मेट्रोतल्या बायका :लेख:३७)कुंपण

मेट्रोतल्या बायका :लेख:३७)कुंपण

कुंपण 
-रश्मी घटवाई
हातातला कुरडयांचा साचा बाजूला ठेवून दमलेल्या गीतानं अंमळ विश्रांती घेतली. थोड्या वेळापूर्वी गच्चीवर ऊन चांगलं चटचटत होतं.पाऊस सुरु होण्यापूर्वी उन्हाळ्यातली वाळवणाची कामं व्हायला हवीत म्हणून तिनं निगुतीनं तीन दिवस गहू भिजत घातले होते.ते निगुतीनं वाटून,हिंग-मीठ घालून त्याचा चीक शिजवला होता आणि आता शेवपात्रातून त्याच्या कुरडया पाडण्यात तिची सगळी सकाळ सत्कारणी लागली होती.उरलेल्या थोड्याच सत्वाच्या आता शेवटच्या कुरडया घालून झाल्या की जरा आराम करूया,भाजी पोळी सकाळीच करून ठेवलीये,त्यामुळे जेवून थोडीशी विश्रांती घेऊया."विचार करता करता गीताची नजर आभाळाकडे गेली.तिच्या बंगल्यातल्या गच्चीवरच्या मघा निरभ्र असलेल्या आकाशाच्या तुकड्यात काही चुकार ढग आलेले दिसत होते.तिचा नवरा,मुलं सकाळीच कामावर गेली होती.ते परतायच्या आत,कुरडया वाळल्या की तळून,सगळं साग्रसंगीत स्वयंपाक-पाणी तिला करायचं होतं."खवय्याचं कुटुंब असल्यामुळे हे सगळे प्रकार करायला हुरूप येतो खरा!"ती स्वत:च्यामनाशीच समाधानानं हसली.  
कुरडयांचं काम संपलं,तसं तिनं गच्चीवरून सहज डोकावून पाहिलं,खाली कसलासा आवाज येत होता. समोरच्या रस्त्याच्या कडेला काही मजूर आणि त्यांची कुटुंब,घमेलं,फावडं,लहान मुलं यांच्यासह बसली होती.खाली घातलेल्या पटकुरावर तान्ही पोरं झोपलेली होती.    
राज्यात बाकी सगळीकडे उन्हाच्या तीव्र झळा सुरु असल्या तरी मुंबईतल्या आभाळात करड्या-काळ्या ढगांचे पुंजके विखुरलेले होते.मुंबईभर नालेसफाईची कामं सुरु झालेली होती.त्यावरून होणाऱ्या राजकारणावर तिनं वृत्तपत्रात वाचलं होतं.
दरवाजावरची घंटी वाजली,म्हणून ती गच्चीवरून खाली गेली.तिच्या घराच्या फाटकाशी मजूर,त्याची बायको एक लहान मुलगा आणि खांद्यावर झोपलेलं तान्हं मूल घेऊन उभे होते. 
"गाडी हटानी पडेगी... गटाराचं झाकण तिथेच आहे,त्यावर तुमची गाडी उभी आहे. "मजुरानं तिला म्हटलं ,तशी तिला ब्रम्हांड आठवलं."ही आवाढव्य गाडी चालवणं आपल्याला कधीच जमलं नाही. आपली मजल मारुती एट हंड्रेड पर्यंत!पाहू कुणी शेजारचे दिसतात का .. बोलावूया मदत करायला !"तिनं विचार केला. 
"मॅडम ठंडा पानी होगा,तो दो ना जरा!"तिच्या बंगल्याच्या कुंपणाच्या पलीकडून मजुराच्या बायकोनं तिला विनंती केली."ती जेमतेम पंधरा-सोळा वर्षांची असावी. पण तीन वर्षांचं मोठं मूल ,हे तान्हं मूल असेल नऊ-दहा महिन्यांचं !"बाटलीत थंड पाणी भरून तिला देताना गीता मनातल्या मनात तिचाच विचार करीत होती. अखेरीस महत्प्रयासानं तिनं त्या गटारावरच्या मोठ्या झाकणावरून गाडी बाजूला केली. "सावित्री,गटर तू साफ कर."तिच्या नवऱ्यानं तिला म्हटल्यावर त्यातल्या त्यात सावली शोधून पटकूर अंथरून तिनं कडेवरच्या तान्ह्या मुलाला झोपवलं आणि ती घमेलं आणि फावडं उचलून नवऱ्यानं अवजड झाकण बाजूला केलेल्या त्या गटारातला गाळ उपसू लागली. कुंपणाआडून गीता कुंपणापल्याडचं तिचं काम बघत होती. कुठे म्हणून कुरकुर नव्हती.मघा गीता ज्या सफाईनं आणि तल्लीनतेनं कुरडया घालत होती,त्याच तल्लीनतेनं सावित्री मनापासून आपलं काम करीत होती. "तो गाळ दुसरीकडे कुठे नेऊन टाका ना!अगदी घरासमोर टाकताय ,दुर्गंधी येतेय खूप !"नाकाला पदर लावत गीता तिला म्हणाली. "एवढ्या दुर्गंधीत ती बिचारी काम करतेय. एक चांगलीशी चादर,जुनी पण चांगली साडी आणि मुलांचे शर्ट द्यावे का हिला ?"कपाटातून ते कपडे आणण्यासाठी गीता आत वळली. 
"मॅडम थंड पाणी द्या नं आणखी थोडंसं.आम्हाला या गटाराच्या झाकणासमोर गाळ टाकावा लागतो. त्याचे फोटो घेतले जातील.पण तुम्हाला ही  घाण तुमच्या दारासमोर नको असेल,तर चहापाणी द्या आम्हाला ..पैशे हो !"कुंपणापल्याडून सावित्री कुंपणाअल्याड उभ्या असलेल्या गीताला म्हणाली,तेव्हा ही  एवढीशी पोर चहापाणी आणि पैशाची भाषा बोलते,हे बघून गीताच्या तोंडाची चवच गेली.
"पोटाची खळगी भरायला महानगर काय काय करायला लावतं गोरगरिबांना!"सुस्कारा सोडत गीतानं विचार केला आणि सावित्रीला जुने कपडे देण्याचा बेत रहित करत तिनं आपली गाडी परत जागेवर आणून ठेवली .
                           ************************************** 
मुंबईतल्या त्या वार्डाच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयासमोर प्रचंड गर्दी होती.
"जयेश शाह आता नगरसेवक नाहीत ना?आत्ता कोण आहेत इथले नगरसेवक?मला जरा तक्रार करायचीय. अहो,आम्ही मागच्या महिन्यात समोरच्या सोसायटीत रहायला आलोय,पण नालेसफाईतून काढलेल्या घाणीची तीव्र दुर्गंधी आमच्या पहिल्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये येतेय.. ती घाण काढा म्हणावं मुंबई महानगरपालिकेला लवकरात लवकर... नगरसेवक कोण आहेत?"संतप्त स्वरात बोलत हेमांगी त्या कार्यालयात शिरली.समोर कम्प्युटरवर एक एकवीस-बावीस वर्षांची मुलगी बसली होती. "अहो,तुम्ही जरा माझी तक्रार लिहून घेता का? कोण आहेत हो नगरसेवक ,मला जरा बोलायचंय त्यांच्याशी.. 
"मीच आहे नगरसेविका या वार्डाची. पण सर आता इथे नाहीयेत... त्यांची बहीण आहे इथेच... त्यांच्याशी  बोला तुम्ही!"
अहो,पण नगरसेविका तुम्ही आहात. तुम्हाला सांगतेय ना.. काय नाव तुमचं ?"हेमांगी म्हणाली. 
"लीना.. सर आता इथे नाहीयेत... त्यांची बहीण आहे इथे...प्लिज त्यांच्याशी  बोला तुम्ही!"
"लीना मॅडम,नगरसेविका तुम्ही आहात..मी माजी नगरसेवकाशी का बोलू?हेमांगी म्हणाली. अनेक महिला सरपंचपदी निवडून आल्या असल्या तरी त्यांचे नवरेच प्रत्यक्ष कारभार बघतात,राजकारणात महिलांना नावापुरते पुढे करून त्यांच्या आडून त्यांचे नवरेच कार्य करीत असतात,ह्या साऱ्या कहाण्या तिच्या डोळ्यांपुढे तरळल्या .कुंपणावर बसलेल्या त्या महिला,कुंपणाच्या बंधनात अडकलेल्या.अगदी त्याच प्रकारचं कुंपण या नुकत्याच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या लीनावर पण घातलं गेलंय तर!" हेमांगीनं विचार केला. "मी मात्र अधिकृतपणे तुम्हालाच माझं लेखी निवेदन देतेय. "तिनं ठासून म्हटलं आणि आणलेला कागद तिच्या सुपूर्द केला. 
महानगर अक्राळविक्राळ वाढत होतं. नाना प्रकारची कुंपणं त्या महानगराला,महानगरातल्या लोकांना  वेढू बघत होती. 
____________________________________________________________________
-रश्मी घटवाई,मुंबई 
९८७१२४९०४७        

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी