मेट्रोतल्या बायका :लेख ४१)प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी

मेट्रोतल्या बायका :लेख ४१)प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी
प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी 
-रश्मी घटवाई 

"संपदा,तुझ्या खोलीत विनाकारण पंखा सुरु आहे,खोलीत कुणीही नाहीये,तो पंखा बंद कर पाहू आधी ! " वरदा बैठकीच्या खोलीतून जोरात ओरडून संपदाला म्हणाली. प्रत्युत्तर आलं नाही,म्हणून तिनं अंमळ रागावून संपदाला पुन्हा एकदा तेच सांगितलं. 
"अगं दोन मिनिटं पंखा सुरु राहिला तर काही बिघडत नाही. आईनी मला हे कपडे वॉशिंग मशिनमध्ये धुवून वाळवायला सांगितले होते,तेच काम करतेय मी!आणि एवढंच खटकतंय तर स्वतः उठून जरा बंद कर ना पंखा!"संपदानं बाल्कनीतून चिडून उत्तर दिलं आणि ती पुन्हा बाल्कनीतल्या दोरीवर कपडे वाळत घालण्याच्या कामात गुंतली.
"मी पण वीज-पाण्याची बिलं ऑनलाईन भरण्याचं,आईनी सांगितलेलंच काम करतेय."वरदा म्हणाली.  "अगं,अगं,किती भांडाल...जुळ्या बहिणी आहात,इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहात,असं कुणी म्हणेल?"आई पोळ्या करता करता स्वयंपाकघरातून बाहेर डोकावली."आता पटापट आवरा,तुम्ही दोघींनी तुमच्या दोन मैत्रिणींना जेवायला बोलावलंय याची आठवण आहे ना?त्या दोघी यायच्या आत माझा स्वयंपाक तयार व्हायला हवा,म्हणजे आपली जेवणं लवकर आटपतील!"
"आई ,इथे इंटरनेटवर बातमी आहे,आज आपल्या भागातल्या पाईपलाईनच्या काही दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा दुपारी बारा ते तीन या वेळात बंद राहणार आहे म्हणून!" लॅपटॉपवर वीज-पाण्याची बिलं भरता-भरता वरदानं बहुमूल्य माहिती दिली."एकट्या आईचीच आंघोळ झालीये,चला आपल्याला लवकर लवकर आंघोळी उरकाव्या लागतील.लवकर जेवणं आटपून बाईंना भांडी घासायला द्यावी लागतील.."वरदानं लॅपटॉप बाजूला ठेवला आणि ती आंघोळीसाठी उठली.संपदानं वरदाचं बोलणं ऐकून,पाणी भरलेलं असावं म्हणून पिण्याच्या पाण्यानं मोठी भांडी आणि वापराच्या पाण्यानं बादल्या भरून ठेवल्या."मुंबईत वीज-पाणी जात नसल्यामुळे अशी वेळ क्वचित येते.तरी व्यवस्था असलेली बरी!"तिनं विचार केला.मुलींना सांगावं लागलं नाही,त्यांनी स्वतःच समजूतदारपणे पाण्याचं नियोजन केलं म्हणून आईनं भाष्य केलं नसलं तरी ती मनोमन सुखावली.
दोघींच्या मैत्रिणी आल्यावर मुलींच्या चिवचिवाटानं घर हसरं झालं, रुचकर चविष्ट भोजन आणि गप्पा गोष्टींमध्ये वेळ कसा गेला,तेही कुणाला कळलं नाही.घरकाम उरकून मोलकरीण गेली,तशी पाणी गेलं आणि बातम्यांमध्ये शुभवर्तमान झळकलं की मुंबईतल्या त्यांच्या भागात दुरुस्ती दरम्यान पाईपलाईन फुटल्यामुळे आणखी किमान दोन दिवस तरी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
"बघ आपण पाण्याची वारेमाप उधळपट्टी करतो,आता तोलून मापून पाणी वापरावं लागेल!देवानीच तुला सुबुद्धी दिली ती बातमी वाचण्याची आणि म्हणून भरपूर पाणी भरून ठेवण्याची."संपदा वरदाला म्हणाली. "खरंच एखादी गोष्ट सहजासहजी उपलब्ध असते,तेव्हा आपल्याला तिची किंमत कळत नाही,पण ती नसेल,तेव्हा तिच्यावाचून किती अडतं आणि मग आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळतं . " मैत्रिणी वरदाला म्हणाल्या."पण आपण या संधीचा उपयोग करून एक शॉर्टफिल्म- डॉक्युमेंटरी म्हण, तयार करूया." वरदा म्हणाली,तशी चौघी जणी त्याची स्क्रिप्ट लिहिण्यात आणि मोबाईलवर सगळं रेकॉर्ड करण्यात  गुंतल्या.

"अलीकडे आपली जीवनशैली नको इतकी पर्यावरणासाठी घातक होते आहे,म्हणजे वापरा आणि फेका या पद्धतीचा अंगिकार करताना आपण वस्तूचं महत्त्वच विसरत चाललोय.बहुतांश वेळा एखाद्या वस्तूचा पुरेसा वापर करून व्हायच्या आत ती टाकून देऊन तीच वस्तू नव्यानं आणली जाते.वस्तूची किंमत माहिती असली तरी आपण त्याचं मूल्यच हरवलंय ."संपदा म्हणाली  
"आजच्या घडीला पर्यावरण ऱ्हासासाठी अनाठायी मुबलकता म्हणजे "प्रॉब्लेम ऑफ  प्लेन्टी " सुद्धा तितकाच जबाबदार आहे.कसा तो बघा;आपल्या घरात दोन मुले असतात नी वीस मुलांना पुरतील, एवढे कपडे असतात.आज जवळ जवळ प्रत्येक मध्यमवर्गीय घरात,कपाटात मावणार नाहीत,एवढ्या साड्या -कपडे असतात. प्रत्येक कार्य-प्रसंगाच्या वेळी ठेवायला जागा पुरत नसते,तरीही भेटवस्तू,साड्या ह्यांचे ढीग अहेर म्हणून येतात आणि कहर म्हणजे कुठल्या लग्नाला वगैरे जायचं असेल,तेव्हा तिथे घालण्यासाठी साजेशी साडीच आपल्याजवळ नसल्याचा साक्षात्कार बहुतेक वेळा बहुतेकींना होतो. एके काळी दोन घरातले नी दोन बाहेरचे आणि दोन ठेवणीतले कपडे असायचे.लहान भावंडे मोठ्या भावंडांची दप्तरे,शालेय पुस्तके आणि इतर सामग्री वापरत.अर्थात हा सगळा जमाना आमच्या आधीच्या पिढीचा होता."वरदा म्हणाली."आता गरज आहे मिनिमलिस्टिक लिव्हिंग म्हणजे गरजेपुरत्याच वस्तूंसह जीवन जगण्याची,वस्तूंच्या हव्यासापायी मागणी पुरवठ्याच्या गणितानुसार होणारा संसाधनांचा अपव्यय टाळण्याची !"
"पूर्वीच्या काळी लग्नकार्यांत पंक्तींमध्ये पत्रावळींवर आणि द्रोणांमध्ये रुचकर भोजन वाढलं जायचं. पळसाच्या पानांच्या या पत्रावळी इकोफ्रेंडली होत्या.आज मात्र थर्मोकोलच्या,ज्यांचं विघटन होणार नाही,अशा यूज 
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
अ‍ॅ
ण्ड
​  थ्रो प्लेट्स ,प्लास्टिकचे चमचे वापरले जातात .हे पर्यावरणाच्या दृष्टीनं खूप घातक आहे."संपदाची मैत्रीण म्हणाली. 
"लग्नकार्यांत अन्न वाया जातंच,रिसेप्शन किंवा अन्य पार्ट्यांत वाया जाणारं अन्न बघून, ह्या देशात दारिद्र्यरेषेखाली  असणारे किंवा ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही असेही लोक आहेत,ह्यावर विश्वास बसणार नाही.भारतात अनेक लोक उपाशी राहतात,तेव्हा सर्वांनीच अन्नाची नासाडी टाळली पाहिजे. "वरदाची मैत्रीण म्हणाली.
"ही पृथ्वी,ही जमीन,ही हवा,हे पाणी,हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा म्हणून दिलेले नाही; तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीकडून मिळालेले ते ऋण आहे;त्यामुळे आपल्याला ज्या स्थितीत हे सारं मिळालं; किमान त्या स्थितीत ते पुढच्या पिढीच्या सुपूर्द करायचं आहे."गांधीजींच्या या वचनाची जाणीवही आपल्याला सतत व्हायला हवी."संपदा म्हणाली . 
"The earth does not belong to man;man belongs to the earth;"असं अमेरिकेतल्या सिएटलच्या रेड इंडियन आदिवासी जमातीच्या प्रमुखानं  अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाला सन1800 च्या सुमारास लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखानं त्यांची जमीन विकत घेण्याबद्दल त्याला पत्र लिहिलं होतं,त्याला उत्तर देताना त्यानं पुढे म्हटलं होतं,"कुणी आकाश किंवा जमीन कसं काय खरेदी करू शकतं किंवा विकू शकतं? ही पृथ्वी आमची माता आहे.तिच्यावर काही आपत्ती येणं म्हणजेच तिच्या मुलांवरही आपत्ती येणं! या नद्या आम्हाला बंधुतुल्य आहेत..."दोनशे वर्षांपूर्वीचं त्याचं ते सबंध विवेचन आजही तितकंच यथार्थ आहे. त्याला तेव्हा जे कळलं,ते आज इतकी प्रगती होऊनही मनुष्याला उमगत नाहीये,ही खरी शोकांतिका आहे."वरदा म्हणाली.     
"२२मार्च हा विश्व जल-दिन,२२ एप्रिल हा वसुंधरा दिन आणि ५ जून रोजी दर वर्षी विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो. वस्तुत:प्रत्येक दिवस हा जल-दिन, वसुंधरा दिन आणि पर्यावरण दिवस मानून आपण प्रत्येकानं अगदी आपल्यापुरती आणि आपल्या कुटुंबीयांपुरती म्हणजे आपापल्या पातळीवर जरी पाण्याची नासाडी टाळली आणि पर्यावरणाची काळजी घेतली,तरी खूप काही साध्य होण्यासारखे आहे !"चौघींनी कळकळीनं संवाद म्हटले आणि सगळं काही मनासारखं झाल्यावर चौघींनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा आपला लघुपट सोशल मीडियावर टाकला.थोड्याच वेळात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. 
"'चॅरिटी बिगिन्स 
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
​​
अ‍ॅ
ट होम,अशी इंग्रजीत म्हण आहे.म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करायची!तुम्ही जे सांगितलं ,ते मला तंतोतंत पटलं.म्हणून तर मी ही भेळ पळसाच्या पानांच्या द्रोणात आणलीये!आणि पुरीच्या रूपात खाण्याजोगा चमचा पण आहे."आईनं डोळे मिचकावत म्हटलं. इतका वेळ मुलींची क्रिएटिव्हिटी ती गुपचूप बघत होती."काही दिवसांपूर्वी पूजेसाठी आणलेल्या जास्तीच्या पत्रावळी आणि द्रोण,पाणी नसतांना अडचणीच्या वेळी कामी आले म्हणायचे!"ती म्हणाली. तोवर आपापले मोबाईल फोन बाजूला ठेवून चौघीजणी भेळेचा आस्वाद घेण्यात गढल्या होत्या. 
महानगर नं होऊ शकलेला पाणीपुरवठा,पाणीकपातीसारख्या समस्यांनी ग्रस्त होतं,त्रस्त होतं . महानगरातल्या काहीजणींनी त्यावर आपल्यापुरता मार्ग काढला होता.
                                    ***************************
त्या आलिशान दुकानात,देश-विदेशातल्या वस्त्रांची मांदियाळी अवतरली होती.देशातल्या नामवंत मॉडेल्स त्या वस्त्रांची जाहिरात करण्यासाठी सुसज्ज होत्या.पत्रकारांची आणि फोटोग्राफर्सची लगबग सुरु होती."मग तुम्ही आपले कपडे कसे आणि कुठून खरेदी करता?"एका फॅशन फोटोग्राफरनं करिअरच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या,वैभव पायाशी लोळण घेत असलेल्या मॉडेलला विचारलं. 
"यू नो ,मी विदेशातून कपडे खरेदी करते.एकदा परिधान केलेले कपडे मी कधीच पुन्हा घालत नाही, पण ते माझ्या कलेक्शन मध्ये असतात.आय हॅव ह्यूज कलेक्शन ऑफ क्लोद्स्...मुंबईतल्या माझ्या या अपार्टमेन्ट मध्ये माझे कपडेच मावत नव्हते,सो कपडे ठेवण्यासाठी म्हणून मी सबर्ब्जमध्ये,मुंबईच्या उपनगरांमध्ये नुकतेच तीन फ्लॅट्स खरेदी केलेत."तिनं अंगावरची तोकडी वस्त्रं नीट करत त्याला सांगितलं आणि सहज म्हणून दुकानाच्या प्रशस्त खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. त्या आलिशान दुकानाचा रखवालदार एका भिकारणीला हाकलत होता.लज्जारक्षणापुरतं गुंडाळलेल्या एका फटकुराशिवाय तिच्या अंगावर पुरेशी वस्त्रं नव्हती आणि लाचार होऊन हात पसरून ती एखाद्या फाटलेल्या का असेना ,अंग झाकण्याजोग्या वस्त्राची याचना करत होती.विक्रेत्यांनी समोरच्या फुटपाथवर थाटलेल्या दुकानांत कपड्यांच्या हारी लागल्या होत्या आणि बायका मुली घासाघीस करत कपड्यांची खरेदी करीत होत्या. 

महानगर निरनिराळ्या वाणानी सजलं होतं,बाजार कपडे आणि वस्तूंच्या मुबलकतेनी ओसंडून वाहत होते. महानगरातले लोक त्या अनाठायी,अनावश्यक मुबलकतेपायी भरमसाठ खरेदी करण्याच्या मोहात गुरफटून गेले होते. 
____________________________________________________________________
-रश्मी घटवाई ,मुंबई 
९८७१२४९०४७

Comments

Popular posts from this blog

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख१०:चौथी सीट

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:२२:लंचटाईम

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख:24:माणुसकी