मेट्रोतल्या बायका :लेख:३८)दीपशिखा
मेट्रोतल्या बायका :लेख:३८)दीपशिखा
दीपशिखा
-रश्मी घटवाई
वसुधाअक्कांच्या मोबाईलची बेल सारखी वाजू लागली,तेव्हा आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून वसुधाअक्कांनी फोन उचलला .
"वसुधाअक्का बोलताहेत का?मला जरा त्यांच्याशी महत्वाचं काम होतं.याआधी दोनतीनदा फोन केला,पण कुणी उचलला नाही.... "
"हं मघा बऱ्याच ट्रॅफिक मधून चालवत होते गाडी,म्हणून नाही उचलता आला फोन.आता बाजूला लावलीये गाडी.बोला !"वसुधाअक्का म्हणाल्या.गाडी चालवताना फोनवर बोललं तर लक्ष विचलित होतं अपघाताचा धोका संभवतो,म्हणून त्या कटाक्षानं फोन घेत नसत.एकदा आपल्या कामाच्या जागी किंवा गर्दी नसलेल्या ठिकाणी पोहोचल्या,की मग त्या बोलायचं राहिलेल्या फोनवर पुन्हा संवाद साधत .
"मॅडम मी जागृती बोलतेय.आम्ही दुसऱ्या राज्यातून मुंबईत आमची जुनी गाडी आणतोय कारण आम्ही दुसऱ्या राज्यातून इथे मुंबईला बदली होऊन येतोय.पण इथे त्या गाडीची नोंदणी करण्यात खूप अडचणी येताहेत.कुणी तरी आम्हाला तुमचं नाव सुचवलं.पण तुम्ही मोठया लोकांच्या,मोठ्या गाडयांची कामं करता ,कॉर्पोरेट्स साठी काम करता असं कळलं .. अहो आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत ,साधीच गाडी आहे आमची !"जागृतीनं एका दमात सांगून टाकलं.वसुधाअक्कांना हसू आलं.नं बघताही ही जागृती कशी असावी याचा त्यांना अंदाज आला."हे बघा,असं काही नाहीय,तुम्ही भेटायला येऊ शकता का?कुणाची गाडी आहे?"
"माझ्या पप्पांची.आम्ही आज मुंबईत येतोय दोन दिवसांसाठी."
वसुधाअक्कांनी तिला त्याच दिवशी संध्याकाळी भेटायला या म्हणून सांगितलं आणि त्या पुन्हा गाडी चालवत आरटीओ मध्ये जायला निघाल्या.
"तुम्ही स्वतः एवढ्या श्रीमंत आणि मोठ्या-मोठ्या लोकांच्या ,मोठ्या गाड्यांचं काम बघणाऱ्या ... आमची आपली छोटीच गाडी आहे हो,तीही पाच वर्षं जुनी!"ठरल्यानुसार वसुधाअक्कां ना भेटायला म्हणून अंधेरीतल्या एका कॉफी शॉपमध्ये आलेली जागृती बिचकत बिचकतच पुन्हा त्यांना म्हणाली. जागृतीचे बाबा पण तिथेच होते.
"माझी मुलगी पण तुमच्याच वयाची आहे.पण एवढ्यातच तिचं लग्न झालंय.म्हणजे तिनी जरा लवकरच केलं लग्न !" जागृतीच्या मनातला गंड दूर व्हावा,म्हणून वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी वसुधाअक्कांनी जागृतीला सांगितलं .जागृतीनं प्रत्युत्तरादाखल स्मित केलं असलं तरी तिच्या मनात वसुधाअक्का कामाची अव्वाच्या सव्वा फी सांगणार बहुतेक असे विचार घोळत असल्याचं त्यांना स्वच्छ कळलं."आणि हो,तुम्ही टेन्शन नका घेऊ.माझी फी एकदम वाजवी आणि परवडणारी असते."त्या म्हणाल्या.
"तुम्ही अंधेरीतच राहता ना?ही तर एकदम पॉश आणि महागडी वस्ती आहे!"जागृतीच्या मनात विचारांचं चक्र सुरूच होतं.तिला या महानगरात वावरणं एकूणच कठीण वाटत होतं. आपण घाटकोपर सारख्या साध्यासुध्या ठिकाणी राहणार आहोत,म्हणून त्या पॉश ठिकाणी वावरण्याची तिला किंचित भीतीही वाटत होती.
"ते आता काही वर्षांपासून!२००५ सालापासून मी आणि माझी लेक,दोघी फुटपाथवर रहात होतो.जेवण काय असतं ,तेसुद्धा आम्हाला ठाऊक नव्हतं .लहानमोठी कामं करत ,तुटपुंजे पैसे मिळवत ,लोकांच्या नजरांपासून वाचवत,कसंबसं आम्ही जीवन कंठत होतो. पण एक ध्येय होतं .मुलीला शिकवायचं. मीसुद्धा शिकलेय,पण कन्नड माध्यमातून.लेकीला शाळेत प्रवेश मिळत नव्हता,त्यासाठी सुद्धा मला लढा द्यावा लागला.मी तिला कन्नडमधून इंग्रजी शिकवत गेले. आज लेक फर्ड्या इंग्रजीत बोलते. तिनं बीकॉम करून नुकताच एमबीएला प्रवेश घेतलाय.पार्ट टाईम नोकरी पण करते ती. "
"पण मग आज इथे कशा?"विस्फारलेल्या नजरेनं जागृतीनं वसुधाअक्कांकडे बघितलं. रॅग्ज टू रिचेस म्हणजे अठराविश्वे दारिद्र्यातून संपन्नतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अनेकांबद्दल तिनं ऐकलं होतं , वाचलं होतं. "वसुधाअक्का त्यापैकीच एक आहेत." तिच्या मनात आलं.
"तुम्ही माझ्यासारख्या अनोळखी मुलीला स्वतः बद्दल सांगता आहात ,म्हणून थोडं आश्चर्य वाटतंय .." जागृतीनं काहीशा अविश्वासानं त्यांना म्हटलं ,तशी वसुधाअक्का हसल्या.
"तुम्हाला नं बघताही तुमच्या फोनवरच्या बोलण्यातून मला जाणवलं की गाडीचं काम होत नाहीये म्हणून तुम्ही लोक वैतागलेले आहात,त्याचवेळी हे काम करण्याचे मी भरपूर पैसे मागेन ही पण धास्ती तुमच्या मनात आहे. प्रत्यक्ष भेटीत तर माझ्या या महागड्या वस्तीत राहण्यामुळे तुम्ही थोडे साशंक झाले आहात,असं मला वाटतं आहे. कार्पोरेट्सच्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन करण्याचं माझं काम आहे, त्यांच्याकडून मी बऱ्यापैकी पैसे घेते.पण सर्वसाधारण लोकांकडून मी कामाचे वाजवी पैसेच आकारते, पैशासाठी अडवणूक करीत नाही. या मायावी महानगरात मुलीला आणि मला मी सांभाळलं,ते शिक्षणाच्या बळावर! "आडून आडून आणि प्रत्यक्षपणे अशा दोन्ही मार्गांनी वसुधाअक्का आपल्या चोख कामाबद्दल जागृतीला सांगत राहिल्या. "आणि खरं सांगू का, कार्पोरेट्सच्या गाड्यांचं रजिस्ट्रेशनचं , फिटनेसचं काम बायका तर सोडाच,पण पुरुष सुद्धा करीत नसल्यामुळे या कामात माझी मोनोपली आहे.म्हणून तर लोकांनीच मला अक्का ही उपाधी दिली आहे."
"पण मग या कामाला तुम्ही सुरुवात कशी केली?"जागृतीनं कुतूहलानं विचारलं.
"एका मोठ्या कंपनीतल्या मॅडमनी नि साहेबांनी आधी कुणा दुसऱ्या माणसाला आपल्या लाखो रुपयांच्या कमर्शियल गाड्यांचं फिटनेसचं काम करायला दिलं होतं.त्यानं फसवणूक करून त्या सगळ्या गाड्या स्वत:च्या नावावर दाखवल्या आणि मग मॅडमना नि साहेबांना खूप मनस्ताप झाला. इतर कुणाला ते काम करण्यासाठी वेळ नव्हता,म्हणून मॅडमनी नि साहेबांनी मला विचारलं आमचं एवढं काम करून द्याल का,ते काम मी पूर्ण केलं आणि आपसूकच ह्या प्रकारची कामं माझ्याकडे चालत येऊ लागली. "वसुधाअक्का म्हणाल्या.
"पण मग फुटपाथवर कशा काय ..."
"नवरा ..खरं म्हणजे नवऱ्याची व्यसनाधीनता .. त्यामुळे कर्जबाजारी झालो,घर,गाडी,नवरा,सगळंच त्याच्या त्या व्यसनानी गिळंकृत केलं." वसुधाअक्का म्हणाल्या.इत की वर्षं त्यांनी मनात ठेवलं होतं,ते सगळं त्या अनोळखी मुलीला सांगून त्यांनी मनावरची काजळी स्वच्छ केली. ती दीपशिखा पुन्हा आपल्या तेजानं झळाळू लागली. "चला,तुमचं काम झालं म्हणून समजा हं !"त्या म्हणाल्या,तशी जागृती निश्चिन्त झाली.
महानगर आपल्या गतीनं चालू लागलं आणि महानगरातली माणसंही.
***************************
"हॅलो ,मॅनेजर साहब से बात करनी है . मैं रेश्मा सिंग बोल रही हूँ शिव सिंग की पत्नी ." रेश्मानं
घाईघाईनं नवऱ्याच्या ऑफिसमध्ये फोन केला.
"शिव सिंग कौन ?"पलीकडून पृच्छा झाली.
"जी वो ड्रायव्हर हैं.मॅनेजर साहब से बात करनी है"तिनं पुन्हा एकदा विनंतीच्या सुरात म्हटलं . पलीकडच्यानं रिसिव्हर मॅनेजरला देईपर्यंत तिच्या मनात विचारांची उलट-सुलट आंदोलनं सुरु होती. त्या ट्रॅव्हल कंपनीच्या मुख्यालयात तिचा नवरा कामाला होता आणि त्या ट्रॅव्हल कंपनीची मुंबईहून विविध पर्यटन स्थळी जाणारी प्रवासी बस चालवण्याचं काम तो करीत होता. आता-आतापावेतो सगळं सुरळीत सुरू होतं ,पण एवढ्यात,तो पर्यटनस्थळी बस घेऊन जातोय असं सांगून दिवसचे दिवस घरातून गायब असतो,ड्युटीवर जातोय असं सांगून तो अन्यत्र जात असावा,त्याला वाईट संगत लागली असावी आणि त्यांच्या संगतीत तो रात्रंदिवस दारू पिऊन पडला रहात असावा असा संशय रेश्माला येऊ लागला होता.शिव सिंग दारू पिऊन प्रवासी बस चालवत असेल,तर प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होईल,या कल्पनेनंच रेश्माचा जीव घाबराघुबरा झाला होता,म्हणून तिनं सामाजिक संकेत बाजूला
ठेवून त्या ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिसमध्ये फोन केला होता.त्याच्या वरिष्ठांना आपण स्पष्ट सांगितलं तर नवऱ्याची मानहानी होईल ,कदाचित त्याला कामावरून काढून टाकण्यात येईल,नवऱ्याच्या मनातून आपण उतरू, तो डोक्यात राख घालून घेईल आणि कायमचं सोडून जाईल,ही भीती तिच्या मनात थैमान घालत होती. पण तिच्यासारखी अल्पशिक्षित स्त्री विचारणार तरी कोणाला होती.त्यामुळे अनेक दिवस मनात घालमेल झाल्यानंतर तिनं धीर एकवटून मॅनेजरशी बोलायचं ठरवलं होतं.
"सर क्षमा चाहती हूँ फोन करने के लिये.शिव सिंग माझे पती आहेत.तुमच्या प्रवासी बस ते चालवतात, पर्यटन स्थळी घेऊन जातात. "
"बरोबर." मॅनेजरनी म्हटलं.त्याच्या बायकोनं फोन का केला असावा याचा त्याला अंदाज येत नव्हता.
"सर एक विनंती आहे. म्हणजे पतीची किंवा तुमच्याकडे काम करणाऱ्या सगळ्या ड्रॉयव्हर्सची कधी,कुठे ड्युटी लागते,किती दिवसांसाठी ते बाहेरगावी जातात , ह्याची त्यांच्या घरच्यांना कल्पना नसते,त्यांना अचानक जावं लागतं ,अशावेळी घरचे खूप काळजीत असतात .अनेकदा मुलांच्या शाळेत पालक-शिक्षक मिटिंगसाठी,घरच्या आजारी व्यक्तींना डॉक्टरकडे नेण्यासाठी कुटुंबप्रमुखाची गरज भासू शकते. सर जर आम्हा ड्रायव्हर्सच्या पत्नींना तुम्ही जर त्यांच्या ड्युटीबद्दलचं शेड्युल अगोदर कळवलं,तर आम्हाला त्याप्रमाणे सोय करता येईल.आणखी एक विनंती सर,मी फोन करून हे सांगितलं हे माझ्या पतीला नका कळवू सर!"रेश्मानं एका दमात बोलून झाल्यावर दीर्घ श्वास घेतला.
"ठीक आहे. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कळवा,मी तुम्हाला तुमच्या पतीच्या ड्युटीबद्दलचं वेळापत्रक तुमच्या विनंतीवरून पाठवायची व्यवस्था करतो.त्यांना नाही सांगणार "मॅनेजरनं तिला आश्वस्त केलं.
"सर आणखी एक!तुमची ट्रॅव्हल कंपनी नामांकित आहे.अनेक मोठे-मोठे लोक तुमच्या प्रवासी बसनी पर्यटन स्थळी प्रवास करतात.इतक्या लोकांची सुरक्षा ज्याच्या हातात असते,त्या ड्रायव्हरनी पुरेशी झोप घेतली आहे ना,त्यानं मद्यपान तर केलं नाही ना,तो बस चालवतांना काळजीपूर्वक बस चालवतो आहे ना,हे सगळं बघता ना?लहान तोंडी मोठा घास घेते आहे सर... "
"ड्रायव्हरनी मद्यपान केलं नाही याची तपासणी आम्ही यापुढे अधिक काटेकोरपणे करीत जाऊ. तुमची सूचना चांगली आहे. "मॅनेजरनं तिला सांगितलं.रेश्मानं त्याचे आभार मानून फोन ठेवला,तेव्हा पतीला खाली नं दाखवता,त्याची बेइज्जती होऊ नं देता आपण कुशलतेनं ही बाब हाताळली कशी;याचं तिला राहून राहून नवल वाटत राहिलं. तिच्या मनावरचं मणामणाचं दडपण दूर झालं.देवासमोर ठेवलेल्या, विझत आलेल्या दिव्यातली ज्योत सारखी करून तिनं त्यात चमचाभर तूप घातलं आणि श्रद्धापूर्वक देवाला नमस्कार केला.दीपशिखा उजळून निघाली.महानगराला कधी अंधारानं ग्रासलं,तरी तिचा प्रकाशमिणमिणता का असेना,अंधाराला दूर सारायला ती समर्थ होती.
______________________________ ______________________________ ________
-रश्मी घटवाई ,मुंबई
९८७१२४९०४७
Comments
Post a Comment