर नोएडातल्या ब्रान्चमध्येपण प्रवेश मिळणं वाटतं तितकं सोपं नाहीये,एवढं त्यांना कळलं होतं .
"अखेर एकदाचा दोघींना आपल्या मनासारख्या नामवंत शाळेत प्रवेश मिळाला बुवा!शाळा जरी आठ वाजताची आहे,तरी आपल्या स्टॉपवर बस सहा वाजता येईल सकाळी आणि दुपारी बारा वाजता शाळेची सुट्टी झाली की दुपारी दोन वाजता घरी येतील दोघी.ग्रेटर नोएडा दूर आहे बरंच,पण एवढी नामवंत शाळा आहे म्हटल्यावर तडजोड करणं आलंच!"सृष्टीनं संजयला म्हटलं.शाळा सुरु झाल्यावर तीन वर्षाच्या त्या चिमुरड्यांना सकाळी उठवून तयार करून आणि बरोबर वेगवेगळे तहानलाडू आणि भूकलाडू देऊन सृष्टी आणि संजय ग्रेटर नोएडाच्या शाळेच्या बसमध्ये बसवून यायचे,तेव्हा दोघी अर्धवट झोपेत बसमध्ये बसायच्या आणि दुपारी दोन वाजता मलूल होऊन घरी परतायच्या तेव्हाही अर्धवट झोपेत असायच्या.
" खेड्यांतल्या पोरांनाही इतकाच त्रास घेऊन रस्ते तुडवत पायी शाळेत जावं लागतं ना!शहरांतली आपली पोरं वातानुकूलित बसनी रस्ते तुडवताहेत! चालायचंच!आहे रे वाल्यांचे त्रास वेगळे आणि नाही रे वाल्यांचे त्रास वेगळे.त्रास कुणाला चुकलाय?विद्या मिळवायला खडतर तपश्चर्या करावी लागते म्हणतात ,ते उगीच नाही!"सृष्टीनं हळहळणाऱ्या संजयला सांगितलं.
महानगर आपल्या गतीनं धावू लागलं आणि महानगरातली लोकंही !
***************************** **************
साक्षीनं घड्याळात पाहिलं.आर्याला शाळेत सोडून लगेचच तिला ऑफिसमध्ये निघायला लागणार होतं. ड्रायव्हरला तिनं आज जरा लवकरच बोलावलं होतं.त्यानं गाडी लख्ख पुसून सज्ज ठेवली होती . साक्षीच्या मनात ऑफिसमध्ये आजच्या मीटिंग्ज मध्ये बोलायचे मुद्दे घोळत होते.अद्याप तिची डोमेस्टिक हेल्प मात्र आली नव्हती."कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना नाहीतरी अशा इमर्जन्सी ची सवयच असते.प्रत्येक गोष्टीचा पर्यायही तिला तयार ठेवावा लागतो." तिच्या मनात आलं."अरे वा! आजच्या मीटिंग्ज मध्ये हे वाक्य बोलायला चांगलंय!"तिनं आर्याला नाश्ता दिला,स्वतः तयार होऊन नाश्ता उरकला.तिचा दिनक्रम तसा आखीव होता.डोमेस्टिक हेल्पच्या मदतीनं आर्याला रोज तयार करून शाळेत सकाळी साडेसात वाजता सोडायचं,मग आपल्या ऑफिसमध्ये जायचं.नोएडातून दिल्लीतल्या आपल्या ऑफिसमध्ये जाता-जाता गाडीतूनच वेळेचा सदुपयोग करत आई-वडिलांना आणि सतत टूरवर असलेल्या आणि कॉर्पोरेट विश्वात नाणावलेल्या आपल्या नवऱ्याला फोन करायचा ..दोन वाजता आर्याची शाळा सुटली की ड्रायव्हरला तिला घ्यायला पाठवायचं.डोमेस्टिक हेल्प मग आर्याला तयार करून तिला आधी ड्रॉईंग क्लासला, मग डान्स क्लासला, त्यानंतर कराटे क्लासला आणि त्यानंतर टेबल-टेनिस शिकवणाऱ्या क्लासला ड्रॉयव्हरबरोबर घेऊन जायची.शनिवारी-रविवारी आर्याला शाळेतच हॉर्स-रायडिंग,पोहोण्या चे आणि थिएटरचे क्लासेस असायचे.एक बरं होतं!आर्याच्या त्या पंचतारांकित शाळेत आहारतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला नाश्ता आणि जेवण दिलं जायचं.होमवर्क नसायचं.सहा वर्षाच्या चिमुरडीसाठी आणि त्याहूनही कॉर्पोरेट क्षेत्रात कामात झोकून दिलेल्या तिच्या आई-वडिलांसाठी ते फारच सोयीचं होतं.किंबहुना या सगळ्या पंचतारांकित सुखसोयींनी युक्त असलेली आणि शिक्षण देण्याबरोबरच आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी पूरक व्यवस्था असणारी शिक्षणसंस्था आपल्या मुलांसाठी शोधणं ही कॉर्पोरेट विश्वातल्या लोकांची गरज होती. त्यासाठी कितीही महागडी फी आकारली गेली तरी ती मोजायची त्यांची तयारी होती.रात्री आठ वाजता ट्रॅफिकशी सामना करीत गाडीनं घरी पोहोचलं की पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी सज्ज व्हायचं.त्यातल्या त्यात सुदैवाची बाब म्हणजे भरपूर पगार घेत असले तरी ज्यांच्यावर साक्षीची मदार होती,तो ड्रायव्हर आणि डोमेस्टिक हेल्प चांगले होते,मन लावून आपलं काम करीत होते. "नाहीतर आजच्या काळात पैसे घेऊनही लोक काम करीत नाहीत.आपल्याबरोबरीनं तेही बारा-चौदा तास राबतातच की !" साक्षीच्या मनात आलं होतं .
"आर्या,आज तो आशा दीदी नहीं आयी है,तुम अकेलीही ड्रायवर अंकल के साथ चली जाना. आपली-आपली तयार होशील नं बाळा?"घराचं दार बंद करत साक्षीनं मोठ्या काळजीनं आर्याला विचारलं .
"येस मम्मा !मी आता मोठी झालेय ना !मी जाईन ड्रायवर अंकल बरोबर." आर्या शहाण्यासारखी गाडीत बसत म्हणाली आणि साक्षीला टाटा करीत शाळेच्या गेटवर उतरली .
"अगं पण एवढं काय अडलंय ,क्लासला मारू दे तिला एखादे दिवशी बुट्टी!"साक्षीच्या आईनं उलट साक्षीलाच म्हटलं," केवढ्या क्लासेसना घातलं आहेस तिला!जीव केवढाय तिचा!"
"मम्मी ,एक दिवस क्लासला बुट्टी मारली की खूप काही बुडतं आणि नंतर कुणी पुन्हा-पुन्हा शिकवत नाहीत.इस रेस में दौडना है उसे,तो यह सब करना पडेगा!या स्पर्धेच्या युगात आपलं मूल ऑलराऊंडर असलंच पाहिजे,अन्यथा इतर मुलं पुढे निघून जातील आणि आपलं मूल मागे पडेल. त्याला आणि आपल्यालाही वैफल्य येईल.ते सगळं टाळायचं,सर्वोत्तम व्हायचं तर हे अपरिहार्य आहे आजच्या काळात. "तिनं आईला सांगितलं होतं."तुला माहितेय आई,आर्याची शाळा नामवंत आहे. ह्या शाळेत प्रवेश मिळवणं सोपं नव्हतं,पण मिळाला.इतरांनी तर म्हणे थोरा-मोठ्यांच्या शिफारसी आणल्या होत्या पाल्याला ह्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून!या शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला समाजात मोठं मानाचं स्थान मिळतंय ."साक्षीनं सांगितलं.ट्रॅफिक सिग्नलला तिची गाडी थांबली तसा एक लहान मुलगा पुढे झेपावला.आधीच स्वच्छ असलेल्या साक्षीच्या गाडीची काच पुसून हक्कानी पैसे घेऊन गेला आणि सिग्नलवर उभ्या असलेल्या पण पैसे नं मिळालेल्या इतर मुलांना उंचावून हातातली नोट दाखवू लागला.
सिग्नल हिरवा झाला तसं महानगर आपल्या गतीनं धावू लागलं आणि एका अदृश्य स्पर्धेत त्या महानगरातली लोकंही नं पेलणाऱ्या वेगानं धावू लागली.
______________________________ ______________________________ _____
रश्मी घटवाई ,मुंबई
९८७१२४९०४७
Comments
Post a Comment