मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १४:थंडी

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख १४:थंडी 
थंडी 
-रश्मी घटवाई

चाँदनी चौक गर्दीनं नुसता फुलून निघाला होता.पुरानी दिल्ली आणि गर्दी यांचं अगदी पहिलेपासून अतूट नातं होतं.पायी चालणारे,सायकली,रिक्षा, हातगाड्या,मोटारगाड्या अशी संमिश्र गर्दी एरवीही तिथे असायचीच,पण होळी,राखीपौर्णिमा,दसरा-दिवाळी आणि नाताळ या सणांच्या निमित्तानं अवघी पुरानी दिल्ली गर्दीनं ओसंडून वहात असली तरी कधी कुठला अनुचित प्रकार घडला नव्हता.धक्काबुक्की सोडा,चुकून कुणाचा कुणाला धक्का लागायचा नाही.तिथे सगळेच कर्मयोगी होते-प्रत्येक जण कामात निमग्न!शिवाय तिथल्या बाजारांमध्ये म्हणाल ती वस्तू उपलब्ध!म्हणून तर साधा चमचा घ्यायचा असो,की महागडी साडी,स्मृती चाँदनी चौक गाठायची.खरेदीच्या दरम्यान खास चाट आणि पाणीपुरी आणि खरेदी उरकल्यावर क्षुधाशांतीसाठी पराठेवाली गली!संबंध दिवस सार्थकी लागला असं स्मृतीला वाटायचं.दिल्लीदर्शन करायला कुणी नातेवाईक,मैत्रीण वगैरे आल्यावर ती आवर्जून त्यांना चाँदनी चौक दाखवायला घेऊन यायची.आताही तिची मैत्रीण दीप्ती तिच्याबरोबर होती.                
"आमच्या पुण्यातही आहे बरं का चांदणी चौक !"दीप्तीनं जरा ठसक्यात सांगितलं तसं चाँदनी चौक मधल्या गर्दीतल्या अनेकांनी माना वळवून तिच्याकडे पाहिलं.तिकडे दुर्लक्ष करून स्मृतीनं दीप्तीला स्वेटरच्या दुकानात खरेदीसाठी नेलं.डिसेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला तरी दिल्लीत अद्याप थंडीचा मागमूस नव्हता.त्या दिवशी तर चक्क रणरणतं ऊन होतं."ह्याला ग्लोबल वार्मिंग नाही तर आणखी काय म्हणायचं ?तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ह्या दिल्लीत ऑक्टोबर महिन्यातच दोन स्वेटर्स घालण्याजोगी चांगली कडाक्याची थंडी असायची आणि ती चांगली मार्च महिन्यापर्यंत असायची !"स्मृतीनं थंडीच्या जुन्या स्मृती जागवल्या."खाण्यापिण्याची चंगळ...शेकोटीशेजारी बसून  सरसोंका साग आणि मक्के की रोटी,राजमा-चावल याच थंडीत खायचं आणि हुडहुडी भरली की दुलईत गडप व्हायचं !"
"ह्या हवामान बदलाला आपणच जबाबदार आहोत!नको इतका वस्तूंचा हव्यास,वस्तूंची मागणी वाढल्यामुळे पुरवठा वाढला आणि त्यापायी आपण आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबाडून वापरू लागलो!पुढच्या पिढ्यांसाठी काही म्हणून स्वच्छ -शुद्ध ठेवलं नाही. आताच त्या हव्यासाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत,आणखी वीस -पंचवीस वर्षांनी किती भीषण चित्र असेल!"दीप्ती म्हणाली.तिनं आवडली म्हणून एक शाल घेतली .पुण्यातल्या थंडीत लागतात,म्हणून घरच्यांसाठी दोन-तीन स्वेटर,टोप्या,हातमोजे घेतले.थंडीत खायच्या गजक -शेंगदाण्याची चिक्की आणि रेवड्यांची खरेदी करून दोघी जणी पराठेवाल्या गलीकडे वळल्या.तिथे आटवलेल्या दुधावरच्या सायीच्या थरांची खुरचन मिठाई,साजूक तुपातली जिलबी आणि रसनेला आव्हान देणारे अनेक खाद्यपदार्थ त्यांची वाट बघत होते .इतर ग्राहकांच्या गर्दीत सामील होऊन त्या दोघींनीही आपलं जिव्हालौल्य पुरवलं . 
                                                                  *********************************************               
"अगंबाई !केवढं दाट धुकं आहे!आपली फ्लाईट गाठू शकू की नाही आपण?त्याहीपेक्षा,ती फ्लाईट जाईल की  रद्द होईल देव जाणे!"खिडकीवरचा पडदा
सारून शालिनीदेवी मल्होत्रांनी बाहेर पाहिलं.अस्वस्थपणे येरझारा घालत त्या आपल्या पतीकडे अपेक्षेनं पाहू लागल्या." सान्नु की!आपल्याला काय करायचंय !फ्लाईट फार फार तर उशिरा निघेल!तिकिटाचे पैसे परत मिळतील जर फ्लाईट रद्द झाली तर!आपण आपले वेळेवर निघू झालं !टॅक्सी बोलावलीये !एरवी दिल्ली एअरपोर्टवर पोहोचायला आपल्याला घरातून दोन तास आधी निघावं लागतं,आता धुकं असल्यामुळे आणखी एखाद  तास अधिक लागेल!सकाळी सिक्युरिटी चेकसाठी केवढी गर्दी असते!आटप ,लाव कुलूप घराला!"मल्होत्रासाहेबांनी पत्नीला सांगितलं.दोघे आपापल्या सुटकेसेस घेऊन घराबाहेर पडले.सेवानिवृत्तीनंतर भारतभ्रमणाचा कार्यक्रम त्यांनी आखला होता.त्या पहिल्याच प्रवासात आता धुकं विघ्न आणू बघत होतं.थंडीचा लवलेश नव्हता,पण दाट धुकं होतं.दहा फुटांवरचं पण नीट दिसत नव्हतं.अर्थात हिवाळ्यात ते नित्याचंच होतं.
"नीट चालव रे बाबा टॅक्सी !"दहादा शालिनीदेवींनी टॅक्सीवाल्याला बजावलं .टॅक्सीवाल्यानं नीटच चालवेन म्हणून ग्वाही दिली.धुक्यात चाललेल्या गाडीच्या ब्लिंकर्सच्या तालावर त्यांचं हृदय धडधडू लागलं.एअरपोर्टवर लोकांची प्रचंड गर्दी होती आणि सिक्युरिटी चेकसाठी लांबच लांब रांग !धुक्यापायी अनेक फ्लाईट रद्द झाल्या होत्या,काही उशिरा निघणार होत्या.एअरपोर्टच्या रेस्टॉरेन्ट्समध्ये एवढी गर्दी होती,की बहुतेकांकडले खाद्यपदार्थ संपले होते. वॉशरूम्ससाठी भल्या थोरल्या रांगा लागल्या होत्या.शालिनीदेवींची फ्लाईट उशिरा निघणार होती,रद्द झाली नव्हती  हाच केवढा मोठा दिलासा होता .  मल्होत्रासाहेब लाउंजमधल्या खुर्चीत छान झोपी गेले होते. त्यामुळे आता एअरपोर्टवरच्या शॉप्समध्ये जाऊन विंडो शॉपिंग करण्याखेरीज दुसरा पर्याय त्यांना दिसत नव्हता.तिथे विंटरवेअरचा सेल लागला होता.एका स्वेटरवर दोन स्वेटर्स फ्री अशी ऑफर होती.शालिनीदेवींनाही मोह आवरला नाही. स्वत:साठी आणि पतीसाठी एकेक स्वेटर विकत घेऊन आणि त्यासह मोफत मिळालेले दोन-दोन स्वेटर घेऊन त्या अतीव समाधानानं परतल्या. एव्हाना त्यांच्यासारख्या अनेकांच्या कृपेनं त्या दुकानातले सगळे विंटरवेअर विकल्या गेल्यामुळे ग्राहक आणि विक्रेता दोन्ही खुश होते!फ्लाईटबद्दल काहीच घोषणा नव्हती,तरी आता शालिनीदेवींना कसलंच टेन्शन नव्हतं."वेळ घालवण्याची हुकुमी सोय!"मनातल्या मनात त्या पुटपुटल्या आणि नवे स्वेटर घालून मल्होत्रासाहेबांच्या बाजूच्या खुर्चीत डोळे मिटून बसल्या . 
                                                       ****************************************************************
"एक उलट एक सुलट,दोनाचे दोन!वीण ह्या पद्धतीनं बाकीचं स्वेटर !"नवनीत कौर आपल्या लेकीला विणकामाचे धडे देऊ लागली!तिची लेक शाळेत शिकत असली तरी स्त्रीच्या जातीला स्वयंपाक,शिवण आणि विणकाम आलंच पाहिजे,घरची चूल पेटती ठेवायची तर बाईला ह्यातलं काहीतरी कौशल्य अवगत केलंच पाहिजे,असा तिचा आग्रह होता.तिची सासू बाजूला खाटेवर बसून स्वेटर विणत होती.दुकानांमध्ये मशीनवर बनलेली स्वेटर्स विकायला असतील भले खूप;थंडी तर हातानी विणलेलं स्वेटर घातलं ,की पळते! आणि गरिबांना कुठली ती महागडी स्वेटर्स परवडणारेत?चार दिवसाला एक स्वेटर ह्या हिशेबानं सासूनं दहाएक आणि नवनीत कौरनं पण तीन चार स्वेटर विणून तयार ठेवले होते!दिल्लीत थंडी पडली की हातोहात विकल्या गेले असते!दोघी जणी आतुरतेनं कडाक्याची थंडी पडण्याची वाट बघू लागल्या!
                                               ************************************* 
दिल्लीत ग्लोबल वॉर्मिंग विषयावर चर्चा करण्यासाठी  मोठी परिषद भरली होती . डिसेंबर अर्धा उलटला,तरी  दिल्लीत अद्याप थंडी पडली नाही,त्याची पर्यावरणीय कारणमीमांसा होत होती. महानगराला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं .... तिथले व्यवहार आपल्या गतीनं सुरु होते!
_________________________________________________________________   

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी