मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ३:रणरागिणी

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ३:रणरागिणी
रणरागिणी
-रश्मी घटवाई

"स्त्रीनं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र  होण्यासाठी,आपल्या पायावर उभं होण्यासाठी, शिक्षण घेतलं पाहिजे!दुर्गा ,सरस्वती,लक्ष्मी या देवी ज्यांची प्रतीकं आहेत,त्या क्षेत्रांत स्त्रियांनीही कर्तबगारी दाखवली पाहिजे!रणरागिणी दुर्गा होऊन देशासाठी लढण्यासाठी स्त्रियांनी सैन्यात जायला हवं, सरस्वती होऊन शिक्षणक्षेत्रात आणि लक्ष्मी होऊन देशाच्या अर्थकारणात स्त्रियांनी आपली चमक दाखवायला हवी !"संगीतानं कपाटातल्या आपल्या जुन्या डायरीतला मजकूर वाचला, तेव्हा तिला प्रचंड हसू आलं.आपला तो कॉलेजमध्ये लिहिलेला, निबंधस्पर्धेत बक्षिस मिळवलेला निबंध , त्याचा तो कच्चा खर्डा आता इतक्या वर्षांनंतर,आवरा-आवरी करताना हाती लागावा याची संगीताला गम्मत वाटली.आता हा पसारा आवरला की गॅसचा नंबर लावायचा,विजेचं बिल भरायचं अशी दोन महत्वाची कामं करायची आहेत असं तिनं कितव्यांदा तरी मनाशी घोकलं!महानगरातल्या एका टोकाला असलेल्या घरापासून निघून महानगराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी तिच्या नवऱ्याला सकाळी सात वाजता घर सोडणं क्रमप्राप्त होतं, त्यामुळे घरातली लहान मोठी सगळी कामं तिलाच बघावी लागत ! 

"अगं मी कामावर गेलो की सगळा वेळ तुला मोकळा मिळतो ना!मग ही  दोन-चार महत्वाची  कामं केलीस तर बिघडतं कुठे ?घरीच तर असतेस!एवढी शिकली आहेस;मग त्याचा काय उपयोग?"तिच्या नवऱ्यानं तिला एकदा म्हटलं होतं,तेव्हा मनोमन तिला खूप वाईट वाटलं होतं,की लहान गावातून आलेल्या आपला या महानगरात कसा काय निभाव लागणार! "सुशिक्षित बेकार म्हणून राहण्याची हौस नाहीये मला!पण आत्ता दोन महिन्यांपूर्वी इथल्या एक दोन नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या घरात काय झालं होतं;वाचलं  होतं ना आपण! त्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी आपली मुलं सांभाळायला म्हणून मोलकरणी ठेवल्या तर त्यापैकी एकीची मोलकरीण लहान मुलं त्रास देतात म्हणून  मुलांना गुंगीचं औषध देऊन झोपवून ठेवून टीव्ही बघत बसायची तर दुसरीची मोलकरीण मालकीण कामावर गेली की त्या सुंदर मुलाला लांबच्या सिग्नलवर भीक मागायला घेऊन जायची!ते केवढं मोठं सिंडिकेट उघडकीला आलं होतं !मला नाही आपल्या रियाला पाळणाघरात ठेवून किंवा मोलकरणीवर सोपवून नोकरी करायची!"तिनं निक्षून नवऱ्याला बजावलं होतं!गावातून सासू सासरे इथे येऊन राहिले तरच रियाला सांभाळण्याचा प्रश्न सुटेल आणि आपण नोकरी करू शकू !"कैकदा संगीताच्या मनात आलं होतं,पण रियाच्या वाढदिवसाच्या वेळी महिनाभर सासू सासरे यायचे आणि त्या अजस्त्र महानगरात त्यांचा जीव गुदमरायला लागायचा आणि लगेच परतण्याचा धोशा लावायचे!त्यामुळे आपल्या मनातला विचार संगीतानं मनातच ठेवला होता .       
          
गॅस संपत आला होता.स्वयंपाक करून रियाला शाळेतून आणायला जायचं होतं,ती अगदी नर्सरीत जरी असली तरी तिला दिलेला गृहपाठ म्हणजे गाणी , कविता ,वगैरेचं  तिच्याकडून पाठांतर करून घ्यायचं होतं !घरात काय संपलंय याचा आढावा घेऊन किराणा ,भाजी  वगैरे आणायचं  होतं !नवऱ्याचा नाश्ता ,डबा ,रियाची अंघोळ,तिला शाळेत पोहोचवणं-आणणं ,तिचं खाणंपिणं ,कपडे धुणं ,इस्त्री करणं ,बाजारहाट,सोसायटीच्या पार्कमध्ये रियाला खेळायला घेऊन जाणं ,जणू एकल पालकत्व  पार पाडतोय!क्रमानं सगळ्या कामांच्या गर्दीत आपण नुसते गोल गोल  घुमतोय.ऑफिसमधून नवरा  घरी परततो तेव्हा रिया झोपून गेलेली असते! हे महानगर म्हणजे एक  जबरदस्त मोठं रिंगण आहे आणि गृहिणी असलो तरी आपण त्यात डोंबाऱ्यानं माराव्या तशा नुसत्या कोलांटउड्या मारतो आहोत!रणरागिणी न अष्टभुजा कसल्या,आधुनिक डोंबारीच आहोत आपण या महानगरातले! संगीतानं उसासा टाकला !चपला अडकवून तिनं पुन्हा एकदा घराची किल्ली घेतल्याची खात्री केली आणि  दार ओढून ती कामांसाठी घराबाहेर पडली . 
       ------------------------------------------------------------------- 

"उद्याच्या पोटाची काळजी कशाला ,आभाळ पांघरू दगड उशाला ,गाळुनी घाम असा मागुया भाकरी,"त्या अजस्त्र महानगरातल्या कोपऱ्यावरच्या नर्सरी शाळेसमोर लहानग्यांची शाळा सुटायची वाट पाहणाऱ्या पालकांच्या गर्दीसमोर डोंबाऱ्याचा खेळ चालला होता!"नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी !"घट्ट काचा मारलेलं  ठिगळांचं लुगडं नेसून डोंबारीण नाचू लागली !मग सराईतपणे कोलांटउड्या मारू लागली,ताणलेल्या दोरीवरून तोल सांभाळत चालू लागली. खाली पटकुरावर  तिची दोन अजाण पोरं निजली होती.पोरं जागी असती,तर भूक भूक करीत त्यांनी भुणभुण लावली असती,तिचं लक्ष कामातून विचलित झालं असतं,म्हणून तिनं त्यांना किंचितशी अफू खायला देऊन निजवून ठेवलं होतं.बघता बघता डोंबाऱ्यानं पेटत्या पलित्यानं हातातल्या लोखंडी रिंगणाला बांधलेले रॉकेलमध्ये बुडवलेले बोळे  पेटवले आणि डोंबारीण त्या चटचटत्या ज्वाळांच्या गोल रिंगणातून सफाईनं  सूर मारू लागली !जणू ते पेटलेलं लोखंडी रिंगण  म्हणजे ते अजस्त्र महानगर होतं आणि त्यात सूर मारून ती रणरागिणी होऊन त्यावर विजय मिळवू बघत होती!


महानगर आपल्या गतीनं धावत होतं !कुणाला उसंत नव्हती!समोरच्या पालकांच्या गर्दीनं डोंबाऱ्याच्या खेळाला टाळ्या वाजवून यंत्रवत दाद दिली आणि शाळा सुटताच आपापल्या पाल्यांना घेऊन संगीतासह सगळे पालक आपापल्या वाटेनं परत गेले!पटकुरावर डोंबारणीची पोरं सुस्त होऊन झोपलेली होती!डोंबारीण मिळालेली सुटी नाणी जवळच्या डब्ब्यात गोळा करीत होती!महानगर आपल्या वेगानं ,आपल्या गतीनं धावत होतं . 
_________________________________________________________

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी