मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख ३४)​​​​शेजारी

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख ३४)​​​​शेजारी
शेजारी 
-रश्मी घटवाई 

त्या उंच इमारतीकडे जातानाच आरतीचा जीव दडपला होता.तिचं सगळं बालपण दिल्लीतल्या विस्तीर्ण आवार असलेल्या प्रशस्त घरात गेलं होतं.दिल्लीत आता आतापर्यंत गगनचुंबी इमारती नव्हत्याच. बंगले,बैठी घरं ह्यांचं जिथे प्रस्थ होतं ,तिथे आता अनेकमजली इमारती उभ्या रहात होत्या.अधूनमधून फिरायला आईबाबांबरोबर ती मुंबईला गेली होती,तेव्हा तिथल्या अनेक मजली उंच  इमारती बघून तिला फार आश्चर्य वाटलं होतं आणि सगळ्यात वरच्या मजल्यावर रहाणाऱ्याला खाली वाकून पाहायचं झालं तर किती भीती वाटेल,याचा तिच्या बालमनाला विचार करतानासुद्धा खूप त्रास झाला होता. मुंबई तर बदलली होतीच;पण दिल्लीही काही आता तिच्या लहानपणी होती तशी राहिली नव्हती. स्वतः आरतीसुध्दा लहानाची मोठी होऊन लग्न होऊन दोन मुलांची आई झाली होती.आयटी क्षेत्रात असलेल्या तिच्या नवऱ्यानं नोकरी बदलल्यानं त्याच्या  कामाच्या ठिकाणी किंवा निदान जवळपास चांगला फ्लॅट भाड्यानं घेऊन राहता येईल,असा विचार करून आरती नवऱ्यासह ग्रेटर नोएडातल्या त्या परिसरात आली होती. बहुमजली इमारतींचे पुंजकेच्या पुंजके तिथे विखुरले असले तरी दूरवर दिसणारं मोकळं आकाश,स्वच्छ -शुद्ध मोकळी हवा आणि हिरवाईनं नटलेला तो परिसर असल्यामुळे महानगरापासून दूर असलेल्या पण महानगराचाच एक भाग असलेल्या त्या ठिकाणी राहणं आपल्या मुलांसाठी हिताचं असेल असा तिनं आणि तिच्या नवऱ्यानं विचार केला होता . 
"आपण ज्या इमारतीत जातो आहोत,ती आणि बाजूच्या आणखी दोन इमारती तीस तीस मजली आहेत.तिथे बरेचसे विदेशी नागरिक राहतात,"त्यांना फ्लॅट दाखवायला आलेल्या प्रॉपर्टी डीलरनं त्यांना सांगितलं,"इसी टॉवरमें अमेरिका,ब्रिटेन,आफ्रिका,पाकिस्तान,इन देशोंसे दिल्लीमें पोस्टिंग पर आए हुए कई लोग रहते हैं और तो और,जिस फ्लॅट को हम देखने जा रहे हैं,वह एक फिल्मस्टार का फ्लॅट है. उसके साथ जो फ्लॅट है,मैंनेही कल दो फॉरेनर्स को किराये पर दिया है."
"फिल्म स्टारचा फ्लॅट ?"किंचित चमकून आरतीनं त्याला विचारलं . 
"हो,नोएडा ,ग्रेटर नोएडा मध्ये बऱ्याच फिल्म स्टार,टीव्ही स्टार लोकांनी आर्थिक गुंतवणूक म्हणून फ्लॅट्स घेऊन ठेवलेत." प्रॉपर्टी डीलरनं अनावश्यक,अतिरिक्त माहिती सांगून दोघांना इम्प्रेस करायचा प्रयत्न केला.
अखेर फिल्म स्टारचा फ्लॅट म्हणून नव्हे;पण चांगला फ्लॅट असल्यामुळे आरतीनं आणि तिच्या नवऱ्यानं तो अकरा महिन्यांच्या भाडेकरारावर घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तिथे सामानासह ते सगळे रहायलाही गेले. सुदैवानं आरतीच्या मुलांना आपल्या वयाची भरपूर मित्रमंडळीपण खेळायला मिळाली.
"वो बाजूवाले अंकल आज हमसे बात कर रहे थे."आरतीच्या मुलांनी संध्याकाळी खेळून आल्यावर एक दिवस तिला सांगितलं. 
"बाजूवाले अंकल?"गोंधळून आरतीनं विचारलं . 
"बाजूवाले अंकल... वो हमारे साथ कल क्रिकेट खेलने भी आए थे."मुलांनी सांगितलं .मुंबईतल्यासारखी बंद दारांची संस्कृती सर्वत्र रुजल्यामुळे बाजूच्या घरात कोण राहतंय,कोण काय करतंय वगैरे कुणाला माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता.आणि आरतीच्या मजल्यावर तिच्या विंगमधले इतर तिघे भाडेकरी प्रॉपर्टी डीलरच्या माहितीनुसार परदेशी नागरिकच होते.सगळ्यांच्या कामावर जाण्या-येण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे क्वचितच कुणाची भेट घडायची . 
"मम्मा,ये बाजूवाले अंकल अच्छा क्रिकेट खेलते हैं,"मुलांनी तिला सांगितलं,"उनकी नाक बहुत लंबी है और वो भी बहुत लंबे हैं."आरतीनं मनोमन त्या वर्णनाबरहुकूम त्या व्यक्तीचं चित्र रंगवलं.मुलांनी त्या शेजाऱ्याचं केलेलं बाजूवाले अंकल हे नामाभिदान पण तिला खूप आवडलं.
मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यावर दर वर्षीप्रमाणे आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून आरतीच्या नवऱ्यानं आपल्या कुटुंबाला जवळच्या हिलस्टेशनवर आठवडाभरासाठी नेण्याचा कार्यक्रम आखला.
"यंदा आपल्याला वेगळ्या हिल स्टेशनवर जाण्याची गरजच नाहीये. इथेच इतकी मस्त हवा येते,बाजूला पायवाट आणि शेतं पण आहेत,"आरती म्हणाली,तशी मुलांनी नाराजी व्यक्त केली. "अगं ,इतर नवरे आपल्या कुटुंबाला फिरायला नेत नाहीत,म्हणून त्यांच्या घरातले लोक त्यांच्यावर नाराज होतात. आपल्याकडे उलटंच आहे!"नवऱ्यानीही कुरकुर केली.अखेरीस ठरल्यानुसार ते सगळे हिलस्टेशनवर  मुक्कामाला गेले. 
"मम्मा,पापा,बाजूवाले अंकल की फोटो!"एका सकाळी वडिलांच्या हातातल्या वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावरचं छायाचित्र लांबूनच बघून आरतीची मुलं ओरडली,"त्यांचं लांब ,मोठठं नाक आणि त्यांची उंची ह्या फोटोतपण दिसतेय." त्यांच्या बाबांनी अद्याप वर्तमानपत्र वाचलं नव्हतं.चहा पीत वर्तमानपत्र वाचायचं आणि सकाळी तयार होऊन,खाऊन पिऊन भटकंतीला निघायचं आणि पुन्हा दुपारी उशिरा जेवायला परत यायचं,आराम करून पुन्हा थोडंसं फिरून यायचं, टीव्ही बघायचा असा त्यांचा कार्यक्रम असायचा."बाजूवाले अंकलने क्या क्रिकेट में कुछ किया है क्या ?" उत्सुकतेनं मुलांनी विचारलं ,तसं त्यांच्या बाबांनी बातमी वाचायला सुरुवात केली.वाचतावाचता त्यांचा चेहरा गंभीर झाला."बेटा ह्या बाजूवाले अंकलपासून लांबच रहायचं बरं का!हा माणूस साधासुधा नाही, दहशतवादी आहे.टेररिस्ट आहे.शेजारच्या देशातून इथे आलाय आणि नाव बदलून रहातोय.सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कोवळ्या वयाच्या मुलांशी संधान साधून किंवा मग त्यांच्याशी क्रिकेट खेळून मैत्री करायची आणि घातपाती कामं करायला त्यांना प्रवृत्त करण्यासाठी प्रशिक्षणासाठी पाठवायचं अशा प्रकारचं काम तो लपून छपून इतके दिवस करीत होता.आपल्या गुप्तचर यंत्रणेनं त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली होती.तो जिथे भाड्यानं रहात होता,त्या फ्लॅटमधून म्हणजे आपल्या बाजूच्या फ्लॅटमधून त्याला पकडण्यात आलंय आणि आता त्याच्याचबरोबर,संशय येऊन आपल्याच इमारतीत आपल्याच मजल्यावर राहणाऱ्या,आफ्रिकेतल्या एका देशाचा नागरिक असलेल्या आणि ग्रेटर नोएडामध्ये शिकणाऱ्या एका- तथाकथित विद्यार्थी असलेल्या-तरुणाला ड्रग्जची तस्करी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडलंय.तो म्हणे कुख्यात आंतरराष्ट्रीय तस्कर आहे."  
"अरे देवा !कसले शेजारी लाभले होते आपल्याला!आणि त्यांचे घरमालकपण बघा,त्यांची कसलीही माहिती नं काढता,कसलीही खातरजमा नं करून घेता,घरभाड्याचे पैसे मिळण्याच्या मोहापायी त्यांनी कसल्या प्रकारच्या लोकांना आपापली घरं दिली होती ते!आणि कमाल आहे!आपल्याला किंवा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इतरांना त्यांच्या ह्या वाईट कामाचा वास सुद्धा आला नाही कधी!"आरतीनं नवऱ्याला म्हटलं. मुलं बावरली होती.त्या सगळ्या गोष्टींचं पुरतं आकलन होण्याइतकं त्यांचं वय नव्हतं,पण हे बाजूवाले अंकल वाईट्ट काम करतात,आपण त्यांना ओळखही दाखवायची नाही,हे त्यांच्या बालमनाला कळलं होतं . 
"एकेकाळी आपल्या शेजाऱ्याकडे कोण आलं ,कोण गेलं ,कोण काय करतं ,याची बातमी त्यांच्या शेजाऱ्यालाच नव्हे,तर संबंध आळीला असायची.घरात काही चांगला पदार्थ शिजला,की शेजाऱ्यांकडे पाठवला जायचा.आजही गावात कुणाला काही लागलं;गरज पडली,तर नातेवाईकांच्या आधी शेजारी धावून जातात मदतीला.महानगरांनी शेजार संपवला.शेजारी संपवले आणि शेजारधर्मपण संपवला . " आरतीच्या नवऱ्यानं आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आणि चुकचुकत आरतीनं त्याला दुजोरा दिला. 
"चला,आपला ह्या हिलस्टेशनवरचा आज शेवटचा दिवस आहे.उद्या आपल्याला महानगरात परतावं लागणारच आहे,पण वर्षभर काम करण्यासाठी इथून पुरेशी ऊर्जा घेऊन,ताजंतवानं होऊन!आपण आपला इथला शेवटचा दिवसपण छान घालवूया ना! "तिनं म्हटलं,तशी मुलं आनंदानं उड्या मारत भटकंतीसाठी तयारी करू लागली.
महानगर आपल्या गतीनं गरगर फिरत होतं.महानगरात चालणाऱ्या कृष्णकृत्यांची अक्राळविक्राळ छाया महानगरावर पडली होती.मात्र दूरवरच्या त्या हिलस्टेशनवर महानगराची सावली निदान एवढ्यात तरी पडणार नव्हती. 
                                         *************************************
"केदार,मुंबईतल्या आपल्या त्या घराचं काय करायचं?"आभानं नवऱ्याला विचारलं."आत्ता आपण भारतात जातोच आहोत,काही तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे."
"खरंय !पण आपली भावनिक गुंतवणूक तर आहेच ना त्यात !तुझं काय म्हणणं आहे?"केदारला इतकी वर्षं होऊनही घराबाबतीत निर्णय घेता येत नव्हता,तसाच आभालाही !केदार नोकरीत लागताच मुंबईत जागतिक बँकेच्या गृहप्रकल्पाची जाहिरात आली आणि त्यानंही सहज म्हणून त्यासाठी अर्ज केला. सोडतीच्या दिवशी तिथल्या महाप्रचंड गर्दीच्या रेट्यात त्याचा नंबर आणि नाव घोषित झालं ,तेव्हा त्याच्या कानांवर त्याचा विश्वास बसेना.मुंबईसारख्या महानगरात त्याला चक्क छोटा का होईना,भूखंड लाभला होता.तेही नोकरीत लागताच लगेचं.पाठोपाठ लग्नही झालं.त्याच्या बाबतीत तरी सुखाची त्रिवेणी त्याच्याकडे अवतरली होती. त्या भूखंडावर अनेक सव्यापसव्यानंतर चार पाच वर्षांनंतर एक सुबक नेटकं घरकुलही त्यानं उभं केलं.आणि तेवढ्यात आणखी एक सुवर्णसंधी त्याच्याकडे चालत आली. 
"आमची काळजी करू नकोस केदार!हे सेवानिवृत्त व्हायला अजून चार वर्षं आहेत.आणि नवनवीन आव्हानं स्वीकारायचं तुझं वयंच आहे रे!तू निश्चित मनानं लंडनमधली पोस्टिंग घे!"त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं,"तुझ्या त्या बंगल्याला मात्र कुलूप लावून ठेवावं लागणार!आम्ही आपले नागपुरातच बरे!आणि सेवानिवृत्तीनंतर यांना संघाची आणि मला समितीची कामं करायची आहेत ना!"
"मुंबईत असं बंगल्याला कुलूप लावून जाणं धोकादायक तर आहेच,पण भाड्यानं बंगला देणंही धोकादायक आहे. लोकांनी घरं हडपल्याच्या घटना घडल्या आहेत."आभानं केदारला म्हटलं होतं."हे घर उभं करायला आपण किती परिश्रम केलेत,पण त्याची फळं मात्र चाखता येत नाहीयेत!ह्या परिसरातला आपला पहिला बंगला.सध्या तरी आजूबाजूला कुणाची घरं उभी नाहीयेत,कुणी शेजारी नाहीयेत.पुढे आपल्या अपरोक्ष काय होईल,कोण जाणे!"केदारनंही आभाच्या सुरात सूर मिसळला. अखेरीस बंगल्याला कुलूप लावून दोघे लंडनला रवाना झाले आणि काही काळ तिथलेच झाले. भारतभेटीत त्या बंगल्याची रंगरंगोटी ,दुरुस्ती नेमानं होत होती,सगळे कर,वीज-पाण्याची बिलं आगाऊ भरली जात होती. पुढे मागे कायमचे भारतात परतू ,तेव्हा रहायला हक्काचं घर आहे ह्या दिलाशावर दोघांचं घराशी भावनिक नातं कायम होतं . 
"बघता-बघता आपण सतरा-अठरा वर्षं इथे काढलीत. कुटुंब वाढलं नाही म्हणा,किंवा आपण वाढू दिलं नाही म्हणा.आईबाबांनी पण आता सत्तरी ओलांडली आहे.मीच आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचणार आहे लवकरच!दोघांना आयुष्यभर पुरेल एवढा पैसा आहे ,कसले पाश नाहीयेत. आपण भारतात परतूया आता,"एक दिवस केदारनं घोषित केलं,"का कोणास ठाऊक;पण आपली माती आपली माणसं साद घालताहेत आता!"
अखेर सगळी निरवानिरव करून दोघे भारतात परतले आणि नागपूर भेटीनंतर मुंबईतल्या आपल्या घरी आले.तिथला परिसर आमूलाग्र बदललेला होता. मूळ मालकांनी आपापले भूखंड किंवा घरं विकून टाकली होती आणि लोकांनी घरात वाटेल तशी अनधिकृत बांधकामं करून त्या परिसराचा चेहरामोहरा विद्रूप करून टाकला होता.केदारच्या आजू-बाजूच्या दोन्ही मालकांनी घरं विकून टाकल्यामुळे नवे अनोळखी रहिवासी तिथे राहायला आलेले होते आणि त्यांनी चक्क केदारच्या घरात आपापले डिश अँटेना लावले होते,त्याच्या अंगणात आपापल्या अनधिकृत बांधकाम केलेल्या अजस्त्र खिडक्या काढलेल्या होत्या.आणि भरीसभर आपापल्या कुंडया आणि वाहनं केदारच्या घराच्या हद्दीत ठेवलेली होती. 
केदारनं आणि आभानं विनम्रपणे आपल्या त्या शेजाऱ्यांना त्यांचं सामान स्वतःच्या घरांच्या हद्दीत ठेवण्याची विनंती केली होती. 
"ह्या शेजाऱ्यांपैकी एकानं चक्क रा.स्व. संघाचं नांव आपल्या घराला दिलंय. संघाचे लोक आपल्या शेजाऱ्यांना असा त्रास देतात का?लोकांच्या घरात अतिक्रमणं करतात का?दुसऱ्यांच्या घरात आपला डिश अँटेना लावतात का? रा.स्व.संघाचं नांव खराब करताहेत हे गृहस्थ!"आभानं त्राग्यानं केदारला आणि फोनवरून सासूसासऱ्यांना म्हटलं होतं,"आणि ह्या दुसऱ्या शेजाऱ्यांनी आपण मुंबईतल्या अमुकअमुक बापूंचे अनुयायी म्हणून घोषित केलंय,त्यांचा मुलगाही त्यांच्याकडे काम करतो म्हणून सांगितलंय,ते रस्ताभर ठेवलेल्या,अडथळे निर्माण करीत असलेल्या आपल्या कुंड्या  हटवायला नकार देताहेत.शेजाऱ्यांना त्रास द्या अशी हे बापू आपल्या शिष्यांना शिकवण देतात का,हे त्यांना कुणीतरी विचारायला हवं."
"महानगरांमध्ये शेजारधर्म औषधालाही शिल्लक नसल्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे!"सासूबाईंनी आभाला म्हटलं होतं,"आपल्याकडे सरकारदरबारी अशी कुठली यंत्रणाच नाहीये गं !अन्यथा ही बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणं काय संबंधित सरकारी यंत्रणांना दिसत नाहीत?ही डोळेझाक मोठी अर्थपूर्ण आहे बरं !"
 "हे लंडन भले नसेल,पण लोकांच्या तक्रारीची दाखल घेणारं एक व्यासपीठ आणि त्यावर तत्परतेनं काम करणारं ग्रीव्हन्स रिड्रेसल फोरम कार्यान्वित करण्याची मुंबईत नितांत आवश्यकता आहे. "केदारनं आभाला म्हटलं होतं . 
"आपण असं करूया,आपल्याजवळ आता वेळंच वेळ आहे,आपणच मुंबईत ग्रीव्हन्स रिड्रेसल फोरम सुरु करूया आणि तक्रारींचं निराकरण होण्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून तक्रारींचा पाठपुरावा करूया!"आभा म्हणाली, "चला,शुभस्य शीघ्र
म् !माझ्याच तक्रारीनं आपण शुभारंभ करूयात!" आभा म्हणाली. 
शेजारधर्माला आणखी तिलांजली देत बाजूच्या शेजाऱ्यांनी आपला कचरा बिनदिक्कतपणे  आभा-केदारच्या घराच्या हद्दीत आणून लोटला आणि निर्विकारपणे कुंड्यांमधल्या झाडांना भरपूर पाणी घालून चिखलाचे ओघळ मुक्तपणे आभा-केदारच्या घराच्या अंगणात वाहू दिले. 
महानगर आपल्या गतीनं जात होतं.महानगरातली माणुसकी,शेजारधर्म,चांगुलपणा वगैरे गुण त्या गतीच्या वरवंट्याखाली कधीचेच भरडून निघाले होते . 
____________________________________________________________________
-रश्मी घटवाई ,मुंबई 
९८७१२४९०४७        

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी