मेट्रोतल्या बायका :लेख:३५)​​​​कोsह​​​​​म्

​​मेट्रोतल्या बायका :लेख:३५)
कोsह​​​​​म्
-रश्मी घटवाई 

श्रुतीनं आपला मेकअप नीट असल्याची खात्री केली आणि ती बातम्या देण्यासाठी टीव्ही स्टुडियो मध्ये शिरली.इतक्या टीव्ही चॅनेल्सच्या पसाऱ्यात आणि अगणित टीव्ही रिपोर्टर्स आणि न्यूज रीडर्सच्या गोतावळ्यातही श्रुतीनं अल्पावधीत न्यूज बघणाऱ्या लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. अहंगंडाचा लवलेश नसलेलं पण आत्मविश्वास झळकणारं श्रुतीचं सोज्ज्वळ ,सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि स्वच्छ शब्दोच्चारण यानं तिनं लोकांना जिंकलं होतं.तिचा चाहतावर्ग ती सादर करीत असलेल्या प्राईमटाईम न्यूजसाठी दोन-चार मिनिटं आधीच टीव्हीच्या पुढ्यात येऊन बसलेला असतो,याची तिला जाणीव होती.स्टुडियोत बातम्या वाचत असतांना अगदी काहीही होऊ शकतं,आगंतुकपणे स्टुडियोत शिरून न्यूज रीडरच्या पायात घोटाळलेलं मांजर,घोंघावणारी माशी वगैरे गोष्टीन्यूज रीडर इतक्याच टीव्हीच्या पुढ्यात बसलेल्या प्रेक्षकांना पण त्रास देतात,ह्या घटना पूर्वी घडल्याचं तिनं ऐकलं होतं.फार पूर्वी म्हणजे एकुलतं एक चॅनेल असायच्या काळात टीव्हीवर एका उद्घोषिकेनं चुकीची घोषणा करून वर चूक लक्षात येताच बोलता बोलता जीभ काढून डोक्यावर हात मारून घेतल्याचं तिच्या आईकडून ऐकल्यावर तर ती बातम्या वाचताना अधिकच काळजी घेऊ लागली होती.तांत्रिक सोपस्कार पार पडल्यानंतर ती लाईव्ह बातम्या देऊ लागली.बातम्या अर्ध्यात आल्या असताना अचानक एक ब्रेकिंग न्यूज आली. "घटनास्थल से हमारे रिपोर्टर ब्रेकिंग न्यूज दे रहे हैं.आईये देखते हैं खबर!"आपल्या बातम्या थांबवून श्रुतीनं रिपोर्टरचा फोटो पडद्यावर दिसेपर्यंत प्रसंगावधान राखून कुणालाच माहित नसलेल्या घटनेबद्दल,वावगी वाटणार नाहीत,अशी दोनचार वाक्य आपल्या मनानं सांगितली. तेवढ्यात रिपोर्टर फोनवर बातमी देऊ लागला.त्या चॅनेलची ओबी व्हॅन,कॅमेरामन आणि रिपोर्टर नोएडातल्या एका निर्मनुष्य रस्त्यावरून येत असताना नेमकी त्यांच्या डोळ्यांदेखत एक घटना घडली.दुबळ्या शरीरयष्टीच्या एका दहा-बारा वर्षांच्या असहाय्य्य गरीब मुलीला पंधरा सोळा वर्षांचा आडदांड शरीरयष्टीचा दांडगट मुलगा त्रास देत फरफटत नेत होता आणि ती त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी जिवाच्या आकांतानं धडपड करीत होती. योगायोगानं त्याच रस्त्यानं ऑफिसमधून घरी परतत असलेल्या, मोटरसायकलवर स्वार असलेल्या एका कम्प्युटर इंजिनीअरनी थांबून त्याला हटकल्यावर त्यानं त्याच्यावर चाकूनं वर केला होता आणि तो रिपोर्टर घटनास्थळी धावून गेल्यावर त्यालाही त्या गुंड मुलानं जखमी केलं होतं.एवढ्या गदारोळात दोघांना जखमी अवस्थेत टाकून आणि त्या गरीब असहाय्य्य मुलीला मारपीट करून तिथेच सोडून देऊन कम्प्युटर इंजिनीअरची मोटरसायकल हिसकून घेऊन तो गुंड मुलगा त्यावर बसून सुसाट वेगानं ग्रेटर नोएडाच्या रोखानं फरार झाला होता.कहर म्हणजे ह्या धावपळीतसुद्धा ती संबंध घटना प्रसंगी कॅमेरा वेडावाकडा धरला जात असला,तरी कॅमेरामननी आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती.त्याहून महत्वाचं म्हणजे अन्य कुठल्याही चॅनेलवर नसून केवळ त्यांच्याच चॅनेलवर त्या घटनेची बातमी दाखवली जात होती.श्रुतीच्या काळजाचा एक ठोका चुकला.तिचा नवरा कम्प्युटर इंजिनीअरच होता,नोएडातल्याच एका मोठ्या कंपनीत काम करीत होता,आणि त्यालाही ऑफिसमधून घरी परतायला रोज उशीर होत होता.रात्री नऊ वाजता तो ज्या रस्त्यानी यायचा,तिथे शुकशुकाट असायचा,हे त्यानी श्रुतीला पूर्वी सांगितलं होतं आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला श्रुतीनं त्याला दिला होता,हे सगळं निमिषार्धात श्रुतीच्या मनात येऊन गेलं ."न्यूज रीडरच्या मनात भावनांचे कल्लोळ उमटायला नकोत आणि तिच्या मनातले विचार आणि काळजी तिच्या चेहऱ्यावर दिसायला नको."श्रुतीनं स्वतःलाच बजावलं,तरी ते विचार तिचा पिच्छा सोडीनात ... अद्याप व्हिज्युअल्स दाखवले जात नव्हते.जखमी झालेला रिपोर्टर त्याही परिस्थितीत फोनवर त्या घटनेचं वर्णन करीत होता.पोलिस अद्याप घटनास्थळी आले नव्हते. 
"काही दिवसांपूर्वीच एका न्यूज रीडरवर असाच प्रसंग आला होता,अपघातग्रस्त झालेल्या वाहनाची आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्याची बातमी तिला द्यावी लागली होती आणि कर्मधर्मसंयोगानीमृत्युमुखी पडलेला तो तिचा पती होता आणि अपघातग्रस्त झालेलं ते वाहन म्हणजे त्यांची कार होती. कमालीचा संयम राखून त्या न्यूज रीडरनं ती बातमी दिली होती आणि स्टुडियोबाहेर येताच ती दु:खावेगानं कोसळली होती.." तिच्या मनात विचार आला.व्हिज्युअल्स नं बघताही,जखमी झालेला तो कम्प्युटर इंजिनीअर म्हणजे आपला नवराच असणार,याची तिला खात्रीच वाटत होती."आणि मग नं जाणो,आपला बांध फुटला तर?"तिच्या मनात शंकेचं काहूर माजलं होतं .एकेक क्षण एकेका वर्षासारखा भासत होता.तिचं चॅनेल लगोलग त्या घटनेला लोकांपर्यंत  पोहोचवण्याची पराकाष्ठा करीत होतं. जाहिरातींचा ब्रेकसुद्धा चॅनेलनं रद्द केला होता.घडल्या प्रसंगाबद्दल ऊहापोह करणारा,लेकीबाळींना  समाजात सुरक्षितपणे वावरणं किती कठीण झालंय याची आणि अशा प्रसंगी हस्तक्षेप करणाऱ्यांच्या प्राणांवर बेतू शकते म्हणून तेही असुरक्षित असल्याबद्दलची कारणमीमांसा करणारा, त्या विषयाशी संबंधित मान्यवरांना बोलावून त्यावर चर्चा घडवून आणणारा आणि समाजमनाला अंतर्मुख करायला लावणारा एक कार्यक्रम बातम्यांनंतर लगोलग होणार असल्याची आणि त्याचं अँकरिंग श्रुती करणार असल्याची चॅनेलनं लगेच घोषणाही करून टाकली.क्षणार्धात त्या घटनेची व्हिज्युअल्स दाखवली जाऊ लागली.तिची भीती सार्थ ठरली.त्या लहान मुलीवर होत असलेला अत्याचार पाहून तिला वाचवायला गेलेला तो कम्प्युटर इंजिनीअर म्हणजे तिचा नवराच निघाला.तिच्याच्यानं जखमी झालेल्या त्याला बघवेना.बातम्या देणं सोडून तिला तिथून पळून त्याच्याजवळ जावंसं वाटलं,पण अशी जबाबदारी झटकून थोडीच तिला जात येणार होतं ?"चॅनेल सगळी धावपळ करून थोड्या वेळानं कदाचित या सगळ्यांना स्टुडियोत आणेल,तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असेल?मी नेमकी कोण?  कोsह​​​​​म्?त्या जखमी माणसाची पत्नी,की अलिप्तपणे चर्चा घडवून आणणारी,आपल्या भावना आतल्या आत लपवून वरपांगी निर्विकारपणा पांघरून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी चॅनेलची न्यूज अँकर?"
व्हिज्युअल्स दाखवले जात होते तोवर पाण्याचे घोट घेत श्रुतीनं आपल्या भावनांना आवार घातला. "भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ !देशाच्या सीमेवर जातांना सैनिकांना त्यांच्या पत्नी शूरवीरपणे साथ देतातच ना!आपण जर हिम्मत हारलो,तर अशानं स्त्रियांवर अत्याचार होताना बघून त्यांची मदत करायला पुढे यायला कोणी धजावणार नाही.उलट,आपण गुन्हेगाराला पकडून देण्यासाठी आणि पुढेहीस्त्रियांवर अत्याचार होऊ नयेत,म्हणून आवाज उठवला पाहिजे.त्या लहान मुलीला वाचवायला गेलेल्या नवऱ्याचं कौतुक केलं पाहिजे,तसंच त्या रिपोर्टरचं आणि कॅमेरामनचंही."श्रुतीनं विचार केला आणि ती उर्वरित बातम्या संपवून आत्मविश्वासानं पुढच्या,स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यक्रमासाठी सज्ज झाली.
                                      ****************************************
"मॅडमजी,एक फोन करना था,"अनितानं मालकीणबाईंना विनवलं,"देर हो गयी है ना!रात के साढे नौ बज रहे हैं मॅडमजी !देखती हूँ पति मुझे लेने आते हैं या मुझे अकेली को ही घर जाना पडेगा!" मालकीणबाईंनी परवानगी देत तिला फोन दिला.तिनं स्वतः जवळचा चुरगळलेला कागद काढला. त्याच्यावर तिच्या नवऱ्याचा मोबाईल नंबर लिहिलेला होता ."आप ही लगा दो ना मॅडमजी,मुझे पढना -लिखना नहीं आता !"मालकीणबाईंनी अनेकदा नंबर लावूनही तिच्या नवऱ्यानं फोन काही उचलला नाही,तशी ती हिरमुसली."कोई नहीं ,चली जाऊंगी!"तिनं उसनं अवसान आणून म्हटलं .
अनितानं रात्रीच्या स्वयंपाकाचं हे नवं काम धरलं होतं.सकाळी दोन घरी स्वयंपाक आणि केरवारे-पोछा करण्याचं,भांडी घासण्याचं तिचं काम होतंच.नवऱ्याला काम नसल्यामुळे तो घरीच असायचा.त्या तेवढ्या पैशात नोएडातल्या बावीस सेक्टर मध्ये घेतलेल्या एका खोलीचं घरभाडं,वीज-पाण्याचा खर्च, कुटुंबियांच्या पालनपोषणाचा खर्च भागवणं कठीण होऊ लागलं होतं.शेवटी तिनं नवऱ्याच्या मिनतवाऱ्या करून,मालकिणींकडून उचल घेऊन नवऱ्याला किरायानं हातगाडी घेऊन देऊन ऐन बारा-बाईसच्या,प्रचंड वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर केळी विकायला बसण्याची सोय करून दिली होती. त्याच्या बाजूलाच पाणीपुरीवाला पण बसायचा.रात्रीपर्यंत केळी विकली जायची,की मग किरायानं घेतलेली हातगाडी परत करून बाजूच्या पाणीपुरीवाल्यासह त्याची पावलं दारूच्या दुकानाकडे वळायची . अनितानं लाख विनंत्या करूनही तो कमावलेले सगळे पैसे आपल्या व्यसनावर उडवत होता. तिची लेक आशा आता मोठी होऊ लागली होती. निदान तिच्यासाठी आपण आता घरातच न्हाणीघर,शौचालय असलेली मोठी खोली घ्यायला हवी,अशी तिची तगमग सुरु होती."ऐसे कमरे का किराया भी ज्यादा होगा!पण आणखी मेहनत करायची माझी तयारी आहे!"तिनं नवऱ्याला सांगितलं होतं ,पण नशेत चूर असलेल्या नवऱ्याच्या कानात ते शिरलंच नाही,म्हणून ती खिन्न झाली. अखेर तिनंच कंबर कसली. 
रात्रीच्या स्वयंपाकाचं नवं काम तिनं स्वतःच्याच बळावर मिळवलं; तसंच हवी असलेली मनासारखी, घरातच न्हाणीघर,शौचालय असलेली मोठी खोलीही .                   
तिच्या मालकीणबाईचंच हृदय द्रवलं "थांब !साहेब आणि मी तुला गाडीनं तुझ्या घरी सोडून देतो.असं कर,तू स्वतःसाठी आणि तुझ्या घरच्यांसाठीपण जरा आठ-दहा पोळ्या लाटून घे .भाजी,लोणचं पण ह्या डब्यात भरून घे!आता घरी जाऊन कुठे स्वयंपाक करशील? उद्या मात्र वेळेवर ये आणि वेळेवर नीघ बरं का!घरी कोणकोण आहे गं तुझ्या ?"मालकीणबाईंनी आस्थेनं विचारलं . 
"दहा वर्षांची मोठी मुलगी आहे. आणि सहा वर्षांचा मतिमंद मुलगा.मी कामावर जाते,तेव्हा मुलगीच सांभाळते त्याला.त्याला बोलता येत नाही,पण बहिणीची पुरती ओळख आहे त्याला.एरवी काही बोलणार नाही,पण त्याच्या दीदीला कोणी काही बोललं,वा त्रास दिला की तो धावून जातो तिच्या मदतीला !"
"अरेरे !काळजी घे हं त्याची!परमेश्वरावर श्रध्दा ठेव,सगळं नीट होईल."मालकीणबाईंनी मृदुपणे म्हटलं. 
"भगवान का ही सहारा है मॅडमजी !आप जैसे मदद करनेवाले लोग मिल जाते हैं.नवरा काहीच कमवत नव्हता,त्याला केळी विकायच्या कामाला लावलं,पण तो कष्टाची कमाई व्यसनावर उडवतो आहे." सहृदयी मालकीणबाईंनी खरंच मनापासून मदत केली,पण आपण इतकं हळवं होऊन नको इतकं आपल्याबद्दल सांगितलं म्हणून अनिता हळहळत राहिली."त्यांच्या चांगुलपणाचा असा फायदा घेणं योग्य नव्हे!"घरी पोहोचल्यावरसुद्धा तिच्या मनातले विचार थांबत नव्हते. नवरा अद्याप घरी पोहोचला नव्हता.मुलं तिची वाट बघून बघून कंटाळली होती.भुकेल्या पोटी पेंगत होती.तिनं घाईघाईनं मालकिणीनी दिलेल्या डब्यातलं अन्न काढून आधी मुलांना जेवू घातलं.तेवढ्यात दारावरची कडी वाजली.बाहेर दारू पिऊन झिंगलेल्या तिच्या नवऱ्याला पोहोचवायला तो पाणीपुरीवाला आणि त्याचा रासवट,दांडगट दिसणारा पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा,दोघे आले होते.अनिताची मान शरमेनं खाली झुकली.अशी शोभा पूर्वी कधीच झाली नव्हती.तिला त्या पाणीपुरीवाल्याचा मुलगाही आवडला नाही. सारखा तो तिच्या मुलीकडे बघत होता,तेही तिला आवडलं नाही. "मेरा बाप गोलगप्पे बेचता है , इसलिये मुझे भी सभी गोलगप्पा बुलाते हैं ."अगदी सहज स्वरात आपल्या पित्याचा एकेरी उल्लेख करत गरज नसताना त्यानं जाताजाता माहिती दिली,ते तर तिला मुळीच आवडलं नव्हतं .पण ते ऐकून कसं कोण जाणे,तिचा मुलगा वारंवार एकच शब्द उच्चारू लागला होता -गोलगप्पा!गोलगप्पा !!
"आशा,हा गोलगप्पा कधी आलाच आपल्याकडे,तर दार उघडायचं नाही!आणि बाहेर कोण आलंय,ते खिडकीला लावलेल्या पडद्याआडून आधी बघायचं,मी असेन,बाबा असतील,तरंच दार उघडायचं हं बाळा !" धास्तावून अनितानं आपल्या मुलीला सांगितलं होतं.आपल्या कृश,दुबळ्या शरीरयष्टीच्या, तरीही अतिशय सुंदर दिसणाऱ्या ,छल -कपट माहीत नसलेल्या साध्यासुध्या लेकीला समाजाच्या दुष्ट नजरांपासून वाचवण्याचं एक  नवं संकट आता तिच्या पुढ्यात येऊन ठाकलं होतं,ज्याची तिनं स्वप्नातही कल्पना केली नव्हती. "पढी- लिखी लड़की"असायला हवी,ही आजकाल मुलीच्या लग्नाच्या बाबतीत अट असू लागल्यामुळे तिनं लेकीला चवथीपर्यंत शिकवलं होत ,स्वयंपाक-पाणी,घरकाम शिकवलं होतं. "आता वयात येताच लेकीचं लग्न लावून दिलेलं बरं,आपण कामावर गेल्यावर आपल्या माघारी हिचं रक्षण कोण करणार!" काळजीनं तिचं मन थाऱ्यावर राहीना."आपला नवरा ना माझं रक्षण करत,ना मुलीचं!स्वतःचंच जो रक्षण करीत नाही,तो इतरांचं रक्षण काय करणार म्हणा!"अनिताच्या मनात विचार आला होता.
"अनिता,उद्या जरा लवकर येऊन चांगलासा स्वयंपाक कर ना !साहेबांचे मित्र यायचेत,जेवायला घातल्याशिवाय पाहुण्यांना कसं बरं जाऊ द्यायचं ?पोलीस अधिकारी आहेत ते!" मालकीणबाई म्हणाल्या,"जायची घाई करतील,आपला स्वयंपाक तयार असलेला बरा!"
"मॅडमजी आपकी इच्छा सर-आँखोंपर !"कृतज्ञ स्वरांत अनिता त्यांना म्हणाली.त्याबरहुकूम तिनं दुसऱ्या दिवशी लवकर येऊन रात्री साडे आठ वाजता मन लावून केलेला रुचकर स्वयंपाक तयार ठेवला. "मॅडमजी,पोळ्या गरम गरम वाढूयात ना?"तिनं विचारलं . 
"असं कर,पोळ्या करूनच ठेव कॅसेरॉल मध्ये!"मालकीणबाई तिला म्हणाल्या,"ते एवढ्यात पोहोचतील."
"मॅडमजी,माझी काळजी करू नका,तुमची इच्छा असल्यास मी वाढेन,मागची आवराआवर करेन आणि मगच जाईन घरी !"अनिता त्यांना म्हणाली.मालकीणबाईंनी हसून मूक संमती दिली,तशी आपल्यावर त्या विश्वासानं जबाबदारी टाकतात,ह्या कल्पनेनं तिला बरं वाटलं.
ठरलेल्या वेळी पाहुणे आल्यावर मालकीणबाईंनी अनिताच्या मदतीनं त्यांचं चांगलं आगतस्वागत केलं,पटापट जेवणं उरकली आणि त्यांनी सहज म्हणून टीव्ही लावला,तेव्हा चॅनेलवर ब्रेकिंग न्यूजमध्ये चॅनेलचा रिपोर्टर फोनवरून त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची,लहान मुलीला कुणी रासवट धिप्पाड मुलगा फरफटत नेत असल्याची ,तिच्या रक्षणार्थ मदतीला धावून गेलेल्या कम्प्युटर इंजिनीअर वरच्या हल्ल्याची बातमी देत होता."मला लगेच निघावं लागणार,काहीतरी गंभीर घटना घडलीये," पोलीस अधिकारी असलेले पाहुणे लगोलग गेले सुध्दा,पण मालकीणबाई आणि मागची आवराआवर करणाऱ्या अनितानं ती बातमी पूर्ण ऐकली.पाठोपाठ दाखवल्या गेलेल्या व्हिज्युअल्सकडे बघताच हातापायातलं त्राण जाऊन अनिता मटकन खाली बसली आणि रडू लागली.मालकीणबाईंना कळेना काय झालं ते!त्यांनी मायेनं तिच्या पाठीवरून हात फिरवला,तेव्हा तर तिचा बांध फुटला. " मॅडमजी ,त्या दुष्टानं घात केला हो,ती बघा माझी मुलगी,आशा,आणि तो मुलगा ...गोलगप्पा... त्या पाणीपुरीवाल्याचा मुलगा!"
प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मालकीणबाई आणि त्यांचे पती तिला लगोलग तिच्या घरी घेऊन गेले. तिच्या खोलीचं दार उघडं होतं. नवरा दारूच्या नशेत चूर होऊन पडला होता,त्याला कसलीच शुद्ध नव्हती. 
"गोलगप्पा ... गोलगप्पा ... गोलगप्पा... "अनिताच्या मतिमंद मुलानं दाराकडे बोट दाखवत म्हटलं. पुन्हापुन्हा तो तेच म्हणू लागला. 
मालकीणबाईंच्या पतीनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून विस्तृतपणे घडलेली गोष्ट सांगितली आणि ते लगोलग तिला तिच्या मुलासमवेत गाडीत घालून त्या अधिकाऱ्याकडे निघाले. 

त्या चॅनेलनं केलेल्या माऱ्यामुळे पोलीस यंत्रणा लगोलग कामाला लागली होतीच;पण आता मालकीणबाईंच्या आणि साहेबांच्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यात जातीनं लक्ष घातल्यामुळेपोलिसांनी दहा मिनिटांत त्या रासवट,गुंड मुलाला चोरलेल्या मोटारसायकलसह ग्रेटर नोएडात पकडलं होतं.
                              ******************************************
श्रुतीला त्या रात्री उसंत म्हणून मिळाली नव्हती.त्या विषयावरचे आणखी कार्यक्रम चॅनेलनं आयोजित केले होते,आणि नं थकता श्रुती त्याचं सूत्रसंचालन करत होती.इतर चॅनेल्सकडे कुणी बघतही नव्हतं.
लगोलग रात्री नोएडातली तरुणाई घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आपापल्या मोटारसायकली घेऊन घोषणा देत निघाली होती.सोशल मीडियावर निषेधाचा महापूर लोटला होता. 
अष्टौप्रहर जाग्या असलेल्या महानगराला,त्यातल्या यंत्रणांना जाग यावी म्हणून इतर चॅनेल्सपण त्या विषयावर भाष्य करू लागले होते.
थरथर कापणाऱ्या आशाला आणि रडून रडून डोळे कोरडे झालेल्या अनिताला आधार द्यायला मालकीणबाई आणि त्यांचे पती दोघे उशिरापर्यंत तिच्या घरी बसले होते.दुसऱ्या दिवशी सकाळी दोघींना पोलीस स्टेशनमध्ये दोघे नवराबायको घेऊन जाणार होते. अनिताचा नवरा आता उठून बसला असला, तरी त्याला काहीच कळत नव्हतं.
"गोलगप्पा ... गोलगप्पा ... गोलगप्पा... "अनिताच्या मतिमंद मुलानं दाराकडे बोट दाखवत म्हटलं आणि तो आपल्या बहिणीला जाऊन बिलगला.थरथर कापणारी आशा आणखी थरथरू लागली आणि अनिताच्या कोरड्या झालेल्या डोळ्यांतून संतापाच्या ठिणग्यांबरोबर आसवांचीही धार लागली.
"मैं कौन हूँ ?एक अभागन ?आशा की माँ ,की ह्या व्यसनी नवऱ्याची बायको की ह्या प्रेमळ मालकीणबाईंकडे काम करणारी स्वयंपाकीण की नुसतीच विखुरलेल्या या समाजात अत्याचार करायला टपलेल्यांसाठी सहज उपलब्ध असलेल्या अनेक सावजांपैकीचं एक सावज?कौन हूँ मैं ?"तिचं मन आक्रन्दू लागलं . 
महानगर निर्विकारपणे आपल्या गतीनं जात होतं. महानगरातल्या लोकांच्या सुखदु:खाशी महानगराला काही देणं घेणं नव्हतं . 
                     ****************************************************** 
रश्मी घटवाई ,मुंबई 
९८७१२४९०४७      

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी