मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ९:विस्थापित

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ९:विस्थापित
विस्थापित 
-रश्मी घटवाई 

अमेरीकेहून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुजाताची फ्लाईट उतरली तेव्हा तिच्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ उमटला.३१ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर म्हणजे हॅलोविन ते थँक्सगिव्हिंग हे अमेरिकेतले सणासुदीचे दिवस!पण त्यावेळी भारतातही सणासुदीचं वातावरण असतं.तिथे राहण्यापेक्षा भारतातले सणासुदीचे दिवस सुजाताला साद घालत होते.भारतात अनेक महत्वाची कामं करायची होती. त्यापैकी एक म्हणजे घरात राहून पुढच्या भारतभेटीसाठी घर राहण्याजोगं असेल यासाठी त्याचं पेंटिंग ,किरकोळ दुरुस्ती वगैरे कामं उरकून घ्यायची होती. यावेळी ती एकटीच आली होती. मागच्या भारतभेटीच्या खेपेला ती अ‍ॅनाला-आपल्या मुलीलापण घेऊन आली होती. संबंध प्रवासभर ती तिला भारतातलं आपलं घर,शेजारी,शाळा ,मित्र-मैत्रिणी , लहानपणच्या गमती,दूरच्या नातेवाईकांच्याआठवणी असं सगळं सांगत राहिली होती.ते सगळं बघण्याविषयी 
अ‍ॅनाच्या मनात प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. मात्र तिनं मुंबईत पाऊल ठेवल्याक्षणापासून तिचा भ्रमनिरास झाला होता.' डिस्गस्टिंग ! डिस्गस्टिंग !'एवढी एकच प्रतिक्रिया अ‍ॅना देत होती. दस्तुरखुद्द सुजाताला धक्का बसला होता.तिच्या आठवणीतली मुंबई,घराच्या आसपासचा परिसर वगैरे सगळं बदललं होतं आणि बकालपणा वाढला होता. गगनचुंबी इमारतींनी  स्कायलाईन शिल्लक ठेवली नव्हती.सर्वत्र उभे झालेले मॉल आणि ओसंडून वाहणारी गर्दी ... सगळं अंगावर येत होतं .
पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमेरिकेला जाऊन एकुलत्या एका लेकीनं उत्तम शिक्षण ,नोकरी मिळवावी म्हणून सुजाताच्या आईवडिलांनी खूप मेहनत घेतली होती.त्यांचं स्वप्न सुजातानं पूर्ण केलं , यथावकाश लग्न ,अ‍ॅनाचा जन्म असे टप्पे पार करीत असताना आईवडील गेले आणि भारतात, मुंबईत येण्यासाठी चा दुवा म्हणून त्यांचं घर तेवढं उरलं.नातेवाईक होते;पण सगळे आता सोशल मीडियावरच्या संवादापुरते जवळचे ;अन्यथा दुरावलेलेच होते!मुंबईतल्या मुंबईतही तिला आवर्जून भेटावं असं कुणाला वाटत नव्हतं.'तू काय बाई,अमेरिकेत राहतेस!'आता आमची आठवण कशाला येत्येय तुला!'वर असे शेरेही सोशल मीडियावर तिला ऐकवले जायचे.
तिची टॅक्सी सिग्नलला थांबली,तेव्हा हातात फलक घेतलेल्या लोकांचा एक मोठ्ठा समूह नारे देत मोटारसायकलवरून जाऊ लागला. 'चलो जंतर-मंतर',  'चलो हुतात्मा चौक!' 'विस्थापितांना न्याय द्या!'विस्थापितांना त्यांचा हक्क द्या!'
      
घर असलेल्या इमारतीसमोर तिची टॅक्सी थांबली. मुंबईच्या वातावरणात भरलेला नेहमीचाच एक कोरडा अलिप्तपणा तिला नव्यानं बोचला.हवासुद्धा सलगी नं करता परक्यासारखी वागत होती.तिनं कुतूहलानं बिल्डिंगमध्ये लागलेल्या पाटीवर नजर फिरवली.रहिवाशांच्या यादीतली दोन-तीन नावे बदललेली दिसत होती.अगदी तिचा शेजारच्या फ्लॅटमध्येसुद्धा कुणीतरी दुसरंच आलेलं दिसत होतं.मराठी शेजार जाऊन कुणी मारवाडी शेजारी आता तिथे आलेला दिसत होता. नोटीसबोर्डवर,आपल्याला आणखी एखादा फ्लॅट विकत हवा आहे, इमारतीत कुणाला फ्लॅट विकायचा असल्यास संपर्क साधा,अशी त्या मारवाडी शेजाऱ्याची नोटीस मोबाईल नंबर सह लागलेली होती.बंद फ्लॅटचं दार तिनं उघडलं. धुळीनं माखलेल्या घरातून एक पाल सरसरत बाहेर पडली. जिवंतपणाची तेवढीच खूण,अन्यथा पार्किंगमधल्या लहानमोठ्या गाड्या आणि कप्पेबंद लोक यांनी व्यापलेल्या त्या इमारतीत चैतन्य केवळ इमारतीच्या नावात तेव्हढं उरलं होतं. 

तिचा मुंबईत ओढीनं येण्याचा उत्साह मावळलेला होता. इथे आपलं काहीच उरलेलं नाहीये याची तिला प्रकर्षांनं जाणीव झाली.घोषणा देणाऱ्या लोकांप्रमाणे नसू कदाचित;पण आपण पण विस्थापितच आहोत. आपण कोण नक्की?मुंबईकर? नाही!आपण आता इथून हुसकले गेलो आहोत!अमेरिकाच आता आपली आहे!सुजाताच्या मनात विचारांची आवर्तनं उमटली आणि तिनं नोटीसबोर्डवर दिलेला मोबाईल नंबर लावला .'आय अ‍ॅम युअर नेबर. आय वॉन्ट टू सेल माय फ्लॅट.इज इट ओके इफ वी डिस्कस अबाउट इट नाऊ?'तिनं अलिप्त, कोरड्या स्वरात विचारलं आणि शांत स्वरात अपेक्षित किंमत सांगितली.
                             *********************************************************** 
दिल्लीतल्या गजबजलेल्या रस्त्यावर टॅक्सी ड्रायव्हरनं करकचून टॅक्सीचे ब्रेक लावले तेव्हा हिसका बसल्यानं मोबाईलवरचे मेसेज वाचता-वाचता सुनीतानं मान वर करून त्याच्याकडे काहीशा रागारागाने आणि काहीशा प्रश्नार्थक नजरेनं  पाहिलं."सॉरी मॅडम !" टॅक्सी ड्रायव्हर ओशाळून म्हणाला ."क्या करू मॅडम!ये मोर्चेवाले लोग अपना रास्ता छोड़कर उलटी दिशा में आनेजानेवाली  ट्रॅफिक में घुस रहे हैं।ऊपर से ये बाईकवाले कहीं से भी ट्रॅफिक में चले आ रहे हैं। "त्यानं रिअर व्ह्यू मिरर मधून  तिच्याकडे बघत सांगितलं . 
"कसला मोर्चा आहे हा ?"तिनं गोंधळून विचारलं.
"विस्थापित शरणार्थीयोंका मोर्चा है मॅडम !अब ये जंतर-मंतर पर बैठकर धरना-प्रदर्शन करेंगे!"
 "विस्थापित शरणार्थीयोंका मोर्चा?"ती आणखीनच गोंधळली. 
"मॅडम,मुंबईजवळच्या एका प्रकल्पात चार-पाच गावांची जमीन गेली. त्या लोकांची घरं ,शेतजमिनी त्यात गेल्यामुळे ते गाववाले विस्थापित झाले.आता त्या सगळ्या विस्थापितांना हाताशी धरून विरोधी पक्षानं मुंबई आणि दिल्लीत धरना-प्रदर्शन आयोजित केलंय.आज आणि उद्या मोठंच आंदोलन होणार आहे बघा ह्या दोन महानगरांमध्ये!बरं झालं आपण लवकर निघालो,म्हणून निदान दोन तासांत तरी पोहोचू शकू!आज रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्यांना बराच ट्रॅफिक जाम लागेल.आज लोकांच्या ट्रेन्स आणि फ्लाईट्स चुकल्या तर नवल नाही!"टॅक्सी ड्रायव्हरनं गाडीचा वेग आणि माहितीचा सपाटा,दोन्ही वाढवले. 

"आपल्याला कशाचीच खबर नसते. देशाच्या राजधानीत कायकाय घडत असतं आणि आपण वर्तमानपत्रातल्या बातम्यांकडे ढुंकूनही बघत नाही!हा साधा टॅक्सीचालक तरी याला सगळी बित्तंबातमी.आता सगळा वेळ त्याचा रस्त्याशी आणि रस्त्यावरच्या ट्रॅफिकशीच संबंध म्हटल्यावर साहजिक आहे म्हणा!" तिच्या मनात आलं."आणि ही महानगरं म्हणजे धरना-प्रदर्शन आयोजित करण्यासाठीच्या सोयीस्कर जागा वाटतात की काय लोकांना!सर्वसामान्यांना किती त्रास होतो! आताच आपली ट्रेन चुकली बिकली तर काय करायचं !"तिच्याही मनात विचारांचा धबधबा कोसळू लागला.

आयुष्यातली ऐन महत्वाची पस्तीस वर्षं दिल्लीत घालवल्यावर सुनीता आणि तिचा नवरा त्याच्या सेवानिवृत्तीनंतर सगळी निरवानिरव करून दिल्लीहून मुंबईला कायमचे रहायला निघालेले होते. घरातलं सामान रेल्वेनं,ब्रेक व्हॅननं पाठवण्याच्या कामात गढलेला तिचा नवरा आदल्या दिवशी आणि आता आज काळपासूनच रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला होता आणि आता संध्याकाळच्या त्याच गाडीनं दोघे मुंबईला रवाना होणार होते.सुनीतानं सकाळपासून रेल्वेस्टेशनवर जाण्यात हशील नव्हतं,म्हणून मैत्रिणी आणि शेजारणींचा निरोप घेऊन सुनीता आता रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठी टॅक्सीनं निघाली होती!

"अपने देश लौट रही हो?" तिच्या बंगाली मैत्रीणीनं तिला विचारलं होतं."तो आखिर तुम्हें मुंबईही पसन्द है,हं ?" "सारी जिन्दगी दिल्ली में गुजारनेके बाद मुंबई वापस जा पाओगी?"तिच्या मैत्रिणींनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता,तेव्हा खरोखरी तिला भडभडून आलं होतं.त्या दोन महानगरांची भाषा, संस्कृती,खाद्यसंस्कृती वेगळी,लोकांचे आचारविचार,वागणे वेगळे,कपडे अगदी साड्यासुद्धा वेगळ्या!ह्या मापदंडांवर तोलले तर दिल्ली आणि मुंबई जणू दोन स्वतंत्र देशच होते आणि ह्या भूभागाहून त्या भूभागाकडे स्थलांतर करणं हे तिच्यासाठी देशांतराइतकंच कठीण होतं.

"आपण नक्की कोण?आणि कुठले? ह्या प्रश्नानं तिला नेहमीच छळलं होतं.आपण नागपूरकर, आपण मुंबईकर आणि आपण दिल्लीकर सुद्धा!लग्न होऊन नागपूरहून आपण मुंबईला आलो आणि नवऱ्याची लगेच बदली झाली म्हणून दिल्लीला आलो,ते इथलेच होऊन राहिलो!चहाच्या झाडाशेजारी संत्र्याचं झाड असेल,तर त्या चहात म्हणे संत्र्याचा फ्लेवर येतो.आपल्या अस्तित्वात आणि खाद्यसंस्कृतीतही नागपूर,मुंबई आणि दिल्ली यांचा फ्लेवर आलेला आहे!पण आपण नुसते नागपूरकर नाही,नुसते मुंबईकर नाही आणि नुसते दिल्लीकर पण नाही!मात्र या सर्वांचा परिपाक!एका ठिकाणाहून उपटून दुसऱ्या ठिकाणी लावलेलं झाडसुद्धा लगेच रुजत नाही,कधीकधी तर वेगळ्या वातावरणात तग धरत नाही.मग आपलं कसं व्हायचं?" टॅक्सीच्या वेगापेक्षाही कैकपट वेगानं तिच्या मनातले विचार धावू लागले.

आणखी काही अंतरावर मोर्चेकऱ्यांचा मोठा जथ्था घोषणा देत जंतरमंतरच्या रोखानं निघाला होता.आम्हां विस्थापितांच्या भावना समजून घ्या म्हणून आक्रोशत होता.त्या विस्थापितांच्या गर्दीतून वाट काढत सुनीताची टॅक्सी रेल्वेस्टेशनच्या रोखानं इंचइंच पुढे सरकत होती. तीपण तर विस्थापितच होत होती!
_________________________________________________________________

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी