मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ६:एकला चलो,एकला चलो,एकला चलो रे!

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ६:एकला चलो,एकला चलो,एकला चलो रे!
एकला चलो,एकला चलो,एकला चलो रे! 
रश्मी घटवाई 
​​
दिल्लीतल्या त्या प्रसिद्ध इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला 
 ​​
अ‍ॅडमिशन मिळालीये याची शोमानं तिसऱ्यांदा त्यांची  वेबसाईट उघडून खात्री करून घेतली.तिचं नाव त्यात होतं.फक्त आता रहायची सोय तेवढी केली की झालं!आणि दिल्लीत बरसाती भाड्यानं सहज मिळतात,पेईंग गेस्ट म्हणून खाण्या-राहण्याची सोय असलेले अनेक पर्याय तिथे उपलब्ध आहेत,अनेक बंगालीभाषिक तिथे राहतात हे वाचून शोमाच्या आईचा जीव भांड्यात पडला अन्यथा कोलकाता सोडून आपल्या लेकीनं शिकायला एवढ्या लांब- तेही दिल्लीसारख्या शहरात जावं ,हेच मुळी तिला नामंजूर होतं.कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची सक्ती नसल्यामुळे बाहेर पेईंग गेस्ट म्हणून लेकीनं रहावं ,हे तिला अधिक स्वस्त आणि श्रेयस्कर वाटलं.अखेर दिल्लीत सारी व्यवस्था होऊन शोमा एका बंगाली कुटुंबाच्या बंगल्याच्या बरसातीत पेईंग गेस्ट म्हणून स्थिरावली. पहिल्यांदाच घरापासून दूर,परक्या शहरात आणि परक्या संस्कृतीत लेक गेलीये म्हणून जीव खालीवर झाला की तिची आई त्या बंगल्याच्या मालकीणीशी संवाद साधायची.लेकीला घरचेच आणि शुक्तो,भाप्पा आलू ,चोरचोरी असे शाकाहारी पदार्थच आवडतात,म्हणून त्यांना सांगायची. खाद्यपदार्थ लोकांना जोडणारा दुवा ठरू शकतो;म्हणून क्वचित जाणाऱ्या येणाऱ्या ओळखीच्यांच्या हाती लेकीबरोबर त्या घरमालकिणीसाठीही बंगाली मिठाया आवर्जून पाठवायची. 

"माँ,ह्या घरमालकीणबाई-त्यांना मी मासी माँ म्हणते,अगं खरंच मावशीसारख्याच मायेनं वागवतात मला!चांगले चांगले पदार्थ खाऊ घालतात मला!" शोमानं आपल्या आईला फोनवर सांगितलं,तेव्हा शोमाच्या आईची काळजी कमी झाली.तिचं सगळं आयुष्य मुलीभोवती केंद्रित होतं.मर्चण्ट नेव्हीमध्ये कामाला असलेला नवरा महिनोंमहिने समुद्रावर आणि एकदोन महिने घरी असायचा.पैशाची ददात नसायची,पण एवढा रिकामा वेळ तिला खायला धावायचा.त्यामुळे एखाद्या लहान मुलीनं आपल्या बाहुलीशी खेळावं तशी शोमाची आई शोमात गुंतून गेली होती. किंबहुना शोमा हा तिचा विरंगुळा होता.किंबहुना म्हणूनच लेकीनं एवढ्या लांब शिकायला जाणं हा जणू  तिच्यावरचा आघात होता.आधाराची गरज शोमाला नसून जणू तिच्या आईला होती. शोमानं नाही म्हटलं म्हणून;अन्यथा कोलकात्याचं बिऱ्हाड मोडून शोमाबरोबर दिल्लीला येणं तिनं पसंत केलं असतं . 

"माँ,मी उत्कृष्ट मार्कांनी इंजिनियरिंग उत्तीर्ण झालेय आणि मला कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मुंबईला चांगली नोकरी पण मिळाली आहे!मासी माँ चा निरोप घेऊन निघतेय घरी यायला,बोल तू ह्यांच्याशी!"शोमानं आईला सांगितलं आणि तिनं मोबाईल घरमालकिणीच्या हातात दिला. 

"खरंच भाग्यवान आहात शोमाच्या आई तुम्ही!अहो एवढ्या गुणी मुलीनं मलाच गेली चार वर्षं इतके सुखाचे क्षण दिलेत;तर तुम्हाला आयुष्यभर किती सुखी केलं असेल;याचं मोजमाप करत्येय मी!तुम्हाला कल्पना नाहीये तिनं मला केवढा मानसिक आधार दिलाय !एकटेपण नुसतं छळत होतं मला !रहायला दिल्लीसारख्या शहरात एवढा मोठा बंगला,पैसाअडका,पण आपलं कुणी नाही!मुळात नातेवाईक नाहीत!मूलबाळ नाही,नवऱ्याच्या पश्चात अक्षरश: एकटी एकटी झालेय मी!काय उपयोग ह्या धन-संपत्तीचा!ती होती;म्हणून स्वयंपाक करण्याचा तरी उत्साह होता माझ्यात!शोमानं मला जे घरभाडं -राहण्या-जेवणाचा खर्च दिला,तो पैसा मी तिच्याचसाठी  बँकेत ठेवला आणि आज गेल्या चार वर्षांची ही ठेव मी तिच्या सुपूर्द करतेय!माँ नं सही;मासी माँ म्हणून!तिनं मला लळा लावला;माझं एकटेपण मला विसरायला लावलं !पुढे आहेच हे एकटेपण!
जोदि तोर डाक शुने केउ ना आशे तोबे 
​ए
कला चोलो रे !​एकला चोलो ,​एकला चोलो ,​एकला चोलो ,​एकला चोलो रे!"रुद्ध कंठानं घरमालकीण रवींद्रनाथ टागोरांची  कविता गाऊ लागली! 
तेरी आवाज़ पे कोई ना आये तो फिर चल अकेला रे
फिर चल अकेला चल अकेला चल अकेला चल अकेला रे
ओ तू चल अकेला चल अकेला चल अकेला चल अकेला रे! 
पलीकडून शोमाच्या आईनं तिच्या सुरात सूर मिसळला.दोन वेगवेगळ्या महानगरांतल्या एकमेकींचे चेहरेही नं पाहिलेल्या त्या दोघींचं विलंबित लयीतलं एकटेपण महानगराच्या द्रुत लयीत हरवून गेलं .
                                                 *****************     

बोरिवलीच्या प्लॅटफॉर्मवर चर्चगेटला जाणारी लोकल धडधडत शिरली,तेव्हा ती पुरती थांबायच्या आतच प्लॅटफॉर्मवरचे प्रवाशांचे लोंढे डब्ब्यांत शिरलेले होते.महिलांचे राखीव डबेपण त्याला अपवाद नव्हते.सराईतपणे प्रत्येकीनं आपली जागा पटकावली होती.काहीजणींनी पोहोचायला किंचित विलंब होत असलेल्या आपल्या सहप्रवासी मैत्रिणींची जागा धरून ठेवली होती. सेकंदकाट्याच्या गतीशी त्या सगळ्यांचं अस्तित्व घट्ट  बांधलेलं होतं.कुणी नवखी त्या डब्यात चढलीच,तर देहबोलीवरून तिचं नवखेपण लक्षात यावं इतकं मुंबई महानगरातलं  बोरिवली- चर्चगेट ८:२२ च्या  लोकलच्या महिलांच्या सेकंड क्लास च्या डब्याचं रोजचं एका साच्यातलं चित्र होतं.त्यामुळे सगळ्याजणी आल्या तरी लेलेकाकू अद्याप पोहोचल्या नसल्यानं संबंध डब्यात एक विचित्र अस्वस्थता  होती.काहीजणी खिडकीतून वाकून त्या कुठे दिसतात का,याचा शोध घेत होत्या.त्यांच्याऐवजी त्या सगळ्यांना सर्वस्वी अपरिचित अशी एक तरुणी आत शिरली,तेव्हा अनेकींच्या भुवया वक्र झाल्या आणि नंतर सवयीनं सगळ्यांचे चेहरे कोरे झाले!लेलेकाकूंसाठी राखून ठेवलेल्या जागेवर ती काहीशा हक्कानं जाऊन बसली,तेव्हा तिचा तो आगाऊपणा नं रुचून अनेकींनी तिच्याकडे जळजळीत कटाक्षसुद्धा टाकले!तोवर दोन खांद्यांवर दोन पिशव्या अडकवून आणि दोन्ही हातांत दोन मोठे डबे असलेल्या पिशव्या घेऊन लेलेकाकू डब्यात शिरल्या,तेव्हा अनेकजणींनी त्यांना हात दिला,त्यांच्याजवळचं सामान वरचेवर झेलत अनेक हातांनी ते त्यांच्या नेहमीच्या सीटवर पोहोचवलं,तेव्हा लोकल सुरु झाली होती. त्या अपरिचित तरुणीनं गांगरून आपणहून ती जागा लेलेकाकूंना दिली. "अगं,बैस,बैस!आज पहिल्यांदाच चालली आहेस का ८:२२ नं ?पण कदाचित तू मुंबईतच नवी असावीस,असं वाटतंय !" लेलेकाकूंनी आईच्या ममतेनं तिला विचारलं.इतरजणींनी केलेल्या नेत्रपल्लवीमुले आणखी गांगरून जाऊन तिनं मान हलवली."अं ,हो,मी इथे नवीन आहे  म्हणून मला मराठी नीट येत नाही!"तिनं मोडक्यातोडक्या मराठीत पाठ केलेलं वाक्य सांगून निश्वास टाकला,तोवर बहुतेकींनी डब्यातून प्लेटमध्ये उपमा अथवा पोहे काढून घेऊन हिशोबाने पैसे लेलेकाकूंच्या सुपूर्द केले होते!

"अगं,हिलापण द्या एक प्लेट भरून!आज माझ्याकडून!स्वागतपर!"लेलेकाकूंनी तिला वाफाळत्या उपम्याची प्लेट दिली,तेव्हा अनोळखी,अपरिचित व्यक्तीनं दिलेले खाद्यपदार्थ खायचे नाहीत, ह्या तिच्या घरच्यांनी सांगितलेल्या सूचना एकजात सगळ्यांना तिच्या चेहऱ्यावर वाचता आल्या!

​​
"अगं घे,घे!घाबरू नकोस!ह्या लेलेकाकू ८:२२ मधल्या सगळ्यांची आईच आहेत!त्यांची मुलं,सुना, मुली,जावई ,नातवंडं सगळे अमेरिकेत स्थायिक आहेत!लेलेकाका होते तोवर काही प्रॉब्लेम नव्हता,पण ते गेले आणि त्या अगदी एकट्या पडल्या. पण त्या खचून गेल्या नाहीत!त्या परक्या देशात आपलं काही जमायचं  नाही, दर सहा महिन्यांनंतर एकदा भारतात यावंच लागणार,पण प्रत्येक वेळी कुणाला तरी त्यांना घेऊन यावं लागणार ,म्हणून कटुता येऊ नये म्हणून त्या स्वाभिमानानं इथे राहताहेत!एकटेपणावर त्यांनी छान तोडगा काढलाय! विरंगुळा म्हणून, रीतसर लायसन्स वगैरे घेऊन लोकलच्या महिलांच्या डब्यात सकाळी स्वत: केलेले नाश्त्याचे ताजे गरमागरम,पदार्थ त्या विकतात आणि संध्याकाळी परतीच्या  चर्चगेट -बोरिवलीच्या लोकलमध्ये चकली लाडू वगैरे!आम्हा सगळ्यांना त्यांचा मोठाच आधार आहे!"परस्पर अनेकजणींनी तिला माहिती दिली. 
 
"लेलेकाकू,पण मग रविवारी काय करता?तेव्हा तुम्हाला एकटेपण जाणवत असेल ना?"तिनं  नं रहावून विचारलं. 

"अगं अनेक इस्पितळांत एकेकटे रुग्ण असतात,किंवा त्या रुग्णांजवळ असलेल्या व्यक्तीलाही थोडीशी मोकळीक हवी असते!रविवारी मी अशा गरज असलेल्यांजवळ  इस्पितळात जाऊन बसते!त्यांना तरी काय हवं असतं,नुसते धीराचे शब्द!मायेची फुंकर!तेही एकटे आणि मीही एकटी !पण पेला अर्धा रिता आहे हे बघण्यापेक्षा तो अर्धा भरला आहे हे बघणं महत्वाचं आणि केवळ तेव्हढं मी सांगते !एकटेपण कुठच्याकुठे पळून जातं !"त्या म्हणाल्या. 
अपार आदरानं तिनं लेलेकाकूंकडे पाहिलं.त्यांचे निळे डोळे आगळ्या आनंदानं चमकत होते. "

जोदि तोर डाक शुने केउ ना आशे तोबे 
​ए
कला चोलो रे !​एकला चोलो ,​एकला चोलो ,​एकला चोलो ,​एकला चोलो रे!रवींद्रनाथ टागोरांची  कविता तिच्या मनात उमटू लागली.त्या अनोळखी महानगरात बहुतेकांची जीवनरेखा असलेल्या लोकल ट्रेननं महानगरातलं तिचं एकटेपण पण पुसून टाकलं आणि लोकल ट्रेन धडधडत पुढच्या स्टेशनात शिरली. 
________________________________________________________________________

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी