मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख ३३)​​स्वातंत्र्य

 मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख ३३)​​स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
-रश्मी घटवाई 

"अहो,उठता ना?चहा गार होतोय तुमचा !बँकेत जायला उशीर होईल अशानं!"गिरिजानं नेहेमीप्रमाणे धोरणानं चहाचं आधण ठेवून नवऱ्याला उठवायचा प्रयत्न केला .   
"गिरिजा,माझ्या ब्रशवर टूथपेस्ट लावून दे ना !कंटाळा आलाय उठायचा,"नवऱ्यानं डोळे नं उघडताच तिला म्हटलं ,तसा गिरिजानं लगोलग सवयीनं आधीच टूथपेस्ट लावून आणलेला नवऱ्याचा टूथब्रश त्याच्या हातात ठेवला."अहो,मुलं बरी!वेळच्या वेळी उठून नाश्ते उरकून शाळेत सुद्धा गेलीत,कारण आज त्यांना त्यांचे वार्षिक परीक्षेचे पेपर्स दाखवणार आहेत.मुंबईसारख्या ठिकाणी तुमची बँक घराजवळ आहे,तिथे चालत जायला जेमतेम दोन मिनिटं लागतात म्हणून बरी गती आहे!उठा आता,नाहीतर ब्रॅन्च मॅनेजर वेळेवर पोहोचले नाहीत,तर बँक बंद पडेल!" गिरिजानं अखेरीस त्याला उठून बसायला भाग पाडलं आणि तो नीट दात घासतोय,याची खात्री पटल्यावर ती रोजच्याप्रमाणे त्याच्यासाठी चहा आणायला गेली."चहा घेऊन लगेच आंघोळीला जा!नाश्ता तयार ठेवते. आणि हो!मला जरा शंभर -दोनशे रुपये देऊन ठेवा,भाज्या -फळं आणायची आहेत." तिनं निसटतं सांगितलं.त्यानं ते कितपत ऐकलं , याबद्दल ती साशंक होती. 
"गिरिजा,अगं तुला एवढ्या-तेवढ्यासाठी नवऱ्याजवळ पैसे मागावे लागतात,तो घरखर्चाला पैसे देत नाही का?"काळजीनं तिच्या मोठ्या बहिणीनं एकदा तिला चमकून विचारलं होतं.लग्न होऊन परगावी रहात असलेली तिची मोठी बहीण गिरिजाच्या लग्नानंतर साताठ महिन्यांनी, अचानक आलेल्या काही कामानिमित्त दोन दिवसांसाठी तिच्याकडे राहिली होती आणि वाणसामान ,भाजी वगैरेंसाठी गिरिजानं हळू आवाजात नवऱ्याला पैसे मागितल्याचं तिनं पाहिलं होतं.
"नाही गं,माझ्याजवळ सुटे नव्हते ना,म्हणून यांना मागितले.आणि पैशाचे व्यवहार एका बँकवाल्यानं सांभाळलेले जास्त चांगलं नाही का?"गिरिजानं सारवासारव केलेली आहे,वेळ मारून नेलेली आहे,हे तिच्या बहिणीच्या लक्षात आलं होतंच.पाठोपाठ आईचा काळजी करणारा फोनही आला होता. 
"नाही गं आई तसं काहीच नाही. मला पूर्ण स्वातंत्र्य आहे या घरात,आता लग्नानंतर थोडी बंधनं तर येतातच ना!"तिनं आईला आश्वस्त करायचा प्रयत्न केला होता,"शिवाय यांना व्यवस्थित हिशेब ठेवायची सवय आहे ना!डायरीत रोजचा खर्च,वाणसामान ,भाज्या वगैरे त्या-त्या रकान्यात लिहिलाच गेला पाहिजे,याबाबत ते फार काटेकोर आहेत.त्यामुळे दर महिन्याचं,दर वर्षाचं,आकस्मिक खर्चांचं वगैरे आर्थिक नियोजन करणं,बजेट ठरवणं सोपं जातं,असं ह्यांचं म्हणणं आहे.शेवटी बोलून चालून एक बँकर आहेत ना!"आईची काळजी मिटली जरी नाही,तरी काही अंशी कमी झाली म्हणून गिरिजानं सुटकेचा नि:श्वास टाकला होता.
"आमच्या लहानपणी बेताची परिस्थिती होती...घरी खाणारी तोंडं जास्ती आणि शाळा मास्तरांना पगार कितीसा असणार!पण आईचा काटकसरी स्वभाव आणि कुठलीच गोष्ट वाया नं घालवण्याची आणि कुणाहीकडून फुकट नं घेण्याची वृत्ती आमच्यावर जाणते-अजाणतेपणी खूप संस्कार करून गेली. कोंड्याचा मांडा करून तिनं आम्हाला लहानाचं मोठं केलं.जोग मास्तरांना गरीब असले तरी समाजातखूप मान होता,त्यांचा मुलगा बँकेत अधिकारी म्हणून लागला,याचं त्यांना किती कौतुक होतं.आज दोघेही या जगात नसले,तरी मी जो काही आहे,तो आईबाबांमुळेच! गिरिजा,तुला मी रुक्ष वाटेन कदाचित;पण वायफळ खर्च केलेला मला नाही आवडत,"नवऱ्यानं गिरिजाला लग्नानंतर सांगितलं होतं. "त्यामुळे दहा रुपयांचा गजरा घेण्यापेक्षा त्या दहा रुपयांची गाजरं आणलेली मला अधिक रुचतील.ही मुंबई आहे. महागडं शहर आहे.हात राखून खर्च केला,तरंच इथे निभाव लागेल आपला !"नवऱ्याचं कोरडं बोलणं तिला आवडलं नव्हतं ,पण त्यात शंभर टक्के तथ्य होतं.
"अहो,ऐकताय ना,निमा वन्स यायच्या आहेत परवा.आत्ता सकाळी फोन आला होता त्यांचा.म्हणजे केशवरावांचं ऑफिसच्या कामानिमित्तानं दोन दिवसांसाठी येणं होतंय मुंबईत,तर नवऱ्याबरोबर आपणही येतोय म्हणून सांगितलंय त्यांनी.इतक्या वर्षांनी येताहेत दोघे,पाहुणचार नीट करावा लागेल आपल्याला.जरा हजार दोन हजार रुपये देऊन ठेवा ना,त्यांच्यासाठी साडी,शर्ट वगैरे तरी घेऊन येते. "
"हजार-दोन हजार रुपये?अगं पैसे काय झाडाला लागतात का गिरिजा?आपण बिल्डरकडे घराचं बुकिंग केलंय,पैसे भरले आहेत,ते बँकेतून कर्ज काढून,हे विसरलीस का?स्वतःसाठी आणलेल्या ढीगभर तरी कोऱ्या करकरीत साड्या असतील तुझ्याजवळ ,बघ त्यातली.."नवऱ्यानं तुटकपणे सांगितलं आणि तो आंघोळीला गेला. 
"अहो मी दोन वर्षांत एकही नवीन साडी विकत घेतली नाहीये.आईनी माझ्या मागच्या आणि यंदाच्या वाढदिवसाला पाठवलेल्या,अजून घडीही नं मोडलेल्या दोन साड्या तेवढ्या आहेत कपाटात." गिरिजानं दुःखी -कष्टी आवाजात म्हटलं."तरी बरं !तुमची धाकटी बहीण येते आहे!माझी धाकटी बहीण आली असती,तर मी कोणत्या तोंडानं तुम्हाला पैसे मागणार होते?"तिच्या मनात विचार आला.मात्र इतक्या वर्षांनी नणंद येतेय,त्या दोघांचं स्वागत मोठ्या भावाच्या इतमामाला साजेसं झालं पाहिजे,म्हणून तिनंच कंबर कसली.मोलकरणीकडून सगळं घर लख्ख करून सजवलं,माळ्यावर पडलेलं पितळेचं बरंचसं जुनं सामान काढून तिनं ती सगळी रद्दी विकली.त्यात इकडची तिकडची भर घालून तिनं खुबीनं नणंदेला आधीच विचारून ठेवल्यानुसार त्यांच्या आवडीच्या रंगाचा आणि मापाचा शर्टपण आणून ठेवला.साडी होतीच.. 
त्या दोघांचा मन लावून पाहुणचार करून आणि स्नेहभेट देऊन त्यांना परतीच्या प्रवासासाठी गाडीत बसवून गिरिजानं त्यांचा निरोप घेतला,तेव्हा आपणही आता काटकसर करण्याबरोबरच हातखर्चाला पैसे मिळवलेच पाहिजेत,ही खूणगाठ तिनं मनाशी बांधली.
"गिरीजा,माझ्याकडे शिकवणीसाठी तिसरी चौथीची बरीच मुलं येतात.तूही स्वत:च्या मुलांचा अभ्यास घेतेस, त्यामुळे तुला पाचवी -सहावीच्या वर्गांचा अभ्यासक्रम माहिती आहेच.घेशील का तुझ्या घरीपाचवी -सहावीच्या पाच-सहा मुलांचा शिकवणीवर्ग?माझ्याकडे शिकणाऱ्या मुलांची ती भावंडं आहेत , त्यांना मला नाही म्हणवेना;म्हणून म्हटलं तुला विचारून बघू," गिरिजा घराचं दार उघडत असतानाच वरच्या मजल्यावर राहणारी तिची मैत्रीण दाराचा आवाज ऐकून घाईघाईनी गिरिजाकडे आली. "नाहीतरी त्या वेळात तुझी मुलं शाळेतच असतील.तास-दोन तास वेळ काढू शकलीस तर घरबसल्या अर्थार्जनही होईल,"मैत्रिणीनं म्हटलं."त्या व्यतिरिक्त उन्हाळ्याच्या सुटीत काही मुलांना आपली इंग्रजी चांगली व्हावी,म्हणून इंग्रजीची शिकवणी लावायची आहे. मी दोन महिने गावाला जाणार आहे. तुला इंग्रजी शिकवण्याचाही सराव आहेच!घेशील ना त्यांची शिकवणी उद्यापासून?"आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.."गिरिजाच्या मनात विचार आला,"चालेल,अगदी आनंदानं शिकवेन त्यांना ," प्रसन्नपणे हसून तिनं मैत्रिणीचे मनापासून आभार मानले आणि मैत्रिणीसाठी चहा करायला ती स्वयंपाकघरात वळली. 
                            ***********************************
जसप्रीत आज खूप आनंदात होती.पंजाबमधल्या त्या छोट्याशा गावातून आपण आता लग्न होऊन एकदम मुंबईत जाणार,या कल्पनेनंच तिच्या आनंदाला उधाण आलं होतं.मुंबईबद्दल तिनं किती ऐकलं  होतं. त्या मायानगरीत जाण्याचा प्रसंग कधी आला नव्हता,आला,तोही आता आठ दिवसांनी थेट लग्न होऊन जाण्याचा.काल गुरमीतसिंगच्या घरची मंडळी तिला बघायला म्हणून आली आणि एकदम 'रोका', म्हणजे वाङ्निश्चय करूनच परत मुंबईला गेली.बघता क्षणी तिला तो आणि त्याला ती आवडली होती.घरी त्याचे आईवडील आणि कॅनडामध्ये राहणारे त्याचे दोन भाऊ असं ते पैसेवालं,आधुनिक कुटुंब होतं,आणि त्यांनी आपल्यासारखी साधीभोळी मुलगी पसंत केल्याचं तिला आश्चर्य वाटलं होतं नी आनंद पण झाला होता.त्यांची हुंड्याची अपेक्षा थोडीशी अधिक होती,पण आपण त्यांची मागणी पूर्ण करू, इतकं चांगलं स्थळ हातचं नं घालवता शेती-बिती विकून करू पैशाची व्यवस्था असं जसप्रीतच्या आईवडिलांनी तिला आणि त्यांना आश्वासन दिलं होतं.लगोलग आठ दिवसांनी विवाह ठरवल्यामुळे सगळ्यांचीच घाई-गडबडीनं तयारी सुरु होती.
"दारजी ,मुलाची माहिती नीट काढली आहे ना?कुणी त्यांना ओळखणारे आपल्या परिचयाचे नाहीत म्हणून शंका येते मनात. वधुवर सूचक मंडळात नाव नोंदवल्यावर त्यांनीच पुढाकार घेऊन तुम्हाला फोन केला म्हणे. सान्नु की,असी ते शादी वास्ते आवांगे,"जसप्रीतच्या आत्यानं तिच्या वडिलांना म्हटलं होतं."आपल्याच नात्यातली गोष्ट आहे ना,परदेशी राहणारा ,रग्गड पैसे कमावणारा मुलगा आपल्या मुलीला पसंत करतोय ,म्हणून हरखून गेलेल्या वधुपित्यानं त्याची सखोल चौकशी केली नाही,आणि ती आता परदेशात धुणं -भांडी-केरवारे आणि स्वयंपाक करणारी फुकटची मोलकरीण असल्यागत त्यांच्या घरी राबतेय,इतके वर्षांत त्यांनी माहेरीही तिला येऊ दिलं नाही की माहेरच्यांशी धड बोलूही दिलं नाही. आणखी आपल्याच ओळखीच्यांच्या मुलीचं अमेरिकेतलं स्थळ म्हणून घाईनं लग्न झालं आणि तिथे गेल्यावर तिला कळलं की लग्न नं करताच काही वर्षांपासून तो कुणा परदेशी बाईबरोबर राहतोय आणि हिच्याशी लग्न केलंय,ते केवळ भरघोस हुंडा मिळवण्यासाठी ... "
"चौकशी केली आहे मी.मुंबईत मोठं दुकान आहे त्यांचं,दोन-तीन फ्लॅट आहेत,दिवसेंदिवस व्यापार वाढतोच आहे त्यांचा."जसप्रीतच्या वडिलांनी बहिणीला सांगितलं होतं.
शेती विकून आणि जवळपास असेल नसेल,ते किडुक-मिडुक विकून जसप्रीतच्या वडिलांनी भरपूर हुंडा आणि सोनं -नाणं देऊनधुमधडाक्यात जसप्रीतचं लग्न गुरमितसिंगशी लावून दिलं,आणि बिदाई होऊन जसप्रीत मुंबईला गेली.
"पापाजी,आप जल्दी आ जाओ,मम्मीजी आप जल्दी आ जाओ ,मुझे इस नरक से ले जाओ ... "एके दिवशी भल्या सकाळी दबक्या आवाजात जसप्रीतचा फोन आला,तेव्हा जसप्रीतचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेल्या तिच्या आईवडिलांचा जीव थाऱ्यावर राहीना !"बेटे,की होया,हुण मैनु दस .. काय झालं ?" त्यांनी अधीर होऊन विचारलं तेवढ्यात कुणी तरी जसप्रीतला  जोरात थापड मारल्याचा आणि तिच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानी आला,पाठोपाठ फोनचा रिसिव्हर आदळून फोन बंद करण्यात आला, तेव्हा दोघांच्या पायाखालची वाळू सरकली.पंजाबमधल्या त्या खेड्यातून लगोलग अमृतसरला आणि तिथून मुंबईला विमानानं दोघे येऊन पोहोचले,मुंबईतल्या त्यांच्या पत्त्यावर पोहोचले,तेव्हा मलूल झालेली, खंगलेली ,रया गेलेली आणि अवघ्या दहा -बारा दिवसांपूर्वी विवाह झालेली आपली लेक ती हीच का,हा त्यांना प्रश्न पडला.
"ले जाओ अपनी बेटी को वापस!तुम्ही तर पन्नास लाख रुपये हुंडा देणार होते,चाळीस लाख जेमतेम टिकवलेत आमच्या हाती!आणि नकली ,खोटे दागिने मारलेत आमच्या माथी ?असले हलक्या प्रतीचे दागिने तर एखादा गरीब माणूसही देणार नाही !"
"माणसं नाहीत ही,कसाई आहेत!तुमच्या सारख्या सरळमार्गी लोकांना ,तुमच्या साध्यासुध्या मुलीला फसवलं यांनी.ज्याचं लग्नच करायला नको,अशा मुलाचं लग्न करून त्यांनी माझं आयुष्य उध्वस्त केलंय. दहा-बारा दिवस मला कसलंच स्वातंत्र्य नव्हतं. आत्ता कुठे मी मोकळा श्वास घेतेय..."त्या बंदीखान्यातून बाहेर पडल्यावर अंगावरच्या जखमा आईला दाखवत जसप्रीत हुंदके देऊन रडू लागली. "आणि त्याचं हे पहिलं लग्नही नाही,कुणा अशाच एका अश्राप परमिंदर कौरला यानं असंच छळून हुंडा वसूल करून नंतर घटस्फोट दिला,तिचं काळीज पिळवटून टाकणारं ,गुरमीतला लिहिलेलं जुनं पत्र माझ्या हाती लागलं आणि कारणाच्या शोधात असलेल्या त्या लोकांनी मला छळायला सुरुवात केली, " जसप्रीत सांगू लागली."पण मी ह्या अन्यायाविरुद्ध लढणार आहे मम्मीजी,पापाजी. "तिनं निश्चयपूर्वक अश्रु पुसले आणि वडिलांचा मोबाईल घेऊन पोलिसांना फोन लावला.
                                     **********************************
अन्नपूर्णा अम्मानं सहज म्हणून खिडकीतून डोकावून पाहिलं ,तेव्हा मुंबईतली गर्दी त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून दिसणाऱ्या रस्त्यावर तरी त्यांना जाणवली नाही. जाणवली ती आजूबाजूच्या बंद फ्लॅट्स मधली निर्मनुष्य शांतता. नाही म्हणायला त्यांच्या समोर असलेल्या बाल्कनीला एखाद्या तुरुंगासारखे उभे गज लागलेले होते आणि कुणी तरी तरुणी तिथे शून्यात नजर लावून उभी असलेली त्यांनी थोड्या वेळापूर्वी पाहिल्याचं त्यांना आठवत होतं.आता मात्र ती तिथे नव्हती." कदाचित आत गेली असावी!" त्यांनी विचार केला.अद्याप अविवाहित असलेल्या आणि मुंबईत नोकरीला असलेल्या त्यांच्या मुलाकडे त्या नुकत्याच तामिळनाडूच्या एका खेड्यातून आल्या होत्या. तामिळशिवाय त्यांना दुसरी कुठली भाषा येत नव्हती.त्यामुळे शेजाऱ्यांशी बोलायचा प्रश्नच नव्हता. शिवाय मुंबईतलं वातावरण काही तामिळनाडू सारखं नव्हतं. मुलानं टीव्हीवर तामिळ चॅनेल्स लावायला शिकवलं होतं,त्यामुळे थोडा वेळ का होईना टीव्ही बघण्यात वेळ जात होता,थोडा थोडा वेळ दोन्ही वेळा स्वयंपाक करण्यात.पण उरलेल्या इतक्या वेळाचं काय करायचं हा प्रश्न त्यांनी बाल्कनीत उभं राहून सोडवला.रहदारी,कॉलनी निरखण्यात त्यांचा चांगला वेळ जाऊ लागला.तेवढाच  विरंगुळा!
"आपल्या समोरच्या बाल्कनीवाल्या घरात कोण राहतं रे?"मुलानं दुपारी त्यांना फोन केला,तेव्हा त्यांनी मुलाला विचारलं."कोण जाणे !मला तर कोणी कधी दिसलं नाही."मुलाला काही त्यात रस नव्हता.  
त्यांना चैन पडेना.दुपारी जेवल्यावर त्यांनी अंमळ आंग  टाकलं आणि नंतर दुपारची कॉफी घेऊन त्या पुन्हा बाल्कनीत जाऊन उभ्या राहिल्या. मघा त्यांना ओझरती दिसलेली ती तरुणी आता त्यांना स्वच्छ दिसत होती. त्यांनी हात हलवून तिचं लक्ष वेधून घेतलं. तिच्याकडे बघून त्यांनी स्मितहास्य केलं ,तरी तिनं काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांनी पुन्हा तिला हात दाखवला . 
"हिंदी इल्ले !हिंदी इल्ले!तामिळ!तामिळ!"तिनं शुष्क आवाजात सांगितलं,तसा अन्नपूर्णा अम्मांचा आनंद गगनात मावेना."मी पण तामिळच आहे,मला पण तामिळशिवाय दुसरी भाषा येत नाही."
हे ऐकताच मात्र त्या तरुणीचा बांध कोसळला आणि ती हमसाहमशी रडू लागली. अन्नपूर्णा अम्मांना कळेना काय झालं ते."मामी ,तुम्ही मला आईसमान आहात !" सुरुवातीचा भर ओसरल्यावर  ती त्यांना म्हणाली,"नवऱ्यानं मला कोंडून ठेवलंय ...म्हणजे मी अशीच कोंडलेल्या अवस्थेत आहे गेली पाच वर्षं.मी तामिळनाडूमधल्या एका खेड्यातली,उच्च वर्णीय आणि आता जो माझा नवरा आहे,तो निम्न वर्णीय. त्यानं पाच वर्षांपूर्वी माझ्याशी अतिप्रसंग केला,आणि खेड्यातल्या पंचांनी दिलेल्या निर्णयानुसार मला त्याच्याशी लग्न करायला भाग पाडलं. घरच्यांनीही आणखी धिंडवडे नकोत म्हणून निर्णयानुसार लग्न लावून दिलं .तो आता चांगल्या ऑफिसमध्ये,मुंबईत कामाला लागला आहे , त्या कंपनीचं हे घर आहे. मात्र जगासाठी मी त्याची पत्नी असले,तरी त्याच्यालेखी त्याच्या या तुरुंगात बंदिस्त असलेली मी एक कैदी आहे.भाषा येत नसल्यामुळे मी सांगणार तरी कुणाला? "ती खिन्नपणे त्यांना म्हणाली. "थांब,घाबरू नकोस!मी आहे तुझ्या पाठीशी. "अन्नपूर्णा अम्मा तिला धीर देऊ लागल्या.तिच्यातला आत्मविश्वास जागवायचा प्रयत्न करू लागल्या.फोन करून मुलाला त्यांनी लगोलग बोलावून घेतलं आणि पाठोपाठ पोलिसांना!तिच्याशी संवाद साधत मुलाला दुभाष्याची भूमिका वठवायला लावत त्यांनी पोलिसांना तिला या नरकातून बाहेर काढायची गळ घातली. 
"मामी,देवानंच तुम्हाला माझी सोडवणूक करण्यासाठी पाठवलंय. तुमचे उपकार या जन्मात फिटणं अशक्य आहे!" तिथून बाहेर निघेपर्यंत पुन्हा-पुन्हा ती म्हणत राहिली आणि अन्नपूर्णा अम्मा वारंवार ईश्वराची प्रार्थना करू लागल्या . 
महानगरानं देऊ केलेल्या अमर्याद स्वातंत्र्यात महानगर बेभान झालं होतं .महानगरातल्या त्या तिघी आपापल्या पारतंत्र्याच्या शृंखला तोडून मोकळा श्वास घेण्याची आपापल्या परीनं धडपड करीत होत्या. 
____________________________________________________________________
-रश्मी घटवाई ,मुंबई 
९८७१२४९०४७

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी